मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|देवी विजय| अध्याय पाचवा देवी विजय श्रीनित्यानंदतीर्थ यांचा परिचय देवीची पूजाविधी व फलप्राप्ती मंगलाचरण अध्याय पहिला अध्याय दुसरा अध्याय तिसरा अध्याय चौथा अध्याय पाचवा अध्याय सहावा अध्याय सातवा अध्याय आठवा अध्याय नववा अध्याय दहावा अध्याय अकरावा अध्याय बारावा अध्याय तेरावा अध्याय चौदावा अध्याय पंधरावा अध्याय सोळावा श्रीदुर्गास्तोत्र श्रीमहालक्ष्मी स्तोत्र नामावली जप नवरात्रसंकल्प श्रीमहालक्ष्मीची आरती अध्याय पाचवा श्रीनित्यानंदतीर्थविरचित श्रीमार्कण्डेयपुराणांतर्गत श्रीदेवीविजय. Tags : devimarathipuranदेवीपुराणमराठी अध्याय पाचवा Translation - भाषांतर ॥ श्रीगणेशाय नमः ॥ ऋषी म्हणे शुंभ - निशुंभ दोघेजण ॥ इंद्राचें सर्वस्व आपण ॥ त्रैलोक्य यज्ञभाग संपूर्ण ॥ बळचि जाण हरण केले ॥१॥हरिती सूर्याचा अधिकार ॥ मोडूनि टाकिला चंद्राचा थार ॥ अनधिकारी केले यमकुबेर ॥ वरुण अधिकार स्वयंचि करिती ॥२॥वायूवन्हीचें जे कर्म ॥ आपणचि करिती त्यांचा धर्म ॥ देवासी जिंकूनि अधम ॥ राज्यदुर्गम केले त्यांसी ॥३॥हरूनि देवाचे अधिकार ॥ देवा घातले राज्याबाहेर ॥ ते देवीसी स्मरती समग्र ॥ अपराजिता अव्यग्र तयेकाळीं ॥४॥आम्हां दिधला वर देवीनें ॥ आपत्काळीं मज स्मरा म्हणून ॥ तुमची आपदा नाश करीन ॥ क्षणमात्रें संपूर्ण म्हणितली ॥५॥देवांनीं करूनि विचार ॥ हिमवंत जो का नगेश्वर ॥ जाऊनि तेथें देवीसी समग्र ॥ विष्णूमाया फार तुष्टविली ॥६॥देव म्हणती देवी नमन ॥ शिवे सतत नमूं देवगण ॥ प्रकृति भद्रे नमन नेमानें ॥ करितो स्मरण निरंतर ॥७॥नित्येरौद्रे नमस्कार ॥ गौरीधात्री नमूं आदरें ॥ चंद्रसूर्यरूपें तेजस्वी अपार ॥ नमितों किंकर सुखस्वरूपें ॥८॥नमि त्या वृद्धिकारी कल्याणी ॥ नमन करूं सिद्धिकूर्मिणी ॥ लक्ष्मी नैरृती वसुधारिणी ॥ हेशवाणी नमन तुज ॥९॥हे दुर्गेदुर्गपारे ॥ सर्वकर्ते सर्वसारे ॥ कृष्णाख्याती निरंतर ॥ सतत धूम्रें नमूं तुज ॥१०॥सौम्यही तूं अति रौद्र ॥ नमन करूं तुज त्रिवार ॥ जग स्थापके नमस्कार ॥ देवी कृत्ये द्विवार नमूं ॥११॥हे देवी सर्वभूताच्या ठाईं ॥ तुज विष्णुमाया म्हणती पाहीं ॥ त्रिवार अमुचें नमन घेईं ॥ आणीक द्विवार नमूं तुज ॥१२॥देवी तूंचि सर्वांभूतीं ॥ बुद्धिरूपें करिसी वस्ती ॥ नमन आमुचें तुजप्रती ॥ जगज्योती पंचवार ॥१३॥अंबे तूं सर्व भूतांच्या ठायीं ॥ निद्रारूपें वससी पाहीं ॥ नमन आमुचें साष्टांग घेईं ॥ पंचवार पार्थीं कृपावंते ॥१४॥सर्व भूत हृदयस्थ ॥ क्षुधारूपें तूं राहत ॥ नमन आमुचें जगन्माते ॥ द्विवार तूं तें आणि त्रिवार ॥१५॥सर्व भूती छायारूपें ॥ राहसी तूं स्वस्वरूपें ॥ नमन तुजला निःपापे ॥ पाप धूपे पांचवेळां ॥१६॥शक्तिरूपें तूं आपण ॥ भूतमात्राच्या हृदयीं जाण ॥ राहसी तूंचि परिपूर्ण ॥ त्रिवार द्विवार नमन आमुचें ॥१७॥तृष्णारूपें भूतमात्रीं ॥ वास करिसी काळरात्रीं ॥ नमन तुज जगत्धात्री ॥ जगत्कर्ती पंचवार ॥१८॥शांतिरूपें तूं जगज्जननी ॥ भूतमात्र तितुके व्यापुनी ॥ वास करिसी भवानी ॥ नमूं तुजलागुनी पंचवार ॥१९॥देवी तूंचि सर्वभूतीं ॥ ज्योति रूपें करिशी वस्ती ॥ नमो नमो तुजप्रती ॥ शुद्धमती त्रिवार नमूं ॥२०॥श्रीराम लज्जारूपें तूं व्यापुन ॥ राहसी भूतमात्रीं आपण ॥ अंबे तुज त्रिवार नमन ॥ आणीकही जाण द्विवार नमूं ॥२१॥शांतिरूपें तूं व्यापक ॥ सर्व भूता देसी सुख ॥ आमुचें नमनपंचक ॥ ग्रहण करी सम्यक जननीये ॥२२॥श्रद्धारूपें भूतहृदयीं ॥ तुझें राहणें असें पाहीं ॥ नमोनमो आणीकही ॥ त्रिवारही तुला नमस्कार ॥२३॥कांतिरूपें तूंचि जननी ॥ वास करिसी भूतीं भवानी ॥ नमन देव चूडामणी ॥ घेईं मानुनी पंचवार ॥२४॥लक्ष्मीरूपें तूं जगीं ॥ राहसी ऐसे पाहतों सुंदरांगीं ॥ त्रिवार नमन चार्वांगी ॥ नमन साष्टांग द्विवार ॥२५॥वृत्तीरूपें तूंचि जाण ॥ सर्वांभूतीं तुझें राहणें ॥ नमोनमो नमोनमन ॥ आणीकही नमन तुज असो ॥२६॥स्मृतिरूपें तुजचि लागी ॥ व्यापक पाहतों जननी जगीं ॥ नमन घेई आमुचें वेगीं ॥ सुंदरापांगी पांच वेळां ॥२७॥तूं दयारूपें स्थिती ॥ देवी करिसी सर्वभूतीं ॥ नमो नमो नमो अतिप्रीती ॥ नमो नमो जन्ममूर्ती जननीये ॥२८॥तुष्टिरूपें तूं सहज ॥ सर्वाभूतीं राहणें तुज ॥ नमन आमुचें राजाधिराज ॥ पांचवार राजेश्वरी ॥२९॥मातृरूपें स्थिति करून ॥ भूतीभूता करिसी पाळन ॥ दोनितीनि मिळून ॥ पांचवेळा नमन कृपाळे ॥३०॥भ्रांतिरूपें करूनि तूंचि ॥ भूतीं राहोनि पाळकजगाची ॥ नमनी प्रीति आमुची ॥ म्हणोनि तुजची नमनपंचक ॥३१॥इंद्रियाची अधिष्ठात्री ॥ पाहतां तूंचि भूतमात्रीं ॥ नमो नमो जगत्धात्रीं ॥ मातासेव्य सावित्री तूंचि येक ॥३२॥चित्तीरूपें जगसकळ ॥ तुवांचि व्यापिलें स्वलीळें ॥ नमन आमुचें पांचवेळ ॥ चित्कल्लोळे असो तुज ॥३३॥पूर्वीं देवांनीं केलें स्तवन ॥ आश्रयिले अभीष्ट चिंतून ॥ इंद्रही सेवा करून ॥ स्वपद आपण पावला ॥३४॥सुरवर वरदे परमेश्वरी ॥ तूं आमुचे अशुभ नाश करी ॥ आपदा हरोनि लौकरी ॥ कल्याण करी शरणागताचें ॥३५॥सांप्रत आम्हां दुष्ट दैत्यांनीं ॥ ताप दिधला अतिशये करूनी ॥ या कारणें जगज्जननी ॥ शरण भवानी आलो तुज ॥३६॥स्मरण करितां तेचि वेळीं ॥ दुःखालागी करिसी होळी ॥ भक्तवृंदें नम्र झाली ॥ भक्ता पाळी जगदंबे ॥३७॥ऋषी म्हणे करितां स्तवन ॥ तेचि काळीं पार्वती आपण ॥ करावयां भागीरथीस्थान ॥ येती झाली आपण सुरथराजा ॥३८॥देवालागीं पार्वती म्हणे ॥ स्तवन करावया काय कारण ॥ देवीच्या शरीरापासूनि येक उत्पन्न ॥ ते म्हणे स्तवन करिती माझें ॥३९॥पार्वतीच्या देहापासून ॥ मूर्ती झाली येक उत्पन्न ॥ कौशिकी तिचें नामाभिधान ॥ समस्त लोकीं जाण विख्यात ॥४०॥ते देहांतून निघाली ॥ पार्वती ते कृष्णवर्ण झाली ॥ काळिका लोकीं नाम पावली ॥ हिमाचळी राहिली ते ॥४१॥तेव्हां अंबेनें सुंदर ॥ रूप धरिले मनोहर ॥ शुंभनिशुंभाचे चाकर ॥ चंडमुंडे पाहिलें तिसी ॥४२॥त्यांनी सांगितलें शुंभाशीं ॥ पाहोनि तिच्या सुंदरपणाशीं ॥ कोणी येक स्त्री हिमाचळप्रदेशीं ॥ सुंदर तिसी पाहिलीं राजा ॥४३॥तिच्या ऐसें रूप कोठेंही ॥ कोणाचेही देखिलें नाहीं ॥ जाणावें तुवां कोणाही ॥ असुरेश्वराही करी ग्रहण तूं ॥४४॥चार्वांगी सुंदर स्त्रीरत्न ॥ दिशा शोभे जिच्या अंगकांतीनें ॥ दैत्येंद्रा ते उभी असे जाण ॥ तीस पाहावया आपण योग्य होशी ॥४५॥रत्नें मणिकां जितुकी ॥ गजाश्वादि राजा तितुकीं ॥ जे कां नाहीं तिन्हीं लोकीं ॥ सांप्रत तितुकी घरीं तुझ्या ॥४६॥ऐरावत गजरत्न ॥ आणिलें इंद्राचें स्वर्गाहून ॥ पारिजात वृक्ष जाण ॥ उच्चैश्रवा ऐसे रत्नअश्वही ॥४७॥दिव्य विमान हंसयुक्त ॥ शोभे अहर्निशी राजा अंगणांत ॥ रत्नजडित सुशोभित ॥ वाहन जे कां ब्रह्मयाचें ॥४८॥महापद्मनिधीधन ॥ आणिलें तुवां कुबेरापासून ॥ कमळमाला आम्लान ॥ समुद्रापासून आणिली ॥४९॥श्वेतछत्र वरुणाचें ॥ आणिले असे सुवर्णाचे ॥ रथही आणिला तसाच ॥ ब्रह्मयांचा श्रेष्ठ तो ॥५०॥मृत्यूपासोनि शक्ती जाण ॥ बळेंचि आणीली हिरून ॥ आणीक पाशहरण ॥ वरुणापासून केलें असे ॥५१॥समुद्रापासूनि उत्पन्न ॥ रत्नजाती आणिल्या निशुंभानें ॥ वस्त्रें अर्पी भये अग्न ॥ उत्तम जाण तुजलागीं ॥५२॥ऐसी रत्नें समस्तें ॥ हरोनि आणिली दैत्यनाथे ॥ तुज ऐसे स्त्रीरत्न प्राप्त ॥ नसावें ते काय राजा ॥५३॥ऋषी म्हणे शुंभ दैत्यानें ॥ ऐकोनि चंडमुंडाचें वचन ॥ सुग्रीवनामा दैत्य त्याने ॥ देवीपाशी जाण पाठविला ॥५४॥देवीपासी तुवां जावें ॥ माझें वचन तिला सांगावें ॥ मज वश्य होईल प्रीतिभावें ॥ ऐसें करावें लाघव तुवां ॥५५॥हिमवंत शैलप्रदेशी ॥ दूत जाऊनि देवीपाशीं बोलतां झाला जगदंबेशी ॥ गोडगिरा अमृतप्राय ॥५६॥दूत म्हणे देवी दैत्येश्वर ॥ शुंभ त्रैलोक्याचा परमेश्वर ॥ मी चाकर त्याचा आज्ञाधार ॥ तुजपाशीं असुरें धाडिलें मज ॥५७॥माझी आज्ञा सर्वांवरी ॥ जरी झाला देवशरीरीं ॥ समरीं जिंकिले निर्जरी ॥ त्याची आज्ञा वैखरी ऐकें तूं ॥५८॥त्रैलोक्य माझें असें सकळ ॥ माझे चाकर देव समूळ ॥ यज्ञभाग भक्षी मी बळें ॥ वेगवेगळे सर्वही ॥५९॥त्रैलोकीं जे श्रेष्ठ रत्नें ॥ ते सर्वही मज आधीन ॥ जे कां देवेंद्राचें वाहन ॥ ऐरावतरत्न आणिलें म्या ॥६०॥अश्वरत्न देवें मजला ॥ समुद्रमंथनी उत्पन्न झाला ॥ नमन करूनि अर्पिला ॥ उच्चैश्रवा केला स्वाधीन मज ॥६१॥आणीकही देवापासून ॥ गंधर्व - उरगादि जे महान ॥ रत्नभूतपदार्थ जाण ॥ हरूनि स्वगृहीं संपूर्ण आणिलें म्यां ॥६२॥स्त्रीरत्न अतिअपूर्ण ॥ लोकीं मानितों मनोभावें ॥ तुवां मज वरावें ॥ मी रत्नभोक्ता सर्व जाणोनी ॥६३॥निशुंभ बंधू माझा धाकुटा ॥ लोकीं पराक्रम त्याचाही मोठा ॥ तूं स्त्रीरत्न मज उद्भटा ॥ होऊनि मोथा भोगभोगी ॥६४॥माझ्या परिग्रहें करून ॥ तूं ऐश्वर्य भोगिशील संपूर्ण ॥ तुवां मनीं विचार करून ॥ मुख्य राणी होय माझी ॥६५॥ऋषी म्हणे देवी ऐसें ऐकून ॥ हास्य करूनि बोले वचन ॥ दुर्गाभद्राभगवतीनामे येणें ॥ केलें धारण जगावया ॥६६॥सत्य मानितें तुझें भाषण ॥ तुझा बोला मिथ्या मी न म्हणे ॥ त्रैलोक्यपती शुंभ जाण ॥ निशुंभ तोही संपूर्ण तैसाची ॥६७॥परंतू मी आपुली प्रतिज्ञा ॥ मिथ्या करावी कैसी सुज्ञा ॥ ऐक अल्पबुद्धि मी अज्ञ ॥ पूर्वीं प्रतिज्ञा केली म्यांते ॥६८॥मज संग्रामीं जिंकील वीर ॥ माझ्या दर्पाचा करील परिहार ॥ मद्बळासमान असे जो थोर ॥ तोचि भर्ता होईल माझा ॥६९॥शुंभापासी तूं जाऊन ॥ निशुंभासही सांगे वर्तमान ॥ मज लौकरीच जिंकून ॥ पाणीग्रहण करी म्हणें ॥७०॥तो म्हणें देवी तूं कासयाशीं ॥ इतुका कां गर्व करिसी ॥ उभे राहावया संग्रामासी ॥ तिन्हीं लोकीं शुंभनिशुंभासी नसे कोण्ही ॥७१॥सर्व देव मिळोनि युद्धीं ॥ अन्य दैत्य जे कां निशुद्धी ॥ समोर उभें न राहती कधीं ॥ तेथें तूं स्त्रीदुर्बुद्धी करिसी काये ॥७२॥सकळे देवासहित इंद्रा ॥ उभें न रहावे जयासमोर ॥ जेथें शुंभा ऐसें झुंजार ॥ तेथें युद्ध बडिवार तुझा न चले ॥७३॥निशुंभशुंभासी ॥ ऐकूनि चाल माझ्या वचनासी ॥ गौरवें जरी तूं न येसी ॥ धरूनि केशीं वोढितां येशील ॥७४॥देवी म्हणे शुंभ प्रबळ ॥ निशुंभही बळी केवळ ॥ मी काय करूं प्रतिज्ञा अढळ ॥ न विचारितां मुळी म्यां केली ॥७५॥त्यापासी तुवां जाउन ॥ मद्वाक्य करी सर्वही कथन ॥ मग त्याच्या युक्तीस जाण ॥ येईल तैसें म्हणे करी ॥७६॥मार्कंडेय भागोरीसी ॥ पुढें सांगेल कथा कैसी ॥ नित्यानंद म्हणे श्रोत्यांसी ॥ श्रवण आदरेंसी करावें ॥७७॥सुमेधा ऋषी ऐसी कथा ॥ सांगतां झाला राजा सुरथा ॥ नित्यानंद विनीतता प्राकृतकथा श्रोत्या वर्णीं ॥७८॥इतिश्रीदेवीविजय ग्रंथ ॥ मार्कंडेयपुराणसंमत ॥ चतुर श्रोते परिसोत ॥ गोड अध्याय पांचवा ॥७९॥इतिश्रीदेवीविजय ग्रंथ पंचमाध्याय समाप्त ॥श्री॥श्री॥श्री॥॥ श्रीदेवीविजय पंचमाध्याय समाप्त ॥ N/A References : N/A Last Updated : March 15, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP