मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|साधन मुक्तावलि|

साधन मुक्तावलि - प्रकरण १३ वें

’ साधन - मुक्तावलि ’ या ग्रंथात सर्व प्रकारचे अभंग आहेत.


श्रीगणेशाय नम: ॥ श्रीसरस्वत्यै नम: ॥ श्रीगुरुभ्यो नम: ॥
पावोनिया, योग खुण ॥ स्वानंद भोगी, परिपूर्ण ॥
ऐशा योगिया, न घडे शीण ॥ कदापि देहीं, संसारीं ॥१॥
झाला ब्रम्हा जो, आपण ॥ जाणावा योगी, तोचि पूर्ण ॥
सदासर्वदा, स्वानंदीं निमग्न ॥ ज्ञप्तिमात्रें, उरोनिया ॥२॥
संकल्प विकल्प, नचि उरती ॥ होता केवळ, ब्रम्हास्थिति ॥
नुरे कोणीच तो, ऐशा रिती ॥ तोचि ब्रम्हा जाहाला ॥३॥
साधन असाधन, खुंटलें ॥ करणें अकरणेंचि, मोडलें ॥
ऐसें ब्रम्हाअंगीं, बाणलें ॥ तोचि ब्रम्हा, जाहाला ॥४॥
नाहीं धारणा, नसे ध्यान ॥ नाहीं समाधी, ना आसन ॥
चळचळीत तेथें, आनंदघन ॥ कर्मातीत, ब्रम्हा तो ॥५॥
माया पीडीते, भुवनत्रयीं ॥ तीच क्रीडतें, अवस्थात्रयी ॥
स्फुर्ति प्रकृति, पुरुषत्रयीं ॥ अलिप्त, योगी, ब्रम्हारूपें ॥६॥
विश्वीं घोराची, कडसणी ॥ सर्वथा नुरे ती, अंत:करणीं ॥
पापणुण्याची, दु:ख काहाणी ॥ नचि उरे, ती, सांगावया ॥७॥
शुभाशुभाचीं जरी फळें ॥ बाधक असती, वेळोवेळे ॥
ऐशा योगिया सर्वही टळे ॥ नीवन्मुक्त, होता पै ॥८॥
बद्धमोक्षार्थीं, कथा वार्ता ॥ नचि ऐके तो, सर्वथा ॥
सहजचि अखंडीं, शाश्वता ॥ तोचि योगी, ब्रम्हारूप ॥९॥
जें जें सुटलें, मनांतुनी ॥ तें तें गेलें, वाहुनी ॥
करणें - अकरणें, व्यर्थचि होऊनी ॥ होतो निरंजन निर्विकार ॥१०॥
ऐसें होवोनी, निभ्रांत ॥ न कळो देती, अपुला अंत ॥
जगतामाजी, दाखवीत ॥ भक्तिरहस्यें, करोनिया ॥११॥
ज्ञानवैराग्यें, भक्तीकडुन । दाविती स्वदेहीं जडवून ॥
परी अंतरींची, त्यांची खुण ॥ न कळे कोणा, ऽतशाविणें ॥१२॥
कथाकीर्तनीं, नित्य असक्त ॥ स्मरण, विस्मरणही, नेमस्त ॥
क्षणोक्षणीं, उच्चारीत ॥ नामघोष, सत्‌गुरुचे ॥१३॥
ज्ञानी भोगिती, ब्रम्हारहस्य ॥ सदा सर्वदा, सतगुरुदास्य ॥
करिती अभेद बुद्धया, नेमस्त ॥ तेचि सत्संग, जाणावे ॥१४॥
परब्रम्हीं ज्याची, ऐक्यता ॥ ऐक्यत्वें चिंतन, तत्वता ॥
सन्मान देती ते साधुसंता ॥ अत्यानंदें करोनिया ॥१५॥
विश्वीं एक, परमेश्वरु ॥ सर्वव्यापी सतगुरु ॥
म्हणोनि सर्वांभूतीं, आदरू ॥ करिती जाणा, समद्दष्टया ॥१६॥
ह्रदय जयांचें, कोमल ॥ सदा शुचिष्मंत, निर्मल ॥
निरंतर जे, आचारशील ॥ पवित्रवृत्या, राहताती ॥१७॥
नचि पहाती, मानापमान ॥ निंदास्तुती ही, समसमान ॥
सदैव समाधानी, ज्यांचें मन ॥ ऐसेंचि आचरण, जयांचें ॥१८॥
सुखें दु:खें समे गणती ॥ लाभ हानी, समे पहाती ॥
दीनावर, ते, कृपाचि करिती ॥ हेंचि  लक्षण, मुक्तांचें ॥१९॥
सदा बिवेकी, चित्तवृत्ती ॥ पडो न देती, ते विस्मृति ॥
सावघानें अहो, रात्रीं ॥ आत्मरूपीं, आनंदित ॥२०॥
दावी तो, केवळ, पिशाचलीला ॥ स्मशानीं नगरीं, नसे वेगळा ॥
ऐसा असोनी, जगावेगळा, ॥ आचार ऐसे, ठेवीतसे ॥२१॥
फलासक्ती, मुळींच नसे ॥ ढोंगधत्तुरे, महतत्व तसें ॥
कदा न दावी, वसवसे ॥ आपण काय, जाणिलें ॥२२॥
विश्व साक्षी, योगिराणा ॥ जाणे सर्वांतरिंच्या खुणा ॥
तरी तो वाटे, वेडाचि जना ॥ भ्रमिष्टासारिखा, दिसतसे ॥२३॥
असतां जरी, लोकामाजीं ॥ ब्रम्हाकर्में, सर्व त्याजी ॥
राहे तोची, सहजासहजीं ॥ ब्रम्हारूपें, हिंडतसे ॥२४॥
आपणचि एक, परमेश्वर ॥ कोणा सांगेना, व्यवहार ॥
आहार निराहार साचार ॥ ऐसा ब्रम्हीं, हिंडतसे ॥२५॥
वेडीं कृत्यें, दावीतसे ॥ विश्व तयाशीं, हांसतसे ॥
तरी तयाशीं, नाहीं पिसे ॥ अद्वैतानंदें, ज्ञानी तो ॥२६॥
ऐसा स्थितीनें, राहणें बरें ॥ ब्रम्हीं संचरणें, हेंचि खरें ॥
बरें वाईट, होणें जाणें ॥ स्मरेना कदापि, सर्वदा ॥२७॥
विश्व अपुले, भोग भोगो ॥ स्वात्म्यसौख्य, नचि सांगो ॥
कांहीं न देतां, अंगीं लागो ॥ निस्पृह वेड, दावोनिया ॥२८॥
ब्रम्हीं रत होतां, एक देशीं ॥ विरुद्ध भावना, जगताशीं ॥
होते स्थिती, सहजीं पाहशी ॥ तरी, न, नेम, सर्वथा ॥२९॥
स्वत: सारिखे, सर्वचि दिसे ॥ हेंच तयाचें, वाटे पिसें ॥
लोक म्हणती, ऐसे कैसे ॥ तरी तोचि सत्य, ब्रम्हारूप ॥३०॥


इति श्रीपरमामृते मुकुंदराजविरचिते मुक्तरहस्यनिरूपणं नाम त्नयोदशं प्रकरणं संपूर्णम् ॥ श्रीब्रम्हार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : September 10, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP