साम्राज्यवामनटीका - श्लोक १०१ ते १२०

वामन नरहरी शेष उर्फ वामन पंडित (इ.स.१६३६ ते १६९५) हे १७ व्या शतकात होऊन गेलेले प्रख्यात मराठी कवी होते


अर्पिती नवही भक्ती तशाच सकळ क्रिया ।
कियमाणातीत ऐसे निरहंकृति वर्तती ॥१०१॥
संचीत दग्ध ज्ञानाग्नीकरुनि जाहलें परी ।
राहे प्रारब्ध जें त्यातें भोगेंकरुनि सारिती ॥१०२॥
प्रारब्ध भोगितांही ते विरक्त प्रेमयुक्तची ।
गोविंद अच्युत मुखीं अमृतवृष्टि सर्वदा ॥१०३॥
अनंत हरि मुकुंद रामकृष्णादि नाम जें ।
येतां मुखीं बुद्धि अर्थीं रूपाभिनव ज्या मनीं ॥१०४॥
भगवंतीं प्राण चित्त बोधिती त्या परस्परें ।
कथिती त्या तोषती ही रमती नित्य त्यांतची ॥१०५॥
अनंत वदतां पाहे व्यापुनी उरला जगा ।
अच्युत वदतां देखे नाशरहित शाश्वत ॥१०६॥
त्रिभंगीं मांडिती ठाण अधरीं वेणु दाविती ।
क्रीडती नाचती गातो ते अभिनव दावुनी ॥१०७॥
येतां मुखीं वासुदेव पाहे विश्वरूपें तया ।
भगवान् म्हणतां तोची प्रत्यक्ष भगवद्रुप ॥१०८॥
जगातें भगवद्रूपें भजताति जगींच त्या ।
चिदात्मा देखती तोची वासुदेवचि सर्व हें ॥१०९॥
सुखदु:खें तुष्ट कष्ट नसे आनंदची असे ।
जो विश्व भरुनी राहे आनंदकंद बोलतां ॥११०॥
पंचभूतें ज्योतिरूपें प्राणी वृक्ष दिशा नग ।
शरीर हरिचें विश्व आत्मत्वें वदती तया ॥१११॥
अवतारादिहि जग मनें आकार कल्पुनी ।
बुद्धिनें तें अनुभवीकीं चैतन्यचि तें असे ॥११२॥
सुख अनंतचि जया संतुष्ट सर्वदाहि तो ।
लाभ ज्या सवरूपीं चित्त भगवद्भक्ति युक्तची ॥११३॥
लाभ जो भक्ति सुखाचा कृपा सर्वेश्वराचि ते ।
आठवी निरहंकारें वर्ते प्रारब्ध भोगुनी ॥११४॥
गुरु ईश्वर जो त्याचे सेवेभक्तींत सर्वदा ॥
घ्यानींच मूर्ति पूजूनी अर्पी सर्वहि घ्यानिं त्या ॥११५॥
प्रार्थुनी त्या वासुदेवा मागताति पुन: पुन: ।
भगवद्बाव सर्वाही भूतीं द्यावा म्हणूनियां ॥११६॥
सर्वात तूझे चरण थोर होय असें करीं ।
आत्मत्वें चरणीं तूझ्या अखंड प्रीति दे हरी ॥११७॥
सनक नारद शुक भक्तांची गति दे तसी ।
दे समागम संतांचा अंतीं स्मृति तुझीच दे ॥११८॥
उरी ज्ञानाचि जे कांहीं  बुद्धि ते दिसते तिही ।
होतां भक्ती असी येतें ज्ञान पूर्ण अनूभवा ॥११९॥
निदिघ्यासेंच करुनी आत्मत्वी स्थैर्य पावतो ।
नित्याभ्यासेंच करूनी बुद्धिसी सच्चिदात्मता ॥१२०॥

N/A

References : N/A
Last Updated : November 29, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP