अभंग १३१ ते १३९

 श्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला.

१३१.
बसतां उठतां चित्त न सोडी आपणा । लक्षुनियां खुणा स्वरूपाची ॥१॥
स्वरूपाची गोडी चित्ता लागलेसे मोठी । लक्षुनि सुख घोंटी आपणातें ॥२॥
विसरेना चित्त निमिषभरी आपणातें । देह मीपणातें कंटळोनी ॥३॥
विसरोनीयां सर्व संसार कल्पनांसी । एक आपणासी धरुनी राहे ॥४॥
विष्णु कृष्ण जगन्नाथा आपण कृपानिधी । करिसी कार्य सिद्धी आपणाची ॥५॥

१३२.
आपणासारिखा नाहीं त्रिभुवनीं । श्री जानकी जानी करुणा मूर्ते ॥१॥
करुणामूर्ति जगीं एकची आपण । मिथ्या हें मीपण नकळे लोकां ॥२॥
आपणाचा शोध न लाविती कोणी । देहाच्या मीपणीं भुलले सर्व ॥३॥
आपणाकरितां सर्व घडामोडी । मुळ एक गोडी आपणांची ॥४॥
विष्णु कृष्ण जगन्नाथा हें मीपण । ग्रासुनि आपण प्रगटला ॥५॥

१३३.
आपणा ऐसा देव ज्यासी आहे कोणी । सांगें मज चापपाणी रामराया ॥१॥
मीपणाची गोडी कांहीच ढळेना । वर्म हें कळेना अज्ञ लोकां ॥२॥
संतसंगें मज वर्म कळों आलें । अखंड दर्शन झालें आपणाचें  ॥३॥
सोडवेना लाविली जे निजात्म गोडी । सर्व सुक जोडी आपणची ॥४॥
विष्णु कृष्ण जगन्नाथ तुझ्या प्रेमीं । तृप्त अंतर्यामी जन्मवरी ॥५॥

१३४.
चिद्रात्नांचा मुकुट माथा शोभे आपणाच्या । श्रवणी कुंडलांचा लखलखाट ॥१॥
कोटी सुर्यासम अंगीचा फांकतो प्रकाश । नुरविच लेश जो तमाचा ॥२॥
लखलखतो पिंवळा पितांबर कटिमाजी । आत्म भक्त काजीं अवतार हा ॥३॥
भक्त शत्रु वध व्हाया धनुष्यबाण हातीं । धरिलें सितापती निश्चयेंसी ॥४॥
सच्चिदानंदा श्री विष्णु कृष्ण जगन्नाथा । अवतार कथा गोड तूझ्या ॥४॥

१३५.
आठवति मज केले त्वां उपकार । प्रभो वारंवार रामराया ॥१॥
दिली मज मानव काया यथा सांग देवा । ब्रम्हानंद ठेवा उघद जीत ॥२॥
सगुण मुर्ति दर्शन द्याया दिल्हे मज डोळे । पाहिन वेळोवेळे रामा तूज ॥३॥
स्वावतार चरितें गाया दिलें मुख । गाईन मी तूज आवडीनें ॥४॥
दिले हात वंदूं भजनीं वाजवाया टाळी । सर्वेद्रियें पाळीं स्वसेवेंत ॥५॥
अखंड आनंद आपण कळबीसी मातें । दीना गरिबातें भ्रमु रामा ॥६॥
ऊपकार केला विष्णु कृष्ण जगन्नाथा । ठेवितो हा माथा चरणीं तूझ्या ॥७॥

१३६.
धन्य दिवस माझा आजी सोनियाचा साचा । हेतु मानसाचा पूर्ण झाला ॥१॥
शाश्वत आपण कळला मज विषयानंद खोटा । संतसंग मोठा सौख्यदाई ॥२॥
ज्याच्या कृपें आपण रामा आला उदयासी । दाउनि ह्रदयासीं प्रत्यय माझ्या ॥३॥
आपण भेटला दु:ख समुद्र आटला आनंद दाटला जागो जागीं ॥४॥
जागो जागीं आपण विष्णु कृष्ण जगन्नाथा । स्फुरसी ह्रदयस्था सूखरूप ॥५॥

१३७.  
राम अयोध्याधीश आला । काटी सूर्य प्रकाश झाला ॥१॥
लखलख होताति छत्रपताका । संगें उमाव नाहीं लोकां ॥२॥
सूर्य पानें झगझगती । सुंदर मंगल वाद्यें वाजती ॥३॥
संत साधू सज्जनदाट । विणे टाळ मृदंगें वाजति गाती थाट ॥४॥
नाम घोषें घडघडाट । ऐसा समयीं न मिळे मुंगीलाही वाट ॥५॥
रामनाम गर्जती वानर समुदाय । नाचत मोठया प्रेमें मारुति कपिराय ॥६॥
रत्न जडित स्वर्ण कलश रथीं । सीतेंसहित शोभतो दाशरथी ॥७॥
सावळ्या अंगीं शोभे पिवळा पितांबर । रुपें कोटी मदनाहुनि सुंदर ॥८॥
जडित रत्नाचा मुकुट शोभे माथा । कुंडलांचा झगझगाट सभोवता ॥९॥
कास केसिला सोनसळा । नवरत्नाचे हार शोभती गळां ॥१०॥
लल्लाटीं शोभतो  क्स्तुरिचा टिळा । कंठीं शोभे वैजयंती माळा ॥११॥
मंद हसित ज्याचें मुख । निरखितां वाढे अंतरीं सुख ॥१२॥
राम विष्णु कृष्ण जगन्नाथ । निमग्न करि भक्तां रमउनि आपणांत ॥१३॥

१३८.
आम्ही रामाचे वारकरी । जातों अयोध्या नगरीं ॥१॥
भक्त जन केव्हां येती । वाट पाहे सीतापती ॥२॥
संत साधुसी होइल भेटी । हर्षें नाचूं शरय़ूतटीं ॥३॥
राम दर्शनासी जाऊं । शामसुंदर नयनी पाहूं ॥४॥
पाहातां राघवाचें मुख । हरपे अनंत जन्म दु:ख ॥५॥
आम्ही दैवाचे दैवाचे । अखंड गाऊं राम वाचे ॥६॥
घेतां रांमाचें दर्शन । होय ह्रदयीं समाधान ॥७॥
विष्णु कृष्ण जगन्नाथाचा । अलभ्य लाभचि आम्हां साचा ॥८॥

१३९.
होती डोंगरी डोंगरी । झाली अयोध्या नगरी ॥१॥
सिताराम उदया आला । सद्भक्तांसी आनंद झाला ॥२॥
धन्य येथींचे ते जन । करिती रामाचें भजन ॥३॥
वैष्णवांचा महिमा ऐसा  । जेथें तेथें राम ठासा ॥४॥
विष्णु कृष्ण जगन्नाथ । उघड दावी मोक्ष पथ ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : June 08, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP