TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

स्त्रीधन - तुकाराम

लोकगीतातील स्त्रीधन म्हणजे मराठीतील एक अमूल्य ठेवा आहे, तो आपण पुढील पिढीसाठी जतन करून ठेवला पाहिजे.

तुकाराम
संत तुकाराम म्हणजे महाराष्ट्राचे महान कवि. फार मोठे सुधारक. विठोबाचे प्रिय भक्त. बहुजन समाजानें जोपासलेला एक त्यागी पुरुष. महाराष्ट्राचा एक आवडता कलाकार. स्वयंफूर्तीनें सामान्य मनाचें दिग्दर्शन करणारा एक थोर समाजसेवक. वारकरी सांप्रदायानें प्रेमानें मनावर कोरून ठेवलेला एक फार मोठा संत. त्याची थोरवी फार मोठी. कवित्व फार बहारीचें. कीर्ति अतिशय विशाल. पण अगदीं सामान्य स्त्रीमनानें फक्त या महापुरुषाच्या सांसारिक जीवनाची जवळून ओळख करून घेतली आहे ! एवढेंच नव्हे तर नेमकें तेवढेंच आवडीनें लक्षांत ठेवलें आहे ; आणि त्यावर ओव्या सांगितलेल्या आहेत ! त्या स्त्रियांना 'ओवी सांगितली ' असें बोलायला आवडतें. ओवी लिहिणें ही कल्पना त्यांना माहीतच नाहीं !
तुकोबाची स्त्रिया बोल जगापशीं
गोसावी झाले आमुचे पति ॥
दगडाचा टाळ देहीचा मुरदुंग
गोंधळ घाली तो हा विठूपाशीं
तुकोबाची स्त्रिया बोल जगापशीं
गोसावी झाले आमुचे पति ॥
फुटका भोपळा तुटक्या तारा
तुकाराम जाती पंढरीशीं
तुकोबाची स्त्रिया बोल जगापशीं
गोसावी झाले आमुचे पति ॥
माळी हाकी मोट लक्ष मोडापशीं
तसंच लक्ष माजं विठूपाशीं
तुकोबाची स्त्रिया बोल जगापशीं
गोसावी झाले आमुचे पति ॥
या गीतानें तुकारामाच्या विठ्ठलभक्तीपायीं त्याच्या बायकोस आलेला राग व्यक्त केलेला आहे. त्याच्या अभंग लेखनाची व कीर्तनाची थोरवी तिला बिचारीला उमजली नाहीं ! तिनें संसाराकडे त्याचें दुर्लक्ष होत असल्याची तक्रार मात्र अशी केली आहे !! दगडाचा टाळ, देहाचा मृदंग, फुटका भोपळा, तुटकीं तार, इत्यादींचा उल्लेख करून ती तुकोबाला चिडून इथें बोलते आहे. एवढेंच नव्हें तर माळ्यानें मोट हाणावी पण त्याचे लक्ष पिकाच्या मोडाकडेच असावें तसें संसार करीत असूनहि मी माझ्या पतीसाठीं विठ्ठलाकडेच लक्ष देत आहे, असें ती म्हणत आहे.
अल्याड देहूगांव        पल्याड येलवाडी
देवा तुकोबाची        मदीं गुरूची माडी
देहूचा मंडप            कोन्या शिंप्यानीं शिवीला
देवा तुकोबाचा        वर अभंग लिवीला
देहूच्या माळावरी        सये बोलती भोरड्या
येलवाडी मंदीं            वया निघाल्या कोरड्या
आळंदीची ग वाट         गेली देहूला कोरडी
इंद्रावनीच्या कांठायाला    तुका बांधितो झोपडी
इंद्रावनी तुजं पानी        येलवाडी तुजं गहूं
देव तुकाराम            साधुसंताला घाली जेवूं
येलवाडी तुजं गहूं        इंद्रावनी तुजं पानी
देव तुकाराम करी        साधुसंताला मेजवानी
देहूच्या माळावरी        विना वाजतो मंजूळ
गांव लोहुगांव            तुकारामाचं आजूळ
हातांत टाळवीना        तुका फिरतो घरोघरीं
येड लागलं तुकाला        चला म्हणतो बरोबरी
आवडीचा देव            तांतडीच्या भेटी
ज्ञानूबा तुकाराम        त्येच्या चरणीं घाली मिठी
बारा भुयाची पालखी        वर मोत्यांचा आईना
आल द्यानूबा तुकाराम    दिंडी त्येंची ग माईना
या ओव्यांनीं तुकारामाच्या देहूगांवची ओळख करून दिलेली आहे. त्याचबरोबर तुकोबाच्या साधुपणाचीहि थोरवी गाइली आहे. देहूच्या माळावर भोरड्या नांवाचे पक्षी ओरडल्यामुळें तुकोबारायाच्या वह्या नदीमधून कोरड्या वर आल्याची सूचना मिळाली, ही या ठिकाणीं व्यक्त झालेली भावना अभिनव तशीच कल्पनारम्यहि आहे. आणि तुकोबा आणि ज्ञानदेव ह्यांचें नांव एकत्रपणें वारकरी मंडळींच्या तोंडीं असल्याबद्दल शेवटीं आलेला उल्लेख वास्तव तसाच अभिमान दर्शविणाराहि आहे.
देहूच्या मंडपाला लागणार्‍या कापडावर तुकारामाचा अभंग विणलेल्या शिंप्याची इथें आवर्जून स्तुति आली असून, त्याला भक्तिमार्गाकडे खेंचणार्‍या तुकारामाचें स्वभाववर्णनहि मोठ्या सहजतेनें परंतु परिणामकारकरीतीनें रेखाटलेलें आहे.
कुंकवाचा करंड        तुका ठेवीतो विन्यांत
सरगीं जायाचं        न्हवतं जिजाच्या मनांत
तुकाराम बोले        जिजा इमानी तूं बैस
येड लागलं तुका तुमां    घरीं दुधाची म्हैस
तुकाराम बोले        जिजा लाव ग उभं कुंकूं
मी जातों वैकुंठा        मग कळल सर्व सुकूं
तुकाराम बोले        जिजा इमान आलं न्याया
येड लागलं तुका तुमां    वरीं लाडक्या माज्या गाया
जिजाबाई बोले        येड लागलं तुकाल
आपुन जातो वैकुंठी        संगं म्हनीतो चला चला
तुकाराम बोले        जिजा संगतीं माज्या चल
मागं राहिल्यानीं        तुजं होत्याली फार हाल
वैकुंठाला निघालेल्या तुकोबानें जिजाईला बरोबर चल म्हणून आग्रह केला असतां आणि बरोबर न येण्यानें तिचे होणारे हाल सूचित केले असतांहि जिजाईंनें त्याला दिलेलें उत्तर या ओव्यांनीं सांगितलेले आहे. जिजाईनें तुकोबाचे ऐकायचें तर राहिलेंच पण त्याला वेडें ठरवून संसारी बाईला शोभेल अशी घराची ओढ त्याच्यापुढें केली आहे ! एवढेंच नव्हें तर तो बरोबर चल म्हणतो म्हणून त्याला तिनें नांवें ठेवलें आहे. तथापि तुकारामानें आपल्या विण्यामध्यें कुंकवाचा करंड ठेवून तिची सोबत अनुभविली असल्याची इथें सांगितलेली कल्पना विलक्षण चित्ताकर्षक झाली आहे.
देहूच्या माळाला        सांडली कस्तुरी
तुकाराम म्हनीतो        घरीं राहिली अस्तुरी
इंद्रायनीच्या कांठाला        बाई हत्तीच्या दिल्या पागा
साधुसंत सांगीती        तुका वैकुंठी गेला बघा
देहूच्या माळावरी        उधळती बुक्का जाई
गईप झाला तुका        जिजा भवतालीं पाही
देहूच्या माळावरी        धूर कशायाचा झाला
तुका गेला वैकुंठासी        जिजा सईपाक केला
देहूचा मंडप            दुरून दिसतो काळानिळा
तुका गेला वैकुंठासी        वर उगवल्या माळा
वाजंत्री वाजवीतो        देहू गांवचा दरडी
तुका गेला वैकुंठाला        वही निघाली कोरडी
देहूच्या माळावर        मोत्या पवळ्यांचं वाळवान
तुका चालला वैकुंठासी    जिजा घालीती लोळण
तुका गेला वैकुंठासी        कुनीं कुनीं पाहिला
नांद्रुकी झाडाखालीं        जोडा रेशमी पाहिला
तुकारामानें वैकुंठाला प्रयाण केल्याची अद्‌भुतरम्य हकीकत या गीतांनीं दिलेली आहे. लहानपणींच इंद्रायणीच्या खोल खड्ड्यामध्यें स्वतःला गडप करून आईचा राग शांत करूं पहाणार्‍या तुकोबानें शेवटीं करून दाखविलेला अद्‌भुत चमत्कार इथें मोठ्या सुंदर रीतीनें व्यक्त झालेला आहे ! तुकाराम वैकुंठाला गेल्याच्या खुणा म्हणून सांडलेली कस्तुरी, उधळलेला बुक्का, झालेला धूर, काळसर मंडपांतून वर आलेल्या माळा, मोत्या पवळ्यांचं घातलेल वाळवण आणि नांद्रुकी झाडाखालीं राहिलेला रेशमी जोडा या गोष्टींचा उल्लेख उत्तम प्रकारच्या कल्पनावैभवाच नमुना म्हणून पहाण्यासारखा आहे. त्यांतल्या त्यांत तुकारामाची आठवण म्हणून झाडाखालीं राहिलेल्या त्याच्या रेशमी जोड्याचा इथें आलेला उल्लेख विलक्षण बहारीचा तसाच चटकदारहि आहे.
तुकारामाच्या वैकुंठ गमनामुळें जिजाईला झालेलें दुःख इथें अगदीं थोडक्यांतच पण एवढ्या चांगल्या रीतीनें वर्णिलेलें आहे की, ऐकणाराच्या मनांत तिच्याबद्दल आपोआप जिव्हाळा निर्माण व्हावा व मनाला चुटपुट लागावी !
सातवी माजी ववी        सातवा अवतार
तुकाराम बोल        न्हाई फिरून संसार
आठवतील तेवढ्या देवादिकांच्यावर ओळीनें ओव्या गाणार्‍या स्त्रीनें सातव्या क्रमांकाच्या ओवीमध्यें तुकारामाचें केलेलें हें स्वभाववर्णन मोठें सुंदर आहे. त्याचप्रमाणें पुन्हा संसार म्हणून नाहीं अशी त्याच्या भावनेची त्या बाईनें केलेली पारख बघून,नकळत दुसर्‍या जन्मांतील त्याच्या एका निश्चयाचा उल्लेख केला आहे किंवा कसें, अशी शंकाहि मनाला चाटून जाते !
तुकाराम एक फार मोठा कवि होऊन गेलेला असला, तरी खेडुत स्त्रियांनीं त्याच्याबद्दल सांगितलेली हकीकत ही अशी आहे. त्या थोर पुरुषाच्या अभंगांचें वाचन त्यांना करणें जमलें नाहीं. त्या लिहिण्यावाचण्यांत अडाणी राहिल्या. त्यामुळें पोथी ऐकूनहि मनावर कांहीं विशेष बिंबलें गेलें नाहीं ! आपल्या संसाराप्रमाणें जेवढें वाटलें तेवढें या अडाणी मनानें टिपून घेतलें. मात्र त्याचा आविष्कार सहजसुंदर केला आहे.
मला मिळालेल्या तुकारामासंबंधींच्या ओव्या एवढ्या असल्या तरी त्या आणखीहि पुष्कळ असूं शकतील. पण एकंदरीनें इतर विषयावरील ओव्यांच्या मानानें ही संख्या कमीच आहे. माझ्या कल्पनेप्रमाणें याचें एक प्रमुख कारण असें असणें शक्य आहे कीं, तुकाराम हा अगदीं अलिकडच्या काळांत होऊन गेलेला संत आहे. त्यामुळें 'देव' म्हणून भाविक श्रद्धेनें त्याच्याकडे पहायची संवय सामान्य मनाला लागलेली असली तरी अद्याप त्याचा कवि म्हणून खरीखुरी ओळख अजून सर्वांच्यापर्यंत पोंचलेली नाहीं. तुकारामाची गाथा लोकांच्यासमोर असली, तरी त्याचें संपूर्ण चरित्र अद्यापहि परिपूर्ण असें प्रकाशित न झाल्यानें असें होणें शक्य आहे !

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2013-12-25T21:53:48.4930000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

उदका पाण्यानें करून टाकणें

  • अत्यंत थोड्या खर्चात करणें 
  • केवळ पाण्यानेच जणू काम करणें 
  • फारसा गाजावाजा न करता व फारसा खर्च न करता कसेबसे एखादे कार्य विशेषतः उत्तरक्रिया वगैरे उरकून घेणें. 
RANDOM WORD

Did you know?

चांदणी चोळी म्हणजे काय
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.