भगवान गोपालकृष्ण - अध्याय १० वा

प्राचीन कवी केशवदत्त यांनी ’ गोपाल कृष्ण ’ हे उत्तम काव्य रचले आहे.


नम: परम कल्याण । नम: परम् मंगल । वासूदेवाय शांताय । यदुनाम पतयेनम: । साईबाबांचा अस्तमान । अंतरी संवेदून । आधीच दिला सांगून । घटना अतर्क्ये भविष्याची ॥१॥
या संबंधीचे निवेदन । केले भाविका तुम्हां लागुन । संक्षिप्तपणे विलक्षण । गताध्यायीं श्रोतेही ॥२॥
या विषयी अधिक विस्तार । केल्यास नाहीं होणार । वाऊगें इथे श्रोतृवर । वाटतें मनीं माझिया ॥३॥
साईपदाचे दर्शन । होण्याआधी तयाचे निर्याण । केशवांशी व्हावे प्रमाण । इच्छा गुरुगोविंदाची ॥४॥
एका महान सिध्दाचे । आशिस असावे साचे । भाळी आपुल्या शिष्याचे । मानसी हेतु तयांच्या ॥५॥
समाधी काळ समीप । आला साईंचा निश्चित । जाणोनी अंतरी सावचित । भेट योजिली तयांची ॥६॥
साईबाबा संतवर । प्रत्यक्ष जणू ईश्वर । त्याची आपुल्या शिष्यावर । अनुग्रह दृष्टी असावी ॥७॥
परी प्रभु केशवदत्त । होते त्यावेळीं मुंबईत । कळणें गोविंद मनीचा हेत । इष्ट होते त्वरेंने ॥८॥
मग काय जाहली मात । ऐका श्रोते सावचित । केशवदत्तासी अवचित । स्व-संवेदना जाहली ॥९॥
असतां प्रकृति केशवांची । निकोप अति नित्याची । हिंव भरले अवचिती । स्वेद सुटला अतिव ॥१०॥
हें तो काहीं दुश्चिन्ह । असावे ऐसे जाणोन । मन जाहलें उद्विग्न । केशवांचे तेधवा ॥११॥
जाणावया तयाचा भावार्थ । केशव झाले आसनस्थ । तंव तयांच्या दिव्यदृष्टीस । काय दिसले भाविका ॥१२॥
गुरु गोविंद माऊली । आजारी असे जाहली । तीव्र ज्वरे पिडीली । सोनगीरी तेधवा ॥१३॥
मिळाला आत्म संदेश । सोनगीरी यावे त्वरित । भेटणें अत्यंत उचित । गुरुगोविंदांस यावेळे ॥१४॥
मग या कारणे । सोडोनी हातची सर्व कामे । परते झाले त्वरेंने । केशवदत्त सोनगीरी ॥१५॥
तंव केशवांनी पाहिले । गुरुगोविंद तीव्र ज्वरें । होते अत्यंत पिडीले । खरोखरीच सोनगीरी ॥१६॥
जन होते बहूत । होऊनी अति चिंताक्रांत । बैसलेले सन्निध । गुरुगोविंद माऊलीच्या ॥१७॥
केशवांनी मग विनम्रें । गुरुगोविंदा क्षेम पुसले । पादसंवाहन आरंभिलें । तत्काळ तेथें बैसोनी ॥१८॥
सकळांसी पाहूनि आर्त । गोविंद म्हणाले तुम्ही भक्त । न व्हा मजविषयीं भ्रांत । ज्वर उतरेल लवकरी ॥१९॥
परी प्रवराकांठीचा संतमणी । साई समर्थ वासरमणी । अस्ता जावया निघाला झणी । दर्शनासी निघा तयाच्या ॥२०॥
साईबाबांच्या दर्शनाचा । लाभ हा अखेरचा । घ्यावा या सिध्द पुरुषाचा । शिरडीस जाऊनी लगबगे ॥२१॥
चंद्रास मिळेल चंद्रज्योत । जी चंद्रस्थानीच असे बसत । ऐसे एक भाकित । केले गोविंद मुनींनी ॥२२॥
नजिक गांवा कोपर । गंगा झाली चंद्राकार । शिरडी तयाच्या सीमेवर । म्हणोनी चंद्रस्थान तीस म्हणावे ॥२३॥
मग गोविंद गुरूंनी । मदन पाटलासी बोलावूनी । पत्र घेतले लिहूनी । बुटी साहेबांना द्यावया ॥२४॥
बुटीसाहेब ख्यातनाम । साईबाबांचे शिष्योत्तम । लाधला जयासी सर्वोत्तम । सत्संग साई प्रभुंचा ॥२५॥
पाटलांनी लिहिलेले । पत्र केशवांच्या हातीं दिले । मग महाराज त्यासी म्हणाले । उठा वेगें जा शिरडीसी ॥२६॥
पत्र घेऊनी केशवदत्त । निघाले शिरडीस त्वरित । संगे घेऊनी कांही भक्त । दर्शनासी अधीर होत्साते ॥२७॥
पडतां पाऊल शिरडींत । रोमांचित झाले केशवदत्त । म्हणाले मज भेटतील भगवंत । साईरूपें इथेच ॥२८॥
शिरडी माझे पंढरपूर । राही रखुमादेवी वर । म्हणती जया भक्तवर । ते परब्रह्म मज दिसेल ॥२९॥
श्रीमंत बुटीसाहेबासी । भेटले जाऊन मशिदीसी । पत्र दिले तयापाशी । सुपूर्द करण्या साईपदीं ॥३०॥
मग बुटीसाहेबासमवेत । गेले केशवदत्त चावडीत । देखिले स्वनेत्री साईसमर्थ । आनंद हृदयीं मायेना ॥३१॥
गोविंदगुरुचे स्नेहपत्र । पाह्तां ओलावले साईनेत्र । भाळीं लावितां ते पवित्र । मुदित झाले साईबाबा ॥३२॥
कीं वसंती यावा बहर । पीयूष वर्षावे अंबर । हर्षे उचंबळावा सागर । तैसे झाले साईनाथा ॥३३॥
पुनरपी त्या पत्रास । लाविले बाबानीं नेत्रास । मग स्वयें वंदूनी तयास । ‘अच्छा म्हणाले केशवांना ॥३४॥
तोंच तयांच्या नेत्रांतून । निघाल्या तेजस्वी ज्योती दोन । अंबरीच्या नक्षत्रासमान । अगणित तेज पुंजाळूनी ॥३५॥
दिव्य या प्रकाशज्योती । विसावल्या केशवांच्या दिठी । साईबाबांची ही प्रेमवृष्टी । ‘तोहपा’ म्हणून मिळाली ॥३६॥
केशवांच्या कायेवरून । फिरतां दृष्टी मोहरून । जाहला साक्षात्कार अगम्य । साईनाथांचा अलौकिक ॥३७॥
तदनंतर विजया दशमीस । साई गेले अस्तमास । महाराष्ट्राचा परमसंत । विसावला समाधित निरंजन ॥३८॥
इकडे सोनगीरीस त्या दिनीं । एका सेवका लागोनी । अज्ञापिलें गुरु गोविंदानी । सचैल स्नान करावे ॥३९॥
स्नान करोनी येतां सेवक । हातीच्या दंडयावरी उदक । सोड म्हणाले ‘आज एक’। ज्योत विलीन जाहली चंद्रमी ॥४०॥
मग शिरडीतून परत । आले प्रभु केशवदत्त । झाले निजगुरु सेवावृत्त । दिन कांही सोनगीरी ॥४१॥
अदृष्टांतील संकेत । जैसे साई निर्णायाचे भाकित । गोविंदगुरुसारिखे संत । अंतर्ज्ञाने जाणती ॥४२॥
ऐसाच एक दृष्टान्त । श्रोते परिसा स्वकौतुक । जो निज शिष्याप्रत । गोविंदगुरुनी दाविला ॥४३॥
कोणे एके सायंदिनी । ज्ञानेश्वरीचे निरुपणी । रमले असतां केशवमुनी । क्षणिक झाले नि:शब्द ॥४४॥
अला विचार मानसीं । अतरर्क्य पहा घटना कैसी । गुरु केले स्वबंधुसी । ज्ञानदेवे आध्यात्मिक ॥४५॥
एक प्रत्यक्ष स्वयंप्रकाशु । दुसरा तारांगणीचा सुधांशु । शांती ब्रह्माचे हिमांशु । गुरुशिष्य सहोदर ॥४६॥
गोरक्षनाथ गहिनीसी । गहिनीनाथ निवृत्तीसी । निवृत्तीनाथ ज्ञानेशासी । शिष्य परंपरा अलौकिक ॥४७॥
ज्ञानदेवा ज्ञानगुरु । निवृत्तीनाथ शांतीवरु । तैसेच आम्हां गोविंदगुरु । परम भाग्यें लाभले ॥४८॥
परि विचारू लागले त्यांचे मन । आपुल्या गुरुचे मूळस्थान । कुठे तरी असावे अन्य । प्रश्न पडला केशवांसी ॥४९॥
केशवांच्या मनीचा संदेह । अंतरीं जाणोनी गुरुदेव । मनीं म्हणाले हा हेवड । सोडवीन लवकरी संज्ञके ॥५०॥
ज्ञान दीपीकेचे वक्तव्य । बहुरसाळ आणि सुश्राव्य । निरुपणाचे लाघव । आगळेच केशवप्रभुंचे ॥५१॥
प्रतिदिनीं सायंकाळी । शिवालयाच्या ओसरीवरी । कथन करावी ज्ञानेश्वरी । नित्यनेम केशवांचा ॥५२॥
सोनगीरीचे ग्रामस्थ । म्हणावे बहु भाग्यवंत । जया दैववशें केशवदत्त । लाधले निरुपण्या प्रबोधिनी ॥५३॥
ज्ञानेश्वरीचे भावपूर्ण । एकचित्ते करावे श्रवण । अंती हरिनाम गर्जून । वंदावे गुरु अन् शिष्यासी ॥५४॥
वंदन करोनी सतभावे । आमोदित मनी व्हावे । निजगृहा परतावे । ज्ञानगंध घेवोनी ॥५५॥
ऐसा हा कार्यक्रम । चालला असतां नित्यनेम । तंव लोटता कांही दिन । केशव निघाले तीर्थासी ॥५६॥
तीर्थयात्रा परिभ्रमण । सर्व सकलांचे प्रबोधन । साधावे अधुन मधून । उद्देश या भ्रमंतीचा ॥५७॥
सोडण्यापूर्वी आनंदवन । केशवांनी केले वंदन । गुरुपदीं मस्तक ठेऊन । आज्ञा गमनासी अपेक्षिली ॥५८॥
तई स्कंधावरी दोन्ही हस्त । केशवांच्या ठेवोनी सस्मित । म्हणाले सद्गुरु गोविंद । शुभास्ते सन्तु पन्थान: ॥५९॥
याच परिक्रमेंत । तव मनीचा एक हेत । सफल होईल निश्चित । आशंकित तुम्ही ज्या विशीं ॥६०॥
आली होती एक शंका । तुमच्या मनीं एकदां । अंतर्ज्ञाने जाणीली मी तदा । ‘मूळ स्थान आमुचे कोठलें?’ ॥६१॥
मूळ स्थान आमुचे । दिसेल तुम्हां सौभाग्याचे । हितगुज मग अंतरीचे । पाहाल तुम्हीं प्रत्यक्ष ॥६२॥
टांगलेल्या पिंजर्‍यामाजी । दिसेल प्रवांसात तुम्हांलागी । पोपट अति लाजवावी । तेच स्थान आमुचे केशवा ॥६३॥
ऐकोनी महाराजांचे मनोगत । केशव झालें स्तिमित । म्हणालें काय हें अघटीत । मनकवडेपणा केवढा ॥६४॥
चातुर्वण्य प्रतीत । प्रचारार्थ धर्मतत्व । निघाले मग केशवदत्त । गांवोगांवी फिरावया ॥६५॥
शिंदखेड, नंदुरबार । पारोळा, पाचोरे अमळनेर । भक्तिमार्गाची येथे प्रचुर । मुंकुळ केली प्रवचनें ॥६६॥
महाराष्ट्राची पुण्यभूमी । पावन केली संतमहंतानी । भागवत धर्माची करोनी पेरणी । सदधर्म रक्षणा कारणें ॥६७॥
चंद्रभागेच्या वाळवंटी । वैष्णव-जन हेलावती । गजरनामाचा करिती । वासुदेव हरी गोविंद ॥६८॥
ऊन अथवा पाऊस । क्षिती न कशाची वैष्णवास । घेई मनीं एकच ध्यास । रूप दिसावे सावळें ॥६९॥
पंढरीचा श्रीपती । करील कृपा सर्वांभूती । हीच बाळगावी आस चित्तीं । उपदेशिती केशव ॥७०॥
संसारी व्हावया निष्काम । घ्यावे श्रीहरीचे नित्य नाम । तेणेच होईल भवतारण । मार्ग सुलभ भक्तीचा ॥७१॥
भागवतादि ग्रंथातून । कथा सुरस सांगून । जनता जनार्दनाचे उद्बोधन । केले केशवांनी ग्रामोग्रामीं ॥७२॥
फिरतां फिरतां एके दिनी । केशवदत्त ज्ञानमुनी । आले एका पवित्र स्थानीं । नांदेड या शहरांत ॥७३॥
मराठवाडयांतील प्रसिध्द । शहर हें नामांकित । उद्योगधंद्याने नित्य । गर्दी वर्दळीनें गाजलेले ॥७४॥
गोदावरीच्या पवित्र तीरीं । उभी ठाकली ही नगरी । ऐश्वर्याची हीजसरी । नगर नासिका सारखीच ॥७५॥
याच नांदेड शहरांत । पवित्र स्थान एक प्रख्यात । उभ्या भरत खंडात । लौकिक जयाचा गाजतसे ॥७६॥
मोंगल साम्राज्याचा अंत । करण्यासाठी ज्याचे हात । प्रामुख्यें झाले कारणीभूत । ते महापुरुष दोघे जण ॥७७॥
एक दक्षिणेचा गाझी । लावोनी जयानें अतुल बाजी । धुळीस मिळविले रणगाजी । मुसलमानी सत्तेचे ॥७८॥
उभवोनी मराठी सेना । थोपविले परकीय आक्रमणा । अभय दिधले गोब्राह्मणा । हिंदुपद पतशाही स्थापुनी ॥७९॥
तो महाप्रतापी शिवराय । जागवोनी मराठी माय । उध्वस्त केला मोंगलराय । आनंदवन भुवनीं आणावया ॥८०॥
याच वेळी उत्तरेंत । दुसरा एक महापुरुष । शीख शौर्य जमातीत । पंजाब प्रांती उदेला ॥८१॥
मोंगली प्रबल सत्तेशीं । तुर्की, इराणी अविंधासी । घालवीन परदेशी । मातृभूमीच्या बाहेरी ॥८२॥
प्रतिज्ञा ऐसी करोनी । शीख सैनिक जमवोनी । केला संघर्ष निशिदिनीं । नारा ‘श्री सत् अकाल’ लाविला ॥८३॥
या महापुरुषाचे नांव । असे गुरु गोविंदसिंह । पराक्रम केला अभिनव । संत सेना उभारोनी ॥८४॥
शांतीवादी, निष्क्रिय । दैववादी, असह्य । पंजाबी शीख संप्रदाय । चैतन्यशील केला तयांनी ॥८५॥
कबुतरानें ससाण्याची । करावी शिकार सहजची । ऐसी हिंमत सकलांची । उभी केली गोंविद सिंहानी ॥८६॥
अंतिम गुरू हे शिखांचे । नांदेडास आले अखेरचे । संत महान खालसांचे । चिरनिद्रित होण्यागोदातीरीं ॥८७॥
याच नांदेड नगरींत । गुरू गोविंदसिंह समाधिस्थ । सतराशें नऊ सालांत । राहिले अमर होवोनी ॥८८॥
शीखांच्या या अद्वितीय । दहाव्या गुरूचे महात्म्य । आजहि सकल भारतीय । हृदयीं बाळगिती अल्पादरें ॥८९॥
सचखंड गुरुद्वारांत । ठेवतां पाऊल केशवदत्त । देखते झाले अवचित । समाधिवरी पिंजरा पोपटाचा ॥९०॥
टांगलेल्या पिंजर्‍यामाजी । तोता एक ला जवाबी । पाहोनी केशवदत्तजी । उमजले शब्द स्वगुरुचे ॥९१॥
करितां समाधीस वंदन । मूर्ति दिसली दैदीप्यमान । झाले प्रत्यक्ष दृष्यमान । गुरू गोविंद सोनगीरीचे ॥९२॥
तयांच्या चित्तवृत्तींत । तत्क्षणी आले स्थिरत्व । भक्ती प्रेमाचे अपूर्वत्व । लोचनीं आले दाटून ॥९३॥
पिंजरे में पोपट जहां । वही हमारा स्थान रहा । गोविंद गुरूंचे सही सहा । शब्द अंतरी पडसादले ॥९४॥
महापुरुष सायुज्य स्थितित । राहती जरी अखंडीत । परी भक्तांचे तया सानिध्य । हांक मारिता मिळतसे ॥९५॥
परम शिष्याचा हा हेत । पंजरी पोपटाचा संकेत । दाखवूनी सहेतुक । पुरविला गुरूगोविंद ॥९६॥
गोविंदसिंहाच्या समाधित । सोनगीरीचे महासंत । दिसावे ही कथा अघटित । रसिका कथिली तुम्हांसी ॥९७॥
जैसा जैसा जयाचा भाव । दिसेल त्यासी प्रभुराव । परी अंतर्यामी असावी ठेव । श्रध्देची अति निश्चयी ॥९८॥
हाच या अध्यायाचा भावार्थ । जाणा श्रोते यथार्थ । भक्ती सौख्याचे महत्व । दुजे नसे या जगीं ॥९९॥
इति श्री यशोधन विरचित । श्रीसद्गुरु केशवदत्त चरित । भक्त भाविका होवो सुखद । दहावा अध्याय संपूर्ण ॥१००॥
॥ इति दशमोऽध्याय समाप्त ॥

N/A

References : N/A
Last Updated : December 02, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP