नरसिंहमहतास्तव

मोरोपंत हे जरी संत नव्हते, तरी सदाचरणी, सच्छील असे ते एक विद्वान् गृहस्थाश्रमी होते.


( गीतिवृत्त )

नरसिंहनाम महता, अहतामळकीर्ति, भक्त, नागर, हा.
‘ याच्या वैभवगानीं ’ स्वमुखसहस्त्रा म्हणेल नाग ‘ रहा. ’ ॥१॥
होतां प्रसन्न, मागे, ‘ द्या स्वप्रियवर ’ असें महादेवा.
भगवान् त्यातें प्रभुच्या रासीं नेवुनि म्हणे, ‘ पहा देवा. ’ ॥२॥
राधादिगोपिकांसीं जगदीश्वर जे स्थळीं करी रास;
तेथें शिवप्रसादें पावे, न त्यागितां शरीरास. ॥३॥
म्हणवि गुमास्ता नामें सामळशा तो, भरूनि दे हुंडी;
मुंडी होवुनि, ज्यातें साधूंच्या नित्य धुंडिती झुंडी. ॥४॥
प्रकटे, संकट समजुनि, देव म्हणे, ‘ सर्व सोयरे बाहें.
फ़ळशोभन कन्येचें महत्या ! माझ्याचि होय रे ! बा ! हें. ’ ॥५॥
जो संबंधी पुरुषस्त्रीजन, जगदीश गौरवी त्यातें.
महता गाय, असें यश दुग्धोदधिफ़ेनगौर वीत्यातें. ॥६॥
करुणासागर, नागरनरसिंहसुताचिया विवाहातें,
श्रीसह जपला; तपला न कळे कोणा तपा शिवा हा तें. ॥७॥
मांडळिकनृपें छळितां, भगवान् महत्यासि हार दे हातें;
प्रभु भक्तातें जपतो, तैसा न निजाहि फ़ार देहातें. ॥८॥
‘ केदार तुझ्याचि मुखें ऐकावा, नित्य काम हा, महत्या ! ’
या जगदीश्वरवचनें प्राप्त न होयील कां महामह त्या ? ॥९॥
जे भक्त उद्धवादिक, न म्हणे श्रीप्रमुख हा निके दार.
धांवे, भक्तें गातां, करुनि सकळभानहानि, केदार. ॥१०॥
बहुधा देव म्हणे, ‘ मम आत्मा सुब्राह्मणें मधुर गातां
परिसुनि वेदा रमला; केदार मला गमे अधिक आतां ’. ॥११॥
पाहे मुखाकडे प्रभु, तन्महिमा फ़ार काय सांगावा ?
बहुभागवतस्तुत जो, भक्तमयूरेंहि तो न कां गावा ? ॥१२॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP