मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|साधन मुक्तावलि|

साधन मुक्तावलि - सहज समाधि

’ साधन - मुक्तावलि ’ या ग्रंथात सर्व प्रकारचे अभंग आहेत.


॥ सहज - समाधी. ॥


विकल्पाचें उठणें राहवें । नुसतें वृत्तिचें स्फुरण उरावें ॥
हेंचि समाधीचें लक्षण जाणावें । राजयोगीयासी ॥१॥
मृगजळापरी वृत्ति उठे । व्यवहारून तात्काळ आठे ॥
सत्य मिथ्या विकारू तुटे । हें सहज समाधि ॥२॥
मन - बुद्धि अंतरीं विहारती । स्वप्नाभासातें उठविती ॥
कीं इंद्रियद्वारा निघोनि क्रीडती । परी समाधि अभंग ॥३॥
हाही तथा निंदी की स्तवी । दूरीं धरी कीं सलगी करी सर्वीं ॥
हे आपुले परकी जरी म्हणावी । परी समाधि अभंग ॥४॥
मग देह जनीं की विजनीं । ग्रामीं पट्टणीं कीं स्मशानीं ॥
एकरूप अखंड समाधानी । या नांव समाधि ॥५॥
क्षेत्रीं, कुग्रामीं भूमीं, कीं कैलासीं । अंत्यजगृहीं कीं भागीरथीसी ॥
सदा एकरूप नि:संशयेसी । या नाव समाधि ॥६॥
अर्चनीं कर्मीं कीं सगुण ध्यानीं । कृष्णादिकीं वेदपठनीं ॥
दुसरा भावचि नुद्भवे मनीं । या नांव समाधि ॥७॥
पुण्यमार्गीं कीं पापमार्गीं । स्त्रीसमुदायीं कीं संतसंगीं ॥
दुजी कल्पनाचि नव्हे वाउगी । या नांव समाधि ॥८॥
देह इंद्रियें किंवा मन । आपुलाले व्यापारीं सावधान ॥
परी समाधान तें परिपूर्ण । या नांव समाधि ॥९॥
नामरुपाचा उद्भवची न होतां । सर्व आहे कीं नाहीं न स्मरतां ॥
सच्चिदघनाकार एकरूपता । हेचि निर्गुण उपासना ॥१०॥
जरी देहादिकांचे व्यापार होती  । परी असंग आपण अचळस्थिती ॥
हेचि सहज - समाधि निश्चितीं । समाधि उत्थानरहित ॥११॥
बहु कासयासि बोलावें । जें जें तयाचे प्रारब्धें घडावें ॥
तें तें सुखदु:खही भोगावें । परि समाधि अभंग ॥१२॥
एकदा जी स्थिती बाणून गेली । मग तयाशी शास्त्रें जरी सांगूं आलीं ॥
कीं हे नव्हेचि म्हणतां ही स्थिति जे आपुली । न भंगे तो समाधि ॥१३॥
इतुका निश्चय द्दढ बाणला । कीं दुजा भाव नसे भलते अवस्थेला ॥
संशय ब्रम्हांडा बाहेरीं गेला । मूला ज्ञानासहित ॥१४॥
जागृतिं स्वप्न- सुशुप्तिं । चिन्मात्रीं जडली वृत्ती ॥
चित्त - चित्त - त्वाची विसरे स्फूर्ति । या नांव मद्भक्ति उद्धवा ॥१५॥
हे माझी आवडती भक्ति । इचें नांव म्हणिजेत चौथी ॥
हें भाग्य आतुडे ज्याचे हातीं । तैं चारी मुक्ति निज दासी ॥१६॥
भिन्न रूप भिन्न नाम । भिन्न स्थिती भिन्न कर्म ॥
जग देखतांही विषम । मद्भक्तास मद्भावें ॥१७॥
भूतें देखतांही भिन्न । भिन्नत्वा न ये ज्याचें ज्ञान ॥
मद्भावेम भजे समान । त्यासी सुप्रसन्न भक्ति माझी ॥१८॥
ज्यासी प्रसन्न माझी भक्ति । त्याचा आज्ञाधारक मी श्रीपती ॥
जो भगवद्भावें सर्व भूतीं । सुनिश्चितीं उपासक ॥१९॥
जैसा जैसा विकल्प क्षीण । तैसा तैसा सामान्य प्रकाशमान ॥
जों जों सामान्य दुणावें आपण । तों तों विकल्प मोडे ॥२०॥
ऐसा चिरकाल आभ्यास होतां । जो मागें उगेपणा बोलिला तत्त्वतां ॥
तो समाधियोग बाणें अवचितां । विकल्प जातां निपटूनि ॥२१॥
आणखी निर्विकल्प समाधीची खुण । तियेचें जाण हेंचि लक्षण ॥
विश्व न स्फूरें ब्रम्होवीण । नित्य चिदघन तेंचि तें कीं ॥२२॥
परी मन कोंडूनि निवांत राहणें । अंतरीं ब्रम्हा - सुख सर्वथा नेणें ॥
ते समाधि नव्हे विठंबणें । वृथा करणें श्रम तोही ॥२३॥

अभंग.

तरी पूर्ण समाधान ते समाधी । तोचि कैसें आधी बोलिजेला ॥२४॥
त्रिविधा प्रीति ती परिपूर्ण आपण । तेंचि समाधान समाधी तो ॥२५॥
आदी अंतीं जैसा मध्यें तैसाचि पूर्ण । तेंचि समाधान समाधी तो ॥२६॥
सर्वही असतां असंग आपण । तेंचि समाधान समाधी तो ॥२७॥
जागर सुषुप्ति स्वप्न एकरूप पाहणें । तेंचि समाधान समाधी तो ॥२८॥
होताही व्यापार नाढळें आपण । तेंचि समाधान समाधी तो ॥२९॥
पाप - पुण्यामाजिं असे जो समान । तेंचि समाधान समाधी तो ॥३०॥
करो न करो जैसा तैसाचि परिपूर्ण । तेंचि समाधान समाधी तो ॥३१॥
प्राप्ताप्राप्त भोग दोन्हीही समान । तेंचि समाधान समाधी तो ॥३२॥
त्रिपुटीचें जेथें नोहे उद्भवन । तेंचि समाधान समाधी तो ॥३३॥
राहो जावो देहो परि पूर्ण आपण । तेंचि समाधान समाधी तो ॥३४॥
भलते आवस्थेसी नि:संग आपण । तेंचि समाधान समाधी तो ॥३५॥

N/A

References : N/A
Last Updated : September 10, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP