भगवान गोपालकृष्ण - अध्याय २४ वा

प्राचीन कवी केशवदत्त यांनी ’ गोपाल कृष्ण ’ हे उत्तम काव्य रचले आहे.


नम: परम कल्याण । नम: परम् मंगल । वासूदेवाय शांताय । यदुनाम पतये नम: । शके अठराशें त्र्याहत्तरात । राहिले केशव कार्यरत । श्रवण मासापर्यंत । नित्याप्रमाणे त्या वर्षी ॥१॥
परंतु एके दिनी अचानक । गळ्याला त्यांच्या गाठ एक । उठली कष्टदायक । जीवघेणी वेदनेची ॥२॥
गाठीच्या निदानासाठी प्रथम । वैद्य पाठकांना आणिले बोलावून । दिले त्यांनी औषध काही दिन ।
उतार परि पडेना ॥३॥
पुढे डॉक्टर सोंदे यानी । गाठीची चिकित्सा करोनी । दुखणे कॅन्सरचे म्हणोनी । निदान केले अखेरचे ॥४॥
ऐकून तयांचे उद्गार । वज्राघात झाला सर्वांवर । सचिंत झाले भक्तवर । आकाश जणू कोसळले ॥५॥
डॉक्टरानी सांगितले सत्वरी । न्यावे स्वामीस मुंबापुरी । उपचारार्थ झडकरी । लावू नका विलंब ॥६॥
परंतु सद्गुरु केशवदत्त । राहिले आपुले कार्य करीत । दुर्लक्षूनी त्या दुखण्याप्रत । निजस्वभावाप्रमाणे ॥७॥
थोडेसे बरे वाटल्यास । श्रींनी जावे कार्यक्रमास । गावोगांवी फिरावयास । नंदुरबारादि ठिकाणी ॥८॥
भासल्यास प्रकृती अस्वस्थ । सोनगिरी मग येती परत । इंजक्शनादि उपचारार्थ । मुंबईस जाणे नको म्हणती ॥९॥
अशाही परिस्थितीत । मार्गशीर्ष मासापर्यंत । प्रवचनादि कार्यक्रम नित्य । करीत होती माऊली ॥१०॥
याच वेळी प्रभूंचे । पुस्तक एक महत्वाचे । प्रसिध्द होते व्हावयाचे । सगुण साक्षात्कारांचे भावंड ॥११॥
पुस्तकाची या दुरुस्ती । चालली होती शीघ्र गती । हरिदत्त पाठक प्रभृती । निमग्न होत्या त्या कामी ॥१२॥
हरिदत्त पिळोदेकर । केशव प्रभूचे शिष्यवर । नामनिर्देश ज्यांचा वारंवार । केला आहे मी या चरित्री ॥१३॥
माऊलीच्या लिखाणाबाबत । पिळोदेकर हरिदत्त । करित होते सहाय्य सतत । मोलाचे अति निष्ठेने ॥१४॥
सदर पुस्तकासमवेत । महाराज होते लिहित । चरित्र एक सिध्दहस्त । संत बहिणाबाईचे ॥१५॥
परी नियतीच्या मनात । होते काही तरी अनिष्ट । केशवांच्या गळ्याची गाठ । दुखू लागली असह्य ॥१६॥
तेव्हां शिष्यमंडळीनीं । ठरविले निश्चित मनोमनी । विनंती आग्रहे करोनी । न्यावे माऊलीस मुंबईला ॥१७॥
तेथे योग्य ते उपचार । होतील त्या गाठीवर । नको आता अन्यविचार । मत पडले सगळ्यांचे ॥१८॥
एकोणीसशे बावन्नांत । जानेवारीच्या महिन्यांत । आणिले मग त्वरित । माऊलीस मुंबापुरी ॥१९॥
गंगाशंकर मुळजी व्यास । भक्त महाराजांचे विशेष । त्यांच्या घरी माऊलीची खास । सोय केली उतरण्याची ॥२०॥
व्यासजींच्या सल्ल्यानुसार । उपाय गाठीवर । आणून धन्वंतरी मान्यवर । सुरु केले त्वरेने ॥२१॥
परि रोगाचा प्रादुर्भाव । दावित होता स्वभाव । औषधींचा काहीच उपाय । चाले ना तयावरी ॥२२॥
तेव्हां सकल भक्तवर । झाले काहीसे चिंतातूर । म्हणाले या रोगावर । शल्यचिकित्सा करावी ॥२३॥
तव सकळांनी जमून । डॉक्टरांचे मत अजमावून । ठरविले करावे ऑपरेशन । निर्घृण या रोगांचे ॥२४॥
केशवांनी करोनी विनवणी । संमती घेतली सर्वांनी । मग डॉक्टर जोशी यांनी । केले ऑपरेशन गाठीचे ॥२५॥
कर्करोगाचा राक्षस । श्रींच्या का लागावा पाठीस । जे समर्थ आणि सर्वाधीश । कोडे पडले भक्तजना ॥२६॥
परी ये विषयी संतवचन । ठेवा ध्यानी श्रोतेजन ।  प्रारब्ध भोगिल्या वाचून । सुटका नाही देवादिका ॥२७॥
शल्य कर्मानंतर । केशवदत्त गुरुवर राहिले । एक महिनाभर । विश्रांतीस्तव व्यासांकडे ॥२८॥
माऊलीच्या या आजारात । व्यास कुटुंबियानी सतत । सेवा केली कष्टप्रद । रात्रंदिन केशवांची ॥२९॥
पुढे महाशिवरात्री निमित्त । माऊली सद्गुरु केशवदत्त । सोनगिरी आली परत । आराम पडता थोडासा ॥३०॥
मुंबईच्या डॉक्टर प्रभृतींनी । होते सांगितले निक्षुनी । माऊलीस बहु आर्जवोनी । श्रम न करावा तीळभरी ॥३१॥
परंतु त्यांच्या स्वभावानुसार । श्रीकेशवदत्त गुरुवर । जाऊ लागले फिरतीवर । दुर्लक्षुनी त्या उपदेशा ॥३२॥
परिणामी त्यांची तब्येत । गेली पुन्हा ढासळत । डोकावू लागली गाठ परत । गळ्याभोवती पुनरपी ॥३३॥
जेव्हा फिरतीवरून परत । आले प्रभु केशवदत्त । भासले तेव्हा ते अतिश्रांत । निस्तेज आणी शक्तिहीन ॥३४॥
काळरूपी कॅन्सर । फांस आपुले तीव्रउतार । माऊलीच्या मानेवर । आवळीत होता क्रूरपणे ॥३५॥
अविरत परिश्रमाने । माऊलीचे हे दुखणे । वाढू लागले स्वैरपणे । आवर कसा घालावा ॥३६॥
म्हणून डॉक्टर सोंद्यानी । सुचविले पुन्हा आग्रहानी । जा घेऊन हे संतमणी । मुंबईस पुन्हा उपचारार्थ ॥३७॥
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार । गोपाळ किसनदास भक्तवर । आले घेऊनी गुरुवर । मुंबईस लगबग ॥३८॥
सोय महाराजांची साजिरी । केली श्रीमंत व्यासाघरी । स्वतंत्र एका दालनांतरी । माऊलीस राहावया ॥३९॥
भरीस या दुखण्यांत । माऊलीच्या पायांत । वेदनाही असंख्यात । ठाव मांडूनी बैसल्या ॥४०॥
योजनापूर्वक उपचार । चालले होते माऊलीवर । जोशी, पाठक, ढवळे डॉक्टर । उभे सतत सेवेसी ॥४१॥
राहून व्यासांकडे काही दिस । माऊली आली धुळ्यास । गोविंद गुरुंच्या उत्सवास । पावसकरांच्या बरोबर ॥४२॥
परंतु केशवांची प्रकृति । चिंतनीय झाली होती । कर्करोगे परिस्थिती । गंभीर झाली सर्वांगीण ॥४३॥
पायांतील तीव्र वेदना । असह्य झाल्या तयांना । आंगीच्याही यातना ज्वालाग्राही झाल्या रोगाने ॥४४॥
मग डॉक्टर सोंदे यांनी । इंजेक्शने योग्य देऊनी । ताप त्यांचा केला कमी । कौशल्ये योजना आखून ॥४५॥
आराम जरासा पडल्यावर । माय माऊली गुरुवर । सोनगीरी आली सत्वर । ओढेकरांच्या गाडीतूनी ॥४६॥
उत्सवाचा कार्यक्रम । पार पडला अति उत्तम । परि केशवदत्त पुरुषोत्तम । तीव्र झाले पिडीत ॥४७॥
मग पुनरपी तयासी । आणिले त्वरे धुळ्यासी । उपचार करावयासी । गणपुले दत्त मंदिरांत ॥४८॥
आनंदीबाई राईलकर । यांनी स्वत: माऊलीवर । उपचार केले निखळ । योजना स्वत: आखूनी ॥४९॥
एकवीस दिवस धुळ्यात । राहूनी प्रभु केशवदत्त । डॉक्टर मोन्यांच्या दवाखान्यांत । आले अंमळनेर मुक्कामी ॥५०॥
मोन्यांनी तव माऊलीस । सांगितले जावयास । अति त्वरेने मुंबईस । उपचारार्थ तातडीने ॥५१॥
मुंबईस आल्यावर । नेले केशवांना सत्वर । कॅन्सरच्या सेंटरवर । इस्पितळांत टाटाच्या ॥५२॥
परंतु तेथे माऊलीस । नाही मिळाला प्रवेश । दुर्दैव आमुचे खास । उभे राहिले आडवे ॥५३॥
पुढे श्रीमंत व्यासांघरी । आणून तयांना सत्वरी । उपचार केले त्यांचेवरी । धन्वंतरीनीं मुंबईच्या ॥५४॥
परंतु माऊलीची प्रकृती । ढासळत होती तीव्रगती । उपचाराची कसलीच मति । किमर्पिही चालेना ॥५५॥
शेवटी केशव प्रभूस । आणिले मग धुळ्यास । शुध्द दशमी आषाढ मास । शके अठराशे चौर्‍याहत्तरी ॥५६॥
आता माऊलीचा समाधिकाळ । येत होता शीघ्र जवळ । लक्षणे तशी प्रबळ । दिसू लागली स्पष्टपणें ॥५७॥
तव सकल भक्तजनास । त्वरे पाठविले संदेश । वेगे यावे दर्शनास । माऊलीच्या अखेरचे ॥५८॥
मग भक्तमंडळी त्वरेने । धांवली धुळ्याच्या दिशेने । मिळेल त्या साधनाने । माऊलीच्या भेटीस्तव ॥५९॥
रामाबुवा रावेकर वासुदेवशेठ भक्तवर । गोरेसाहेब मान्यवर । हजर जाहले धुळ्याला ॥६०॥
नारिंग्रेकर आणि साळवेकर । मोरु, मुळे, टिल्लू केळकर । भक्त मंडळी नाना अपार । भोवती जमाली केशवांच्या ॥६१॥
बाबूलाल, गोपाळभाई । वकील पटवर्धन, नारायण भाई । मंडळी धुळ्याची अशी काही । सेवेस हाती माऊलीच्या ॥६२॥
याही परिस्थितीत । योजिते झाले केशवदत्त । कार्यक्रम एक सुखद । सोनगीरी क्षेत्रासी ॥६३॥
साधावे सकलांचे कल्याण । अपमृत्युचे व्हावे निरसन । यासाठी केले हवन । मृत्युंजयाचे प्रभूंनी ॥६४॥
असता केशव आसन्न मरंण । तरी सोनगीरी जाऊन । पुरा करोनी कार्यक्रम । परतले ते धुळ्यासी ॥६५॥
आल्यापासून धुळ्यास । अस्वस्थता आली माऊलीस । रोगाने घेतले पलटीस । लाही होतसे अंगाची ॥६६॥
ज्वरही असे सतत । भिनलेला अंगात । मर्यादा उल्लंघीत । एकशे पांच अंशाकडे ॥६७॥
तरीही माऊलीचे आह्निक । स्नानसंध्या पुजादिक । चालले होते अचूक । नित्य नियमाप्रमाणे ॥६८॥
हरीपाठाचे वाचन । राधे गोविंद नामस्मरण । रात्री सुस्वर भजन । चालूही असे भक्तांचे ॥६९॥
परंतु काळाची पाऊले । सरकत होती पुढे पुढे । ग्रासावया रोकडे । संत शिरोमणी केशवासी ॥७०॥
श्रावण वद्य द्वितीयेस । मध्यरात्रीच्या सुमारास । महाराज म्हणाले अवघ्यांस । उठा, उठवा, उचलामसी ॥७१॥
माऊलीची हाक ऐकून । भक्त मंडळी आली धावून । खडबडा जागी होऊन । पातली समीप तयांच्या ॥७२॥
मग केशवांच्या आज्ञेनुसार । बसविले तयांना आसनावर । देऊन पुरेसा आधार । भक्त मंडळीनी तेथल्या ॥७३॥
रात्री दीडच्या सुमारास । निरोधिला माऊलीने श्वास । हात लाविला नासिकेस । प्राणायाम करावया ॥७४॥
दहा मिनीटे अशा स्थितीत । राहिले प्रभु केशवदत्त । मग नासिकेपासून सुटला हात । मान झाली वाकडी ॥७५॥
ये रिती प्राण निरोधन । करून हा संत महान । अनंतात झाला विलीन । अस्त जणू रवीचा ॥७६॥
दिस हा होता गुरुवारचा । श्रावण वद्य द्वितीयेचा । शके अठराशे चौर्‍याहत्तरचा । एकोणिशे बावन्न ॥७७॥
इति श्रीयशोधन विरचित । श्रीसद्गुरु केशवदत्त चरित । होवो सकलां सुखद । चोविसावा अध्याय संपूर्ण ॥७९॥
॥ इति चतुर्विंशतितमो‌ऽध्याय: समाप्त ॥

N/A

References : N/A
Last Updated : December 03, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP