ज्ञानदेवस्तव

मोरोपंत हे जरी संत नव्हते, तरी सदाचरणी, सच्छील असे ते एक विद्वान् गृहस्थाश्रमी होते.


( गीतिवृत्त )

श्रीविष्णुसा न तारी जन काय ज्ञानदेव वेगानें ?
हा दे, तें स्वर्गाच्या जनका, यज्ञा, न देववे गानें. ॥१॥
यास्तव, या स्तवनार्हा स्तवितों, कवि तों नव्हें, यथाबुद्धि.
स्तवितां भावें, देतो ज्ञानेश्वरविष्णु हा मन:शुद्धि. ॥२॥
ज्ञानेशा ! भगवंता ! भगवज्जनवल्लभा ! महासदया !
कलियुगवर्ती जन जो, देसी, स्मरणेंचि, मुक्तिचें पद या. ॥३॥
त्वन्नाम महामंत्र ज्ञानप्रद होय; यासि जो भावें
जपतो, ज्ञान तयाचें, त्या जनकाचें तसेंचि, शोभावें. ॥४॥
कोणा जडा न होसिल सुगतिप्रद जाहलासि भिंतीतें.
श्रीरामाचें तैसें, तव यश सज्जनसमाज चिंती तें. ॥५॥
ज्ञानेशा ! जें जाड्य, त्वत्तेजें क्षिप्र तें विरे; डाजो
खळमानसीं प्रताप; श्रुति वदला विप्र तेंवि रेडा जो. ॥६॥
श्रीमद्भगवद्गीताव्याख्या केली जगासि ताराया.
सारा या सद्ग्रंथा सेविति, संसारताप साराया. ॥७॥
श्रीहरिहरकीर्ति तशा बा ! विश्वास प्रिया तुझ्या ओव्या.
जो व्यास तोहि बहुधा म्हणतो, ‘ श्रुतिशाचि या मला होव्या. ’ ॥८॥
ज्ञाता शिष्यासि म्हणे, ‘ प्राकृत दिसतो, परंतु न तसा रे;
गोपप्रभुसा अमृतानुभव, तया पाहि सुजन नत सारे. ’ ॥९॥
ज्ञानेशा ! त्वत्कृतितें करिति ज्ञाते समस्तही प्रणती.
‘ ज्ञानेश्वरी भवानी होय महामोह महिष ’ हें म्हणती. ॥१०॥
शंकर निवृत्ति, हरि तूं ज्ञानेश, ब्रह्मदेव सोपान;
विद्या मुक्ता; तुमच्या कीर्तिसुधेचें सदा असो पान. ॥११॥
त्वां बहु जड उद्धरिले, प्रकट ज्ञानेश्वरा ! दयालो ! हें.
तारीं मयूरहि; तुला परिसासि हिनाविजे न या लोहें. ॥१२॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP