स्त्रीधन - भोंडला ( हातगा )

लोकगीतातील स्त्रीधन म्हणजे मराठीतील एक अमूल्य ठेवा आहे, तो आपण पुढील पिढीसाठी जतन करून ठेवला पाहिजे.

भाद्रपद संपून आश्विन उजडाला कीं, महाराष्ट्रांतल्या बहुतेक प्रत्येक घरांतील मुलीची मोठी धांदल उडून जाते. घरोघरीं मुलीं भोंडला अगर हातगा घालीत असतात. त्यासाठी प्रत्येकीची जणूं इर्षेनें तयारी चालू असते. अंगणांत लाकडी पाट ठेवायचा. पाटावर रांगोळीनें हत्ती काढायचा आणि त्या हत्तीची पूजा बांधायची, हा या हातगा घालण्याच्या मागें हेतु असतो. रब्बीच्या हंगामांतील पिकें तरारून वर येत असतांना त्यांना अधिकाधिक टवटवी यावी म्हणून अभ्यंगस्नान घालणार्‍या हस्तनक्षत्राचीच ही पूजा. पावसाळ्यांतील हस्तनक्षत्राचा पाऊस मोठा मानाचा. रखरखीत उन्हानें तापलेल्या धरणीला 'वर्षा' नें शात केल्यावर सर्वत्र आबादीआबाद करून सोडण्याचा त्याचा मान. शेतवाडीला आणि माणसांना भरपूर पाणी सांठवून घेण्याची संधि तो देतो. त्यामुळें सर्वत्र आनंदीआनंद. आणि म्हणूनच त्याची ही पूजा घरोघरींच्या मुलीबाळी आनंदीनें बांधतात. हासतनाचत आणि गात ही पूजा बांधली जाते.
अशा वेळीं आणि सोंडेमध्यें हार धरलेले दोन हत्ती एकमेकांच्याकडे तोंड करून उभे आहेत असलें चित्र भिंतीवर टांगण्यांत येतें. तसेंच या दिवसांत मिळणार्‍या कोरांटीच्या, कारियळाच्या आणि झेंडूच्या फुलांची माळ नित्य नेमानें दररोज त्याच्या गळ्यांत घालण्याची चाल आहे. खेरीज सुरवातीसच या मोसमांत मिळणार्‍या वांगें, दोडका, घोसाळें, भेंडी, पडवळ, सीताफळ, कारलं, काकडी, मिरची, दुध्या भोपाळा, साधा भोपळा, मुळा, गाजर, तोंडलं, घेवडा, मक्याचें कणीस वगैरे सर्व फळांमुळांचा हारहि या चित्राच्या गळ्यांत घालण्यांत येतो.
सामान्यतः संध्याकाळी पांचच्या सुमारास हा हातगा घालावा म्हणुन आळीपाळीनें घरोघरीं मुली दररोज जमतात. त्यावेळीं रांगोळीनें काढलेला पाटावरचा हत्ती मध्यें ठेवून आणि लहानगीं मुलें मधीं बसवून मुली सभोंवतीं फेर धरून गाणीं म्हणतात. शेवटीं कोणाला सहसा ओळखतां येणार नाहीं अशी खिरापत पुढें आणून, पण ती चिरडीच्या अगर परकराच्या सोग्यांत लपवून, ओळखायला लावीत मुली बराच वेळ हंसत खेळत वेळ घालवतात. आणि अखेरीस ती ओळखली म्हणजे सर्वांना वांटून हा खेळ संपवतात.
हा हातगा सोळा दिवस घातला जातो. शेवटच्या दिवशीं तर सोळा गाणीं, सोळा खिरापती आणि सर्व प्रकारचा भरपूर खेळ असा मोठा गंमती जमतीचा व आनंदाचा उत्सव मुली पार पाडतात. या कामीं घरच्या वडीलधार्‍या बायकांचीहि त्यांना भरपूर मदत होते. आपण स्वतः लहानपणीं अनुभवलेला आनंद त्या या मुलींच्या निमित्तानें पुन्हां उपभोगतात. अशा वेळीं तो आनंद पुरेपूर लाभावा म्हणून मुलींना गाणीं सांगतांनाहि त्या अगदीं एकजीव झालेल्या दिसून येतात. आपल्यापेक्षांहि आपली मुलगी यावेळीं गाणारी व्हावी ही ईर्षा त्यांच्या ठायीं मोठ्या प्रकर्षानें आलेली असते.
भोंडल्याचीं वा हातग्याचीं जीं गाणीं आज कितीक वर्षें सर्वत्र प्रसिद्ध आहेत तीं मोठी सुरेख आहेत. त्यांचें अंतरंग घरगुती आहे. मांडणी रेखीव आहे. भाषा आकर्षक आहे. आणि 'गळा' तर फारच छान आहे. या गाण्यांची सुरवात बहुधा पुढील गाण्यानें करतात--
ऐलमा पैलमा गणेश देवा
माझा खेळ मांडून दे करीन तुझी सेवा
माझा खेळ मांडीला वेशीच्या दारीं
पारवं घुमतं बुरजावरी
पारवणी बाळाचे गुंजावणी डोळे
गुंजावणी डोळ्याच्या गुंफिल्या टिक्का
आमच्या गांवच्या भुलोजी नायका
येशील काय देशील काय
कांडा तीळ बाई तांदूळ कांडा
आमच्या आया तुमच्या आया
खातिल कया दुधोंडे
दुधोंड्याची लागली टाळी
आयुष्य दे रे बा माळी
माळी गेला शंता भातां
पाऊस पडला येतां जातां
पड पड पावसा थेंबोथेंबी
थेंबोथेंबीं आळव्या लोंबी
आळव्या लोंबती अंकणा
अंकणा तुझी सात कणसं
भोंडल्या तुझीं सोळा वर्षं
हस्ताचा पाऊस म्हणजे मुळसळधार पाऊस. फार मोठा या बाबतींत जुनीं माणसें एक कहाणी सांगतात कीं, आभाळांतील मोठे ढग समुद्रावर येऊन पोट फुटस्तावेंर पाणी पिऊन जातात आणि मग हत्तीच्या सोंडेची झारी करून ते आभाळांतून पुन्हां खालीं धरणीवर सोडतात! ... हा पाऊस हत्तीच्या सोंडेंतून पडतो म्हणूनच त्याला हस्ताचा पाऊस म्हणावयाचें. अशा या पावसाचें स्वागत करतांना मुली म्हणत आहेत कीं, वेशीच्या दारावर मांडलेला माझा खेळ हे गणपतिबाप्पा तूं चांगला मांडून दे. नुकत्याच विसर्जन केलेल्या गणपतीची आठवण करून मुली आपल्या उभ्या आयुष्याचा खेळ मांडून द्यायला सांगत आहेत, ही या गाण्यांतील भूमिका मोठी हृद्य आहे. आणि ती उठावदार व्हावी म्हणूनच कीं काय रोजच्या जीवनांतील प्रसंगांचा इथें उल्लेख आलेला आहे. बुरजावर घुमणारा पारवा, गांवचा भुलोजी नाईक, तांदूळ कांडणें, आईचें खाणें, माळी, शेत, पाऊस, कणसें इ. सर्व गोष्टी जमेल तशा इथें आलेल्या आहेत. मनांत आलें तें आनंदाच्या प्रसंगीं बोलून मोकळें व्हावें तसें इथें झालें आहे.
यानंतर स्वाभाविकपणेंच पुढें येणारें गाणें असें आहे-
वाजे चौघडा रुण झुण   
आला ग हादगा पाहुणा
दारीं तुळसा दऊणा
जाईजुई शेवंती दुपारी
फुलें ग नाना परी
हार गुंफीतें कुसरी
वहात मी हादग्या परी
हादगा देव मी पूजीतें
लवंगा सुपार्‍या वेलदोडे
करून ठेवले विडे
आणखीन् दुधांतले दुधपेढे
वहातें मी हादग्यापुढें
हदगा देव मी पूजीतें
सुरवातीला होणारी हातग्यांची पूजा या गाण्यांत वर्णिलेली आहे. ( हातगा हा शब्द इथें हादगा असा उल्लेखिलेला आहे. हे दोन्हीहि शब्द सर्वत्र प्रचारांत आहेत. ) चौघडा वाजतो आणि हातग्याच्या येण्याची चाहूल देऊन आपलें चित्त वेधून घेता आहे. ही या गाण्याची सुरवात फारच सूचक अशी आहे. त्याचप्रमाणें या गाण्यांत वर्णिलेल्या पूजेच्या व नैवेद्याच्या साहित्याबरोबरच दारांतील तुळशीचें व द‍उण्याचें ओघानें सुचविलें गेलेलें मंगल वातावरणहि मन प्रसन्न करणारें आहे.
मुली हातगा खेळायला लागल्या म्हणजे मग, कणगीचे तोंड बाजूला होतांच अखंडपणे जोंधळे वेगानें बाहेर पडावेत, त्या प्रमाणें एकामागून एक गाणीं त्या भराभर म्हणूं लागतात. त्या गाण्यांना ठरलेला क्रम नसतो. सुचेल तसें किंवा आठवेल तसें गाणें ओठांवर खेळायला लागतें.
येवढं येवढंसं पांखरुं माझं
लाल लाल ग त्याची चोंच
गुंजावाणी ग त्याचे डोळे
सप्त पाताळी बाळ खेळे कीं पांखरुं माझं
कोण्या बाजारासी ग गेलं
कोण्या नारीनं खुणाविलं कीं पांखरुं माझं
दह्या दुधांनीं भरल्या वाट्या
वर साखर रायपुरी
माझा जेवणार नानापरी कीं पांखरुं माझं
दुधा तुपांनी भरल्या वाट्या
वर साखर रायपिठी
माझा जेवणार जगजेठी कीं पांखरुं माझं
लोण्या ताकांनीं भरल्या वाट्या
वर साखर चवीयीला
आला गोविंद जेवायला कीं पांखरुं माझं
हस्तीदंती ग आणा फणी
जावळ विंचरूनी घाला वेणी कीं पांखरुं माझं
सोनियाचा न पाळयीणा
मोतीयाची ग लावली दोरी
पुढं हालवीत राधा नारी कीं पांखरुं माझं
आपल्या लहानग्या बाळाचें कौतुक या गाण्यामध्यें आईनें मनसोक्त केलें आहे आणि तें गाणें आपल्या मुलीला म्हणायला शिकविलें आहे. हेतु एवढाच कीं, मुलीला वात्सल्याची कल्पना यावी आणि त्या जिव्हाळ्यांतील आनंद कळावा. शिवाय आपल्या लहान भावंडाला उद्देशूनही असे गौरवोद्नार इतरांच्यापुढें अभिमानानें काढायला लागायची तिला संवय लागावी, भावंडांमधील आपुलकी वाढावी इथें वर्णन केलेलीं दह्यादुधाचीं, लोण्याची, तुपाची वर्णनें त्या वेळच्या आबादी आबादीची साक्ष देतात. तसेंच आपल्या मुलाला भगवान् श्रीकृष्ण मानून हें गोरस भरपूर देण्याची आईच्या मनांतील ईर्षाहि दिसून येते! सुरवातीच्या तीनचार ओळींमधील बाळाच्या सौंदर्याचें वर्णनहि मोठें सुंदर आहे.
पानपुडा की शंकरचुडा की शंकरचूडा   
मामा माझा की लेकुरवाळा की लेकुरवाळा
त्याच्या घरीं की दुभतं कांहीं की दुभतं कांहीं
मामा पाहुणा आला बाई की आला बाई
त्याला जेवायला काय काय करूं की काय काय करूं
त्याला जेवायला साखर उंडे की साखर उंडे
मामा सांगे की मामी भांडे की मामी भांडे
त्यानं आणली की तेलंग साडी की तेलंग साडी
नेसून गेलें मी बुरजावरी की बुरजावरी
तिथं हरपली इरुद्या जोडवीं की इरुद्या जोडवीं
सासूबांईना कळूं गेलं की कळूं गेलं
चार चाबूक चमकाविले की चमकावीले
ते बाई चाबूक दूरच्या दूर की दूरच्या दूर
माझं माहेर पंढरपूर की पंढरपूर
माझं आजोळ रत्‍नांगिरी की रत्‍नांगिरी
रत्‍नांगिरीच्या बांगड्या साध्या की बांगड्या साध्या
येतां जातांना खुळखुळ वाजे की खुळखुळ वाजे
माहेरच्या आणि सासरच्या माणसांची तुलना करण्याचा इथें प्रयत्‍न झालेला आहे. आपला लेकूरवाळा मामा आपलें दुभतें घर सोडून आपल्याकडे येणार, तेव्हां त्याला उत्तम जेवण दिलें पाहिजें, ही आईची शिकवण या गाण्यांत प्रकट झाली आहे. आपली भावना आईनें जणुं मुलीच्या करवीं इथें सांगितली आहे. लाडक्या भाचीला आणलेली तेलंग साडी ( तेलंगणांतील-आंध्र प्रांतांतील ) किती मोलाची असते, हें उभ्या गांवाला दाखवावी म्हणून ती गांवांतल्या बुरजावर जाऊन दिमाखानें उभी रहाते ही कल्पना हृदयंगम आहे. तशीच ती त्यावेळच्या जुन्या काळांतील त्या गांवच्या किल्ल्याचें वास्तव्यहि दर्शविणारी आहे. पायांतील लग्नाच्या वेळचीं इरुदीं जोडवीं हरवलीं म्हणून सासूबांईनीं चाबकाचा मार दिला! त्यामुळें माहेरची आणि आजोळची आठवन होऊन शेवटीं आजोळीं घातलेल्या साध्या बांगड्यावर मनाचें समाधान स्थिर झालें, हा इथें आलेला भोळा भाबड्या मनांतील भावनाविष्कारहि मोठा गंमतीचा आहे.
हातूका मतूका, चरणीं चतूका   
चरणींच्या सोंडेवरी
बाळ खुळखुळ गोंडेवरी
एकेक गोंडा विसाविसाचा
नागर साड्या नेसायचा
नेसा ग नेसा मावल्यांनो
सात घरच्या पाव्हण्यांनो
पाव्हण्या गेल्या खोलीं
सितानं टाकली डोली
चिटक्या मिटक्या करंडफूल
तें बाई फूल मी तोडीलं
हातग्या देवा वाहीलं
हातग्या तुझा तुरारा
मातीयाचा भुरारा
भैनी तुमचा चांद वो
मोतियाचा भांग वो
चांदासरशीं निळी घोडी
येतां जातां कमळं तोडी
या गाण्यामध्यें अनेक कल्पना एकत्र आलेल्या आहेत. हत्तीच्या पुढें वाहिलेल्या वस्त्राला लावलेला गोंडा एकेक विसाविसाचा आहे, एवढा मौल्यवान आहे. म्हणजे हा एवढा भारी गोंडा ( त्या वेळच्या स्वताईच्या मानानें ) वहाणारी स्त्री भारी नागर साडी नेसणारी आहे. अशा चांगल्या सात घरच्या पाहुण्या जणूं नवस फेडावा म्हणून हातग्या देवाकडे आल्या आहेत! त्यावेळच्या रिवाजाप्रमाणें मेण्यामध्यें बसून येणार्‍या बायकांचा इथें उल्लेख आला आहे, तसेंच पूर्वी विसापलीकडे सामान्य स्त्रियांना अंक मोजतां येत नसत, हेंहि यावरून दिसून येतें! पूजेसाठीं जमविलेलीं फुलें, बसायला मिळालेली निळी घोडी, बहिणीच्या भांगांतील मोत्यांची बिंदी वगैरे गोष्टींचा इथें आलेला उल्लेख जुनें ऐश्वर्य दर्शवित आहे. हीं गाणीं नेमकीं केव्हां तयार झालीं याचा मागोसा घेतां येत नसला, तरी त्यामधील वर्णनावरून त्यावेळीचा काळ बराच जुना असला पाहिजे, हें उघड आहे.
एक लिंबूं झेलूं बाई दोन लिंबूं झेलूं
तीन लिंबूं झेलूं बाई चार लिंबूं झेलूं
चार लिंबूं झेलूं बाई पांच लिंबूं झेलूं
पांचा लिंबांचा पानोळा
माळ घाली हनुमंता
हनुमंताची निळ्ळी घोडी
येतां जातां कमळं तोडी
कमळाच्या पाठीमागं लपली राणी
अग अग राणी इथं कुठं पाणी
पाणी नव्हें यमुना जमुना
यमुना जमुनाची बारीक वाळू
तिथं खेळे चिलार बाळू
चिलार बाळाला भूक लागली
सोन्याच्या शिंपीनं दूध पाजलं
पाटावरच्या घडीवर निजवलं
नीजरे नीजरे चिलार बाळा
मी तर जातें सोनारवाड्या
सोनारदादा सोनारदादा
गौरीचे मोती झाले कां नाहीं
गौरीच्या घरीं तांब्याच्या चुली
भोजन झालं आवळी खालीं
उष्ट्या पत्रावळी चिंचे खालीं
शेणगोळा आंब्या खालीं
पानं सुपारी उद्यां दुपारी
या गाण्याचा उत्तरार्ध याशिवाय कुणी कुणी असाहि म्हणतात-
गौराईच्या माहेरीं तांब्याच्या चुलीं
मांडव घातला मखमखपूरीं
लगीन लागलं सूर्यातळीं
उष्ट्या पत्रावळी चिंचेखाली
टाळ्या पोळ्या पुरणाच्या पोळ्या
भुलाई जाते सासरीं
जाईल तशी जाऊं द्या
खीर पोळी खाऊं द्या
आमचा भोंडला वर्षाला येऊं द्या
या गाण्यामध्यें एवढ्या गोष्टी एका ठिकाणीं गोळा झाल्या आहेत कीं, नेमकें काय म्हणायचें आहे हें लक्षांत येत नाहीं. परंतु हें गाणें विशेष लोकप्रिय आहे. या गाण्याची चाल आणि ठेका मोठा आकर्षक असल्यानेंहि त्याची मोहिनी मुलींच्या मनावर पडते. इथें एक लहानशी कथा सांगण्याचा प्रयत्‍न झालेला दिसतो. लिंबांशीं खेळ खेळणारी बाई त्या लिंबांच्या पानांची माळ हनुमंताच्या गळ्यांत घालते. त्या हनुमंताची निळी घोडी असते व तो येतां जातां कमळें तोडीत असतो. ( हा हनुमंत कोण याचा मात्र एवढ्यावरून मागमूस लागत नाही. कदाचित् तें एखादें विशेष नामहि असणें शक्य आहे.) त्या कमळाच्या पाठीमागें कोणी तरी स्त्री लपलेली असते. जमुनेच्या काठावर पाणी आणायला ती जाते. तिथें चिलार ( श्रियाळ ) बाळ खेळत असतें. त्याला घेऊन ती सोन्याच्या शिंपीनं दूध पाजते, पाटावर निजवतें आणि स्वतः सोनाराकडे जाऊन गौरीच्या दागिन्यांची चौकशी करते. होतां होतां ती गौरीच्या घरीं जाऊन तेथील वर्णन करते आणि मग स्त्री स्वभावाला अनुसरून जेवण खाण्याचा उल्लेख करीत भोंडल्याला दरवर्षाला यायचें निमंत्रण देते, असा ह्या कथेचा गोषवारा या गाण्यावरून काढतां येईल. कदाचित् भोंडला खेळण्यासाठीं जमलेल्या मुलींनी भातुकली खेळून जेवण उरकलें असण्याचीहि शक्यता वरील वर्णनावरून दिसून येते! एकूण सर्व वर्णन स्त्रीच्या रोजच्या जीवनांतील अगदीं घरगुती असें इथें आल्यानें त्याची गोडी स्त्री मनाला भुरळ पाडीत असावी!

मराठींतील स्त्रीधन भोंडला ( हातगा )

सईच्या अंगणीं झोकुन दिलं बाई झोकुन दीलं   
चोळुन मोळुनी राळ केलं बाई राळ केलं
सईनं उचलूनी घरांत नेलं बाई घरांत नेलं
कांडुन कुटूनी तांदुळ केलं बाई तांदूळ केलं
म्होरच्या बाजारीं विकाय नेलं बाई विकाय नेलं
त्या बाई तांदळाचा खुरदा आला बाई खुरदा आला
त्या बाई खुरद्याची बांगडी लेली बाई बांगडी लेली
सासूबाईनं ठोसला दिला बाई ठोसला दिला
तो बाई ठोसला दूरच्या दूर बाई दूरच्या दूर
माझं माहेर पंढरपूर बाई पंढरपूर
माझं आजूळ रत्‍नांगिरी बाई रत्‍नांगिरी
माझ्या हातांत कोइमतुरी चुडा बाई चुडा
मला बसायला निळ्‌ळा घोडा बाई निळ्‌ळा घोडा
कोण्या देशींचे गहू आणले बाई गहू आणले
त्याच्या चपात्या केल्या नऊ बाई केल्या नऊ
त्या बाई चपातिच्या तारा तुट बाई तारा तूट
माझ्या झिम्माचा धिंगाणा उठ बाई धिंगाणा ऊठ
एखाद्या शेतावर घर बांधून राहणार्‍या शेतकर्‍याच्या घरच्या एका प्रसंगाचें हें वर्णन आहे. ही एक चिमुकली कथा आहे. कुठला तरी कावळा अचानक येऊन राळ्याचें लोंबट तोडून नेतो आणि तें अंगणांत सांपडल्यानंतर सई त्याचे चोळूनमोळून आणि कांडुनकुटून राळे करून बाजारांत विकते. त्या विक्री कारणानें आलेल्या पैशाच्या ती बांगड्या घालते म्हणून सासू रागावते. घालून पाडून बोलते. अशा वेळीं सईला माहेर आणि आजोळ आठवतें. बसायला मिळणारा निळा घोडा लक्षांत येतो आणि मग माहेरीं बक्षी गव्हासारख्या चांगल्या अशा दूर देशांतील गव्हाच्या चपात्या खाऊन भरपूर खेळायला मिळतें! या गाण्यांतील ही कथा लक्षांत घेतां एक गोष्ट उघड होते कीं, माहेरचें कौतुक व स्वतःची कर्तबगारी बाई या निमित्तानें समाजापुढें ठेवीत आहे! अशा गाण्यामधून वरचेवर आढळून येणारें माहेर पंढरपूर आणि आजोळ रत्‍नांगिरी म्हणजे पंढरीचा विठोबा आणि कोल्हापूरचा ( रत्‍नागिरी ) ज्योतिबा हे देव असावेत असें म्हणायला हरकत नाहीं.  देवाच्या दारीं माहेराप्रमाणें मोकळ्या मनानें खेळतां येतें असें इथें सुचविलें असावे! या गाण्यांत शेवटीं झिम्माचा उल्लेख केलेला आहे. हातगा घालतांना फेराचा झिम्मा देखील मुली खेळतात व त्यावेळीं हें गाणें म्हटलें जातें
कोथिंबिरी बाई ग आतां कधीं येशिल ग
आतां येईन चैत्रमासीं
चैत्रा चैत्रा लौकर ये
हस्त घालिन हस्तारा देव बसविन देव्हारां
देव्हार्‍याचा चौकटीं उठतांबसतां लाथाबुक्की
घे काठी लाग पाठी
घेत नाहीं काठीं लागत नाहीं पाठी
घरादाराची लक्ष्मी मोठी
हातगा संपत यावा आणि घट बसावेत अशा वेळची भावना या गाण्यांत आलेली आहे. पावसाळ्यांत भरपूर बहर आलेल्या कोथिंबिरीशीं बोलतां बोलतां चैत्रमासाला बोलावणें केलें आहे. हस्त नक्षत्रांत हातगा घालायचा आणि नवरात्रांत देव बसवायचे. पण देव्हार्‍याजवळ फार काळ घालवला कीं सासू उठतां बसतां रागें भरील ही भीति वाटते. तिचे कोणीं कान भरेल ही धास्ती वाटते. पण तसें होत नाहीं घरादाराची लक्ष्मी म्हणून सुनेचा मान राखला जातो, अशी या गाण्यांतील ही कल्पना मोठी सुचक आहे यांत शंका नाहीं. पूर्वीच्या काळीं लेकीबाळींना व सुनांना अशा रीतीनें उपदेश करण्याची प्रथा फार होती.
बाईच्या परसांत भेंडीचे झाड   
भेंडीचं झाड बाई खारवलं
मामाचं घर बाई थोरवलं
मामाच्या घरीं येऊन जा
तूप रोटी खाऊन जा
घाल ग मामे तुपाची धार
तुपाची धार गेली वार्‍यावन
भैनी आल्या पालखींतन
बाप आले घोड्यावन
आई आली चुड्यावन
भाऊजी आले कुत्र्यावन
का वो भाऊजी रुसला
काळा विंचू डसला
काळा विंचू पापी
रांजणाच्या कांठीं
रांजण गेला गडगडीं
पाऊस आला धडधडीं
आजोळच्या जिव्हाळ्याची गोष्ट या गाण्यांत सांगितलेली आहे. मामाच्या घरीं भेंडीचें पीक भरपूर आलें आहे आणि अशा वेळीं तिथें लक्ष्मी आनंदानें नांदत असतांना आपण आजोळीं जावें, तिथें तूपरोटी खावी आणि मजा मारावी. पण मामीनें थोडी ढिलाई केल्याकारणानें सारें बिनसतें. टांकोटांक ही बातमी मग आईला समजते. आपापल्या मानानें सगळीं गोळा होतात. पण भाऊजी मात्र काळ्या कुत्र्यावरून आल्यानें हंशाचहंशा होतो. त्यांच्या या येण्याला कांहींतरी कारणमीमांसा जोडून शेवटीं विनोद निर्माण झाला असून, पाऊस मुसळधार पडण्यांत गाणें थांबतें. विनोद करणें शक्य होईल अशीं नातीं जमा करून अशा प्रकारची भाषा करण्याची प्रथा अद्यापहि खेड्यामध्यें आहे. घटकाभर खेळीमेळीनें वेळ काढावा हा त्यामागचा हेतु इथें सफल झालेला दिसतो.
काळी चंद्रकळा नेसूं मी कशी    
गळ्यांत हार बाई वाकूं कशी
पायांत पैंजण चालूं कशी
बाहेर मामाजी बोलूं कशी
दमडीचं तेल मी आणूं कशी
दमडीचं तेल बाई आणलं
सासूबाईचं न्हाण झालं
वन्सबाईंची वेणी झाली
मामांजींची दाढी झाली
उरलेलं तेल झांकून ठेवलं
लांडोरीचा पाय लागला
येशीपातूर ओघळ गेला
त्यातन हत्ती वाहून गेला
या गाण्यामध्यें अगदीं परकोटीची अतिशयोक्ति वर्णन केलेली दिसून येते. सासरच्या घरचें उणेंपुरें बोलून दाखवतांना जीभ किती वळवळ करते, त्याचा हा मासलेवाईक नमुना आहे. घरच्या माणसांचा थोडा धाक असला कीं, कोणती गोष्ट किती परकोटीला जाते हें इथें चागलें दाखविलेलें आहे. अर्थात् हा केवळ विनोद आहे हें विसरून चालणार नाही.
एवढासा तांदूळ बाई नखांनी खुडीला    
भारा जी बांधिला बाई येशीभाईर टाकीला
गाय आली हुंगून गेली
म्हैस आली खाऊन गेली
म्हशीला झाला बाई रेडा
गाईला झाला बाई पाडा
तोच रेडापाडा बाई बापाजींचा वाडा
बापाजींनी घेतली जांभळी घोडी
जांभळ्या घोडीची नेटकी चाल.
जिथं पाऊल पडलं तिथं कोलापुरी शाल
कोलापुरी शाल बाई उंदरून दिशी
ठसा पडल बाई चोळीचोळी देशीं
ठस्सा मस्सा अंबर घस्सा
अंबरांत पडली काडी
तीच काडी उप्पर माडी
उप्पर माडीवर कमळाचं तळं
त्या बाई तळ्यांत परटीन धूती
विठूच्या टोपीला निळा रंगदेती
विठूची टोपी बाई रंगाची
रखमाईची चोळी भिंगाची
शेतकरी वडीलांच्या घरच्या दौलतीचें वर्णन इथें आलेलें आहे. लहानगा तांदूळ नखानें खोडून घेऊन उरलेलें निकामी गवत वेशीच्या बाहेर टाकलें आणि तें गाईनें हुंगलें व म्हशीनें खाल्लें. त्यामुळें गाईला पाडा झाला व म्हशीला रेडा झाला! वडिलांच्या घरीं दावणीला त्या दोघांना जागा मिळाली. पण वडिलांनीं निळी घोडी घेऊन तिच्या नेटक्या चालीचा उपयोग करून घेतला. अशा वेळीं घडलें असें कीं, जिथें पाऊल पडावें तिथें कोल्हापुरी शाल मिळूं लागली एवढी त्यांची कर्तबगारी वाढली. कोल्हापुरी शाल मोठी देखणी. चार देशांत उठून दिसणारी...वडिलांच्या कर्तबगारीची ही हकीकत आल्यानंतर या गाण्यांत कुठल्या तरी वरच्या माडीवरील तळ्याचें वर्णन येऊन शेवटीं विठ्ठल व रुक्मिणीच्या कपड्यांच्या गोष्टी आलेल्या आहेत. त्यावरून असें दिसतें कीं, माणसाच्या चांगुलपणाला देवादिकांचा आधार द्यावा. तसेंच अशा गाण्यांमधून वरचेवर येणारी निळी घोडी म्हणजे त्या वेळच्या एका ऐश्वर्याचा दिमाख दर्शविणारी गोष्ट असली पाहिजे.
नणंदा भावजया दोघीजणी  
घरांत नव्हतं तिसरं कोणी
शिंक्यावरचं लोणी खाल्लं कोणीं
मीं नाहीं खाल्लं वहिनीनं खाल्लं
आतां माझा दादा येईल ग
दादाच्या मांडीवर बशीन ग
वैनीच्या चाड्या सांगीन ग
दादा तुझी बायको चोरटी
असूं दे माझी चोरटी
घे काठी लाग पाठी
घरादाराची लक्ष्मी मोठी
या गाण्यामध्यें नणंदा भावजयांच्या नात्यामधील एक महात्वाचा प्रसंग चित्रित झालेला आहे. घरांत दोघीजणीच असायच्या आणि झाल्या गेल्याचा आळ फक्त वहिनीवरच यावयाचा ही रोजच्या व्यवहारांतील एक साधी गोष्ट आहे. पण भावनेच्या दृष्टीनें ती फार महत्वाची आहे. खोडी होईल ती फक्त भावजईच्या हातूनच आणि नणंद तेवढी करून सवरून नामानिराळी अशी ही भावना सर्वत्र रूढ झालेली! तिचाच इथें आविष्कार झालेला आहे. पण त्यांतल्या त्यांत समाधानाची गोष्ट म्हणजे नवर्‍यानें तिची बाजू घेतली असून बहिणीच्या चहाड्यांना धूडकावून लावलें आहे.
नणंदा भावजया दोघीजणी
खेळत बसल्या ग अंगणी
भावजईवरी डाव आला
रुसून बसली गाईच्या गोठयांत
सासूरवाशी सून रुसून बसली कैशी ?
यादव राया राणी रुसून बसली कैशी ?
नणंद गेली समजावयासी
उठा उठा वैनी चला घरासी
सोन्याची सुपली देतें तुम्हासी
सोन्याची सुपली नक्को मला
मी नाहीं यायची तुमच्या घरासी
सासुरवाशी सून रुसून बसली कैशी?
यादवराया राणी रुसून बसली कैशी?...
असें हें गाणें बरेंच लांबलचक आहे. शब्दरचना सर्वत्र पुढें हीच आहे. फक्त नणंदेच्या ऐवजीं घरचीं इतर माणसें तिचा रुसवा काढायला जातात व सोन्याच्या सुपलीऐवजी इतर पदार्थाचें आमीष दाखवितात, एवढाच काय तो फरक. दीर चेंडूदांडूं घेऊन जातो, जाऊ ताकाचा डेरा देऊं करते, सासरा पैशाची पेटी देतो म्हणतो, सासू अर्धा संसार देईन म्हणते पण तिची मर्जीं मुळींच फिरत नाहीं ! अखेर शेवटीं नवरा आल्यावर मात्र साराच रंग निराळा होतो-
नवरा गेला समजावयासी
उठ उठ राणी चल घरासी
लाल लाल चाबूक देतों तूंशी
उठली ग बाई गजबजून
पदर घेतला सावरून
सासुरवाशी सून घरासी आली कैशी?
यादवराया राणी घरासी आली कैशी?
आणि मग हें गाणें असें संपतें. इथें हट्टी सुनेचें स्वभावचित्र रेखाटलेलें आहे. पण त्याचबरोबर नवर्‍याचा धाक ती मानून असते, याचा मोठा मार्मिकतेनें उल्लेख आलेला आहे.

मराठींतील स्त्रीधन भोंडला (हातगा)

सोन्याची सुपली बाई मोत्यांनी गुंफली
तिथं आमच्या वन्सं खेळत होत्या
वन्सं वन्सं, मला आलं मूळ
गुणाचे गौरी मला काय पुसतीस पूसजा आपल्या दिराला
सोन्याचा चेंडू बाई मोत्यांचा दांडू
तिथं आमचे भाऊजी खेळत होते
भाऊजी भाऊजी, मला आलं मूळ
गुणाचे गौरी मला काय पुसतीस पूस जा आपल्या जावेला
सोन्याची रवी बाई रुप्याचा डेरा
तिथं आमच्या जाऊबाई ताक करीत होत्या
जाऊबाई जाऊबाई, मला आलं मूळ
गुणाचे गौरी मला काय पुसतीस पूसजा आपल्या सासर्‍याला
सोन्याची सहाण बाई रुप्याचं खोड
तिथं आमचे मामाजी पूजा करीत होते.
मामाजी मामाजी, मला आलं मूळ
गुणाचे गौरी बरीच दिसतीस पूसजा आपल्या सासूला
सोन्याचा करंड बाई रुप्याचा आरसा
तिथं आमच्या सासूबाई कुंकूं लावीत होत्या
सासूबाई सासूबाई, मला आलं मूळ
गुणाचे गौरी बरीच दिसतील पूस जा आपल्या नवर्‍याला
रुप्याचा पलंग बाई रेशमाची गादी
तिथं आमचे पति निजले होते
पति पति, मला आलं मूळ
आणा फणी, घाला वेणी, जाऊंद्या राणी माहेरा
या गाण्यामध्यें जुन्या काळच्या ऐश्वर्याची आणि आज्ञाधारकपणाची माहिती सर्वत्र गोविलेली आहे. माहेराचा मुराळी न्यायला म्हणून आला कीं, घरच्या प्रत्येकाची कशी मनधरणी करावी लागत असे, ह्याचा हा एक पहाण्याजोगा नमुना आहे. प्रत्येकाकडे जावें आणि ज्यानें त्यानें स्वतःवर जबाबदारी न घेतां दुसर्‍यावर ढकलून रिकामें व्हावें असा हा प्रकार आहे! अखेरीस नवर्‍यानें समंजसपणा दाखवावा आणि बायकोला माहेरीं धाडून तिचें मन सांभाळावें, हा उदार मनाचा नमुनाहि येथें मोठ्या खुबीनें चित्रित झालेला आहे.
सासरच्या वाटें कुचकुच कांटे   
कोण पाहुणा आला ग बाई...हूं...हूं...
सासरा पाहुणा आला ग बाई...हूं...हूं...
सासर्‍यानं काय आणलं ग बाई...हूं...हूं...
सासर्‍यानं पाटल्या आणल्या ग बाई...हूं...हूं...
पाटल्या मी लेत न्हाई, संगं मी येत न्हाई
चारी दरवाजे लावा ग बाई...हूं...हूं...
झिपरं कुत्रं सोडा ग बाई...हूं...हूं...
असें हें गाणें घरची सगळीं नातीं सगळे दागिने घेऊन येस्तोंवर व त्यांना प्रत्येकाला नकार देईपर्यंत चालतें. पण शेवटी नवरा आल्यानंतर मात्र एकदम वातावरण बदलतें!-
सासरच्या वाटे कुचकुच कांटे
कोण पाहुणा आला ग बाई...हूं...हूं...
पति पाहुणा आला ग बाई...हूं...हूं...
पतीनं काय आणलं ग बाई...हूं...हूं...
पतीनं चाबुक आणला ग बाई...हूं...हूं...
चाबुक मी लेतें, संग मी येतें
चारी दरवाजे उघडा ग बाई...हूं...हूं...
झिपरं कुत्रं आवरा ग बाई...हूं...हूं...
आणि मग हें गाणें संपतें. ह्या गाण्याचा सगळा तोंडावळा मागें आलेल्या गाण्याप्रमाणेंच जवळ जवळ आहे. पण ती परिस्थिति सासरच्या घरांतील होती आणि ही माहेरची आहे एवढाच काय तो फरक. बाकी मानपान येथून तेथून सर्वत्र सारखेच! हें गाणें एकीनें म्हणावयाचें व बाकीच्यांनी फक्त 'हूं...हूं' करावयाचें असतें. त्यामुळें कहाणी ऐकतांना लागणारी चित्ताची एकाग्रता व गाणें पुढें सरकायला लागणारें उत्तेजन हे दोन्हीहि मिळत असल्यानें ऐकतांना मोठी मौज येते यांत शंका नाहीं. अशाच प्रकारचें आणखी एक गाणें थोड्या फार शब्दांच्या फरकानें हातगा घालतांना म्हणतात-
अरडी बाई परडी ग   
परडी एवढं काय ग
परडी एवढं फूल ग
दारीं मूळ  कोण ग
दारीं मूळ नणंद ग
नणंदेनं काय आणलंन् ग
नणंदेनं पाटल्या आणल्या ग
पाटल्या मी घेत नाहीं संगं मी येत नाहीं
चारी दरवाजे लावा ग बाई
झिप्र कुत्रं सोडा ग सई...
येथेंहि मागच्या गाण्याप्रमाणेंच सर्व प्रकार घडत जातो व शेवटीं नवर्‍याचें म्हंणणें ऐकावें लागतें. अशा या सर्व गाण्यांमधून 'असे पति देवचि ललनांना' या भावनेनें परमोच्च बिंदू गांठलेला दिसतो व नवर्‍याखेरीज भागणार नाहीं या कल्पनेनें बायकोहि आपला सगळा तोरा सोडून देते आहे, ही भावना या रीतीनें प्रकट झालेली दिसते!
आला चेंडू गेला चेंडू, राया चेंडू झुगारिला    
आपण चाले हत्ती घोडे, राम चाले पायीं
राम ग वेचीतो कळया
सीता ग गुंफिते माळा
आल्या ग लगीन वेळा
आकाशी घातीला मंडप
जरतारी घातीलं बोहलं
जरम्‌जरती बसले पति
पतीन् पती तिरूबाई राळा
तिरूबाई राळा मुंजाबाळा
मुंजा बाळीचा मुंजक दोरी
तीच दोरी सावध मारी
सावधा सावधा सर्वतकाळ
सर्वतकाळाचा दोर
आणा दोर बांधा चोर
बांधा चोर बाई झाडाशीं
झाड झपकं, फूल टपकं
तें बाई फूल मीं तोडीलं
बहिणा माथां खोवीलं
बहिणा तुझी वेणी ग
सोनीयाची फणी ग
बहिणा तुझा खोपा ग
उंदीर घेतो झोपा ग
येत असतील त्या सगळ्या गोष्टी एखाद्याला सांगून मोकळें व्हावें तसा प्रकार या गाण्यामध्यें झालेला दिसतो. सुरवातीला आलेली राम आणि सीता, नंतरची लगीन वेळ, बोहलं, तिरूबाई राळा, मुंजाबाळ, सर्वतकाळ, चोर, झाड व फूल इ. या गोष्टी अशा रीतीनें इथें एकत्र झालेल्या आहेत कीं कशाचाच कशाला पत्ता लागत नाहीं! तथापि सुरवातींचे रामाचें नांव आणि शेवटचा विनोद यामुळें मुलींना हें गाणें म्हणतांना मजा वाटते.
आमच्या परसात भेंडीचं झाड     
लवलव डहाळ्या हालतील ग
अंबरमामा बाई येतील ग
फुलफुल साड्या आणतील ग
फुलफुल साड्या बाई नेसूं ग
लांब लांब पदर काढूं ग
लांब लांब पदर जरतारी
आमचे मामा व्यापारी
तोंडांत चिकणी सुपारी
सुपारी गेली फुटून
मामा आले उठून
या लहानशा गाण्यामध्यें श्रीमंत मामाचे व लाडक्या भाचीचें वर्णन थोडक्यांत पण खुबीदार रीतीनें केलेलें आहे. साडीची हौस मामा पुरवीत असे ही गोष्ट सांगायला हा चिमुकला संसार इथें उभा केला आहे! हातगा घालतांना अशी लहान पुष्कळ गाणीं आहेत-
माझी वेणी मोकळी
सोनीयाची साखळी
साखळी देऊं देवाला
देवा, दे मला अंगारा
अंगारा देऊं आईला
आई, दे मला साडी
साडीच्या पदरीं रुपाया
भाऊ माझा शिपाया
ज्याला हवें ते मिळवून आपणाला हवें तें पदरांतपाडून कसें घ्यावें, याची कल्पना इथें थोडक्यांत दिलेली दिसते. तसेंच जुन्या काळीं भाऊ शिपाई असणें म्हणजे मोठी मानाची गोष्ट असे, या गोष्टीचा उल्लेख मागें आलाच आहे.
अहिल्या पहिल्या गनीस देवा
माजा खेळ मांडीला वेशीच्या दारीं
पारवा घुमतो बुरजावरी
पारवाळ पक्काचे गुंज गुंज डोळे
आमचा मारुती शिकार खेळे
खेळत खेळत गेला मळ्याला
फुलाची माळ आनली हत्तीला
डेरा ग डेरा मांडीला अवधानी
त्या बाई डेर्‍यांत कायसंसं घुमतं
घुसळण घुसळी राधीका गवळण
तिकडून आले कृष्णाजी दातार
कृष्णाजी कृष्णाजी, दान द्या
निळ्या घोडीवर बसून जा
निळी घोडी वाळळी, सखुबाई सुंदर हांसली
सखुबाई तुमच्या अंगणीं, सुंदर चांफा लावूनी
ऐसा चांफा फुलला, चला बाई कळ्या तोडायला
आम्हीं बाई कळ्या तोडील्या, आम्हीं बाई हार गुंफिले
हारा हारा चांफेळी, रात्र झाली गोकुळीं
इथें गोकुळच्या राधाकृष्णाचें वर्णन आलेलें आहे. सखुबाई हें नांव कुणाचें तरी नांव घालावयाचें म्हणून इथें आलें आहे. या पलीकडे त्याला अर्थ नाहीं. सर्वत्र राधाकृष्णांच्या लीलेची माहिती गोविलेली आहे व शेवटीं अंगणांतील चांफ्यांच्या फुलांचा हार गुंफतांना रात्र झाली असा उल्लेख आला आहे. निळी घोडी खालीं वाकते व त्यामुळें ताक करीत उभी असलेली राधा कृष्ण खालीं उतरून खेळायला आल्याकारणानें हांसते, हा उल्लेखहि इथें मोठ्या खुबीनें केलेला आहे.
गंगु रंगु, तंगु गऽमिळूनी हादगा गाऊंऽग
केळी, नारळी, बकूळ, पोफळी, वरती लिंबूं लावूं ग
अननस, पपनस, कणीस, आंबा, वरती डाळींब लावूं ग
खिरापती या किती तर्‍हेच्या, करंज्या लाडू मोदक ग
या लहानग्या गाण्यामध्यें जमलेल्या मैत्रिणींच्या व खिरापतीच्या नांवांची फक्त नोंद झालेली आहे. आणि ती हातगा घालतांना आवश्यक असल्यानें मोठी गंमतीची वाटते. मुलगी हातगा गाऊन झाल्यावर जेव्हां परकराच्या सोग्यांत खिरापत लपवून जमलेल्या सगळ्याजणींना ओळखायला सांगते. तेव्हां ती खिरापत लौकर ओळखली नाहीं म्हणजे मोठी बहार उडून जाते. अशा वेळीं अक्कल जणुं पणाला लागते या ईर्षेनें हातगा जिच्या घरीं घालावयाचा ती मुलगी आपली खिरापत मुली हरतील कशा हें मुद्दाम पहाते! त्यामुळें रोज न ओळखणारी खिरापत कोणती करावी याची काळवी त्या मुलीप्रमाणेंच तिच्या आईला व आजीलाहि फार घ्यावी लागते!
आड बाई आडवनी
आडाचं पाणी खारवनी
आडांत होता गणोबा
गणोबा आमचा सत्याचा
पाऊस पडला मोत्यांचा
आडबाई आडवनी
आडाचं पाणी खारवनी
आडांच पडला शिंपला
आमचा भोंडला संपला
भोंडला अगर हातगा घालायचा संपला म्हणजे शेवटीं हें गाणें म्हणण्याचा प्रघात आहे. या गाण्यांत आडाचें पाणीं खारें असलें तरी आंत नुकताच टाकलेला गणपती सत्याचा वाली असल्यानें भरपूर पाऊस होतो व प्यायला गोड पाणी मिळते, ही भावना प्रकट झालेली आहे. ह्या गाण्याच्या उत्तरार्धांत विशेष कांहींच सांगितलेलें नाहीं. फक्त भोंडला आता संपला हें सूचित केले आहे इतकेंच काय तें.
हातग्याची मला सांपडलीं तीं गाणीं मीं इथें दिलीं आहेत. तथापि आणखीहि कितीतरी असण्याची शक्यता आहे, पण तीं मिळवावींत तशीं आपलीं लांबतच जातात. संपत म्हणून नाहींत! सगळ्याच लोकगीतांचें तसें आहे. त्यामुळेंच त्यांचें नाविन्य व गोडवा. आणि दर वर्षाचें न संपणारें माहात्म्यहि!
आपल्याकडे महाराष्ट्रांत ज्याप्रमाणें हातगा घालतात त्याचप्रमाणें पण थोड्या वेगळ्या रीतीनें मध्य प्रदेशामध्यें 'भुलाबाई' ची पूजा होते. पाटावर हत्ती काढून पूजा करावयाची, ती मधें देवी बसवून पूजा करावयाची एवढाच फरक यावेळीं बरीचशीं हातग्याचींच गाणीं या देवीसाठीं म्हटलीं जात असलीं, तरी 'भुलाबाई' ची म्हणून वेगळीं गाणीं आहेतच. त्यांपैकीं वानवळा म्हणून इथें दोन तीन देत आहें:-
पहिली ग मुक्ताबाई देवा देवा साजे
घातीला मंडोबा खेळींखेळीं खंडोबा
खंडोबाच्या नादीं बाई वर्षावर्षा आवपणी
आवपणीचं पाणी तसं गंगेचं पाणी
गंगेच्या पाण्यानं वेळीला भात
जेवीला कंथ हनुमंत बाळा
हनुमंत बाळाचे लांबलांब झोके
शिकारीचे डोळे हातपाय गोरे
भाऊ भाऊ खेळतो माता पुढं झळकती
झळकतीचं एकच पान
दुरून भुलाबाई नमस्कार
ह्या गाण्याचा नेमका आशय काय हें लक्षांत येणें मोठें कठीण आहे! मला हें गाणें मिळालें तसें मी तें इथें दिलें आहे. कदाचित् तें अपुरेंहि असण्याची शक्यता आहे. परंतु जें आहे त्यावरून घरगूती थाटांत देवीला नमस्कार करण्यापलीकडे त्यांत कांहीं विशेष असावें असें दिसत नाही. खंडोबा हा देव, गंगेचें पाणी, त्या पाण्यांत शिजवलेला भात खाणारा पति, हनुमंत बाळ भावाभावांचें खेळणें वगैरे आठवीत ह्या देवीला हा नमस्कार केला असावा!
एवढीसी गंगा झुळुझुळू वाहे
तांब्या पितळी नाय ग
हिरवी टोपी घाल ग
हिरवी टोपी हारपली
सर्पा आड लपली
सरपदादा हेकोडा
जाई आंबा पिकला
जाई नव्हें जुई नव्हें
चिंचेखालची राणूबाई
चिंचा तोडीत जाय ग
पांच पानं खाय ग
खातां खातां रंगली
तळ्यातं घागर बुडाली
गंगेचें पाणी ( नदीचें पाणी ) अगदी झुळझुळतें आहे आणि तें भरून घ्यायला जवळ तांब्या अगर पितळीहि नाही. अशा वेळीं इथें नदीला हिरवें वस्त्र परिधान करण्यास विनंति केली आहे! किंवा जी बाई पाणी भरायला जाईल तिनें आपल्या बाळाला तसें म्हणणें शक्य आहे. असाहि एक पर्याय निघतो ही हिरवी टोपी सरपा आड लपली आहे! ( इथें याचा नेमका अर्थ लागत नाहीं ) आणि तो हेकोडा मानून जाईजुई व आंब्याची शंका निर्माण झाली आहे. परंतु तो सारा भ्रम ठरतो व चिंचेखालची ती राणूबाई निघते! ती चिंचा तोडीत जाते व पान खाते. पान खातां खातां तिचा विडा रंगतो व त्या नादांत तिची घागर तळ्यांत बुडून जाते, अशी ही एक लहानशी कथा आहे. लहान मुलाल घास भरवतांना चिऊकाऊची गोष्ट सांगावी तसा हा प्रकार वाटतो.
एके दिवशीं काऊ आला बाई काऊ आला
एकच कणीस तोडून नेलं बाई तोडून नेलं
सईच्या अंगणांत टाकून दिलं बाई टाकून दिलं
कांडून कुटून राळ केल बाई राळ केल
घागर घेऊन पाण्याला गेली बाई पाण्याला गेली
तिथं निळा विंचू चावला ग बाई चावला ग
आला ग माहेरचा वैद्य
डोक्यांत टोपी ग जरतारी
अंगांत सदरा बुट्टेदारी
नेसाया रेशमी धोतर
हातांत काठी ग चंदनाची
कसा ग दिसतो राजावाणी
या गाण्यांत भोंडल्याच्या गाण्यासारखी सुरवात असून नंतर ती सई पाण्याला जाते व तिथं तिला विंचू चावला कारणानें तिच्या माहेरचा वैद्य येऊन तिला बरें करतो अशी गोष्ट आली आहे. माहेरच्या वैद्याचें हें वर्णन मात्र माहेरचा रुबाब दर्शविणारें आहे, हें चटकन् ध्यानांत आल्याविना रहात नाही.
भोडल्याची व हातग्याचीं गाणीं हीं अशीं आहेत. कांहीं लांब आहेत, कांहीं लहान आहेत. पण सगळीं अगदीं खाजगी अशा घरगुती जीवनाचें चित्रण करणारीं आहेत. हें घरगुती जीवन एवढ्या चटकदार रीतींने इथें आविष्कृत झालें आहे कीं, हीं गाणीं संपूर्णपणें कळोत अगर न कळोत तीं ऐकावीशीं वाटतात. त्यांची चाल सुरेख असून सर्वांच्या परिचयाची आहे. त्यामुळेंहि त्यांचें आकर्षण.
परंतु अलीकडे एके काळीं महाराष्ट्रांतील घराघरांत आढळणारा हा हातगा बराचसा मावळत चालला आहे! कुठें कुठें तुरळकपणेंच त्याचें दर्शन घडतें. शहरांत ही अवस्था असली तरी खेड्यामध्यें मात्र अजूनहि तो तगून आहे. मुलीबाळींचा तो अत्यंत आवडता आहे. भरपूर गावें, मनमुराद खेळावें आणि पोटभर खायला मिळावें असा त्याचा थाट असल्यानें गोडी लावली, तर शहरच्या पोरींनाहि तो खात्रीनें आवडतो. पण मुलींच्या आयांनाच तो वेडगळ वाटूं लागल्यानें व नव्या सुधारणेच्या दडपणाखालीं त्यांच्या मनाची वृत्ति बदलत गेल्यानें, त्याची आवड निर्माण करण्याकडे कमी कल दिसून येतो! एक काळ असा होता कीं, मुलीचा हातगा घालावयाचा म्हणजे आईला भूषणास्पद वाटत असे; आणि आपल्या पोरीचा हा खेळ सर्वांगसुंदर व्हावा म्हणून ती रात्रंदिवस खपून जिवाचा आटापिटाहि करीत असे.

N/A

References : N/A
Last Updated : December 20, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP