मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत नामदेवांचे अभंग|
चोखामेळ्याच्या समाधीचे अभंग

चोखामेळ्याच्या समाधीचे अभंग

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.


१.
मंगळवेढयाभोंवतें कुसूं घालावया । महारासी न्यावया दूत आले ॥१॥
महारासमागमें चोखा मेळा गेला । काम तें लागला करावया ॥२॥
सर्वकाळ वाचे विठ्ठलनाम छंद । आठवी गोविंद वेळोवेळां ॥३॥
चार महिने याचि रीतीनें लोटिले । कुसूं कडाडिलें अकस्मात्‌ ॥४॥
तयाखालीं महार बहु चूर झाले । चोख्यानें अर्पिले प्राण देवा ॥५॥
देव म्हणे नाम्या त्वां जावें तेथें । त्याच्या अस्थि येथें घेऊनि याव्या ॥६॥
नामा म्हणे देवा कैशा ओळखाव्या । विठ्ठलनाम जयामध्यें निघे ॥७॥
२.
ऐकोनिया कानीं अचळीं भराव्या । आणोनियां द्याव्या आम्हापाशीं ॥१॥
शालिवाहन शके बाराशें साठ । प्रमाथी नाम स्पष्ट संवत्सर ॥२॥
वैशाख वद्य पंचमी सुदीन । गुरुवारीं प्रयाण करी चोखा ॥३॥
चोखा माझा जीव चोखा माझा भाव । कुळ धर्म देव चोखा माझा ॥४॥
काय त्याची भक्ति काय त्याची शक्ति । मीहि आलों व्यक्ति तयासाठीं ॥५॥
माझ्या चोखियाचे करिती जे ध्यान । तया कधीं विन्घ पडों नेदीं ॥६॥
नामदेवें अस्थि आणिल्या पारखोनी । घेत चक्रपाणी पितांबरीं ॥७॥
३.
देवाचे अंचळीं उठिला गजर । विठ्ठलनामें अंबर गर्जतसे ॥१॥
संत समुदाय पताकांचे भार । लोटले गजर ऐकावया ॥२॥
वद्य त्रयोदशी वैशाख शुक्रवार । नामाचा गजर महाद्वारीं ॥३॥
ऐसी आनंदानें नामाच्या गजरीं । दिली महाद्वारीं समाधि त्या ॥४॥
अस्थि निक्षेपण आपुलीया हातें । करूनि अनंतें पाषाण ठेवी ॥५॥
राही रखुमाई कुर्वंडी करिती । सत्यभामा आरति ओंवाळीत ॥६॥
नामा म्हणे धन्य विठोबाची कृपा । जाईन माझ्या बापा ओंवाळून ॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : January 14, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP