भगवान गोपालकृष्ण - अध्याय ८ वा

प्राचीन कवी केशवदत्त यांनी ’ गोपाल कृष्ण ’ हे उत्तम काव्य रचले आहे.


नम: परम कल्याण नम: परम मंगल । वासुदेवाय शांताय यदूनां पतये नम: । केशवदत्तांचा कीर्तीगंध । भाविका करोनी धुंदसुंद । पसरला सर्वत्र स्वच्छंद परिसरांत धुळ्याच्या ॥१॥
महाराजांची वैखरी । साक्षांत जणूं काश्मिरी । प्रज्ञेची शीतल शर्वरी । बरसावी ज्ञानगंगा ॥२॥
लोक मंदिरी वा रहाटी । होतील जेथे गांठीभेटी । चर्चा तयाच्या एकच ओठीं । प्रवचनाची प्रभूंच्या ॥३॥
जन म्हणती आपुलें । भाग्य केवढे उत्तुंग भले । लाभले पूर्व सुकृतामुळे । अमृत शब्द प्राशावया ॥४॥
निरुपणाची ही पर्वणी । साधिली अपूर्व धुळेकरांनी । वार्ता त्याची कर्णोपकर्णी । खेडोपाडी पसरली ॥५॥
बैलगाडी अथवा टांग्यातून । कोस कोस अंतर चालून । येऊं लागले असंख्य जन । ज्ञानेश्वरी ऐकावया ॥६॥
लागली येऊ निमंत्रणें । निरुपणाची नित्यनेमे । ठिकठिकाणी सप्रेमे । केशवदत्त गुरुंना ॥७॥
धार्मिक वृत्तीचे जतन । सुशीलतेचे संवर्धन । भ्रष्टाचाराचे निर्मूलन । मार्ग एकला सुखाचा ॥८॥
हीच अज्ञ जनांत । रुजवावी भावना सतत । इतुकाच लौकिकी हेत । प्रवचनाचा असे तयांच्या ॥९॥
राष्ट्र झाल्याविण प्रबळ । वृध्दी न पावे धर्मबळ । धर्मबळाविण सबळ । अभ्युदय न होई कुणाचा ॥१०॥
प्रवचनांत म्हणोनी । राष्टोन्नति विषय गुंफोनी ॥ मागती केशव प्रभुचरणी । क्षेम कल्याण भारताचे ॥११॥
प्रभुभक्ती आणि राष्ट्रभक्ती । व्हावी न तयाची विभक्ती । घेऊन दोघां सांगाती । मार्ग प्रगतीचा आक्रमावा ॥१२॥
महाराजांचा द्रष्टेपणा । केवढा उजू होता जाणा । आध्यात्म तितुका लोककारणा । कल्याणकारी सारखाच ॥१३॥
चांदोरकर नामे वकील । नागरिक धुळ्याचे सोज्वळ । भाविक आणि सच्छिल । परम भक्त महाराजांचे ॥१४॥
आयोजिले होते तयांनी । प्रवचन केशवांचे एके दिनीं । माडीवर त्यांच्याच सदनीं । मंडळीं जमली बहुत ॥१५॥
आसनस्थ होता गुरुवर । झाला हरिनामाचा गजर । राधे गोविंद गोविंद सुस्वर । भजन झाले सानंदे ॥१६॥
उघडोनी ज्ञानेश्वरीचे पान । ओवी अनाहुतपणे उचलोन । सुरू केलें प्रवचन । ओघ जेवी गंगेचा ॥१७॥
शब्दा मागून शब्दपंक्ती । शारदाच जणू जीव्हेवरती । वक्तृत्वाची अमोघ दीप्ति । दिपले पाहून श्रोतृजन ॥१८॥
याच श्रोतृगणांत बसले । होते एक गृहस्थ । न्याहाळीत एकचित । केशवदत्त प्रभूंना ॥१९॥
वामनराव नांव त्याचें । रहिवासी होते धुळ्याचे । सात्विक अति वृत्तीचे । उपनामे पराडकर ॥२०॥
याच नांवाचा निर्देश । केला आहे मी विशद । पहा श्रोते तुम्ही सुभग । पहिल्या चरित्राच्या ॥२१॥
निरुपणाच्या ओघांत । महाराज लविती हात । स्वमस्तकास कधी कानास । हालचाल स्वाभाविक ॥२२॥
प्रवचनाच्या स्पष्टीकरणार्थ । हावभाव हे यथार्थ । वक्त्यास असणें उचित । वाटले साहजिक श्रोत्यांना ॥२३॥
परी त्या हालचालीचा । विशिष्ट होता अर्थ साचा । अंतरीच्या खुणेचा । उमज एक्या पराडकरां ॥२४॥
भासले तयांना केशवदत्त । केडगांवचे प्रसिध्द । संत नारायण प्रत्यक्ष । बैसलेले आसनी ॥२५॥
अद्भुत ही नवलाई । नव्हती भ्रांतिची चतुराई । दैविक ही कारवाई । अंतरी जाणले पराडकर ॥२६॥
बेट येथील निवासस्थानी । वामनराव पराडकरांनी । नारायण महाराजांचे चरणीं । ठेविले होते मस्तक ॥२७॥
झाली जुनी आठवण । आठवला तो सुवर्णक्षण । स्मरले ते सौभाग्यदर्शन । मोहरले अंग तयांचे ॥२८॥
दिले होते निमंत्रण । यावे कृपाळा नारायण । लागावे आपुले चरण । घरी माझ्या धुळ्याच्या ॥२९॥
तैं महाराज नारायण । वदले तुज अवश्य दर्शन । धुळ्यांत प्रत्यक्ष येऊन । देईन अन्यरूपानें ॥३०॥
महाराजाच्या मनीचे कोंडे । झाले पराडकरां साकडे । म्हणाले ‘निराळें रूप रोकडे’। कैसें जाणू मी पामर? ॥३१॥
महाराजांनी तेव्हां स्वमस्तकास । तैसाच कर्ण पाळीस । वैशिष्टयपूर्ण लाविले हातास । खूण बाणण्या भक्तासी ॥३२॥
याच खुणेची प्रचिती । आली पराडकरांप्रती । अश्रू दाटले नयनीं किती । आनंदाचे वर्णवेना ॥३३॥
पहा कैशी संताची मात । पुरविती भक्तांचा हेत । दर्शन देती नारायण संत । केशवरूप पराडकरा ॥३४॥
पराडकर होवोनी उन्मन । केशवांचे धरती चरण । म्हणती झालों धन्य धन्य । गुरुवरा आज मी ॥३५॥
या पराडकरांचा वृत्तांत । कथिला आहे मी साद्यंत । पहिल्या दोन अध्यायांत । ध्यानीं असेल वाचका ॥३६॥
पराडकरांनी विनम्रें । केशवदत्तासी विनविले । महाराज मम गृही चलावे । आस पुरवा दासाची ॥३७॥
पाहून तयांचा सद्भाव । केशवदत्त महा वैष्णव । म्हणाले ऐका वामनराव । जरूर येऊ तुमचे घरीं ॥३८॥
पराडकराचे भाग्य थोर । त्या कारणें त्यांचे हयातीभर । महाराज उतरले वारंवार । बिर्‍हाडीच तयांच्या ॥३९॥
एकोणीसशें नऊ सालीं । परकियांच्या सत्तेखाली । जनता होती पिचलेली । गुलामीच्या बंधनाने ॥४०॥
अज्ञान, दारिद्र्य, बेकारी । ठाव देवोनी घरोघरीं । बसली होती बिचारी । मान गुडघ्यांत घालोनी ॥४१॥
याच असाह्य जनतेला । देशभक्तांनी जरी हात दिला । परी संतानीच फिरविला । मायेचा दिलासा पाठीवर ॥४२॥
तहानलेल्यासी जीवन । भुकेल्यासी अन्नदान । अनावृत्तासी वस्त्राप्रावर्ण । पुरविले संत जनांनी ॥४३॥
पाणपोया अन्नछत्रे । धर्मशाळा उद्योग कुटिरें । उभारिली इस्पितळें । कारण संत प्रेरणा ॥४४॥
धर्म जागृति लोक जागृति । वाढवावी सतप्रवृत्ती । तीच राष्ट्राची अभिवृध्दी । धारणा संताची निखळ ॥४५॥
सर्व धर्माविषयी सहिष्णुता । पंथापंथात समता । हीच जाणा सर्वात्मकता । तत्व विश्व संतांचे ॥४६॥
सदविचाराचे रोपटे । पाणी घालतां नेटके । ताटवे होतील गोमटे । मोगर्‍यांचे सुंगधी ॥४७॥
म्हणोनि संस्कृतिची । जोपासना करावी साची । बालपणीच मुलांची । नीतिधर्म शिकवून ॥४८॥
याच कारणें केशवदत्त । आंग्ल वा मराठी शाळेंत । जाऊन होते उपदेशीत । धडे नीतिचे बालकां ॥४९॥
कधीं घेवोनी बालचमूस । मंदिरीं वा उद्यानांत । बैसावे एकत्र आनंदात । गोष्टी सांगाव्या धार्मिक ॥५०॥
सुश्लोक अथवा कविता । रामरक्षा वा गीता । अभंग अथवा सुबोध फटका । पाठांतर घ्यावे करोनी ॥५१॥
घालता मुळांस पाणी । वृक्षसंभार फोफावे धरणी । तेवीच तयांची करणी । राष्ट्रबांधणिची तार्किक ॥५२॥
राधे गोविंद राधी गोविंद । लागो तुम्हां नित्य छंद । तेणेंच पावाल आनंद । उपदेश तयांचा सान थोरा ॥५३॥
खरोखर किती भाग्याचे । दिवस होते धुळ्याचे । पाय लागले केशवांचे । पूर्वसुकृत अपूर्व ॥५४॥
याच धुळें शहरांत । नदीकाठांलगत । पद्मनाभस्वामीचा मठ । आहे ठाऊक तुम्हांसी ॥५५॥
परिवार याचा प्रशस्त । लता तरुंनी व्याप्त । शांत तसाच निभ्रांत । साधकासी सुयोग्य ॥५६॥
याच पवित्र मठांत । होते केशवदत्त राहात । सोनगीरीस जाईपर्यंत । भेटण्या गुरु गोविंदासी ॥५७॥
गुरु गोविंदांची भेट । नव्हती जरी अकल्पीत । तरी कारण मात्र निमित्त । पराडकरांचे जाहलें ॥५८॥
चिखला माजीचें कमळ । लागो नेदी अंगी मळ । तैसेचि होते निर्मळ । जीवन पराडकरांचे ॥५९॥
कमळदल पाण्यांत । राहते हसे अलिप्त । तैसेच ते संसारात । निष्काम कर्में वर्तती ॥६०॥
घडावा संतसहवास । ठेवोनी मनीं एकच आस । जाती नित्य दर्शनास । ठिकठिकाणी संतांच्या ॥६१॥
याच कारणें सोनगीरी । होत असे तयांची फेरी । सवें घेऊनी भक्तमंडळी । गोविंद गुरुंच्या दर्शना ॥६२॥
गोविंद गुरुंच्या भक्तांत । होते अस तयांचे अग्रेसरत्व । स्वामींचीही असीम प्रीत । होती पराडकरंवरी ॥६३॥
भेट आनंदवनीची । ना चुके कदा तयांची । वारी जेवी पंढरीची । वैष्णव चुको न देती ॥६४॥
याच पराडकरांना । गोविंद गुरुंनी केली आज्ञा । आणावया केशवांना । धुळ्याहून सोनगीरी ॥६५॥
नदी किनारीच्या मंदिरांत । आले आहे मम बालक । घेऊन यावे त्वरीत । दरबारीं माझ्या म्हणाले ॥६६॥
तईं पराडकर वामनराव । सवें घेऊन भाऊराव । कुळकर्णी जयांचे आडनाव । धांव घेती धुळ्यास ॥६७॥
पद्मनाभ स्वामीच्या मठांत । आले हे सद्गृहस्थ । देखिले तयांनी आसनस्थ । प्रभुचिंतनी केशव ॥६८॥
या पुढील कथा सुरस । वर्णिली मी तुम्हां रसिक । गुरु-शिष्य भेटीची सुरेख । तिसर्‍या अध्यायीं चरित्राच्या ॥६९॥
गुरु-शिष्यांची अपूर्व भेट । पाहिली जयांनी उत्कट । ते भाग्याचे परम श्रेष्ठ । उपमा कुठली तयाला ॥७०॥
ज्यासाठीं केला अट्टाहास । तोच सौभाग्याचा दिवस । सद्गुरुप्राप्तीची आस । फला आली केशवांची ॥७१॥
तयांच्या मुखकमलावर । ओसंडले तेज अपार । गुरुकृपेचा सुखकर । हात फिरता अंगावरी ॥७२॥
शिवदत्त शिवदत्त । गोविंद मुखीचा सुशब्द । ऐकोनी प्रभु केशवदत्त । जाणले खूण अंतरीची ॥७३॥
शिवदत्तांच्या भाकिताची । आली तयाना प्रचिती । संत कर्तृत्वाची दिव्यशक्ती । आकळावी कशीकुणा ॥७४॥
संतसिध्दांचे एकमेकांस । कळतात आत्मसंदेश । राहतात जरी पराक्ष । अंतिद्रिय ज्ञानाने ॥७५॥
शिरडीचे साईबाबा । ब्रह्मीभूत झाले जेव्हां । गुरु गोविंद म्हणाले तेव्हां । “चंद्रमें ज्योति मिल गयी” ॥७६॥
होते हे शब्द तयांचे । आदल्याच दिवशीचे । वर्तमान साईच्या समाधिचे । आले छापून दुसरे दिनीं ॥७७॥
पहा संताचें कैसे महिमान । जाणती सकळ वर्तमान । एक्या ठायीं स्वस्थ बैसोन । अगाध लीला तयांची ॥७८॥
केशव गोविंद भेटीचा । नवलाव अति सुखाचा । दिवस बहु चैतन्याचा । होता सोनगीरकरांसी ॥७९॥
अमृताच्या सागरीं । अमृताच्याच येती लहरी । तेवीच या द्वयींच्या अंतरी । उसळल्या उर्मी हर्षाच्या ॥८०॥
माता आणि बालक । दोन परी अंतरी एक । तैसेच हे गुरु-शिष्य । एक चंद्र दुजी चंद्रिका ॥८१॥
सतजनांत विरावे सज्जन । विश्वांत विसावे परब्रम्ह । तैसे संतात संतजन । एक रूप जाहले ॥८२॥
आत्मौक्यता तयांची । निर्मळ चंद्र चंद्रिकेची । शोभा निरभ्र गगनीची । सुख-स्पर्शीं सकलांना ॥८३॥
फुलें शुभ्र पाकळ्यांची । नाजुक सुगंधी प्राजक्ताची । बरसावी अंगावर सुखाची । वाटले आज भाविकां ॥८४॥
पाहोनी एकत्र दोन संत । फुलला सोनगीरी वसंत । कोकीळकुजनें आसमंत । दुमदुमला भक्तीप्रेमानें ॥८५॥
भक्ति-प्रीतीचा संगम । गुरुशिष्याचा हृदयंगम । भाग्यें पाहिला मनोमय । धन्य तेची या जगीं ॥८६॥
सोनगीरीच्या प्राचीवर । केशवरुपी अरुण कमळ । उमलले अज सुंदर । सौरभ भक्तीचा पसरला ॥८७॥
परमहंस गुरु गोविंद । पूर्णानंद विबुध वंद्य । पदी तयांच्या शिरसावंद्य । केशवदत्त जाहले ॥८८॥
पुजिली प्रेमें हृदयकमली । दयानिधी गुरुमाऊली । व्हावी मज कृपा साऊली । केशवदत्त म्हणाले ॥८९॥
गुरुराया कृपाधना । परिसा माझी विज्ञापना । तेजोराशी दयाघना । कामना माझी पुरवावी ॥९०॥
व्हावा मज अनुग्रह । हाच मनीचा निग्रह । या कारणे प्रभुराव । आश्रयासी पातलो ॥९१॥
तुम्हींच भक्तोध्दारक । तुम्हीच सकल रक्षक । तुमचेच कृपाकटाक्ष । उध्दरोत आतां आम्हांसी ॥९२॥
आपुल्याच कृपादिठी । होवो ज्ञानामृत वृष्टी । पांडुरंग दिसो समष्टी । तव अनुग्रहे कृपाळा ॥९३॥
कुमुदिनीभोवतीं भ्रमर । रुंजी घाली निरंतर स। मन माझें तैसेच आतुर । ज्ञान-मकरंद प्राशावया ॥९४॥
आत्मसुखाचा निजबोध । द्यावा मज अविरोध । परमप्राप्ति प्रबोध । होईल जेणें मजप्राप्ती ॥९५॥
राहावे देही उदास । निवारावे आशापाश । कैवल्य ज्ञानाची आस । लागली मज गुरुराया ॥९६॥
त्यजावी सकल मोहममता । बाणावी अंगी वैराग्यता । इंद्रियांची चंचलता । विरावी तुमचे पायावरी ॥९७॥
विषय अखंड सोडावे । चित्तीं प्रसन्न राहावे । निजानंदी रमावे । आत्मरुप होवोनी ॥९८॥
विनंती ऐशी सलगीची । केशवदत्तप्रभुंची । फळा आली सुखाची । “तथास्तु” म्हणतां गोविंद ॥९९॥
“तुम्ही तर संतवर । केवढा तुमचा अधिकार । संतुष्ट तुमच्या विनयावर । जाहलो” म्हणाले गोविंद ॥१००॥
“तुम्ही स्वयंप्रकाशी । न कशाची तुम्हा क्षिती । तुमची आमुची संगती । नियनीनेच घडविली” ॥१॥
हाती घेवोनी केशवांचा कर । आलिंगुनी दृढतर । “तुम्हीच आमुचे शिष्यवर” । गोविंद गुरु म्हणाले ॥२॥
सोनियाचा हा दिन । पाहोनी सकल भक्तजन । देहभावा विसरोन । हर्षे नाचले आनंदवनीं ॥३॥
इति श्रीयशोधनविरचित । श्रीसद्गुरु केशवदत्तचरित । भक्तभाविका होवो सुखद । आठवा अध्याय संपूर्ण ॥४॥
॥ इति अष्टमोऽध्याय: समाप्त ॥

N/A

References : N/A
Last Updated : December 02, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP