भगवान गोपालकृष्ण - अध्याय २० वा

प्राचीन कवी केशवदत्त यांनी ’ गोपाल कृष्ण ’ हे उत्तम काव्य रचले आहे.


नम: परम कल्याण । नम: परम् मंगल । वासूदेवाय शांताय । यदुनाम पतये नम: । शके अठराशें एकुणसाठसाली । सद्गुरु केशवदत्त माऊली । नित्याप्रमाणे होती आली । अमळनेरी उत्सवा ॥१॥
या वर्षीच्या कार्यक्रमांत । व्याख्याने केली होती आयोजित । वक्ते बहु नामांकित । पाचरिले होते नागपूरचे ॥२॥
परांडे, म्हसकर, नवाथे । कवी शास्त्री तत्ववेत्ते । प्रतिभावंत व्याख्याते । बोलले या प्रसंगी ॥३॥
जेव्हां पृथ्वीतलावर । धर्मास ग्लानी येते तीव्रवर । तेव्हां प्रभु अवतार । अभ्युदयार्थ घेतो भूवरी ॥४॥
या विषयावर सुरेख । दाखले देऊन पौराणिक । व्याख्यान केले उद्बोधक । सोपे आणि सुबोध ॥५॥
मांडणी विषयाची सुबुध्द । रसाळ आणि तर्कशुध्द । घेई अंत:करणाचा वेध । श्रोतुजनांचा लिलया ॥६॥
पुढें याच संदर्भातुन । मुक्काम तळोदे येथून । आग्रहाचे आले निमंत्रण । मसुराश्रमी केशवांना ॥७॥
आश्रमाचे मान्यवर । सेवक श्री. बुद्धिसागर । ओंकारभाई तथा क्षीरसागर । स्नेही होते माऊलीचे ॥८॥
कार्यक्रम प्रवचनाचा सुंदर । या आश्रयाचा झाल्यावर । श्रीकेशवदत्त गुरुवर । धुळें मुक्कामी पातले ॥९॥
धुळ्यास प्रभु केशवांचे । मित्र होते एक जवळचे । पाठकशास्त्री नावांचे । विद्वान तैसेच भाविक ॥१०॥
तयांच्या घरी नित्यनेमे । श्रींचे असे येणें जाणें । वादविवाद चर्चा करणें । छंद होता उभयतांसि ॥११॥
असेच एकदां बोलताना । शास्त्री म्हणाले केशवांना । महाराज एक आहे सूचना । सर्व धर्म परिषद बोलवावी ॥१२॥
निरनिराळ्या धर्माचे । प्रतिनिधी बोलवावे साचे । विचार त्या त्या पंथाचे । ऐकावे एकत्र बैसोनी ॥१३॥
पाठकांची ही सूचना । पसंत पडली केशवांना । मग कार्यचक्रे नाना । फिरू लागली क्षणांत ॥१४॥
यासाठीं द्रव्य निधान । उभारण्याचे परिश्रम । वकील द्वयांनी केले महान । भट, पटवर्धन धुळ्याचे ॥१५॥
शंकराचार्य कुर्तकोटी । महाराष्ट्राचे धर्मश्रेष्ठी । विद्याविभूषित वेदांती । अध्यक्ष होते परिषदेचे ॥१६॥
अधिवेशनाच्या प्रसंगी । भाषणें विविध व्यासंगी । झाली वक्त्यांची चतुरंगी । विवेकी आणि वैचारिक ॥१७॥
परी कांही कारणानिमित्त । श्रीसद्गुरु केशवदत्त । न राहिले उपस्थित । ऐन वेळी अधिवेषना ॥१८॥
माऊलीने निज भाषण । पाठविले होते लिहून । ते सभेस दाविले वाचून । जोशी यज्ञेश्वर महाराजांनी ॥१९॥
भक्तीरसानें परिपूर्ण ओथंबलेले हे भाषण । ऐकून झाला तल्लीन । श्रोतृवर्ग परिषदेचा ॥२०॥
साक्रि तालुक्यांत रत्नेश्वर । संत होते एक लोकोत्तर । पवित्र त्यांचे समाधिस्थळ । आजही आहे दर्शनीय ॥२१॥
या समाधिस्थळानजिक । धर्म शिक्षणाचा वर्ग एक । काढिला होता सुरेख । राजाराम महाराजांनी ॥२२॥
येथेही केशवांनी येऊन । दिली प्रवचने सुवर्म । संघटना, संस्कृति, संरक्षण । नानाविध विषयांची ॥२३॥
मौजे तळवे गांवची । सभा भिल्ल जमातिची । केशवांनी गाजविली साची । आदेश निर्भयतेचा देऊनी ॥२४॥
स्वाहाकाराचे कार्यक्रम । खेडोपाडीही आयोजून । धर्म, क्षेम, कुशल, कल्याण । वर्धिष्णु केले केशवांनी ॥२५॥
स्थानिक जनांचा या कामी । सहकार घेतला केशवांनी । लोकसंग्रह तेणे साधूनी । भागवत धर्म वाढविला ॥२६॥
कलमाडीचे झिपरु मुरार पाटील । धुळ्याचे रासददेव खिर्डीकर । बापुराव कुळकर्णी नथु पाटील ।
नांवें ऐशा साह्यकांची ॥२७॥
कलमाडीच्या समारंभात । रास भजनें प्रासादिक । कार्यक्रम मनोवेधक । नाना परिचे जाहले ॥२८॥
रामबुवा रावरेकर । प्राध्यापक श्री. दांडेकर । यासारखी मान्यवर । मित्रमंडळी होती केशवांची ॥२९॥
अशा या प्रभुतींची कीर्तने । ज्ञानप्रदायी व्याख्याने । प्रबोधकारी प्रवचने । योजिली केशवांनी ठाईठाई ॥३०॥
चावळखेडे मुक्कामीं । उत्सव असाच सुखदायीनी । केला प्रभु केशवांनी । अंजनी नदीचे तीरावर ॥३१॥
या उत्सवाचे प्रसंगी । एरंडोलचे बंडुनाना जोशी । जळगावचे विद्यामहर्षि । कोरान्ने गुरुजी होते आलेले ॥३२॥
पूर्व-पश्चिम खानदेश । येथील मंडळी विशेष । हजर होती या उत्सवास । सावकार, शेतकरी प्रामुख्ये ॥३३॥
महोत्सव एक असाच । झाला कुकुरमुंडयास । गांव अति लोभस । संतोजी महाराजांचे ॥३४॥
पंडित राजराजेश्वर । देवनायकचार्य गुरुवर । बंकट, उध्दव ज्ञानसागर । अगत्यें आले समारंभा ॥३५॥
या बुध्दिवंताच्या बैठकीत । चर्चा झाली बहुविध । धर्म, देश, वेदांत । पक्ष उपपक्ष करोनी ॥३६॥
धर्मसंस्थांचा विकास । राष्ट्रप्रेमाचा निदिध्यास ॥ मूलमंत्र हा उन्नतीचा खास । प्रतिपादले अवघ्यांनी ॥३७॥
भिल्ल जमातीसाठी सुगम । कीर्तनाचा केला कार्यक्रम । शके अठराशेंसाठांत अनुपम । डामळदे गांवी माऊलीनें ॥३८॥
या वेळी खादी आणि खादीवस्त्रें । सुबोध सोपी गीता पुस्तके । केशवांनी वाटली स्वहस्तें । जमलेल्या भाविकां ॥३९॥
केशवदत्तांचे कार्यक्षेत्र । धर्मकारणापुरते विवक्षित ॥ नव्हते कधीही संकुचित । आग्रही आणि एकांडे ॥४०॥
राजकारणाबाबत । उदसीन नव्हते केशवदत्त ॥ मांडीत आपुले स्पष्ट मत । सभासंमेलनी हिरीरीने ॥४१॥
जातीयतेचे तंटेबखेडे । स्पृश्यास्पृश्यतेचे धिंडवडे । ज्वलंत ऐशा प्रश्नाकडे । लक्ष होते केशवांचे ॥४२॥
डावरे, राजवाडे, करंदीकर । (लोकसत्ता) पटवर्धन, रुपचंद, केळकर । राजकारणी पुरुष धुरंधर ।
परम स्नेही माऊलीचे ॥४३॥
या सर्व मंडळीबरोबर । तत्कालीन राजकारणावर । चर्चा होई वारंवार । केशवांची पुण्यात ॥४४॥
समाजसत्तावादी पक्षाचे । पुढारी एक चोपडयाचे । मगनभाई नांवाचे । विचार घेत केशवांचा ॥४५॥
लोकशाही पक्षाच्या वतीने । महाराजांची व्याख्यानें । गावोगांवी झाली सातत्याने ।
पांगारकर महाराजांच्या समवेत ॥४६॥
निझामी राज्यातील हिंदुवर । जुलुम जबरदस्ती विषयावर । व्याख्यान एक निषेधपर । झाले धर्मवीर डावर्‍यांचे ॥४७।
भद्रकालीच्या पटांगणात । जनता नासिकची समस्त । ऐकावया आली वक्तृत्व । विश्वासरावांचे (डावरे) ओजस्वी ॥४८॥
अध्यक्षपदी विराजीत । होते सद्गुरु केशवदत्त । समारोप सभेचा संतुलित । केला तयांनी सुंदर ॥४९॥
मंदिर-प्रवेशाच्या बिलावर । सडेतोड आपुले विचार । मांडिले महाराजांनी निकर । जनतेमाजी जावोनी ॥५०॥
सत्यनारायणाच्या पूजेचा । समारंभ एक थाटाचा । पारोळ्यास झाला आनंदाचा । सोनुशेट वाणी यांच्याकडे ॥५१॥
टेनन्सी बिल आणि फेडरेशन । हिंदु संस्कृती आणि संघटन । या विषयासंबंधी विवेचन ।
केले केशवांनी या वेळी ॥५२॥
पुढे याच विषयावर । प्रचार करण्या गुरुवर । रवाना झाले सत्वर । सुरत मुंबई पुण्याकडे ॥५३॥
गुरुकुलांचे पुनर्जीवन । ब्रह्मचर्य व्रताच पालन । यासंबंधीही केले विवेचन । स्वामी शिवानंदासी केशवांनी ॥५४॥
सरदार विंचुरकरांच्या येथें । गणेशोत्सवाच्या निमित्तें । प्रवचनाचा कार्यक्रम अगत्ये । होत असे माऊलीच्या ॥५५॥
गोकुळाष्टमीचाही उत्सव । केला जाई अभिनव । जेथें जेथें असतील केशव । त्या त्या ठिकाणी प्रतिवर्षी ॥५६॥
येणे प्रभु केशवांचे । कार्यक्रम अनेक प्रवचनाचे । गावोगांवी नित्य व्हावयाचे । नाना उत्सव प्रसंगी ॥५७॥
कल्याण, भिवंडी, मुरबाड । कुंझर, झोडगे शिरुड । नंदुरबार शिरपूर शिंदखेड । नांवे किती सांगावी ॥५८॥
उध्दव महाराजांच्या उत्सवाला । माऊली यायची भिवंडीला । मग मुक्काम होई कल्याणला ।
राममारूती उत्सवा प्रतिवर्षीं ॥५९॥
मुंबईच्या गिरणी विभागांत (लोअर परळ) दुर्गादेवी उत्सवानिमित्त । व्याख्यान माऊलीचे बहुश्रुत ।
भक्तीमार्गावर जाहले ॥६०॥
कार्यक्रमास या प्रामुख्याने । जमले होते बहुसंख्येने । कामगार श्रमजिवी विनम्रपणे । बोधामृत ऐकावया ॥६१॥
वासुदेव वाणी यांचेकडून । लग्नाच्या घरचे निमंत्रण । माऊलीस आले आवर्जून । विनंतीपूर्वक रावेरी ॥६२॥
वासुदेव आणि बाजीराशेट । बंधद्वय होते एकनिष्ठ । शिष्य, माऊलीचे परमश्रेष्ठ । सात्विक आणि प्रेमळ ॥६३॥
वासुदेवशेट वाण्याचा । आणि त्यांच्या कुटुंबियांचा । उल्लेख मी केला आहे साचा । सतराव्या अध्यायीं यापूर्वी ॥६४॥
या लग्न समारंभात कार्यक्रम झाले विविध । धार्मिक आणि पारंपारिक । रितीरिवाजाप्रमाणे ॥६५॥
लक्ष्मी नारायणासमान । जोडी या वधुवरांची पाहून । नांदा सौख्यभरे म्हणून । आशीर्वाद दिला माऊलीने ॥६६॥
समारंभाचे भरतवाक्य । शांति मंगल सुखदायक । म्हणाले सद्गुरु केशवदत्त । प्रवचनानें आपुल्या ॥६७॥
काशी, भुसावळ, बर्‍हाणपूर त्र्यंबक, पंढरपूर, ओंकारेश्वर । वाणी, मंडळी येथील थोर । लग्नास होती जमलेली ॥६८॥
या निमंत्रित मंडळीचा । तेवीस संत साधूंचा । सत्कार बहुमानाचा । केला वासुदेव कुंटुबाने ॥६९॥
तळवे, निंबारे रामखेड । पिंगाणे कोपरेली मोखड । येथेही केशवांची सुरवाड । व्याख्यानें झाली असंख्य ॥७०॥
भेट कोपली शाळेस । उपदेश गुजर समाजास । हैद्राबादच्या सत्याग्रहीस । आशीर्वाद दिला केशवांनी ॥७१॥
पुढे त्या सत्याग्रहींवर । लाठीहल्ला केला भयंकर । औरंगाबादेत दुर्धर । निर्घुण निजामी सत्तेने ॥७२॥
हा हल्ल्याच्या निषेधार्थ । सभा झाली नासिकांत । त्या वेळी निमंत्रितात । केशवदत्त होते प्रामुख्यानें ॥७३॥
अस्खलीत आपुल्या वाणीने । महाराज म्हणाले स्पष्टपणे । “जनतेचे रक्षन करणे । कर्तव्य केवळ इंग्रजांचे” ॥७४॥
विंचुरच्या ब्राह्मण सभेचे । कार्य स्वहस्ते स्थापनेचे । महाराजांनी केले साचे । आग्रहे रखमाबाई साहेबांच्या ॥७५॥
पुढे एक महिनाभर । श्रींची गीता ज्ञानेश्वरीवर । प्रवचने झाली ज्ञानप्रचुर । मुरलीधर मंदिरी नासिकाच्या ॥७६॥
तुकडोजी महाराज प्रसिध्द । राष्ट्रसंत आणि देशभक्त । यांची आणि केशवांची अचानक । भेट जाहली एकदां ॥७७॥
राष्ट्रभक्तीची अनुपम । भजने तुकडोजींची सुगम । तरुणांसी करील कार्यक्षेम । निश्चये म्हणाले केशव ॥७८॥
कवित्व त्यांचे सात्विक । बाळबोध आणि मार्मिक । भारतीयांसी मार्गदर्शक । अभिप्राय होता केशवांचा ॥७९॥
शके अठराशे एकसष्टांत कार्यक्रम प्रवचनांचे विख्यात । झाले महाराजांचे मुंबईत । ब्राह्मण साहाय्य्क संघामध्ये ॥८०॥
ज्ञानदेव पुण्योत्सवानिमित्त । सप्ताह एक नितांत । दादरच्या या संघात । आयोजित होई प्रतिवर्षी ॥८१॥
माऊलीच्या प्रवचनांचा । योग बहु भाग्याचा । लाभला था सुदैवाचा । भक्तमंडळीस दादरच्या ॥८२॥
या प्रवचनाच्या गंगेत । श्रोते होऊनी हर्षभरीत । नाहले भक्तीप्रेमांत । अनुभूती घेऊनी आगळी ॥८३॥
दिघे वकील, खोपकर । रानडे, जोशी, करमरकर । रावबहाद्दर धुरंधर । भक्त मुंबईकर केशवांचे ॥८४॥
वैतारणा धरणाचे कल्पक । सिटी अभियंते मोडक । माऊलींचे होते भक्त एक । पुरुषोत्तम मुंबईचे ॥८५॥
नानासाहेब मोडकांचे । आणि केशवदत्तांचे । संबंध अति स्नेहाचे । होते अखेरपर्यंत ॥८६॥
वैतरणेस अडविण्याचा । प्रयत्न या अभियंत्याचा । होता दुसरा भागिरथाचा अद्वितिय आणि अगम्य ॥८७॥
अवखळ नदी वैतारणा । बांधू न देई योजिल्या धारणा । अचडणी उद्भवल्या नाना । त्रस्त झाले योजक ॥८८॥
तंई विचार केला मोडकांनी । सद्गुरु आणावे या स्थानी । जेथे वैतरणा नदीचे पाणी । अडविण्याची होती योजना ॥८९॥
महाराजांचे लागता पादपद्म । वैतरणा झाली सौजन्यक्षम । काम झाले बहु सुगम । मोडक सागराच्या निर्मितीचे ॥९०॥
वैतरणा नदीचे हे धरण । प्रयत्ने अतुल बांधून । मुंबापुरीस जीवन । उदंड दिले मोडकांनी ॥९१॥
धन्वंतरी महोत्सव । मुंबईत घाला अभिनव । तेथेंही माऊलीचा गौरव । केला जनतेनी आदरे ॥९२॥
शके अठराशें बासष्टांत । उतराणची वारकरी परिषद । गाजली महाराष्ट्रांत । अध्यक्षतेखाली केशवांच्या ॥९३॥
चांदवडच्या व्यायामशाळेत । श्रींनी देऊनी भेट खास । उपदेश केला विद्यार्थ्यांस । बलशाली उपासनेचा ॥९४॥
याच वर्षी पंढरपुरात । दसर्‍याच्या महोत्सवानिमित्त । केशव गुरुंचे भक्तियुक्त । प्रवचन झाले सुवर्म ॥९५॥
जे सौभाग्यभक्तीचे सुवर्ण । कीं अलंकार प्रभुचे सुषम । ते संत निखिळ भूषण । कंठमणी विठठलाचे ॥९६॥
पुढे डामरखेडे, तळोद्याचे । उत्सव रामनवमी, पोर्णिमेचे । साजरे करोनी माऊलीचे । येणे झाले जळगावीं ॥९७॥
“ऋग्वेद वाङ्मय प्रसाद” । या गहन विषयावर । व्याख्यान एक सुंदर । केशवदत्तांचे झाले जळगावीं ॥९८॥
चित्राव आणि शेंडेशास्त्री । मंडळी विद्याव्यासंगी । हजर होती या प्रसंगी । अभिनंदन कराया केशवांचे ॥९९॥
या नंतर श्रीकेशवदत्त । सोनगीरीस आले परत । गोविंदगुरु उत्सवाप्रित्यर्थ । प्रतिवर्षाप्रमाणे ॥१००॥
श्रीराम गोस्वामी नासिकेचे । वकील पटवर्धन धुळ्याचे । कार्यक्रम यांच्या भाषणांचे । झाले प्रतिसालानुसार ॥१०१॥
लाहोरचे भंडारी प्रोफेसर । काशीचे शास्त्री कुसुंबेकर । यांचीही ज्ञानप्रचुर । प्रवचनें झाली या वेळीं ॥१०२॥
या वर्षी केशवांनी । पंचमीस उत्सव दिनीं । स्वत: हरिकीर्तन करोनी । ज्ञानामृत पाजिले भाविकां ॥१०३॥
उत्सव हा असा आनंदात । सन एकोणीशें चाळिसांत । झाला बहु उत्साहात । सोनगीरीच्या आनंदवनी ॥१०४॥
इति श्रीयशोधनविरचित । श्रीसद्गुरु केशवदत्त चरित । होवो सकलां सुखद । अध्याय विसावा संपूर्ण ॥१०५॥
॥ इति विंशतितमो‍‍ऽध्याय: समाप्त ॥

N/A

References : N/A
Last Updated : December 03, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP