भगवान गोपालकृष्ण - अध्याय २१ वा

प्राचीन कवी केशवदत्त यांनी ’ गोपाल कृष्ण ’ हे उत्तम काव्य रचले आहे.


नम: परम कल्याण । नम: परम् मंगल । वासूदेवाय शांताय । यदुनाम पतये नम: । आतां माऊलीचे कार्यक्षेत्र । हळुहळु झाले विस्तृत । कक्षा तयाची सर्वत्र । दक्षिणोत्तर पसरली ॥१॥
शके अठराशें त्रेसष्ठाचे । कार्यक्रम नंदुरबारचे । उकरोनी प्रभु केशवांचे । आगमन झाले नारायणपुरी ॥२॥
इथेही गोरगरीबांना । शाली, उपरणी, वस्त्रें नाना । खण, लंगोटया भिल्लांना । स्वहस्तें दिल्या माऊलीने ॥३॥
शेवटीं अन्नसंतर्पण । भजने कथा कीर्तन । इत्यादी होऊनी कार्यक्रम । पूर्तता झाली उत्सवाची ॥४॥
पुढे सद्गुरु केशवदत्त । ओंकार मातांधा दर्शनार्थ । कडू, वुला भाई यांचे समवेत । गेले नर्मदा तटाकी ॥५॥
नर्मदेच्या तीरावर । दृष्य निसर्गाचे मनोहर । पक्षीगणांचा स्वच्छंद विहार । पाहून मन धाले तयांचे ॥६॥
तव इथें अवचित । भेटीचा योग अकस्मात । आला या मंडळीस नितांत । मोरेश्वर-गुरु नामे संताचा ॥७॥
मोरेश्वरगुरु आणि केशवदत्त । या दोन संतांची भेट । पाहुनी झाले मुदित । भक्तगण उभयंताचे ॥८॥
मग या द्वयींच्या समवेत । दुमदुमला नर्मदा कांठ । सतरा दिवस संतत । जयजय नारायण नामजपे ॥९॥
तदनंतर केशवदत्त । कडू, कालिदासाहीत । सोनगीरीस आले परत । काही दिवस मुक्कामा ॥१०॥
पुढें प्रतिवर्षानुसार । महाराज निघाले दौर्‍यावर । निजकार्य पताका खांद्यावर ॥ घेऊनी भागवत धर्माची ॥११॥
आतां महाराजांची प्रवचनें । होऊं लागली प्रामुख्यानें । नागरवस्तीस सातत्यानें । मुंबई पुण्यासारख्या ॥१२॥
धसवाडी, गणेशवाडी, दादर । माटुंगा, कांदिवली, घाटकोपर । मुंबईचा असा हा परिसर ।
गाजला माऊलीच्या प्रवचने ॥१३॥
व्याख्यानेही ओजस्वी । तरुण पढीस हितापदेशी । श्रींची झाली हृदयस्पर्शीं । अनेक ठिकाणीं मुंबईत ॥१४॥
भजनाचे काही कार्यक्रम । श्रींचे झाले हृदयंगम । समर्थ व्यायाम शाळेंत मनोरम । सुविख्यात दादरच्या ॥१५॥
कार्तिक वारी झाल्यावर । केशवदत्त गुरुवर । निघाले पुनश्च फिरतीवर । कार्य आपुले करावया ॥१६॥
अकोला, चोपडे, फैजपूर । उमरावती बडनेरा नगर । नशिराबाद सावदे नागपूर । भ्रमण गांवे कैक माऊलीची ॥१७॥
खासगी निमंत्रणेही अनंत । केशवांना यावयाची नित्य । लग्ने, मुंजी, इत्यादिक । भक्तमंडळीची आग्रहें ॥१८॥
लासलगांवचे बाबाजीमहाराज । यांच्या मुलाच्या विवाहास । केशवदत्त होते उपस्थित । आशीर्वाद द्यावया वधुवरा ॥१९॥
महाराजांचे निकटचे स्नेही । वीरकर वकील यांचे कडेही । व्रतबंधास आले लवलाही । महाराज अति अगत्य ॥२०॥
आनंदमय मंगल आशीर्वाद । दिला केशवांनी सुखद । बटुच्या ठेऊनी मस्तकी हस्त । कल्याणमस्तु म्हणाले ॥२१॥
शके अठराशें चौसष्टांत । घटना एक घडली दु:खद । महारांजाचे परमभक्त । मदनभाई झाले आजारी ॥२२॥
नाना तर्‍हेचे उपचार । करूनही मुळी उतार । प्रकृतीस न पडे तिळभर । चिंतांक्रांत झाली माऊली ॥२३॥
मदनभाईचा मृत्युक्षण । जवळी आला हें उमजुन । एकनाथी भागवताचे पारायण । सुरू केले केशवांनी ॥२४॥
शेवटी मदनभाईची प्राणज्योत । राधे गोविंद गजरात । विलीन झाली विश्वांत । आषाढी अमावस्येला ॥२५॥
मृत्यु न म्हणावा अकल्पित । न धरावा तयाचा खेदखंत । जे उपजे ते नाशवंत । विसरु नका शब्द संताचें ॥२६॥
महाराजांनी असा उपदेश । केला व्यथित जनांस । झाले होते जे शोकग्रस्त । मदनभाईच्या वियोगे ॥२७॥
कालांतराने सद्गुरु केशवांनी । मदनभाईच्या स्मरणदिनी । अन्नसंतर्पण करोनी । वस्त्रें दिली गोरगरीबां ॥२८॥
या वर्षाच्या अखेरीस । माऊली फिरून आली हृषीकेश । मग डामर खेडयास । विष्णु याग केला शांतीप्रत ॥२९॥
शके अठराशेंपासष्टांत । महाराज काही मंडळीसहीत । सामिल झाले यात्रासहलीत । विजापूर गोवळकोंडयाच्या ॥३०॥
महाजांची सौंदर्यदृष्टी । होती वाखाणण्यासारखी । शिल्प, साहित्य कलासक्ती । रसिक राजाची मूर्तिमंत ॥३१॥
या प्रवासात रसिकतेनें । श्रींनी पाहिली नाना ठिकाणें । गोलघुमटांच्या प्रतिध्वनीनें ।
साथ दिली गोविंद नामाची ॥३२॥
नृसिंहाचे देवालय प्राचिन । जागृत एक धर्मस्थान । येथेही झाला कार्यक्रम । माऊलीच्या भजनाचा ॥३३॥
सहलीच्या मधुर आठवणी । घेऊन संगे संतमणी । सोनगीरी आले परतोनी । विश्रांती घ्यावया कांही दिन ॥३४॥
महाराजांचा स्वभाव परिही । स्वस्थ बसू न दे जराही । कार्यक्रम मग येथेही । आयोजिले दोन केशवांनी ॥३५॥
आजुबाजुच्या विद्यार्थ्यांचा । मेळावा भरून आनंदाचा । कार्यक्रम विविध प्रकारचा । करविला त्यांचेकडून ॥३६॥
“अदृश्य शक्ती व साक्षात्कार” । भाषणें या विषयावर । करविली विद्वत्ताप्रचुर । जोहरे मास्तर आणि गोर्‍यांची ॥३७॥
पुढें याच विषयावर । कापशें डॉंक्टरांच्याबरोबर । चर्चा महाराजांनी सुंदर । केली एरंडोल मुक्कामीं ॥३८॥
धुळे शहराच्या आध्यात्मिक । जीवनांत पान एक । लिहीले गेले ऐतिहासिक । सुवर्ण अक्षरांनी गोमटे ॥३९॥
एकोणीसशें सत्तेचाळीसांत । धर्मविचार नामें परिषद । धुळ्यांत झाली विख्यात । भागवतधर्म मंडळाची ॥४०॥
आधिभौतिकतेच्या गुंत्यात । अडकलेल्या मानवाप्रत । दाखवावा मार्ग उचित । उद्दिष्ट होते परिषदेचे ॥४१॥
धर्माविषयीं उदासिनता । नास्तिक वृत्ती असहिष्णुता । सकल दु:खाची ही तत्वत: । कारणे चिंतनीय आजची ॥४२॥
धुळें नगरपालिकेच्या प्रशस्त । सभागृहांत ही परिषद । केली होती आयोजित । दिनांकी पांच-सहा जूनच्या ॥४३॥
प्रेरणा या परिषदेची । होती मूळ केशवांची । रुपरेषाही कार्यक्रमांची । दिली होती तयांनी ॥४४॥
पुण्याहून या परिषदेस । आले होते अगत्यें खास । श्री. करंदीकर ज.स.। संपादक केसरीचे ॥४५॥
किंबहुना ऋषी-मुनीसंताचा । संदेश तेजस्वी सुखाचा । रुजवावा भावार्थ गीतेचा । मनीं तरुंणांच्या आजच्या ॥४६॥
निष्काम कर्मयोगाची । शिकवण गोपाळकृष्णांची । दृढमूल करावी साची । जनमानसी भारताच्या ॥४७॥
याच केवळ हेतूनें । परिषदेंत या प्रामुख्याने । ठेविली होती व्याख्यानें । विद्याविभूषित जनांची ॥४८॥
कुमारी पद्मा कजवाडकर । हिचे ईशस्तवन व स्वागतपर । गायन झाल्यावर सुमधुर ।सुरवात झाली अधिवेशन ॥४९॥
समर्थ सेवाश्रमाचे अग्रणी । राजश्री अनंतराव क्षीरे यांनी । प्रस्तुत कार्याचे उद्दिष्ट सांगोनी ।वाचन केले संदेशाचे ॥५०॥
लोकनायक अणे यांचा । कोलंबोहून अगत्याचा । संदेश बहु प्रेमाचा । आला होता परिषदेसी ॥५१॥
वकील कासार मालेगांवचे । शुक्ल तसेच नंदुरबारचे । याचे अभिनंदनाचे । संदेश होते आलेले ॥५२॥
उपोदघाताचे भाषणांत । म्हणाले सद्गुरु केशवदत्त । अध्यात्म हा विषय भारतांत । अभ्युदयानें आहे नटलेला ॥५३॥
ध्यान, धर्म मानसशास्त्र । त्रिवर्गावर हा आधारित । अक्षय सुखाचा मूर्तिमंत । चिंतामणी किंबहुना ॥५४॥
यासाठी तुम्हां श्रोतृजन । सांगणे माझे आवर्जून । भगवत्-गीता आणि संतवचन । हृदयीं धरा भक्तीभावें ॥५५॥
संतवाङ्मय आणि मानसशास्त्र । या विषयावर आधारित । भाषण झाले सयुक्तिक । नित्सुरें यांचे या समयी ॥५६॥
नरहरी शास्त्री नंदुरबारकर । यांनी “चित्-साक्षात्कार” विषयावर । तर्कशुध्द आपुले विचार ।
मांडले गीवार्ण भाषेंमध्ये ॥५७॥
परिषदेच्या दुसर्‍या दिनीं । तात्यासाहेब करंदीकरांनी । “विश्वदर्शना” वरी बोलोनी । मंत्रमुग्ध केळे श्रोतृजना ॥५८॥
रेगे, गाडगीळ, करमकर । रामशास्त्री कुसुंबेकर । यांची भाषणे लोकोत्तर । स्मरणीय झाली या समयीं ॥५९॥
समारोपाचे भाषण । आणि आभार प्रदर्शन । केले केशवांनी सौहार्दपूर्ण । सांगता व्हावया परिषदेची ॥६०॥
पुढे याच सुमारास । महाराज आले पुण्यास । चर्चा करावयास विशेष । रावकमेटीच्या बिलाची ॥६१॥
न्यायमूर्ति लोकूर । राजेश्वरशास्त्री पुणतांबेकर । मंडळी अशी मान्यवर । हजर होती चर्चेला ॥६२॥
धर्मकारणा इतुकेच । राजकारणीही श्रींचे चित्त । होते किती निगडीत । कळोनी येते यामुळें ॥६३॥
डामरखेडयाच्या मंडळीनी । महाजांच्या जन्मदिनी । कार्यक्रम एक आयोजिनी । उत्सव केला सुरेखसा ॥६४॥
या गांवच्या मंडळींची । श्रध्दा केशवांच्या विषयीची । अपूर्व आणि कौतुकाची । होती अतुलनीय सर्वथा ॥६५॥
या उत्सवाच्या प्रपंगी । स्नाने पूजने नाना विधी । गोमती दर्शन इत्यादी । कार्यक्रम झाले विविध ॥६६॥
या अभिष्ठ चिंतनी । मुक्तहस्ते दिल्या केशवांनी । देणग्या ओंजळी भरोनी । सार्वजनिक संस्थाना ॥६७॥
काशीच्या पाठशाळेला । वा श्रध्दानंदाश्रमाला । गुर्जरांच्या वसतीगृहाला । मदत केली ऐशापरी ॥६८॥
या समारंभाचे कामी । माऊलीच्या अनेक भक्तांनी । श्रम केले उत्साहानी । पार पाडावया कार्य हे ॥६९॥
मुरारपुना, दशपुत्रे गुरुजी । फकिरा भिला जीवन नथुजी । मंगा, करसन सर्वोत्तमजी । नांवे अशी भक्ताची ॥७०॥
शके अठराशें अडुसष्टांत । महाराज पुन्हा आले परत । क्षेत्र नारायणपुरांत । कार्यं आपुले करावया ॥७१॥
काही काळ येथें राहून । लोकशिक्षणाचे कार्यक्रम । केले केशवांनी महोत्तम । उन्नतीसाठी भिल्लांच्या ॥७२॥
या कामी निफाडकर । तैसेच हरिभाऊ कोटलीकर । यांचेही सहाय्य झाले अपार । केवदत्त माऊलीस ॥७३॥
शेवटी सद्गुरु केशवांनी । दानधर्म केला स्वहस्तांनी । वस्त्रेंप्रावरणें वांटोनी । संतोषविली भिल्ल मने ॥७४॥
पुढें याच सुमारास । माऊली गंगापूजनास । आली रावेरी दोन दिवस । वासुदेव वाणी यांच्याकडे ॥७५॥
गंगापूजनाच्या कार्यक्रम । पार पडल्यावर यथाक्रम । हलविला महाराजांनी मुक्काम । बडोद्यासी जावया ॥७६॥
येथेंही केशवांची प्रवचनें । झाली बहुसंख्येने । बडोदेकरांच्या आग्रहाने । मंदिरी, नाना शहराच्या ॥७७॥
सरदार शितोळे मान्यवर । राबकदंबांडे जहागिरदार । या पुरुषश्रेष्ठींनी सुंदर । व्यवस्था ठेविली प्रवचनाची ॥७८॥
सिध्दनाथादि मंदिरात । महाराजांची गुर्जर भाषेंत । प्रवचनें झाली विख्यात । आबालवृध्दांच्या सामोरी ॥७९॥
शके अठराशें सत्तरचा । उत्सव महाशिवरात्रीचा । झाला बहु आनंदाचा । प्रतिवर्षाप्रमाणें ॥८०॥
या वेळीं संत ओंकारेश्वर । पूर्णेकर महाराज इंदोरकर । सर्वोत्तम भाई भिवंडीकर । हजर होते अत्यादरें ॥८१॥
उत्सवनिमित्ते भजनाचा । कार्यक्रम झाला बहरीचा । भालेराव निळोबाराय मंडळाचा । गोविंद गुरुंच्या दरबारी ॥८२॥
श्रीपाद शास्त्र्यांचे कर्णमधुर । गायन झाले सुस्वर । निनादले सप्तवर । आसमंती सोनगिरी ॥८३॥
शके अठराशें एकाहत्तरात । आले सद्गुरु केशवदत्त । वैशाख मासांत मुंबईत । अमृत महोत्सवासी खोपकरांच्या ॥८४॥
श्री. भाऊसाहेब खोपकर । होते महाराजांचे शिष्यवर । ज्यांचे घरी वारंवर । मुक्काम करी माऊली ॥८५॥
महाराज पुढें अमळनेरास । उपस्थित राहिले रथोत्सवास । परंतु याच सुमारास । घटना घडली एक दु:खाची ॥८६॥
महाराजांचें स्नेही परम । डॉक्टर कापशे ज्यांचे नाम । झाले तयांचे दु:खद निधन । एरंडोल मुक्कामीं अकाली ॥८७॥
तंव माऊलीनें तेथें जाऊन । केले दु:खीतांचे सांत्वन । आयोजुनी भजन पूजन । मृतात्म्याच्या शांतीसाठीं ॥८८॥
हे कार्य आटोपल्यावर केशवदत्त प्रभुवर । निघाले जाण्यास सत्वर । उत्तर यात्रेसी पुनरपी ॥८९॥
प्रयाग क्षेत्राच्या वास्तव्यांत । भेटले केशवांना महासंत । नामे ब्रह्मचारी प्रभुदत्त । संगम हरिहरांचा ॥९०॥
राहोनी एकमेकां सन्निध । आनंदमय झाले संवाद । मग त्रिवेणी संगमात । स्नानें केली उभयंतानी ॥९१॥
वाराणसीच्या मुक्कामात । विद्वतजनांच्या भेटी विख्यात । घेते झाले केशवदत्त । दुर्गादत्तादि शास्त्रांच्या ॥९२॥
माऊलीच्या प्रवचनाचा । कार्यक्रम एक बहारीचा । ज्ञानेश्वरीतील दृष्टांताचा । झाला तारकाश्रमीं काशीच्या ॥९३॥
महाराज या यात्रेहून । जेव्हा सोनगिरी आले परतून । तेव्हा वय वर्षे साठ पूर्ण । झाली होती तयांची ॥९४॥
म्हणोनी माऊलीच्या भक्तांनी । षष्ठाब्दिसमारंभ आयोजुनी । महोत्सव केला आनंदवनी । होम हवनादि कार्यक्रमें ॥९५॥
दिवस या सोहळ्याचा । होता भाद्रपद वद्य तृतीयेचा । शके अठराशें एकाहत्तरचा । सुखदायी शुभदायी ॥९६॥
इति श्रीयशोधन विरचित । श्रीसद्गुरु केशवदत्त चरित । होवो सकलां सुखद । एकविसावा अध्याय संपूर्ण ॥९७॥
॥ इति एकविंशतितमोऽध्याय: समाप्त ॥

N/A

References : N/A
Last Updated : December 03, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP