भगवान गोपालकृष्ण - अध्याय ४ था

प्राचीन कवी केशवदत्त यांनी ’ गोपाल कृष्ण ’ हे उत्तम काव्य रचले आहे.


नम: परम् कल्याण नम: परम् मंगल । वासुदेवाय शांताय यदूनां पतये नम: ॥ मोंगलाई माजि जिल्हा एक ।
“धारासीव” आहे प्रसिध्द । त्या जिल्ह्यामाजी सुरेख । वीट नामें ग्राम वसे ॥१॥
ऐतिहासिक खर्ड्यापासून । तीन कोस दूर असून । खर्ड्याइतुकेच ते पावन । महाराष्ट्र देशी झाले असे ॥२॥
या पवित्र गांवी एक घराणें । नामांकित “रामराप” नामे । नांदत होते सुखानें । अद्वैत भाव राखूनी ॥३॥
होते या घराण्यांत । ऋग्वेदी ब्राह्मण देशस्थ । परम श्रेष्ठ भगवत भक्त । गोविंदपंत नामे अत्रि गोत्राचे ॥४॥
सुखवस्तु मनाचे उदार । अति आदरे पाहुणचार । आल्यागेल्या करिती आदर । नेटक्या गृहस्थी रिवाजे ॥५॥
भगवद गीतेचे नित्य पठण । पूजा अर्चा धारणा ध्यान । शुध्द आणि पवित्राचरण । आचरती तटस्थ वृत्तीनें ॥६॥
माताहि तयांची महदभक्त । नित्य नेमे करी जपतप । भावभक्ती स्वयंज्योत । दिव्य तेज भासतसे ॥७॥
या कारणें गोविंदपंतावर । झाले अमृतमय संस्कार । फुटला भक्ति-प्रितीचा अंकुर । दैववशें तया अंगी ॥८॥
नित्य प्रात:काळी उठावे । गोविंदपंतासी जवळी घ्यावे । दशमस्कंदतिल गोपीगीत ऐकावे ।
गोड गळ्यांतून पुत्राच्या ॥९॥
व्हावे तल्लीन दोघांनी । देहभावास विसरोनी । एकरूप व्हावे प्रभूचरणीं । निजानंदी रमावे ॥१०॥
भगवंताचा एक ध्यास । नित्य असे या साध्वीस । वेचिले उभे आयुष्य । चिंतनी केवळ प्रभूच्या ॥११॥
नारायण नारायण । अखंड ऐसे करीत स्मरण । पंचतत्त्वांत झाली विलीन ।“मोहरी” गांवास माता ही ॥१२॥
“रामराप” घराण्याचा लौकिक । आधीच केवढा अलौकिक । सात्विक आणि भाविक । वारसा ठेविला मागे तिनें ॥१३॥
अशा या जननीच्या कुशीत । जन्मावे गोविंदपंत । हें नवल नव्हे अघटीत । पुण्याई अनेक जन्मांची ॥१४॥
भार्याहि गोविंद पंताची । मूर्ती केवळ त्यागाची । मिळाली सोबत जन्माची । एकमेका सुयोग्य ॥१५॥
नित्य करावा दानधर्म । विवेके आचरावें सत्कर्म । संसाराचें हें मर्म । अंगी तयांच्या वसतसे ॥१६॥
आल्या गेल्या तडी तापसा । मुक्त ह्स्ते द्यावा पैसा । दीन दुबळ्यासांठी वसा । मायेचा घ्यावा अखंड ॥१७॥
अन्नपूर्णा यासाध्वीचे । यथार्थ होते नांव साचे । उणेपण नव्हते कशाचे । वीटे गावांत कुठेही ॥१८॥
लोक विट्याचे भाग्यवंत । फळा आले सुकृत । लक्ष्मी-नारायण प्रत्यक्षांत । अन्नपूर्णा-गोविंद पाहती ॥१९॥
अन्नपूर्णा आणि गोविंदपंत । शांत सुविचारी दांपत्य । प्रिय झालें सकलांप्रत । पंचक्रोशीत बिट्याच्या ॥२०॥
शुध्द बिजा पोटी । फळें रसाळ गोमटीं । येती ऐसे सांगती । तुकोबा आपुल्या मुखानें ॥२१॥
सर्वांग जयाचे निर्मळ । चित्त जैसें गंगाजळ । तो साधूच म्हणावा निखळ । तुक्याचेच शब्द हे ॥२२॥
मुखीं अमृताची वाणी । देह देवाचे चरणीं । ऐशी जया नराची करणी । तो सत्पुरुष जाणावा ॥२३॥
या संतोक्ती अनुसार । पतिपत्नी विटेकर । होती शुध्द आणि उदार । मराळ जणूं मानसीचे ॥२४॥
या भाग्यवंताचें पोटी । जन्मा आले भक्तश्रेष्ठी । उभी राहिली पाऊटी । पुण्याई भगवत भक्तांची ॥२५॥
सोनियाचा तो दिवस । उदया आला पूर्वेस । भाद्रपद वद्य तृतीयेस । अठराशें अकरा संवत्सरीं ॥२६॥
ग्राम नामें ‘मानूर’ । अन्नपूर्णा बाईचे माहेर । बीड जिल्ह्यांत महशूर । होते निसर्गरम्य बहू ॥२७॥
जीवन आपुलें व्यतीत । करण्या धर्मप्रसारार्थ । या मातुलग्रामांत । संत एक जन्मले ॥२८॥
हेच आपुले चरित्रनायक । केला ज्यांचा मी उल्लेख । ‘नदी किनारी आया बालक’ । तृतीयोध्यायी श्रोते हो ॥२९॥
भागवत धर्माच्या प्रचारार्थ । मुमुक्षुंचे साधण्या इप्सित । दीनदुबळ्यांच्या उध्दारार्थ । अवतार यांनी घेतला ॥३०॥
तेजस्वी हें बालक । झाले सकलां कौतुक । आगळें आणि अलौकिक । प्रबुध्द तैसे प्रबोधिनी ॥३१॥
पाय मुलाचे पाळण्यांत । दिसती ऐसे म्हणतात । प्रचीती तयांची नितांत । आली सकल जनांसी ॥३२॥
शुभवेळा शुभ नक्षत्र । ग्रह उच्चीचे सकळ पवित्र । कुंडलितला योग अन्यत्र । दिसेल ऐसा क्वचित ॥३३॥
जोशी विष्णु बाळकृष्ण । काव्यालंकार पंडीतभूषण । वर्तविलें यांनी भविष्य संपूर्ण । काव्यांत जन्मकुंडलीचे ॥३४॥
हा अवतारी महापुरुष । प्रकाशमान सर्वंकष । होईल सकलां आदर्श । सत्वशील योगी म्हणोनी ॥३५॥
यासी होतील साक्षात्कार । येईल वैराग्य अनिवार । विदेहताहि वारंवार । उत्पन्न होईल तयासी ॥३६॥
पाळूनी ब्रह्मचर्य प्रखर । करील सकळांचा उध्दार । दुरितांचा होईल तापहार कनवाळू मायमाऊली ॥३७॥
हातीं घेऊनी ज्ञानज्योत । उजळील अखंड भारत । भागवत धर्माची संतत । मिरवील पताका खांद्यावरी ॥३८॥
कामना अंतरांतील सर्व । सोडील स्वयें संपूर्ण । आत्मैक्यांत राहिल परिपूर्ण । संतुष्ट महायोगी हा ॥३९॥
हा न मानील सुखदु:ख । यासी न ग्रासील भयक्रोध । न करील कशाचा उद्वेग । राहील स्थितप्रज्ञसंयमी ॥४०॥
सर्वत्र हा अनासक्त । लाभालाभांत विरक्त । इंद्रिये ठेविल अलिप्त । विषयांतूनी सर्वदा ॥४१॥
जोश्यांची ही वैखरी । तंतोतंत झाली खरी । येईल प्रचीती श्रोतयांपरी । वाचिल्या ग्रंथ संपूर्ण ॥४२॥
चंद्रकलेसमान । वाढत होते बाळ सान । मातापिता उभय जण । पाहती कवतुक सुखानें ॥४३॥
रूप गोजीरें वेल्हाळ । गोकुळीचा जणूं गोपाळ । उचलोनी घेती सकळ । कडेवरी नरनारी ॥४४॥
सुवर्णासम अगंकांती । नयन इंदिवर शोभती । सरळ नासिका वक्रभ्रुकुटी । सतेज सुंदर रूप दिसे ॥४५॥
या प्रिय बालकाचे । झाले नामाभिधान साचे । नांव ठेविले तयाचे । “केशव” ऐसे सुबोध ॥४६॥
बाळपणीचे बालजीवन । वर्षे लागतां अवघी तीन । दुरावले मातेपासोन । पूर्व प्रारब्धा कारणें ॥४७॥
माता सोडोनी इहलोक । अवचित करी स्वर्गवास । ठेविले मागे केशवास । जनकल्याण कारणें ॥४८॥
बीज ऐसे शैशंवांत । पोषक वैराग्य भूमीत । पडले पूर्वानुसंकेत । विधात्यानें योजिल्या ॥४९॥
सुखासी होता वंचित । विरागवृत्तीस मिळे उचीत । खत आपैसे हे सत्य । सांगती संत महात्मे ॥५०॥
अन्नपूर्णाबाईचे मागुति । निज पुत्रासी वाढविती । पाळणा डोळियाचा करिती । गोविंदपंत वात्सल्ये ॥५१॥
हाती धरोनि तयासी । न्यावें नित्य मंदीरीसी । करावे देवदर्शनासी । नियम कधीं चुको नये ॥५२॥
गोड बोबड्या बोलोनीं । म्हणावी स्तोत्रें केशवानी । अश्रू यावे लोचनीं । आनंदे मग पित्याच्या ॥५३॥
माते समान बुझाऊनी । वाढविले अंकी घेऊनी । ज्ञानदीपा स्नेह घालूनी । ज्योत ठेविली तेवत ॥५४॥
वय होता सहा वर्षे । शाळेत गेले सहर्षे । बृहस्पतिसारिखे । धीमंत भक्तवर ॥५५॥
रामायणादि ग्रंथाचे । झाले वाचन तयांचे । प्रबोधन झाले मनाचे । संतवाङगमय वाचूनी ॥५६॥
नऊ वर्षांचे हे बालक । दिसे जणूं मुनी शुक । ज्ञानवैराग्याचा मृगांक । क्षितीजावरी उगवला ॥५७॥
संस्कारक्षम या बालकास । गायत्री मंत्राचा उपदेश । उपनयनाचे समयास । पित्यानें प्रथम निवेदिला ॥५८॥
पूर्वसुकृता माझारी । हे बटु ब्रह्मचारी । मौजीबंधन झाल्यावरी । आले नेवासे गावांत ॥५९॥
पहा कैसे हे भाग्यवंत । वास करण्या आले नेवाश्यांत । जेथें ज्ञानेश भगवंत । भावार्थदीपिका निवेदती ॥६०॥
जे परम शांतीचे आगरु । सत्वशीलतेचे महामेरू । येऊनी नेवासे भीतरु । अध्ययनार्थ राहिले ॥६१॥
जे परम शांतीचे उमाळु । भृतमात्रासी सदा स्नेहाळु । ऐसे हे परम वेल्हाळु । बालयोगी शोभती ॥६२॥
या पवित्र नेवाश्यांत । सच्चिदानंदबाबांच्या कृपाहस्त । ठेविती भाली ज्ञानदेव संत । लिहून घेण्या ज्ञानेश्वरी ॥६३॥
अशी ही भूमी परम मंगल । शीवे न जीसी अमंगल । इथेच पडले शुभ पाऊल । ज्ञानेशा भगवान विष्णुचे ॥६४॥
बाल केशवांचा विद्याभ्यास । सुरु झाला नेवाश्यास । शुक्लेंदुवत विकास । ज्ञानप्रभेचा जाहला ॥६५॥
आधिच शुध्द हिरकणी । गोविली जैं सुवर्णकोंदणी । सुषमा  तिची चहूगुणी । चक्षुम मग दिसतसे ॥ ६६॥
तैलबुध्दीचे केशव । सरले न जयांचे शैशव । देखोनी तयांचे ज्ञानवैभव । दिपले डोळे गुरुजनांचे ॥६७॥
पाठशाळे जरी अध्ययन । वसे मनीं भगवतचिंतन ॥ ईशप्रेमी अखंड तल्लीन । राधेशाम आळविती ॥६८॥
जाऊनी बसावें एकांती । तरुतळी वा नदीकाठी । ध्यानस्थ होऊनी जगजेठी । हृदयामाजी पहावा ॥६९॥
प्रेमाचें यावे अनन्य भरते । नयनीं बाहावे नीर सरते । डुल्लावे होऊनी निरुते । स्वानंदे भेटतां वनमाळी ॥७०॥
जीवनाची ही नौका । सुखेनैव तरंगता । अकस्मातें झंजावाता । सांपडली एका दु:खार्णवीं ॥७१॥
ज्ञानदेवासारिखे । केशवही झाले पोरके । गोविंदपंत दैववशें । कालवश जाहले ॥७२॥
ते समयीं दशवर्षांचे । वय होते केशवांचे । फासे पडले नियतीचे । दान उफराटे घेऊनी ॥७३॥
मोहिनीराजाचे चरणीं । बाल केशवासी ठेवोनी । जावे गोविंदपंतानी । विधीलिखित कैसे हें ॥७४॥
छत्र न राहावे मातेचे । न तैसेची प्रिय पित्याचे । या अतर्क्य घटनेचे । आलेख कुणा कळावे ॥७५॥
परी वियोगादि आपदा । ही वैराग्यरुपी संपदा ॥ ज्ञानीजन मानिती सदा । मुढास मात्र सिनानी ॥७६॥
जीवासवे जन्ममृत्यु । जाणती जे गीतातत्वु । ते तत्वज्ञ आणि ज्ञानवंतु । शोक तयांचा न मानिती ॥७७॥
या रमणीय भूमींत । रोपटें हे प्रशांत । हळूवारपणे बहूत । जोपासिले नेवासे ॥७८॥
बालक्रिडा केल्या अनंत । इथेच घेतला तयांनी छंद । राधेगोविंद-राधेगोविंद । अनिर्बंध भजनाचा ॥७९॥
बालगोपाळासवें । एकांती जाऊन बैसावे । भजनानंदि रमावे । भान न राहावे काळाचे ॥८०॥
निरागस ऐसे बालपण । सहज गेले निघून । ठेऊनी सुखदु:खाची आठवण । चरित्रनायकासी ॥८१॥
साहित्याची सुवर्ण खनी । जिथे उघडली ज्ञानेशानी । केली विवेकवल्लीची लावणी । तेंच हे नेवासे ॥८२॥
या खाणीतील सुवर्ण कण । अति आदरे वेचून । अध्यात्माचे तोरण । बालत्वे लाविले केशवांनी ॥८३॥
इथेच या प्रेमळा । चितशक्तीचा आला उमाळा । भावभक्तीचा पिकला मळा । ज्ञानदेवे कृपा केली ॥८४॥
धैर्य, पावित्र्य, उत्साह, ओज । अद्रोहता, नम्रता, क्षमा, तेज । दैवसंपत्ति ऐशी सहज । घेऊन आले प्रभुत्वर ॥८५॥
जे मनोनिग्रही निराकार । नि:संग आणि निरहंकार । स्थिर बुध्दीचे अचलेश्वर । कर्ते सात्विक केशव ॥८६॥
शैशवाचे तृणांकार । घेऊं लागले आकार । तारुण्य झाले साकार । केशव-प्रभुंच्या ठिकाणीं ॥८७॥
तरी या पुढती विज्ञापना । शेषग्रंथी केशवांना । उल्लेखूं आपण तयांना । श्रीस्वामी वा महाराज ॥८८॥
नेवाशाचा ऋणानुंबंध । सोडूनी सारे प्रबंध । ठेऊनि मागे स्मृतिगंध । महाराज आले “नगरासी ॥८९॥
तारुण्याची नव्हाळी । दिसूं लागली आगळी । ब्रह्मानिष्ठेची कोवळी । प्रभा अंगी तयांच्या ॥९०॥
वडिलांचे गेल्यावर छत्र । महाराजांचे अन्य आप्त । आपैसे आले प्रभूत । करण्या साहाय्य तयासी ॥९१॥
शास्त्र संकृतादि विद्याभ्यास । केला प्रभूंनी नगरास । बावळे वकिलांचे लौकिकार्थ । झाले साहाय्य स्वामींना ॥९२॥
आबासाहेब देशपांडे । शेगावचे वकील गाढे । महाराजांनी यांच्याहिकडे । घेतले इंग्रजी शिक्षण ॥९३॥
पांडुरंगराव म्हापस । गोविंदपंताचे स्नेही खास । यांचे येथें कांही दिवस । राहिले महाराज शिक्षणासी ॥९४॥
मोहरीकर नामे नामवंत । कायद्याचे एक पंडित । होते औरंगाबादेत । म्हापसांच्या बरोबरी ॥९५॥
या दोघांच्या आधारें । उर्दू साहित्याचे साचकोरे । परिशिलन केले संतवरे । औरंगाबादेत राहूनी ॥९६॥
बिंदूबिंदूने जैसी सरघा । कौशल्यें मेळवी मधू अवघा । तैशीच सकल ज्ञानसंपदा । प्राप्त केली तयांनी ॥९७॥
ब्रह्मचर्य आणि शुचिता । भक्ति तैसीच भाविकता । येणें केले भगवंता । आपुलेसे केशवांनी ॥९८॥
जे वावरती ऐहिक जीवनी । ठेवोनी मन परमार्थचिंतनी । ते हे भक्तशिरोमणी । होवोत कृपाळू तुम्हां आम्हां ॥९९॥
अस्तू या पुढील वृत्तांत । ऐके सहृदा दत्तचित्त । जे मग गुरुकृपे प्रेरित । सांगेन शेष प्रबंधी ॥१००॥
इति श्रीयशधनविरचित । श्रीसद्गुरु केशवदत्त चरित । भक्तभाविका होवो सुखद । अध्याय चवथा संपूर्ण ॥१०१॥
॥ इति चतुर्थोऽध्याय: समाप्त ॥

N/A

References : N/A
Last Updated : December 02, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP