स्त्रीधन - गौरी पूजन

लोकगीतातील स्त्रीधन म्हणजे मराठीतील एक अमूल्य ठेवा आहे , तो आपण पुढील पिढीसाठी जतन करून ठेवला पाहिजे .


भाद्रपद महिना म्हणजे सणांची गर्दी . पाऊसकाळामुळें सगळीकडे लोकांना कामधाम कमी . पेरण्या आटोपलेल्या . रानांतील काम आळसावलेलें . सगळीकडे हिरवा समुद्र पसरल्याकारणानें मन प्रसन्न . थोडीफार जिवाला मोकळीक . हौस पुरवायला वेळ रिकामा . त्यामुळें सणासुदीची चैन उपभोगण्यास वाव भरपूर . अशावेळीं गौरी -गणपतीसारखा देवतांची पूजा सामान्य मनाला विशेष प्रिय सगळीकडे आबादीआबाद झाल्याकारणानें चित्तवृत्ति देखील हारखलेल्या . त्यामुळें जवळची सारी कला पणाला लावून देवाची पूजा आणि आरास करण्यांत लोकांना विशेष आनंद वाटतो .

गणपतीची पूजा इतर अनेक कारण्याच्यासाठीं होत असली , तरी ती एक विद्येची देवता आहे . यादृष्टीनें तिच्या पूजेचें महत्व फार . त्यामुळें भाद्रपदाच्या शुक्लपक्षांतील चतुर्थीला येणारा हा गणपति मुलांबाळाचा विशेष आवडता . 'गणपति बाप्पा मोरया ' म्हणतांना मुलें व मोठीं माणसेंहि आनंदानें उड्या मारतात . आणि या गणपतीची पूजा दुर्वा आणि नैवेद्याला मोदक ठेवून केली म्हणजे आरती म्हणतेवेळीं तर सर्वांची धांदल विचारूंच नये ! अगदीं ठेक्यांत आणि तालासुरांत ही आरती म्हणतांना खरोखरच 'सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची ...' या कल्पनेचा आविष्कार डोक्यांत आल्याविना रहात नाहीं !

अशावेळीं या गणपतीची आई जी गौरीमाता , पार्वती , तिची पूजाहि झालीच पाहिजे . म्हणून गणपती आल्यापासून तिसर्‍या दिवशीं गौरीहि येते . शहरामधील बहुजनसमाजामध्यें व खेडोपाडीं सर्रास ही पूजा जरूर केली जाते . गणपति हा शंकर -पार्वतीचा मुलगा . त्यामुळें तो घरीं आल्यानंतर त्याची आई गौरी हे देखील माहेरीं येणें स्वाभाविक आहे . या गौरीमातेच्या पूजेमागचा हेतु ही कीं , भरपूर धनधान्य आणि स्वास्थ याचें वरदान तिच्याकडून मिळावें .

त्याचप्रमाणें भरपूर आयुष्यहि तिच्याजवळ मागावें याहि हेतूनें भाविक मग तिची पुजा करतें .

या गौरीपूजेच्या बाबतींत पुराणामध्यें अशी एक गोष्ट सांपडते कीं , पूर्वींच्या काळीं दैत्यांनीं देवांना अतिशय त्रास दिला . त्यामुळें देवांच्या स्त्रियांना आपलें सौभाग्य कसें सुरक्षित राहील याबद्दल धास्ती वाटली . काळजी वाटली . त्या कारणानें सगळ्याजणींनीं एकत्र जमून या संकटामधून आपली मुक्तता करण्यासाठीं महालक्ष्मीस विनविण्याचें ठरविलें . आणि तसें झाल्यावर व महालक्ष्मीची त्यांनी पूजा बांधल्यावर ती त्यांना प्रसन्न झाली . तिनें हैत्यांचा संहार केला . आपल्या भक्तमंडळींना अडचणींतून मुक्त केलें . सुखाची त्यांच्यावर खैरात केली . त्यामुळें या उपकाराची आठवण म्हणून दरवर्षीं गौरीपूजेचा हा उत्सव बायका साजरा करतात . त्या मागची प्रमुख भावना ही कीं , आपणांस अखंड सौभाग्य लाभावें .

परंतु खेडोपाडींच्या सामान्य बायका या सणामागचें कारण विचारतांना ही गोष्ट न सांगतां एवढेंच म्हणतात कीं , "या कारणानें पार्वतीला माहेरीं यायला मिळतें . पार्वती म्हणजे आपलीच पोर . माहेरवाशीण वर्षांतून एकदां येणारी . तिनें कौतुक करायचें . तिला माहेर करायचें . तिला सुखांत ठेवायची ." आणि त्या दृष्टीनेंच सर्वत्र हा सण पार पडतांना दिसतो .

सूर्या समूक माजं घर ग बाई मी लोटीतें घरदार

पायीं साकळ्या तंगभार ग बोटीं जोडवीं झिनकार

कमरीं दाबाला चारी कुलपं ग गळीं पुतबीळ्याची माळ

वर चिताक नक्षीदार ग डाळीं डोरलं पांच फेर

नथ नाकांत डौलदार ग काप कानांत गजबार

डोकीं केवडा मारी ल्ह्यार ग चोळी अंगांत हिरवीगार

नेशी पिवळा पितांबर ग हातीं सोन्याच बिलवर

मी ग निगालें न्हवयीना ग लेक बाबांची तालीवार

अशा प्रकारचे सगळे दागिने -जुन्या काळचे असे -एकत्र गुंफून तयार झालेलें गीत गात घरोघरींच्या पोरीबाळी न्हवणाला जातात . गौर आणायला म्हणून जातात . हातांत पानाफुलांनी सजवलेला तांब्या घेऊन नदीवर नाहींतर आडावर अगर विहिरीवर जावयाचें . त्यावेळीं जातांना केलेला साजशिणगार असा बोलून दाखवायचा . घोळ्यामेळ्यानें जमून ठेक्यांत पावलें टाकीत जातांना एकमेकींचा दिमाख एकमुखानें असा म्हणावयाचा . मग खरोखर घरांत तसें वैभव नांदत नसलें तरी फिकीर नाहीं . मनाचें ऐश्वर्य कायम . कल्पनेची भरारी दांडगी .

पाणवठ्यावर जाऊन ही गौर आणावयाची म्हणजे तांब्यांतील पाण्यांत पांच खडे घेऊन यावयाचे . बरोबर नेलेलें तेरड्याचें पान व फूल त्यास वहावयाचें कोंकणामध्यें गंगेवर तेरडा नेऊन ठेवतात . त्यावेळीं नारळ व कोरें सूप नेऊन तो तेरडा व सात खडे माघारी आणतात . तेरड्यावर मुखवटा बसवतात . त्यावरच सर्व साजशिणगार चढवतात . देशावर फक्त पांच खडे आणतात . ते घेऊन घरी आलेल्या मुलीच्या पायावर गरम पाणी ओतून , तिला हळदकुंकू लावून आणि ओवाळून घरांत घेतात . आणि मग ते पांच खडे एकाद्या गाडग्यांत नाहींतर पितळेच्या भांड्यांत ठेवून गौरी बसवतात . त्या संख्येनें दोन असतात . आणि त्यांची मांडणीहि मोठी अभिनव असते . म्हणजे गाडग्यावर गाडगें उतरंडीसारखें रचावयाचें आणि वरच्या तोंडाला हळदीकुंकवानें माणसाचा चेहरा काढलेल्या लहान टिंगणीचा *मुखवटा ठेवायचा . त्यावर खण घालावयाचा . कुणीं कुणीं भांड्यावर भांडें अगर डब्यावर डबे ठेवून त्यावर मातीचा अगर वाटीवर काजळीनें काढलेला मुखवटा ठेवून उंची लुगडीं नेसवतात . क्वचित् प्रसंगीं पितळेचे मुखवटेहि दिसून येतात . मात्र या सगळ्या गोष्टींसाठीं वापरण्यांत येणार्‍या गाडग्यांत अगर भांड्यांत सवाष्णीची ओटी असते . तांदूळ अगर गहूं , पानसुपारी , लेकुरवाळें हळकुंड , खोबर्‍याची वाटी वगैरे वगैरे सर्व या गौरीला लागते . त्याचप्रमाणे मुखवटा असेल त्या बेतानें नाकांत व कानांत डाग घालतात . आणि एरव्हीं सर्रास सर्व गौरींना गळ्यांतील ठळक दागिने घालण्याची प्रथा आहे . उंची लुगडें आणि दागदागिने यामुळें ही गौर नक्षत्रासरखी दिसते . तिच्या पुढें घरांतील सुंदर वस्तूंची मांडणी करून दोन्ही बांजूना दोन समया तेवत ठेवायच्या . आणि खणनारळ समोर मांडले म्हणून त्यांना हळदकुंकूं वहायचें . या वेळीं ही सगळी शोभा बघून डोळ्याचें पारणें फिटल्यासारखें वाटतें .

हा गौरीचा सण तीन दिवसांचा असतो . पहिल्या दिवशीं गौर येते . तिची मांडामांड झाली कीं , तिला शेपूच्या भाजीचा आणि भाकरीचा नैवेद्य . दुसर्‍या दिवशीं पुरणपोळीचें जेवण . रात्रीं जागरण . लहान मोठ्या सगळ्या बायका आणि मुलीबाळी रात्रभर भरपूर गात आणि नाचत गौर जागवतात .

* टिंगाणी =वाटीसारखें मातीचें लहान भांडे .

गौरीचें जागरण म्हणजे भारी आनंद त्यामुळेंच सुरवातीला एखादी मोठी बाई लहान मुलीला सांगते कीं -

बाळे मी जातें बाजारीं ऐक ग माजी गोष्ट

नेसलें काळीं चंद्रकळा तिला ग रेशमी कांठ

अंगा त चोळी भिंगाची बसली ग तटतट

दंडांत बाजूबंदाची गोड ग लटपट

गळ्यांत मणी डोरलं आणीक काळी पोत

कानांत बाळ्या बुगड्या नाजुक मोत्याचे काप

हातांत गोट पाटल्या कंगण्या भरल्या दाट

कमरचा मासपट्टा करतूया मनाचा बेत

पायांत पैंजण घुंगूराच दाट हाईती घस

बोटांत जोडवीं मासूळ्या बिरुद्याच ठस

भांग भरला मोतीयानं कपाळ भरलं कुंकवानं

नेत्र भरलं काजळानं नाक ग नथीनं

मुख भरलं तांबूळानं भरला ग कान फुलानं

गळा भरला गळसुरीनं दंड भरल बाजुबंदानं

हात भरलं बांगड्यानं कंबर भरली दाबानं

पाय भरलं पैजणानं बोटं भरली जोडव्यानं

वटी भरली तांदळानं केलं ग म्हायार मावळ्यानं

तेव्हां माझी गोष्ट अशानं अशी आहे . कपडेलत्ते आणि दागदागिने यांची जणुं ददात नाहीं . सगळं कांहीं आहे .

आणि हें ऐकलें म्हणजे मग मुलीबाळी यांपैकीं एखादा दागिना आपल्यासाठीं कर म्हणून तिच्या पाठीमागें लागतात . मग तीहि खुशीनें सावधगिरी बाळगून आधींच तयार केलेला दागिना तिला देऊं करते .

गौर यायची म्हणजे असा थाट असला पाहिजे . एवढी मोठी पाहुणी यायची , तेव्हा आपलाहि दिमाख तेवढ्याच हवा , ही त्या मागची भावना . जुन्या काळच्या सर्व दागिन्यांची माहिती इथें आली आहे . त्यावेळच्या बाईला नटायची किती हौस होती हें यावरून दिसते ! आज काळ फार बदलला आहे . सगळेंच निराळें झालें आहे . परंतु शहरें सोडली तर खेडीं अजून या सुखाला पारखीं झालेलीं नाहींत असें दिसून येतें . निदान एवढ्या सगळ्या दागिन्यांच्या वडीलधार्‍या माणसांजवळचा पुरावा गोळा करून ते घडवायची हिंमत दाखवायला तरी कुणीं भीत नाहीं ! हौसेला मोल नाहीं असाच त्यांचा समज आहे . अगदींच गरिबी असेल तर घरांतील किडुकमिडूक विकून एखादा दागिना घडविला जातो . आणि बाकीचा सारा भाग फळाफुलांनीं सजतो ! बाभळीच्या शेंगाच्या मासोळ्या आणि जोडवीं , बाभळीच्या फुलाचा नाकांत मोगरा , भुइमुगाच्या शेंगाची नथ आणि डूल , मण्यांचा साधा लफ्फा , भिंगाचीं कांकणें इ . गोळा करून मुली दागिन्यांची हौस भागवतांना खेड्यामध्यें अद्यापहि दिसतात . गौरीसारख्या पाव्हणीपुढें दारिद्र नको हाच त्या सगळ्या पाठीमागचा भाग .

रात्रींच्यावेळीं गौर जागवतांना जसा गाण्यांना बहर येतो तसाच तो तिला आणतेवेळी देखील येतो -

अंगणीं तापतं दूध दुधा पिवळी शाई

ये ग गवरी बाई एवढं जिवूनि जाई

आतां काय करूं बाई माता ग ऽऽ दारीं शंकर उभा ग ऽऽ

शंकर साळा राजा भोळा नगरीं मोडून जाय ग

नगराला लागलं निशाण ग ऽऽ कापूराची वात ग ऽऽ

दिवा जळी दिवाटीं कापूर जळीं आरतीं

गवराय सारकी पावणी खेळूं सार्‍या रातीं

अंगणांत दूध तापतें आहे , त्यावर पिवळी साय आली आहे आणि अशा वेळीं 'हे गौरी , तूं जेवायला येऊन जा ' असा पुकार बायका करीत आहेत . गौर यायची म्हणजे जणुं थोरामोठ्या घरीं दिलेली मुलगीच यायची . खमंग दुधाचें जेवण म्हणूनच तिला रांधायचें . पण ती बिचारी पडली सासुरवाशीण . आईनें हांक दिली तरी शंकराची भीति आहेच कीं ! दारांत तो उभा असतांना यायचें कसें ? परंतु आईला दम निघत नाहीं . ती उलट जबाब देते कीं , 'तो साधा भोळा शंकर आहे . भ्यायचें कारण नाहीं .' तरी पण ती सांगतेंच कीं , त्यानें गांव सोडून दिलें आहे . पण छे . आईला तें पटत नाहीं . नगराला निशाण लागलें असून शांतता दर्शविणारी कापूराची वात आरतींत आली आहे . असें ती सुचविते . अखेरीस पणतींत जळणार्‍या दिव्याच्या उजेडांत गौरीला माहेरीं येणें भाग पडते . असा ह्या गाण्यांतील आशय मोठा सुरेख आहे . मनाला गुदगुल्या करणारा आहे .

ताड गौरी ताडाला लागली

शंकूरबाची वाट गिरजा पाहूं बा लागली

सोड सोड शंकर आमुचा पालव

आमाला जाऊं दे म्हायारीं

काय काय लेनं लेवूनी येतील्या

येतील तशा बा येऊं द्या

आनीन साकळ्याच जोड

माजं म्हायार दुबळं

आनीन पुतळ्याची माळ

माजं म्हायार दुबळं .....

माहेराला जावें म्हणून गौरी शंकराला विचारण्यासाठीं थांबली आहे . झाडावर ऊंच चढली आहे . पण शंकर तिचा पदर सोडीत नाहीं . हिला तर माहेरीं जायची घाई झाली आहे . म्हणून माहेराहून काय आणशील असें विचारलें असतां ती सगळे दागिने आठवेपर्यंत तो तो दागिना आणीन असें सागते आहे ! हेंच गाणें कुणी कुणी असेंहि म्हणतातः -

ताडावरची माड गवराय येंगूं जी लागली

म्हायाराची वाट गवराय पाहूं जी लागली

तिकून आला शंकर त्येनं पदर जी धरीला

सोडा सोडा पदर मला जाऊं द्या म्हायारीं

म्हायारीं जाऊन काय ग खाशील

तूप शेवाया , दूध शेवाया खाईन

दीड दिवस राहीन आणिक मग येईन

सोडा सोडा पदर मला जाऊं द्या म्हायारीं

न्हाई सोडित पदर काय ग म्हनशील

वैताग घेऊन जाई जी होईन

जाई होऊन मी मळ्याला जाईन

मी मग माळी होऊनी येईन

पाणी घालून मग तुजला भेटीन

झाड होऊन कळ्या जी आनीन

फुलं मी तोडून हार गुंफीन

देवाला घालून मी मग तुला ग भेटीन

मागच्या गाण्यापेक्षां ह्या गाण्यांतील भावनाविष्कार अधिक स्पष्ट झाला आहे . थोडा निराळाहि झाला आहे . माहेरच्या माणसांना कमी लेखून प्रश्न करणार्‍या नवर्‍याला खाण्यापिण्याची गोष्ट सांगून गौरीनें जाई व्हायची इच्छा इथें प्रकट झाली आहे ! परंतु तरीहि शंकर तिची सोबत सोडीत नाहीं . ती जें रूप घेईल तिथें त्यानें आपलेंहि नातें जोडलें आहे . याचा अर्थच असा कीं तो तिला खुशीनें परवानगी देत नाहीं ! मानवाच्या संसारांतील हें कटुसत्य इथें या रीतीनें व्यक्त झालेलें आहे .

गौर एकवेळ याहि परिस्थितींत माहेरीं आली म्हणजे मग तिची मांडणी करतांना बायका गुणगुणतात -

राना मागली तुळस पाना फुलांनीं सजली

पैंजणाच्या भारूभार गवर कशी ग लवली

तुळशीची मंजिरी पवित्र भावनेनें न्हवणामध्यें खोविली असतां पानाफुलांनीं सजलेला तेरडा आणि आंतील पांच खडे घेण्याला व पैंजणाच्या भारानें भारावलेले पाय हलके करायला बाई वाकते , तसें झालें असल्याची गोष्ट इथें व्यक्त केली आहे . आणि -

गवर आली गजबारानं पाय भरलं पैंजनानं

तुज्या गुलालाच भार माजं पैंजन झालं लाल

गवर आली गजबारानं पाय भरलं जोडव्यानं

तुज्या गुलालाचा भार माजं पैंजन जोडवं लाल ...

मग अशा रीतीनें गौर मोठ्या थाटामाटानें आली असून तिच्या स्वागतासाठीं गुलालाचा अभिषेक करतांना सगळे दागिने माखले गेले , असेंहि या रीतीनें इथें सांगितलें आहे . हेतु एवढाच कीं , गौरीच्या निमित्तानें पुन्हां एकवार आपल्या दागिन्यांचें वैभव सर्वांच्या कानावर गाणें गात गात घालावें .

अपाळ्या वड बाई जपाळ्या वड जपाळ्या वडाला कोतमिरी पानं

दुरून दिसतीं हिरवीं रानं हिरव्या रानाला पिवळ ठस

गौराय म्हनी म्हायार दिसं म्हायार न्हवं बाई सोनार वाडा

गौराय म्हनती नथ माजी घडा नथ जोगा सोनार बाई कोनचा

गौराय म्हनी माज्या म्हायारीचा वाक्या घडविल गुजरिच्या

गौरीचा सगळा साज शिणगार झाला म्हणजे मग तिला आणखी खूप दागिने हवेत असें वाटून हें गाणें गुणगुणलें जातें . इथें वडाच्या झाडाबरोबरच माहेरच्या वाटेवरील हिरव्या गार रानांतून उठून दिसणारीं सोनाराचीं पिवळीं घरं मोठ्या खुबीनें वर्णिलेलीं आहेत . साध्याभोळ्या स्त्रीच्या मनांतील कल्पनाचातुर्याचा हा एक उत्कृष्ट नमुना ठरेल . निसर्गाशीं तादात्म्य पावून तिनें व्यक्त केलेला हा भाव हृदयंगम तसाच स्त्रीसुलभ भावनेला असाच आहे .

रात्रींच्या वेळीं गौर जागवायची म्हणजे भरपूर गावयाचें आणि खेळावयाचें , म्हणून आळींतील सगळ्या मुलीबाळी व लहानथोर बायका एके ठिकाणीं जमतात . अशा वेळीं एखादी बाई परात पालथी घालून तिच्यावर राख पसरते . दोन्ही हातांत लाटणें व डाव घेऊन त्या राखेवर आळीपाळीनें फिरविते . त्यावेळीं खर्रर्रर्र ...खर्रर्रर्र ... असा मोठा देखणा आवाज घुमायला लागतो ; आणि मग त्या पार्श्वभूमीवर गौरीचे कान उघडतांना बायका गायला लागतात -

आली आली गवराय येतच हुती

आंब्याच्या बनीं गुंतली हुती

आंब्याचं आंब तोडीत हुती

सईच्या वट्या भरीत हुती

सईला वाटला लावीत हुती

आंब्याच्या बनीं वरुटा पाटा

आली आली गवराय हळदकुंकुं वांटा

गौर माहेरीं येतांना वाटेंत काय काय घडलें तें इथें सांगितलें आहे . वरवंटा व पाटा असलेल्या विहिरीवर आंब्याचें झाड होतें आणि तिथें ती तोडलेले आंबे बायकांना वांटण्यांत गुंतली होती म्हणुन उशीर झाला . परंतु आतां ती आली आहे तेव्हां हळदकुंकूं वांटून स्वागत करावें , असें या गाण्यांत सूचित केलेलें आहे .

साती शंकर बनामंदीं

एकला गनव्या वनामंदी

गणूच्या आईला सांगून धाडा

गणूनं तोड गमीवल

गमीवल तर गमवूं द्या

गनला घराला घेऊन या

म्हणजे सात वनांनीं दाटलेल्या जंगलांत शंकर गुंतले असतां एकटा गणपति एके ठिकाणीं वनांत सांपडला आहे ! अशावेळीं पायांतील अगर हातांतील तोडे हरवल्यानें तो रडतो आहे , अशी तक्रार गौरीच्या कानावर आली , म्हणून तिला यायला वेळ झाला . मनाची रुखरुख कमी करावी म्हणून तिनें तोडे गेले तर जाऊं देत पण पोर हाताशी लागूं दे , अशी प्रकट केलेली ही भावना स्त्रीच्या मनाचा वात्सल्यपूर्ण आविष्कार आहे . आईच्या अंतःकरणाची ही अवस्था इथें इतक्या सहजतेनें आली कीं , तिला आणखी सजविण्याची आवश्यकता भासूं नये .

गवरी ग बाई जागरान तुजं

जागतां जागतां पडल्या झापडी

एवड्या निजची पिरत केवडी

सोन्याच्या चौकटी गौरी बाळातनी

नारळीच्या गोन्या लोटील्या अंगनीं

सुपारीच्या गोन्या लोटील्या अंगनीं ...

गौरीचें जागरण चालू असतांना देखील फार उशीर झाल्यानें झोप येते आहे . त्यामुळें झोपेची आवड माणसाला किती आहे तें दिसतें . तरी गौरीबाई बाळंतीण असल्यानें , अंगणांत गोण्या भरून आलेल्या सगळ्या फळांच्या याद्या संपेपर्यंत चालणार्‍या या गाण्यानें जागायची आवश्यकता पटविली आहे . सामान्य जीवनांतील प्रसंग देवादिकांनाहि जोडून मनाचें समाधान करण्याची मानवी प्रवृत्ति इथें अशी सूचित झालेली आहे !

बैठकींतील अशीं गाणीं रेंगाळलीं म्हणजे मग बायका खूप खेळ खेळतात . परंतु खेळांचीं गाणीं एका स्वतंत्र विभागांत विचारांत घेतल्यानें प्रस्तुत ठिकाणीं त्यांची पुनरावृत्ति मुद्दामच केलेली नाहीं .

इतर खेळांच्या जोडीलाच नागपंचमीप्रमाणें यावेळींहि बायका फेर धरून खास गौरीचीं अशीं निरनिराळीं गाणीं म्हणतात . एकदोघींनी एकेक ओळ सांगायची आणि मग हाताला हात धरून खाली वांकून , वर उभें रहात इतरांनीं ती म्हणायची असें चालतें

गवर पुशी शंकराशीं स्वामी विनंति तुमापाशीं

मला पाठवा माहेराशीं भेटुन येईन आंईबापाशीं

माय बाप भेटवावे आमी तर अस्तुरीची जात

सासर्‍याची धनसंपदा तरी त्या माहेराची प्रीत

शंकर म्हणे प्राणवल्लभे तुजविण आम्हा नाहीं गमे

तूं अस्तूरी रंभा शोभे तुजविण आम्हा नच गमे

काय शोभे मजला हो मज तरी आहे तुमचें ध्यान

त्यांनीं तारीलें जीवन मग मी भेटून येईन

साजूक तांदळाचा भात वरण मुगाचं पवित्र

तुपांत तळल्या खिरी घार्‍या खिरी बोटव्या गव्हल्याच्या

साजुक शेवाया वेळीती लोणचें लिबाचें आणीती

भोजन सावकाश झालें उष्ण उदक आंचविलें

कापरासहित विडे दिले डोल्लार्‍यावर आसन केलें

आणा पैठणी ही साडी आणला कळस नाकी शेला

गणेश गौरीला मूळ आलें सुखी जा ग गौरीबाई

आंबा सुखी जा ग माय आंबा परतुनी पाहे

शंकर पार्वतीची एकमेकांमधील भाषा आणि माहेरच्या प्रीतीनें माखलेल्या पार्वतीचें माहेरीं झालेलें स्वागत यांनीं नटलेलें हें गाणें आहे . या गाण्याची भाषा बरीचशी शहरीं वळणारी आहे . सुशिक्षित मनांतून आलेली आहे . त्यामुळें इतर गाण्यांच्यापेक्षां हें गाणें एकदम वेगळें वाटलें तरीं त्याचें अंतरंग निराळें नाहीं . तीच भावना . पण सांगण्यासाठीं निवडलेले शब्द वेगळे एवढेंच काय तें . गौराईला सुग्रास भोजन देऊन , ऊन पाण्यानें तिचे हात धूऊन , तिला चौरंगावर बसवून स्वादिष्ट विडे देऊन , पैठणी नेसवून आणि झालरीचा शेला आणून तिची पाठवणी केली , ही या गीताच्या उत्तरार्धांतील कल्पना माहेरवाशिणीच्या मनाला भुरळ पाडणारी तशीच घरगुती चालरीत दर्शविणारीहि आहे .

भली भली ग पारबती

शब्दाला उतार ( उत्तर ) देती

ऐकावं महादेव समद्याचा उतार घ्यावा

कुनाला ग सोडीत हुती

कुनाला ग बांधित हुती

कुनाला हातीं धरून रंगम्हालीं जात हूती

गाईला मी बांदित हुतें

वासराला मी सोडित हुतें

दुधाची चरवी घेऊनी रंगम्हालीं जात हूतें

भली भली ग पारबती

शब्दाला उतार देती ...

कुनाला ग हाडपित हुती

कुनाला ग दडपीत हुती

कुनाच्या मुखाकडं बघून वारा घालीत हूती

दाराला मीं हाडपित हुतें

इस्त्याला मीं दडपीत हुतें

दिव्याच्या मुखाकडं बघून वारा घालित हुतें

भली मली ग पारबती

शब्दाला उतार देती ...

कुनाला ग वारीत हुती

कुनाला ग बुडवीत हुती

कुनाच्या गळ्यावरी हात ठेवून चालत हुती

पान्याला मी वारीत हुतें

घागरीला मी बुडवीत हुतें

घागरीच्या गळ्यावरी हात ठेवून चालत हुतें

भली भली ग पारबती

शब्दाला उतार देती ...

कुनाला ग दीला हात

कुनाला ग दिला पाय

कुनाच्या गादीवरी राज्य तूं करीत हूती

कासाराला दिलावता हात

सोनाराला दिलावता पाय

देवाच्या गादीवरी राज्य मी करीत हुतें

सासुरवाशिणीच्या प्रत्येक कृतीकडे आणि कामाकडे साशंकतेनेंच उठतां बसतां बघून तिला प्रश्न करणार्‍याला तिनें ठसक्यांत उत्तर देऊन आपला आव कसा राखला , याचा हा एक उत्तम नमुना आहे . सासूसुनांच्या वादाला इथें मोठा सुंदर रंग भरलेला आहे . एकीपेक्षां एक सवाई होऊन उत्तर देते आहे . कुणीहि हार जात नाहीं . पार्वती नांवाची एक सासुरवाशिणींची प्रातिनिधिक स्त्री प्रत्येक शब्दाला कसें मोजकें आणि गप्प बसविणारें पण माघार घेणें भाग पाडणारें उत्तर या गाण्यामध्यें देत असून , सुनेच्या चोखपणाची बाजू राखतांना दिसते आहे . सुनेची खंबीर बाजू मांडणारें हें गाणें त्यामुळेंच बायकांच्या विशेष मर्जीतलें आहे .

आज मथुरेचा बाजार झाला उशीर

गौळणीचं न्हाणंवुणं उद्यां बाजाराला जाणं

अडविलं त्या गोविंदानं सोडा हरी पदर ॥

कां बा धरलिस माझी वेणी

घरीं आहे घरचा धनी

करील माझी धूळदाणी सोडा हरी पदर ॥

कां बा धरलिस माझी वेळ

घरीं आहे तान्हं बाळ

रडुन रडुन करील गोंधळ सोडा हरी पदर ॥

कां बा धरलिस माझी वाट

घरीं आहे सासू खाष्ट

करील कामाचा बोभाट सोडा हरी पदर ॥

राधा कृष्णाच्या प्रेमळ बोलाचालीमधून निर्माण झालेंलें हें गाणें आहे . राधेंच्या निमित्तानें सासुरवाशीण आपल्या मोजक्या जीवनमर्यादेची कहाणी इथें सांगते आहे . बाजारला जायला अगोदरच उशीर झाला असतांना कृष्णानें अडवणूक करून अडचणींच आणून मनाची बेचैनता वाढवूं नये , म्हणून वरील धन्याचीं , मुलाचीं व सासूचीं कारणें पुढें करीत आहे . स्वतःपेक्षां इतरांच्या हातांत आपलें आयुष्य अधिक आहे तेव्हां हें सगळें ध्यानांत घे आणि आपला खोळंबा करूं नको असें राधा विनवीत आहे . स्त्री जीवनांतील या ना त्या रूपानें येणारा वारंवारचा हा एक प्रसंग असल्यानें त्याची गोडी विशेष .

मुक्ताचं चांगुलपन जसं केवड्याचं पान

बाळ्या बुगड्यांनीं भरलं कान कापाला सोडवान

काप घेतील विकयीत नाकीं सुरव्याची नथ

नथीबाईला आरली ग काळ्या पोतीला डोरली

डोरल्याखालीं सरी लोळं पडला सरीला ग पीळ

बाजूबंद लेली येळां ( वाक्या ) बाजूबंदाचं आऊयीट

सई लेती चारी गोट अंगठयांनीं भरलीं बोटं

पायी पैंजण वाजयीतीं बोटीं जोडवीं झिनकारीतीं

मुक्ता नांवाच्या चांगुलपणा मिळवून वागणार्‍या बाईच्या अंगावरील दागिन्यांची नोंद या गाण्याच्या झाली आहे . बायकांना अगोदरच दागिन्यांची विशेष आवड तशांच डाग घालून सजलेल्या गौराईपुढें त्यांचे गाणें , तेव्हा स्वाभाविकच वारंवार दागिने गोवलेलें असलें गाणें त्या आवडीनें म्हणत असतात . जुन्या काळचे दागिने कसे असत हें या गाण्यावरून दिसून येतें .

माजी गवर आली ग भांग भरून गेली ग

भांग न्हवं भंडारा खिडकींत पडला अंगारा

खिडकीच्या बा कपाटा न्हवं बाई माजा परवंटा

परवंटा माजा हाटावू शेला माजा पाटावू

बाई ग माजी हंसरी तिचीं शेतं डोंगरीं

डोंगर जळ धडाधडां हरीण रडतंय खळखळां

हरणीबाई दूध ग बालपणीचीं बूध ग

बाळपणाचं नक्षत्र नशीब घडवी पवित्र

चांदा तुज्या टिपुर्‍या चांदणीं उभ्या राहूं

शिंपीदादा शिवी चोळी अंबर नाडा मी गुंफीन

अंबरनाडा पड सांदडीं रथाच्या दांडीव घोड्याची मांडी

घोड्याच्या मांडीव फिर मोगरा एक कळी तोडतां वास गेला नगरां

नगराच्या राजानं नगराई केली आमच्या महादेवाला पारूबाई दिली

पारूबाई देऊनी यशवंत झाला दिवट्या लावूनी घरासि आला

या गाण्यामध्यें शंकर पार्वतीच्या जीवनांतील अनेक प्रसंग एकत्र आले आहेत . वास्तविक त्या सर्वांचा सलग असा संबध या एकत्रीकरणांत लागत नाही . तरीपण काय काय घडत गेलें याची कल्पना मात्र येते . जुन्या काळीं बायका भांगांत गुलाल किंवा कुंकूं भरीत आणि नऊवारी लुगडें चापून चोपून नीट बसावें म्हणून कमरेंभोवतीं कमरपट्ट्यासारखी गांठ घालून पदर आवळून वर घेत त्याला 'परवंटाने ' नेसणें म्हणत . त्या चालीचा इथें उल्लेख आला आहे . हें परवंटी लुगडें हातमागावर विणलेलें व रेशमी असे , हें 'हाटावु ' व 'पाटवु ' या शब्दांनीं सांगितलें आहे . ही गौरी हसंतमुखी आहे . व तिची शेतें डोंगरावर आहेत . पण डोंगराला वणव्यानें घेरल्यानें आग लागली आहे . त्यामुळें हरीण रडतें आहे . कोवळ्या मनाला दुःख झालें आहे . कदाचित् त्या डोंगरावरील या हरीणीचीं पिलें मरतील या भीतीनें तिला घेरलें असावें . हरिणीचें दूध म्हणजे बाळपणीं मिळालेलें वळण . त्यावेळीं जें नक्षत्र असेल तें भवितव्याची रेघ ओढून पवित्र झालें ! टिपुर्‍या चांदण्यांत उभें राहून मौज पहावयाची . शिंपी चोळी शिवतो आणि लुगड्यावर बांधायचा नाडा आपण गुंफीत आहोंत तो आतां सांदीला (अडगळींत ) पडला आहे . परगांवीं जायला रथ आला आहे . त्याच्या दांडीला घोड्याची मांडी घासते आहे . त्या मांडीवर मोगरा फिरवला म्हणजे त्याच्या वासानें उभें गांव प्रसन्न होतें . त्या गांवच्या राजानें युक्ति करून महादेवाला पार्वती दिली . ती मिळाल्यानें तो भाग्यवान् ठरला आणि दिवटीच्या प्रकाशांत तिला घरीं घेऊन गेला . अशा अनेक गोष्टींचा , प्रसंगाचा , उल्लेख या गाण्यांत आल्यानें बायकांना तें आपल्याच जीवनाची गोष्ट सांगणारें आहे असें वाटतें . आणि त्याच कारणानें त्याचा मोहहि होतो .

सोन्याची ग किरीमिरी शंभुदेवाच्या शिकरावरी

चौरंगी ग शालजोडी शंभुदेवानं पांघरिली

हातीं घेऊनी ग काठी डोंई घालूनी ग टोपी

काखीं लावून झोळी गेला गिरजेच्या ग माडीखालीं

'अल्लक ' ग बोलयीला गिरजा दान ग करूं आली

शंभू वचन बोलयीला गिरजा मागं परतली

गेली शेकाजी रायापाशीं त्यानं धाडील्या नऊ दासी

त्येचा विचार कर बिगी तूं कुनाचा बा कोन

मी बा शिखरीचा शंभू मला न्हाई नात्याचं कोन

मला न्हाई भैन भाऊ तुमची कन्या मला द्यावी

शेकाजी ग राजा बोले तुला न्हाई नातंगोतं

तुला न्हाई भैन भाऊ तुला गिरजा कशी देऊं

गिरजा बोले बापायाशीं कपाळींची वो माजी रेग

गिरजाबाईला देऊं केली शंभुबाई ग देवायाला

चंदनाचे ग खाब सई घातीले ग भूमीवरी

माणिकांच्या वेली सई छपरीं ग सोडीयील्या

गिरजाबाईच्या लगनाचा आला गगनी मंडप

गिरजा नारीच्या ग हातीं माळ पवळ्यांची आली

सई लाजत मुरकत शंभुदेवाच्या गळ्यां घाली

रखमाई ग करवली चंद्रभागच्या झरीवरी आली

तांब्या पाण्याचा विसरली पाणी दिसतं दुधावाणी

चंद्रभागचं पाणी प्याली गिरजा घराशीं ग आली

गिरजेच्या लग्नाची सगळी हकीकत या गाण्यामध्यें दिलेला आहे . शिखरावरचा शंभुदेव सूर्य उगवतांच शाल पांघरून बैराग्याचें रूप घेऊन निघाला . तो आला गिरजेच्या घरीं . तिनें त्याला दान दिलें . दोघांचें एकमेकांवर मन बसलें . वचन मिळालें . गिरजेनें शेकाजी राजाला , आपल्या बापाला , झाली गोष्ट सांगितली . त्यानें नऊ दासी पाठवून नीट विचार कर म्हणून तिला सांगितलें आणि शंभू देवाची चौकशी केली . त्याला कोणींच नात्याचें नाहीं म्हणून तो विचारांत पडला . पण गिरजेनें होकार दिला . लग्नाची तयारी झाली . चंदनाच्या खांबाला माणकांची वेल लावून मंडप उभारला . गिरजेनें शंभूच्या गळ्यांत पोवळ्यांची माळ घातली . लग्न लागलें . आणि मग रखमाई करवली झाल्यानें पंढरपूरच्या चंद्रभागेचें ती विसरून आलेलें पाणी तिथं जाऊन गिरजा प्याली व आपल्या घरीं आली , अशी माहिती इथें आली आहे . म्हणजे सामान्य लोकांच्या लग्नाच्या रीतीप्रमाणें देवादिकांचींहि लग्नें लागत , ही कल्पना गिरजेच्या निमित्तानें या ठिकाणीं मांडलेली आहे . आपलीं सुखदुःखें देवादिकांनाहि चुकूं नयेत ही मानवी मनांत डोकवणारी भावना या निमित्तानें व या प्रकारें प्रकट झालेली आहे . त्यामुळें आपलेंच आयुष्य जणुं आपण अनुभवीत आहोंत , या विश्वासानें बायका हें गाणें आवडीनें म्हणतात .

तात्या कुनब्याचं शात शात पिकलं अमरवती

महादेव गेल बाई चोरी पांच कनसं मोडीयिलीं

कुनब्या दादानं देखीयिलं कुनबी धांवत पळयीत

गोसावी जटशीं धरीयीला आसडून धरनीं पाडीयिला

धरून माळ्याला बांदिला ग तात्या कुनब्याची आली रानी

भरली पाटी शेतां आली भरताराला शिव्या दीती

गोसाव्या कां चोरी केली गोसावी माळ्याचा सोडीयिली

गोसावी धावंत पळयीत आला अपुल्या मठायाशीं

पारबतींशीं बोलता झाला तात्या कुनब्याचं ग शात

पिकलं हुतं ग अमरावता मी गेलोंवतों ग चोरी

पांच भेंडांनीं मारीयिला धरून माळ्याला बांधीयिला

पारबती ग ऐकती झाली पारबती ग बोलती झाली

भोळ्या माज्या महादेवा कुनब्याचा कां मार खावा

महादेव आणि पार्वती यांच्या जीवनांत घडलेल्या मोठ्या मजेदार प्रसंगाचें हें वर्णन आहे . एखाद्याचें शेत उत्तम पिकलें म्हणून त्याची चोरी केली आहे . काय काय घडतें आणि तें ऐकून पार्वती त्याला 'अशाचा आपण मार खावा का ?' म्हणून प्रश्न विचारीत टोमणा मारते , ही या गाण्यांतील हकीकत गमतीची आहे . त्याप्रमाणें कुणब्याच्या बायकोनें माळ्याला टांगलेल्या महादेवाची सुटका करून 'हा कसा चोरी करील ' असें विचारलें , ही कल्पनाहि मनोवेधक आहे . स्त्रीच्या दयाळू स्वभावाचा तो एक दाखला म्हणून दाखवितां येईल .

गौरीच्या जागरणाचें वेळीं अशीं कितीक गाणीं फेर धरून बायका म्हणत असतात . त्या सगळ्यांना मला इथें नोंदतां आलें नाहीं . त्यांना ना आदि ना अंत . मिळालीं तेवढीं मीं इथें दिलीं आहेत . आणखी पुष्कळ असतील . कुणीं सांगावें ? पण एवढ्यावरून त्यांची कल्पना येईन . रात्र केव्हां मागें सरली याचें भान न रहणार्‍या बायका अशा वेळीं मनमुराद गातात आणि खेळतातहि . कितीकदां नागपंचमीच्या वेळच्या फेराच्या गाण्यांचाहि इथें समावेश होतो !

खेडेगांवांतील मायबहिणींच्या एकमेकींच्या सहवासांत हें गौरीचें जागरण बरेंच सुखावतें . त्यांची भावगंगा अशावेळीं अगदीं ईर्षेनें दुथडी तुडुंब भरून वहाते ! त्यांच्या भावनेचा पसारा मोठा . त्यांचें खेळायचें अंगणहि भव्य ! आनंदातिरेकानें त्या गात राहिल्या म्हणजे त्यांच्या 'फेरा ' ला दृष्ट लागेल कीं काय असें पहाणाराला वाटतें . केवढें सौंदर्य त्यांत सांठलें आहे हें पारखतांना दृष्टि मंदावत तर नाहीं ना असा भास होतो ! शरीराचा प्रत्येक भाग अशा वेळीं आवाहन स्वीकारतो आणि आपली तालबद्धता मनाच्या लईबरोबर आणि स्वरविलासाच्या संगतींत विलीन करून गाणार्‍यांना हुषारी आणतो . आणि मग त्यामुळेंच शेवटीं घरोघरीं परततांना खेडुत बायका एकमेंकीत कुजबुजतात , "सोन्यासारकी सोबत ही आपली . सार्‍या दुनियेची माया तिच्या पोटांत ! दुजाभाव म्हणून कसला त्यो न्हाईच !" आणि जातां जातं एकमेकींना हंसत खेळत बजावतातहि -

हमरस्ता पायपुस्ता

देवाला निगालेंय मीं आतां पांच वाजतां

N/A

References : N/A
Last Updated : December 20, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP