कबीरस्तव

मोरोपंत हे जरी संत नव्हते, तरी सदाचरणी, सच्छील असे ते एक विद्वान् गृहस्थाश्रमी होते.


( गीतिवृत्त )

श्रीराम याचि नामीं, न म्हणुनि अल्ला खुदा नबी, रमला.
झाला पुष्पें तुळसी; स्तवितां तारील तो कबीर मला. ॥१॥
जी विषयवासना ती, ज्याच्या ज्ञानानळें न, बी, राहे;
स्तविन, यथामति, मींही; संत स्तविती सदा कबीरा हे. ॥२॥
श्रीरामभक्त मोठा ज्ञानी वाटे कबीर हित मातें;
दोहा तो रविच गमे; हरिल तयाचा अबीरहि तमातें. ॥३॥
शक्राचें औदार्यें करि, चिंतुनि ज्यास, ‘ हाय हाय ’ वन.
रामानंदानुग्रह रामप्रभु ज्या सहाय, हा यवन. ॥४॥
परमचमत्कारवती, साधुवता, श्रुति जशा, तशा उक्ती
ज्याच्या, ब्रह्मज्ञानामळमौक्तिकरत्नगर्भिता शुक्ती. ॥५॥
ज्याची ‘ निमिषहि राम न विसरेन ’ अशी अजी प्रतिज्ञा ते.
शकति कराया, होवुनि रोमांचिततनु, न जीप्रति ज्ञाते. ॥६॥
भंडारा करणें, हें व्यसन, गळां घालिती बळेंचि खल.
वात्सल्यें अपवाद प्रभु हरि आपण, जसा जळें चिखल. ॥७॥
जें तत्काळ निरसितें ज्ञानमहातेज भव - तमाला, तें,
तातधन तसें, झालें संप्राप्त कबीरसुत कमालातें. ॥८॥
धन्या सुमति कमाली, उपजत हरिभक्तिमाधुरी तिस, ती.
कवि म्हणति कबीराची मूर्तिमती होय साधुरीति सती. ॥९॥
श्रीज्ञाननामदेवाहि मानवले त्याहि बहु कमालीला;
गायिल मयूर जड किति साधूंच्या, विष्णुच्या समा, लीला ? ॥१०॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP