तुलसीदासस्तव

मोरोपंत हे जरी संत नव्हते, तरी सदाचरणी, सच्छील असे ते एक विद्वान् गृहस्थाश्रमी होते.


( गीतिवृत्त )

श्रीमद्रामपदाब्जीं अळि तुलसीदास हा सदा गावा;
मागावा वर, ‘ हरिजन भक्त भवपथीं कधीं न भागावा ’. ॥१॥
श्रीवाल्मीकिच झाला श्रीतुलसीदा, रामयश गाया;
तरिच प्रेमरसाची खाणी वाणी तसीच वशगा या. ॥२॥
तुलसीदासें रचिलीं श्रीमद्रामायणें स्वयें सप्त;
ज्यांच्या श्रवणें निवतो संसारीं जीव, जो सदा तप्त. ॥३॥
सेविति तुलसीदासें रचिल्या रामायणाख्य सुरसा जे;
पुण्ययशें कोणीही स्वर्गांत तयांपुढें न सुर साजे. ॥४॥
तुलसीदासाची सुख देती श्रोत्यांसि नित्य नव दोहा;
सेवितया हे म्हणत्ये जैशी श्रीरामकीर्ति ‘ न वदो ‘ हा ’ ’. ॥५॥
याचें सुप्रेमभवन कवन निववितें सदा बुधास रसें;
हें जों जों सेवावें, तों तों सेव्यचि गमे, सुधासरसें. ॥६॥
राम प्रसन्न झाला तुलसीतें जेंवि पवनतनयातें;
साक्षात्कार असा ज्या, होयिल जन कोण अवनत न यातें ? ॥७॥
यवनपति म्हणे, ‘ तुलसीदासा ! दाखीव राम तो, बाहें ’.
कपि लाविती म्हणाया त्या, व्यापुनि नगर धाम, ‘ तोबा ’ हें. ॥८॥
ते दाशरथी, तुलसीदासमठद्वारपाळ, चोरांनीं
अवलोकिले; बहु तपुनि, वपु नियमुनि, कृश करोनि, थोरांनीं. ॥९॥
बापा तुलसीदासा ! तुळसी दासामरद्रुरामासीं.
तैसेंचि तुझें नाम प्रभुच्या झालें समान नामासीं. ॥१०॥
हा पुण्यकीर्ति, सन्मत; म्हणतिल कवि कां न रामसम याला ?
जो ज्यास पूज्य तो त्या ‘ ईश ’ म्हणे, जेंवि तामस मयाला. ॥११॥
कवि म्हणति, ‘ आपणांतें राम तसे भक्त वर्ण्यकुळशील,
तुळसी लक्षजनस्तुत; याशीं, या स्तवुनि, तूंहि तुळशील ’. ॥१२॥
वंद्य, स्तुत्य, सदा हा, श्रीरामसमान, वासवा तुळसी.
पथ्या उक्ति हरिजना, हे तामसमानवास वातुळसी. ॥१३॥
श्रीकृष्णमूर्ति जेणें केली श्रीराममूर्ति, सज्जन हो !
रामसुत मयूर म्हणे, ‘ त्याच्या सुयशोमृतांत मज्जन हो ’. ॥१४॥
स्तविले कवि लेशज्ञें, भक्तें रामत्मजें पदा नमुनीं.
स्वस्तुति संतासि नको, प्रणतमनहि मोडिती कदा न मुनी. ॥१५॥
यास्तव या स्तवनातें तुलसीदासा ! कवीश्वरा ! स्वामी !
श्रीरामपदींच वहा, तुझिया चरणांसि वंदितों बा ! मीं. ॥१६॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP