भगवान गोपालकृष्ण - अध्याय ६ वा

प्राचीन कवी केशवदत्त यांनी ’ गोपाल कृष्ण ’ हे उत्तम काव्य रचले आहे.


नम: परम कल्याण नम: परम मंगल । वासुदेवाय शांताय यदूनां पतये नम: । देश आपुला भारत । आध्यात्मिक ज्ञानांत । संपन्न अखिल जगतांत । श्रेष्ठ मानिती सकल जन ॥१॥
भावभक्तीची गंगा । यमुना आणि चंद्रभागा । याच देशी दिसेल सुभगा । अमोघ वाहतां दुथडी ॥२॥
कृष्णा, कावेरी, नर्मदा । गोदा, भीमा, तुंगभद्रा । ललाटीच्या जणुं पद्ममुद्रा । भारतभूच्या पवित्र ॥३॥
नगाधिपती हिमालय । तापसी जनांचे आलय । सह्यगिरी मलय । मंदिरे योग्यांची निरंजन ॥४॥
भूमी आपुली भाग्यवंत । जन्मति जेथें साधुसंत । गीतातत्व सांगे भगवंत । मानव-उध्दारा कारणें ॥५॥
सतधर्माची संस्कृती । अध्यात्म साधकाची वृत्ती । जोपासली प्रत्यहि अति । संतसज्जनाची इथेच ॥६॥
रांगडया सह्याद्रिच्या कुशींत । उदया आला महाराष्ट्र । ज्ञानदेवादि महान भक्त । राखिती संत परंपरा ॥७॥
कलियुगीं मानव प्राणी । त्रस्त बहु झाला भुवनिं । दु:खी आणि चिंतामग्नीं । जीवनकाळ कंठितो ॥८॥
संशयग्रस्त, भितीग्रस्त । दारिद्रय आणि व्याधिग्रस्त । सर्वंकश होऊनी त्रस्त । म्हणे, “देवा सोडवी” ॥९॥
साधावया तयाचें कल्याण । दुरितांचे करावया क्षेम । अवतार घेती स्वयम । भगवंत संत रुपानें ॥१०॥
हीन, दीन, दलीतांसाठी । केशवदत्त संतश्रेष्ठी । सुपुत्र या भूमींत मराठी । लाभले आपुल्या भाग्यवशे ॥११॥
श्रीगुरु केशवदत्त । मथुरा गोकुळ वृंदावनात । राहोनी कांहीं दिवस । प्रस्थान ठेविती पुढील यात्रे ॥१२॥
ही हकिगत आपणांस । कथिली मिया तुम्हांस । पुढील कथा सुरस । ऐका श्रोते श्रध्देनें ॥१३॥
महाराज पुढें हरिद्वार । प्रयाग, काशीविश्वेश्वर । यात्रा करोनी अपार । नर्मदातीरी पातले ॥१४॥
गंगा यमुना सरस्वती । सिंधु कावेरी गोमती । सरिता निर्मल भारती । परी नर्मदेची महती आगळीच ॥१५॥
हिच्या आश्रयाची काननें । परम सिध्दांची निवासस्थानें । तापसी जनांची तपोवनें । आनंदवनें योगीयांसी ॥१६॥
निसर्गाचे नितांत सुंदर । लेऊनी आपुल्या अंगावर । वृक्षवेलीचे अलंकार । धावे ही अधीर सिंधूकडे ॥१७॥
देवदार, पलस, संतान । मंदार, पिप्पल, हरिचंदन । पनस, आम्र कळकघन । तीरावरी हिच्या असंख्य ॥१८॥
नगर, शेवगा, एरंड । करंज फालसा, दाडिंब, । लिंब, बाहवा, सापचंद । अनंत तरुंच्या आवली ॥१९॥
नागवेल, आस्कंदा, शत्तावरी । गुळवेल, मुंगुस उपळसरी । कर्टोली रींगण, भुयावळी । दिव्यौषधिंची खाण ही ॥२०॥
जाई जुई, अबोली । सोनचाफा, चमेली । निशिगंध, गुलाब, कर्दळी । पुष्पें सुंगधी सर्वत्र ॥२१॥
चंद्रकमल, सूर्यफूल । शेवंती, सुंरगी, बकुल । हादगा, रुई, सदाफूल । नांवें किती वर्णावी ॥२२॥
रातराणीचा सुवास । केतकी सौरभ अमूप । नाना पुष्पांचे गंधरस । दरवळती आसमंती नर्मदेच्या ॥२३॥
गगनचुंबी वृक्षंसंभार । घळी दाट काननें घोर । व्याघ्र, सर्पादि श्वापदे क्रूर । हिच्याच आश्रयें राहती ॥२४॥
तीरातीरावर गोपुरे । ज्ञानपीठ-मठ-मंदिरें । तापसी जनांची निबीड विवरें । इथेंच अगणित दिसतील ॥२५॥
याच नर्मदेच्या कांठी । केशवदत्त संतश्रेष्ठी । आले एकांत वासासाठीं । आत्नचिंतन करावया ॥२६॥
उठोनि नित्य प्रात:काळी । स्नान करावें गंगाजळीं । सश्रध्दे भरोनी अंजुळीं । अर्पावें अर्ध्य अरुणासी ॥२७॥
पूजा अर्चा जपजाप्य । तिन्ही त्रिकाळचे आन्हिक । ईशचिंतनी निवांत । काळ येथें कंठिला ॥२८॥
घेतल्या संतसिध्दांच्या भेटी । केल्या आध्यात्मिक गुजगोष्टि । ज्ञानसंपदा सकळ सिध्दि । प्राप्त झाली इथेंच ॥२९॥
गोपाळकृष्णाचे दर्शन । गर्द हिरव्या राईतून । घेतलें नयनांत सांठवून । ठाई ठाई स्वामीनीं ॥३०॥
नर्मदेच्या जलांत । देखिला प्रभु यदुनाथ । गोपीसवें क्रीडा करीत । अनिमिष नेत्रें केशवांनी ॥३१॥
आत्मचिंतनी तत्वचिंतनी । निर्गुण निराकार ईशचिंतनी । काळ अमोलिक कंठूनी । घेतला निरोप नर्मदेचा ॥३२॥
घेतां निरोप नर्मदा माता । गहिंवरली ती सागर-वनिता । उसळलें जल दोन्ही हाता । वियोग गुरूंचा न साहे ॥३३॥
हद्द प्रांताची गुजरात । ओलांडूनी महाराष्टांत । पुनश्च सद्गुरु केशवदत्त । निज कार्यार्थ पातले ॥३४॥
सकल विद्या अलंकृत । ज्ञानविधि प्रज्ञावंत । प्रकांड पंडित महासंत । आळंदीस आले दर्शना ॥३५॥
माऊलीचा कृपाप्रसाद । मस्तकी रहावा हस्त सुखद । निजकार्य चालावे निर्वेध । हीच कल्पना मनीची ॥३६॥
बैसोनी मग मंदिरीं । माऊलीचे सामोरी उघडोनी ग्रंथ ज्ञानेश्वरी । प्रवचन केले सुश्राव्य ॥३७॥
शब्दाशब्दांतून मौक्तिक । ओघळावे अलौकिक । आकर्णे घ्यावी ओंजळीत । भक्तीमाला गुंफावया ॥३८॥
ऐकोनी बहु रसाळवाणी । श्रोतृजन गेला मोहुनी । माधवी फुलला तरारोनी । अंगी रोमांच दाटले ॥३९॥
तैं काही दिवस आळंदीतं । राहिले श्रीकेशवदत्त । प्रवचनें गोमटी केली नित्य । लोकाग्रहा कारणें ॥४०॥
आळंदीहून पुण्यास । महाराज आले राहावयास । लाभला तयांना सहवास । संतसज्जनांचा इथेंही ॥४१॥
श्रीकेशवराव देशमुख । साखरेमहाराज विनायक । बुवा भिंगारकर नामें एक । सज्जन ऐसे भेटले ॥४२॥
एकमेकां मिळावे । सुखसंवादीं रमावे । परमार्थ विषयांचे करावें । सांगोपांग निरूपण ॥४३॥
धर्मशास्त्राची चिकित्सा । वेद-वेदांतांची मिमांसा । संतवाङगमयाची समिक्षा । आदरे करावी एकत्र ॥४४॥
ज्ञानेश्वरीची प्रवचने । होऊ लागली नित्यनेमे । महाराजांचे नांव तेणे । गाजले पुणें शहरात ॥४५॥
प्रवचनाचा व्यासंग । होवोनी बहु सत्संग । केला येथे सुसंगत । याच काळी पुण्यांत ॥४६॥
ओथंबलेल्या हृदयानें । करावी रसाळ प्रवचनें । ओली व्हावी रसिक लोचने । शब्दब्रह्म ऐकोनी ॥४७॥
क्षेत्रे नासिक, पंढरपूर । अष्टविनायक, त्र्यंबकेश्वर । इथेहि तयांचा संचार । झाला दिवस अनेक ॥४८॥
औंढया नागनाथ, तुळजापूर, । अक्कलकोट औदुंबर । पदयात्रा केली अपार । पांढरीत मराठी ॥४९॥
सतशील ब्राह्मणाचे घर । अथवा एखादे मंदीर । धर्मशाळा वा नदीतीर । वसती कारणे योजावे ॥५०॥
जमवूनी अवघे जन । ज्ञानदीपिकेचे प्रवचन । किंवा श्रीहरीचे भजन । आनंदात करावे ॥५१॥
गोष्टी सांगाव्या बालबोध । उपदेश करावा सुबोध । हळुवार पाजावे ज्ञानदुग्ध । माऊलीच्या वात्सल्यें ॥५२॥
चौकशी करावी दीनांची । पखरण करोनी मायेची । रंजल्या गांजल्या जनांची । आपुलेसे म्हणोन ॥५३॥
माहेरवाशीणीचे कौतुक । लावोनि कुंकुमतिलक । घालोनि फळ ओटीत । आशिर्वाद द्यावा सुखाचा ॥५४॥
तेली तांबोळी शेतकरी । ब्राह्मण वैश्य हेटकरी । महार मांग कातकरी । समत्वें पाहती केशव ॥५५॥
देशप्रेम - ईशप्रेम । बंधुभाव सर्वोत्तम । साधावया निरुपम । लोकसंग्रह करावा ॥५६॥
अडल्यानडल्याची गरज । स्व-पैका देऊन सहज । रुग्णासी द्यावे ओखद । पदरचें आपुल्या ॥५७॥
हें विश्वची माझें घर । मानिती सकल संतवर । याच वचनाचा आधार । घेऊनी केशव पर्वती ॥५८॥
फिरतां ऐसे अनेक दिवस । घडले काय एक दिस । माणिकांचन योग सुरस । आला सुवर्ण पाऊली ॥५९॥
केडगांवचे नारायण । ज्ञानयोगी महान । हरि-भक्ति परायण । भेटले केशवदत्तांना ॥६०॥
सुखमूर्तीचें दर्शन । होता हारपले मन । योगी विरागी दोघेजण । अमृतांत नाहले ॥६१॥
नारायण प्रभु राजयोगी । स्वाधीन जयांच्या सकळ सिध्द । छत्रचामरें गजदळें उभी । मागेंपुढे तयांच्या ॥६२॥
उतरावें जणूं भूवर । कुबेराचे यक्षनगर । वाटावा तयांचा दरबार । अलकापुरी प्रत्यक्ष ॥६३॥
नामवंत गायकांनी । हजेरी लावावी हरदिनीं । गाऊनी स्वर्गीय स्वरांनी । रिझवावा दरबार तयांचा ॥६४॥
सत्यनारायणाची पूजनें । करावी सहस्त्र संख्येने । हारीने बसवूनी मेहुणे । एकाच वेळी अपूर्व ॥६५॥
श्रीचे ज्ञानेश्वरी प्रवचन । ऐकोनी सद्गुरु नारायण । म्हणाले प्रसन्न होऊन । धन्य धन्य केशवजी ॥६६॥
हाच जणू कृपाप्रसाद । मानोनी शिरसावंद्य । श्रीसद्गुरु केशवदत्त । निघाले पुढें स्वकाजा ॥६७॥
रंजल्या गांजल्यांची सेवा । हाच आपुला धर्म व्हावा । ज्ञानदीप उजळावा । वाणीनें आपुल्या सकलार्थ ॥६८॥
करावा प्रेमभाव निर्माण । सकलांच्या चिंताचे निवारण । आपपर भाव विसरून । बंधुभाव वाढवावा ॥६९॥
सर्वाभुतीं भगवंत । पाहावा त्यजुनी जातीपंथ । श्रध्दा तयांची नितांत । पाझरे कळवळा येऊनी ॥७०॥
जे मातेसमान सदय । पाडला जैसी गाय । ते हे ज्ञानेश्वर हृदय । जोजाविती भक्तांसी ॥७१॥
सांडोनी सकल भेदभाव । वाढवावा अंतरी स्नेह । झिजवावा परोपकारे देह । ध्येय हेंच तयाचें ॥७२॥
धर्मोपदेश देशकारण । समन्वय दोहोंचा साधुन । आपुल्या कार्याचें धोरण । निश्चित केलें स्वामिनीं ॥७३॥
या भूचे लक्षावधी जन । राहती केवळ खेड्यांतून ॥ समस्या तयांच्या जाणून । खेडीच केली कर्मभूमी ॥७४॥
गांवोगावी प्रचारार्थ । फिरले सद्गुरु समर्थ । धर्म, विवेके, सामर्थ्य । शांति बीज पेरिलें ॥७५॥
शुक्रासारखे तेजस्वी । वैराग्य जयाचे मनस्वी । बालब्रह्मचारी हे महर्षि । आले मग राहाया ॥७६॥
धुळेकरांच्या भाग्यांत । होतें हे वर्ष सुखांत । लिहिले जावे सुवर्णाक्षरांत । एकोणीसशें नऊ परमोत्तम ॥७७॥
खानदेश ऐसा सुपीक । अन्य नाहीं प्रदेश । मराठी या भूमींत । कपाशीचे आगर ॥७८॥
पिकवावा कापूस बलदंड, । पैका घ्यावा उदंड । भरावी कोठारें अखंड । धनधन्यांनी विपुल ॥७९॥
एरंडोल, धुळें, पाचोरे । जळगांव, अमळनेर, पारोळें । उदीम व्यापाराची स्थळें । खानदेशाची प्रख्यात ॥८०॥
यांत धुळें अग्रेसर । दुसरें जणू पुणें शहर । विद्याविज्ञानाचे आगर । बहुरंगी आणि चतुरस्त्र ॥८१॥
या नगरीच्या गळ्यांत । हिरव्या पाचूंची रत्नजडीत । दिसेल नित्य सुशोभित । माला पांजरा नदीची ॥८२॥
दोन्हीं तीरावर बागमळे । छत्र्या, समाध्या, राऊळे । दृश्य मनोहर आगळे । वर्षाकाळी विशेष ॥८३॥
याच नदीच्या उत्तरतीरा । वसला आहे देवपुरा । जेथें घालती येरझारा । देवदर्शना भाविक ॥८४॥
देवपुजार्‍यानजिक । नदीच्या अगदीं समीप । होते अति जीर्ण एक । शिवालय पुरातन ॥८५॥
याच मंदिरीं प्रथम । झाले केशवांचें आगमन । सांगती कांही जाणते जन । धुळे शहराचे रहिवासी ॥८६॥
बालब्रह्मचारी तेजस्वी । कोणी एक महातपस्वी । उतरले देवपुजार्‍याशीं । वार्ता पसरली धुळ्यांत ॥८७॥
साधुसंताचा राखावा मान । करावा तयांचा सन्मान । घेऊन तयाचें दर्शन । ख्याति धुळे नगरीची ॥८८॥
स्त्री पुरुष बालके सान । ऐकोनी हे वर्तमान । टाकोनी आपुले कामधाम । धावले नदी तीरास ॥८९॥
शुभ्रवस्त्रें परिधान । दृष्टी लाऊनी अंतर्ध्यान । पाहती मूर्ति देदिप्यमान । आसनस्थ झालेली ॥९०॥
नित्यनेमे सांज सकाळीं । येऊ लागली भक्तमंडळी । बैसवोनी तयांना जवळी । नाम-महिमा सांगती ॥९१॥
हरिपाठाचे अभंग । म्हणावे सकलांनी एक संघ । परमार्थाचा सुगंध । उधळावा नित्य दशदिशा ॥९२॥
श्रीरामकृष्ण नामाचा । छंद असावा नित्य साचा । तेणेंच त्या प्रभुचा । होईल दान पसावो ॥९३॥
केशवदत्ताची कृष्णभक्ति । ज्ञान ललसा साधुवृत्ति । सर्वांमुखी झाली कीर्ति । आजुबाजुस धुळ्याच्या ॥९४॥
लोक अनेक येती दर्शना । गर्दीं होऊं लागली प्रवचना । शिवमंदीर आतां पुरेना । जनसमुदाय दाटे अपार ॥९५॥
ज्ञानेश्वरीचे प्रवचनें करिती । मोठया रसाळपणें । विद्वत्ताप्रचुर परि बाळ्बोधपणें । विशिष्टय तयाचें आगळेच ॥९६॥
दीपिकेचा एकेक शब्द । निघे मुखांतून बुलंद । श्रोते होती धुंदसूंद । देहभान हारपोनी ॥९७॥
हें विश्वची माझें घर । सांगति संत ज्ञानेश्वर । शब्द त्याचें निरंतर । मनीं वागवा श्रोते हो ॥९८॥
विनंती ऐशी सलगीची । करिती श्रोतवृंदा नित्याची । सांगता तेणे निरुपणाची । न होई निष्फळ ॥९९॥
येणे रिती केशवदत्त । धुळ्यात राहिले कित्येक दिस । लाभले तयाचें अमूप सुख । भक्तभाविक जनांसी ॥१००॥
इति श्रीयशोधनविरचित । श्रीसद्गुरुकेशवचरित । भक्तभाविकां होवो सुखद । अध्याय सहावा संपूर्ण ॥१०१॥
॥ इति षष्ठमोऽध्याय समाप्त ॥

N/A

References : N/A
Last Updated : December 02, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP