पुंडरीकप्रार्थना

मोरोपंत हे जरी संत नव्हते, तरी सदाचरणी, सच्छील असे ते एक विद्वान् गृहस्थाश्रमी होते.


( अनुष्टुभ् वृत्त )

पुंडरीका ! तुज - असा साधु तूंचि महामहा,
म्हणसी जड जीवांतें ‘ मोक्षरूपा पहा महा. ’ ॥१॥
यश केलें तप तुवाम अगा ! धवळ साधुन;
या तसें म्हणती बा ! त्या अगाधबळ साधु न. ॥२॥
देव द्याया मुक्ति केला त्वां उभा, शयनावरी
न निजे, न बसे, हात हा शुभाशय नावरी. ॥३॥
जड मोक्षपदा न्याया वदान्या या रमावरा
वरा मागोनि, म्हणसी, ‘ न प्रभो ! हात आंवरा ’. ॥४॥
पुंडरीका ! भुलविला त्पस्तेजें तुवां हरी.
करी जड जना मुक्त, प्रणामेंचि अघें हरी. ॥५॥
बा पुंडरीका ! जी पूर्वीं होती फ़ार महाग, ती
तुवां कलियुगीं केली बहु स्वस्त महागति. ॥६॥
कल्पद्रुमादि जे होते यशें लोकांत साजले,
पुंदरीका ! त्वदौदार्यें ते चित्तीं सर्व लाजले. ॥७॥
बा ! दयावंत जे, त्यांहीं तुजला हात जोडिले.
तुज्या भिडेनें प्रभुनें जडांचे पाश तोडिले. ॥८॥
भाग्यवंत नसेस कोणी पुंडरीका ! जगीं दुजा.
हिमाद्रि मेरुहि ज्ञात्या ! दिसे तुजपुढें खुजा. ॥९॥
प्रभु तूं, कीं त्वदाज्ञेंत विश्वाचा मायबाप हा.
पुंडरीका ! हें मदुक्त लटिकें काय ? बा ! पहा. ॥१०॥
निवारिती काय मायबाप ताप तुज्या - असे ?
करिती स्नेह, परि बा ! बाळकाची रुजा असे. ॥११॥
पुंडरीका ! मुक्तिसत्र ख्यात निर्विघ्न घातलें.
विश्वेश्वरयशाहूनि बहु त्वद्यश मातलें. ॥१२॥
पुंडरीका ! भेटला तो केला पाशविमोचनें.
मुक्तिचा नवरा जीव नवराजीवलोचनें. ॥१३॥
वरवा वर वाचेला आला, बा ! हा तुला कसा
सुचला ? रुचला देवा ? मानहाव सुधारस. ॥१४॥
पुंडरीका ! क्षमा केली त्वां वैकुंठधिका सदा.
पुंडरीकाक्ष माकेलिस्थाना त्या नाठवी कदा. ॥१५॥
करी सुवर्ण मणि जो होउनि स्वगुणा वश,
बा ! म्हणावें तया लोहें ‘ दयालो ! हें तुजें यश. ’ ॥१६॥
तैसे त्वां मुक्त जे केले, वंदावासि तिहीं रसें.
घडेल प्रत्युपकृत प्राणही अर्पितां कसें ? ॥१७॥
भला रंजविला स्वामी. भला मागितला वर.
भला जडजनोद्धारा लाविला त्वां दयाकर. ॥१८॥
पुंडरीका ! महाबुद्धे ! जोडिला त्वां महावर.
देत्यां घेत्यां थोरथोरां म्हणतो ‘ हाय ’ हा वर. ॥१९॥
योग्य हें कल्पपर्यंत महायश तगावया.
लागावें यासि जोडूनि सहाय शत गावया. ॥२०॥
गाति प्रेमें या यशातें विठ्ठलाचे उपासिते;
म्हणती कामधेनूच्या फ़िकें दुग्धातुपासि ते. ॥२१॥
सर्वां रसांत यश हें पुंडरीका ! तुझें निकें.
‘ टिकें यांत, ’ म्हणे सुज्ञ, ‘ स्वांता ! पीयूष तें फ़िकें. ॥२२॥
म्हणती साधु पाप्यांतें, ‘ प्या यशेंचि, निवाल, या;
आधीं सन्महिम्या सेवा, मग विष्णुशिवालया. ’ ॥२३॥
जसें हरिहरांचें हें यश, नाम तुजें जगीं.
लज्जा उत्पन्न करितें त्या देवांच्या महानगीं. ॥२४॥
तुजा तात महासाधु, तुजी माता महासती;
करिती जाहली धन्य तुज्या मातामहास ती. ॥२५॥
पितृभक्ति असी केली न गुहें, न गजाननें;
त्वां घेतलें ‘ धन्य ’ असें म्हणोनि नगजाननें. ॥२६॥
पितृभक्ति न रामत्वीं, न कृष्णत्वींहि साधली.
लाधली पुंडरीका ! ती तुज, सिद्धि न बाधलीं. ॥२७॥
भगवत्प्रियभक्तां श्रेष्ठ नारद, यापरी.
तूं बा ! तुजवरि स्पष्ट दिसे फ़ार दया परी. ॥२८॥
म्हणे जना भव, ‘ सुखें तर; वारकरी तसे, ’
जे शत्रु तछिरीं उग्रतर वार करीतसे. ॥२९॥
येती क्षेत्रीं तुज्या तीर्थें देव संतत सेवना;
गुण देसी जना बा ! न दे वसंत तसे वना. ॥३०॥
पुंडरीका ! तव पुरी संतांची होय हे खनि.
लेखनीं अक्षमा त्यांच्या भारतीचीहि लेखनी. ॥३१॥
पुंडरीका ! द्रवे तोही, मातेच्या बाळ जो कडे
म्हणे तुकोबा, ‘ त्वत्क्षेत्रीं खळा पाझर रोकडे. ’ ॥३२॥
तत्काळ निष्पंक करी हरिनामनदी नता.
त्वत्क्षेत्रीं संसृति जसी हरिना मन दीनता. ॥३३॥
चिंतेतें जीव, होवूनि क्षेत्रीं अनघ, टाकिती.
त्वत्पुरी वांचवि जना; मोरा घनघटा किती ? ॥३४॥
त्वत्क्षेत्रांत न कोणीही असानंद नर क्षण.
हा जसा पावला, घोषीं असा नंद न रक्षण. ॥३५॥
येती जातीहि जी यात्रा, ‘ नमो ’ कळि करी तितें.
हा आटोपी, आपुल्या दे न मोकळिक रीतीतें. ॥३६॥
हिता खळाहि तुमची सुलीला न गमोहि ती.
धीला सद्गुण हे, जैसे मुलीला नग मोहिती. ॥३७॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP