स्त्रीधन - बेरका प्रधान

लोकगीतातील स्त्रीधन म्हणजे मराठीतील एक अमूल्य ठेवा आहे, तो आपण पुढील पिढीसाठी जतन करून ठेवला पाहिजे.

असंच आपलं एक गांव होतं. तिथं एक राजा रहात होता. त्याचा एक प्रधान होता. मोठा हुषार. फार बेरका. खरा युक्तिबाज. तर अशा प्रधानासमोर राजानं एक पैज मांडली. गांवांत दवंडी पिटून सांग म्हणाला, 'गांवाबाहेरील तळ्यांतल्या पाण्यांत रात्रभर जो गळ्याइतका भिजेल असा उभा राहील, त्यास एक हजार  मोहरा इनाम मिळतील.'
झालं. गांवांत दवंडी पिटली. जो तो विचार करूं लागला. पण थंडी फार होती. गळ्याएवढ्या पाण्यांत उभे रहायचें म्हणजे दांतखिळी बसेल अशी प्रत्येकाला भीति पडली. त्यामुळें पैजेचा विडा कुणीच उचलेना. शेवटीं एक गरीब माणूस तयार झाला. 'मी रात्रभर तळ्यांत उभा रहातों' म्हणाला. पैजेचा विडा उचलून गांवाबाहेर गेला. लोकांना आश्चर्य वाटलं.
कडाक्याची थंडी पडलेली खरी पण तो तळ्यांत जाऊन उभा राहिला. रात्रभर त्यानं कळ काढली नि पैज जिंकली. सारं गांव तोंडांत बोट घालून सामोरं आलं. पण राजाला तें खरं वाटलं नाहीं. म्हणाला, 'काय बिशाद आहे तुझी पाण्यांत रात्र काढायची ? आमच्या वाड्यापुढचा कंदील तुला उब देत होता. चालता हो. बक्षिस मिळणार नाही.'
बिचारा तो गरीब माणूस मुकाट्यानं घरीं निघून गेला. राजाला बोलणार काय ? कुणीं तोंडातून 'ब्र' काढला नाहीं. उघड्या डोळ्यांनीं सगळं बघून गिळून टाकलं.
पण प्रधानानें युक्ति काढली. तो त्या गरिबाला म्हणाला, 'घाबरू नकोस. तुझं बक्षिस द्यायला लावीन तरच नांवचा.' तो पडला मोठा बेरकी. काय युक्ति करेल नि काय नाहीं कुणीं सांगावी. त्याच्यावर विश्वासून रहाणं भाग होतं. कारण तो दिला शब्द पाळीत असे अशीहि त्याची प्रसिद्धी होती.
होतां होतां एक दिवस प्रधानानें राजाला जेवायला बोलावलें. राजानं तें निमंत्रण स्वीकारलें 'येतो' म्हणाला, आणिक ठरल्या वेळीं प्रधानाकडे जेवायलाहि गेला.
पण राजानं पाहिलं तों सैंपाक तयार नव्हता. उलट एका झाडाखालीं भलीमोठी चर काढून सैंपाक रांधीत प्रधान बसलेला. चरींत मोठमोठीं लांकडं पेटलीं होतीं आणि झाडाला बांधलेलीं भांडीं लोंबकळत त्यावर शेकलीं जात होतीं. राजाला नवल वाटलं. म्हणाला, 'हे काय प्रधानजी ? वेडबिड तर लागलं नाहीं ?' तशी प्रधान हंसला. म्हणाला, 'महाराज, तुमच्या वाड्यावरच्या कंदिलाची ऊब लागून लांबच्या तळ्यावरचा तो माणूस जगला मग ही सैंपाकाची काय कथा ?'
हें ऐकून राजा मनांतून खजिल झाला. त्यानं आपली चूक कबूल केली. त्या गरीबाला हजार मोहरा त्यानं देऊन टाकल्या.
सगळीकडे आनंदी आनंद झाला.

या कथेमध्यें गरीबांची राजाकडून होणारी गळचेपी आणि हुषार प्रधानाकडून त्याला मिळणारें यश रंगविलेलें आहे. हुषार माणसें राज्यकारभारासाठीं व लोकांच्या कल्याणासाठीं कशी उपयोगी पडतात आणि प्रामाणिकपणाला चांगलें फळ कसें येतें, याचा बोध घेण्यासाठीं ही कथा जन्माला आली असली पाहिजे. कारण जुन्याकाळच्या राजाराणीवर आधारलेल्या अशा कितीक कथा बोधप्रधान अशाच आहेत.
अगदीं साध्या प्रसंगांतून निभावून नेण्यासाठीं अंगीं किती धैर्य असावें लागतें, याची कल्पना या कथेंतील गरीब माणसावरून येते. त्याचप्रमाणें हुषार प्रधान असेल तर राजाची तो कशी युक्तीयुक्तीनें खोड मोडतो, हेंहि इथें पूर्वीच्या काळी दवंडी पिटून गांवभर एखादी गोष्ट कशी कळवीत असत हेंहि या कथेंत आलेलें आहे.
'असंच आपलं एक गांव होतं-' अशी या कथेची झालेली सुरवातहि या कथेचा खूप जुनेपणा दर्शविते. त्याचबरोबर ही कथा विशिष्ट गांवीं घडलेली नसून ती सर्व ठिकाणीं लागूं पडणारी आहे, हेंहि इथें सूचित केलेलें आहे.
धामीन कोका
कोण्या एके काळीं एका गावांत दोन बायका रहात होत्या. एका घरांत रहायच्या. त्यांचं जावाजावाचं नातं. पैकी मोठी जी होती तिला प्रपंचाची मोठी हौस. मोठी हुषार होती. व्यवहारानं वागायची. हातीं येईल तो पैसाआडका संसारांत घालायची. धाकलीचं तसं नव्हतं. ती मोठी नटारंगी होती. हौस करावी तर तिनंच. मनाला येईल तसं करायची.
तर एकदां काय गंमत झाली कीं, दोघीहि माहेरीं गेल्या. दोघीनाहि त्यांच्या बापानं माहेर केलं. दागदागिने, कपडालत्ता असं कांहीं केलं नाहीं. पैसाआडका दिला.
आवडेल तें घेऊन मुलींनी संतोषी रहावं ही त्याची भावना.
माहेरपण संपलं. दोघीहि सासरीं आल्या. गुण्यागोविंदानं नांदू लागल्या.
होतां होतां एक दिवस उजाडला. दोघीहि बाजारांत गेल्या. बापानं दिलेल्या पैशाची खरेदी करावी म्हणाल्या. चारीपेठा धुंडाळीत फिरल्या.
मोठीनं दुधाला विरजणं, ताकाला डेरा, कालवणाला डेचकी, जेवायला घंगाळ, म्हशीला पेंड, सासूला खण असं आपलं काय काय घेतलं. धाकलीला तें पटलं नाहीं. तिनं आपलीं चमकणारीं बाशिंगं घेतलीं नि घरला आलीं.
घरीं आलीं तर देव्हार्‍यावर एक बाशिंग बांधून मोकळी झाली. एक तिनं आपल्या कपाळावर बांधलं. सगळीं हसलीं. नांवं ठेवाय लागलीं. पण ही ढम्म म्हणीना. बाशिंग बांधूनच कामाला लागली. तितक्यांत नवरा आला. म्हणाला कसा, 'अग अग ! हें ग काय ? 'तशी म्हटली कशी, 'कावो ? देवार्‍यांत ठेवलंय बगा जावा !' नवर्‍यानं पुन्हा पुन्हां तीच गोष्ट केली. हिनं पण तेंच उत्तर दिलं. अखेर शेवटीं नवरा कावला, रागारागानं उपाशींच निजला. दुसर्‍या दिवशीं न बोलतांच शेतावर गेला. न्ह्यारी नाहीं. जेवण नाहीं.
इकडं तोंवर हिनं एक नारळ फोडला. खिसून घेतला. त्याचे कानवले केले. शिजवून खाल्ले. बाकीच्यांना आमटी भाकरी केली. कानवला एकलीच जेवली. नवर्‍याला भाकरी घेऊन गेली. दोघांची बोलाचाली झाली नाहीं. मुकाटच तो जेवला.
आणि असं चांगलं आठवडभर चाललं. मग मात्र एक दिवस तिनं नवर्‍याला कानवला करून नेला. म्हणाली, 'अवो, अवो, धामीन कोका आनल्या. पन खाशीला तर रातीं भूत भेटल.' तरीपण तो भ्याला नाहीं. त्यानं धामीन कोका खाल्ला. आणीक रात्री बघतोय तर खरंच की भूत ! तो घाबरला. किंचाळला. भेदरून गेला. 'पुनाच्यान धामीन कोका खानार न्हाई.' म्हणाला. भूत गेलं. ह्याच्या जीवात जीव आला.
तर गंमत अशी कीं, हीच भूत होऊन गेलेली ! काजळानं तोंड माखलेलं. भांगांत शेंदूर भरलेला. केस मोकळे सोडलेले. दांताला पीठ माखलेलं. घोंगडं नेसलेली. आचकट विचकट बडबड केलेली. नाचधिंगाणा केला.
झालं. पुन्हां दुसर्‍या दिवशीं तोच प्रकार. धामीन कोका नवर्‍याला देतांना तिची हीच भाषा. पण आतां हा घाबरला नाहीं. नेटानं बोलला. तशी ही पण रात्रीं जोरानं भूत होऊन शेतावर गेली. मोठ्यानं ओरडली. तशी हा धांवला. चिमणी घेऊन गेला. उजेडांत बघतोय तर ही ! ह्यानं तिला बेदम मारली. कातडं सोलून निघस्तोंवर फोकळून काढली. तशी ती गहिंवर घालून रडायला लागली. सारी वस्ती गोळा झाली.
तितक्यांत थोरली तिथं आली. ह्यानं अशान असं झाल्याचं तिच्या कानावर घातलं. थोरली पुढं झाली. म्हणाली, 'भूता खेतानू पळा रऽऽ धामीन कोक्याचं हें घर न्हवं ! म्होरची वाट धरा.' आणीक दाही दिशांना हळदीकुंकवाची चिमूट तिनं फेंकली. मग हिला घरला घेऊन आली. म्हणाली कशी, 'नवरा देव असतूंया बायकूचा. त्येला त्येच्या पायरीनं वागीवलं, तरच तूं खरी गरतीची लेक.' हिला आतां तें पटलं. नवर्‍यापुढं तिनं नाक घासलं. चूक कबूल केली. थोरलीसारखा संसार मग तिनं केला. दोघं सुखांत नांदलीं. त्यांनीं मग रामाचं राज्य भोगलं.
या लोककथेनें गृहिणीच्या कर्तव्याची जाणीव करून दिलेली आहे. केवळ स्वतःचाच विचार न करतां नवर्‍याचा आणि घरादाराचाहि विचार केला पाहिजे, हें इथें बजावून सांगितलेलें आहे. त्यासाठी दोघींच्या संसाराची तुलना केली आहे. त्याचप्रमाणें भुताखेतावरील विश्वासहि धुडकावून दिला असून, खरे कर्तव्य-गरतीच्या मुलीचें कर्तव्य-शेवतीं बोलून दाखविलेलें आहे.
या कथेंतील सगळें वातावरण गांवरान आहे. शेतकर्‍याच्या घरचें आहे. सांसारिक जीवनाची माहिती देणारें आहे.
भाषेच्या दृष्टीनेंहि ही कथा चित्ताकर्षक झाली असून तिची मांडणी देखील मनोहर झाली आहे. या कथेनें संसारी बाईला उपदेश केला आहे. त्यामुळें अद्‌भुततेचा वासहि न लागतां ही कथा लोकप्रिय झाली आहे.
ही कथा मला सातार्‍याकडे मिळाली. सातारी भाषेचा साज त्यामुले हिच्यावर चढला आहे असें दिसून येईल. ज्यावेळीं मला ही कथा मिळाली, त्यावेळीं ती सांगणार्‍या बाईनें अशी भाषा वापरली कीं, सारा प्रसंग माझ्या नजरेसमोर त्या त्या क्षणाला उभा रहात गेला ! कथा सांगणें ही देखील कला आहे याची साक्ष त्यावेळीं मला मिळाली.
एका दाण्याचे चौईस दाणे
एक होता राजा. त्याला एक मुलगा होता. तो त्याचा फार लाडका होता. नेहमीं सावलीसारखा बरोबर असायचा.
तर एक दिवस काय झालं की, राजा शिकारीला गेला होता. त्यानं मुलालाहि बरोबर नेलं होतं. तर वाटेंत जातां जातां त्यांना एक मळा लागला. तिथं माळ्याची पोरं जोंधळा राखीत होती.
राजाच्या मुलानं एक जोंधळ्याचं कणीस मोडलं नि बघूं लागला. तेवढ्यांत माळ्याचीं मुलं ओरडली, 'कोण रं कणीस मोडतंया ? आम्ही एका दाण्याचे चौईस दाणे करून दाखवतों.' पण त्यावर हा राजाचा मुलगा न बोलतांच घरीं निघून आला.
घरीं आल्यावर त्यानं बापाला सांगितलं, 'माझं लगीन करा. मी सोयरीक पाहिलीय.
राजानं मुलाच्या मनाप्रमाणं लग्नाची तयारी केली. राजाच्या मुलाचं लग्न माळ्याच्या मुलीशीं लागल. थाटामाटांत झालं, नव्या बायकोला राजाच्या मुलानं घरीं न आणता एका अरण्यांत नेली. दोघेहि खूप फिरले. थकून गेले. शेवटीं एका झाडाच्या सावलींत बसले. माळ्याच्या मुलीला झोप लागली. हा राजाचा मुलगा जागाच होता. त्यानं एक युक्ती केली. जोंधळ्याचा एक दाणा तिच्या पदरांत बांधला नि स्वतः निघून गेला.
थोड्या वेळानं ती जागी झाली. पण बघतेय तर नवरा कुठाय ? बिचारी रडूं लागली. पदरांत तोंड खुपसू लागली. तर एकाएकीं तिच्या हाताला तो जोंधळ्याचा दाणा लागला. तिनं गांठ सोडून पाहिली. मग तो जोंधळा बघून तिच्या मनांत कसलासा विचार आला. ती उठली नि चालूं लागली.
जातां जातां तिला एका डोंगरावर एक खोपटी दिसली. तिथं ही गेली. जाऊन पहातेय तर तिथं आपली एक म्हातारी होती. हिनं तिच्याजवळून एक विस्तवाचा निखारा मागून घेतला. त्या निखार्‍यावर त्या दाण्याची लाही केली व ती तिथं ठेवून स्वतः आंघोळीला गेली.
इकडे तोंवर एका पक्षानं ती लाही खाल्ली नि त्या जागीं सोन्याचं पीस टाकून तो निघून गेला.
माळ्याची मुलगी माघारीं येऊन बघतेय तर हा चमत्कार ! पण ती घाबरली नाही. बाजांरांत जाऊन तिनं ते सोन्याचं पीस विकलं नि शेरभर जोंधळे घेऊन आली. तिनं त्याच्या सूपभर लाह्या केल्या. एवढ्यांत त्या सगळ्या लाह्या पक्षांनीं खाल्ल्या नि सूपभर सोन्याचीं पिसं तिच्या पुढ्यांत टाकलीं.
हें बघून त्या माळ्याच्या मुलीचे डोळे दिपले. पण ती बावचळली नाहीं. तिनं त्यांतलीं निम्मी पिसं विकून काय काय आणलं. धान्यधुन्य, गुरंढोरं, दासीकुणबीणी, गडीमाणसं असा मोठा खटाला घेऊन आली. एक घर बांधलं. घरांभोंवतीं तट बांधला. सुखानं राहूं लागली.
एकडे एक दिवस राजाच्या मुलाला तिची आठवण आली. तो त्या रानांत तिचा शोध करीत आला. भेटेल त्याला त्यानं तिच्याबद्दल विचारलं. पण दाद लागली नाहीं. शेवटी होय नाहीं करत तो त्या टेकडीवरच्या खोपटाजवळ आला. त्या म्हातारीजवळ 'अशानं अशी मुलगी बघीतली काय' म्हणून त्यानं चौकशी केली. 'हें घर कुणाचं ?' म्हणाला. तशी ती म्हातारी म्हणाली, 'एका दाण्याचे चौईस दाणे करणार्‍या बाईचं घर हाय हें.'
हें ऐकून राजाच्या मुलास भारी आनंद झाला. बायकोची व त्याची गांठ पडली. दोघेंहि आनंदानं भेटलीं. तिथंच राज्य करूं लागलीं.
आमची कहाणी संपली. तुमची तहानभूक हरपली.

या कथेमध्यें दिलेला शब्द पाळणार्‍या लोकांची आणि पतिव्रता स्त्रीची अद्‌भुतरम्य कथा सांगितलेली आहे. त्याचप्रमाणें राजाच्या मुलानें माळ्याची मुलगी करण्याचें धारिष्ट्य दाखवून तिची परीक्षाहि कशोशीनें घेतल्याचें सांगितलें आहे.
एक दाणा खाऊन सोन्याचें पिस देणार्‍या पक्ष्यामुळें निर्माण होणारे सर्व अद्‌भुतरम्य प्रसंग इथें मोठ्या सुंदररीतीनें चित्रित झाले असून, त्यामुळें माळ्याच्या मुलीबद्दल सर्वांच्या मनात जिव्हाळा निर्माण झालेला आहे. कांहींतरीं भव्यदिव्य असें घडवून आणून, त्यामुळें संकटांत पडलेल्याबद्दल जिव्हाळा निर्माण करण्याची लोककथेची शक्ति इथें अजमावता येते.
राजाच्या मुलानें माळ्याची मुलगी करावयाची हाच मुळीं एक अद्‌भुत चमत्कार आहे. पण तो इथें व्यक्त झालेला असून या मुलीनें केलेली कर्तबगारीहि अभिमानानें नोंदली गेली आहे.
या कथेची सुरवात आणि शेवट या दोन्हीहि गोष्टी मोठ्या आकर्षक आहेत. 'एक होता राजा' नि त्याची गोष्ट ऐकून आपली तहानभूक हरपते.' अशी ही सुरवातीची नि शेवटची भाषा गोड आहे. त्यामुळें निश्चित असें कांहीं समजलें नाहीं तरीं एवढें ऐकताक्षणींच ही कथ नक्कीच चांगली असली पाहिजे असें ऐकणारास वाटतें व मग तो गोष्ट सांग म्हणून सांगणार्‍याच्या मागें लागतो. आणि लोककथेचें हेंच एक प्रमुख वैशिष्ट्य आहे.
मराठीमध्यें अशा शेकडों लोककथा सांपडतील. त्या सर्वांचा विचार करणें एक तर अशक्यच आहे व दुसरें म्हणजे त्यावरच आधारलेलें एक स्वतंत्र पुस्तक लिहावें, 'एवढा हा मोठा पसारा' आहे. तथापि कांहिं विशिष्ट तोंडावळ्याच्या या पांच कथा दिलेल्या आहेत.
देशकाल परिस्थिति बाजूला सारली, तर जगामधील सर्व भाषांमधून अशाच प्रकारच्या लोककथा विखुरलेल्या दिसून येतील. मानवी मन हें येथून तेथून सारखेंच असल्यानें अद्‌भुतरम्यतेचा पगडा सर्वत्र सारखाच आहे. नाहीं म्हणायला त्यांच्या आविष्कारांतच काय तो फरक सांपडावयाचा. त्या कारणानें थोड्या फार फरकानें जगाच्या पाठीवरील कितीक भाषांमधील लोककथांच्यामध्यें समान धागा सांपडल्याविना रहात नाहीं. लोककथेचें प्रमुख वैशिष्ट्य असें की, ती एकदां ऐकली असतां चटकन मनांत भरते. त्यामुळें आपल्या ओळखीची अशी कथा कोणीं सांगू लागलेंच तर त्याच्या जोडीला आपलेहि ओठ नकळत हालूं लागतात, असा हा अनुभव आहे ! एवढेंच नव्हे तर एका मागून एक अशा मागें ऐकलेल्या लोककथा भराभर आठवणींत येऊं लागून गोष्ट सांगायला कोण हरतंय बघूंया' अशी तीव्र ईर्षा मनांत डोकावल्याविना रहात नाहीं ! आणि रात्रभरहि वेळ पडली तर गोष्टीला खंड पडूं न देण्याची मनाची तयारी मग आपोआपच व्हायला लागते !
लहानपणीं एक पिढी दुसर्‍या पिढीकडून ही कथा उचलते व मोठेपणीं तिसर्‍या पिढीला बहाल करते असा या कथेचा लौकिक आहे ! जणुं हें एक पिढीजात मालकीचें, हक्काचें, असें मौलिक धनच आहे !
लोककथा
पूर्वीच्या काळी तिन्हीसांज झाली आणि गुरेंवासरें शेतावरून माघारीं फिरायची वेळ झाली, म्हणजे लहान लहान मुलें घरच्या आजोबा-आजीजवळ गोळा होत व म्हणत, 'कानी सांग. चांगली झकास पाइजे.' आणि मग त्या मुलांना जवळ घेऊन एखादी कहाणी आजोबा आजीहि त्यांना मोठ्या हौसेनें ऐकवीत.
या कहाण्या कधीं लहान असत तर कधीं मोठ्या असत; आणि त्या सांगण्याची धाटणी देखील मोठी सुंदर असे. कहाणी सुरू झाली म्हणजे प्रत्येक वाक्यानंतर ऐकणारानें 'हूं' म्हणत चित्ताची सावधानता दर्शविली पाहिजे असा दंडक असे. त्यामुळें कहानी एक दोनदां ऐकली म्हणजे ती लगेच आठवणींत जमा होत असे. मुलें मग आजोबा-आजीनें सांगितलेली कहानी बरोबरीच्या मुलांना ऐकवीत; आणि एकाच्या तोंदून ही कहाणी दुसर्‍याच्या मनांत ठाण देत असे व याप्रमाणें सर्वत्र पसरत जात असे !
वडीलधारी माणसें ज्यावेळीम अशा लोकप्रिय कहाण्या सांगत, त्यावेळीं त्यांच्या मनामध्यें एक प्रमुख हेतु असा असायचा की, ह्या कहाण्या ऐकून मुलीबाळींना, लेकीसुनांना आणि मुलांना चांगलें वळण लागवें. त्यामुळें अशा कहाण्या कांहींतरी बोध बरोबर घेऊनच जन्माला येत असत.
जुन्या काळची ही कहाणी 'लोककथा' या नांवानेहि प्रसिद्ध आहे. हिला लोककथा म्हणावयाचें कारण असें कीं, इथें कोणाचेंहि नांवगांव सांगण्यांत आलेलें नसतें. 'अमक्या ठिकाणीं अमुक झालें' असाच सारा प्रकार. त्या कारणानें सामुदायिक जीवनाचा तो एक विशिष्ट प्रसंगावरील असा आविष्कार होतो.
माणूस जन्माला आला आणि त्याला आपल्या मनांतील गोष्ट इतरांना सांगावीशी वाटली, तेव्हांपासून लोककथा वा कहाणी जन्माला आली असली पाहिजे, असें म्हणावयास हरकत नाहीं. मराठींत अशा कितीतरी लोककथा आहेत. मात्र प्रत्येक निराळ्या स्वभावाची आणि निराळ्या धाटणीचीहि !
लहान लहान सुटसुटीत वाक्यें, आकर्षक क्रियापदे आणि चटकदार भाषा ही लोककथेची वैशिष्ट्यें आहेत. मानवी मनाचें मनोहर विश्लेषण करण्यांत तिचा हातखंडा आहे. आणि अद्‌भुतरम्य प्रसंगांची उभारणी करून मानवी मन जिंकण्यांतहि ती कमालीची यशस्वी झालेली आहे.
सातवी मुलगी
आटपाट नगर होतं. तिथं एक गरीब माणूस रहात होता. त्याची फार गरिबी. रोज रानांत जावं, लाकडं तोडून आणावींत, बाजारांत नेऊन विकावींत आणि मिळेल त्यावर भागवावं अशी त्याची गत. तशांतच घरांत खात्यापित्या सात मुली. एकीपेक्षां एक देखणी. त्यांचं रूप नक्षत्रासारखं. पण पोटाला मिळायची मारामार. बिचार्‍या रानावनांत भटकायच्या. मिळालंच तर कांहीं खायच्या. एरव्हीं सारा तिन्हीकाळ उपास.
तर एकदा काय झालं कीं, त्या गरीब माणसानं बायकोला एक गोष्ट सांगितली. म्हणाला, 'आपल्या पोरींना पुरणपोळी कर. खावी वाटतेय.' त्यावर बायकोनं विचार केला. तिनं मोजक्या सातच पुरणपोळ्या केल्या. पोरींना वाढल्या.
संध्याकाळ झाली. तो माणूस घरीं आला. पहातो तों त्याला पोळी नाहीं. त्याच्या तर ती आवडीची. तो रागावला. बायकोला मारहाण केली.
एक दिवस त्यानं विचार केला. घरांतल्या मुलींचा त्रास नको म्हणाला. सर्वांना त्यानं जंगलांत नेऊन सोडलं. वाघ, सिंह, अस्वल, रानडुक्कर त्यांना खाऊन टाकतील म्हणाला. पोरींना फुलं, फळं आणायला सांगून स्वतः निघून गेला. नाहीं म्हणायला जातां जातां त्यानं धाकट्या मुलीचा मुका घेत एवढीच बडबड केली कीं, 'ही सातवी मुलगी तेवढं नांव काढील.'
इकडे त्या साती मुली दिवसभर रानांवनांतून फिरल्या. रात्र झाली. एका ठिकाणीं जमल्या. बापाची वाट पहात राहिल्या. जमवलेली फळं फुलं बघत बसल्या. पण बाप आला नाहीं. वाट बघून कंटाळल्या नि वाट फुटेल तिकडे गेल्या.
होतां होतां काय झालं की, वाटेंत त्यांना एक जांभळीचं झाड दिसलं. झाडावर जांभळं कचकून होतीं. टिप्पूर चांदण्यांत ती दिसलीं. मोठीनं पाहिलीं. ती सरसर झाडावर चढली. तिनं एकेक जांभूळ चाखून खालीं टाकलं. सगळ्याजणींनीं तें उचलून खाल्लं. पण धाकटी तशीच राहिली. मोठीनं तें पाहिलं तिनं एक जांभूळ तोडून तिला खालीं टाकलं. स्वतः खालीं उतरली. पहाते तों तें जांभूळ मुंगी घेऊन चाललेली ! सगळ्याजणी मुंगीच्यामागं धांवल्या. पण मुंगी तशीच पुढं नि ह्या तिच्यामागं. अखेर शेवटीं मुंगीची नि त्यांची गांठ पडली ती एक राजाच्या घरांत !
सातवी धाकटी मुलगी तिथं आली तों दारात राक्षस झोपलेला. आतां काय करावं ? तिनं विचार केला. बहिणींना बाहेरच बसवून ती एकटी आंत गेली. तिथं पहातेय तो एका मोठ्या कढईत दूध तापत होतं. धाकटीनं एका भांड्यात तें रसरशीत निखार्‍यावरचं दूध घेतलं. हळूच बाहेर आली. राक्षसाच्या तोंडांत तिनं तें दूध ओतलं. तशी राक्षस तडफडून मेला. मग बिनघोरी सगळ्याजणी आंत आल्या. बघतात तर ऊनऊन सैंपाक तयार होता. त्यांना आनंद झाला. त्या पोटभर जेवल्या. तरतरीत झाल्या. नंतर त्यांनीं सगळा वाडा पाहिला. खूप खोल्या होत्या. प्रत्येकीनं एकेक खोली ताब्यांत घेतली. आणि आतां त्या झोपणार तर एकाएकीं देवघर दिसलं. तिकडे गेल्या. धाकटीनं देवघराचं दार उघडलं. आंत देवाची सुंदर मूर्ति. सगळ्याजणी देवापुढं बसल्या. देवाच्या पाया पडल्या. देव प्रसन्न झाला. धाकटीला म्हणाला, 'कोंड्याच्या खोलींत नीज. तुझं भलं होईल.' धाकटीला तें पटलं. कोंड्याच्या खोलींत जाऊन ती निजली. बाकीच्या दुसरीकडे गेल्या. प्रत्येकीच्या खोलींत मोतीं पोवळीं भरलेली ! धाकटीच्या खोलीत मोहरा भरलेल्या !
एक दिवस सगळ्याजणींना आईची आठवण फार आली. म्हणून मोतीं पोवळीं घेऊन घरीं जायला निघाल्या. धाकटीनं एका गोणींत मोहरा घालून वर शेणमाती शिंपली नि मग सर्वांच्या बरोबर निघाली. पण वाटेंत चोर आले. सहा जणींची धनसंपत्ति त्यांनी लांबविली. सातवीच्या वाटेला कुणी गेलं नाहीं.
सगळ्या घरी आल्या. सहाजणी रडत होत्या. धाकटी हंसत होती. तिनं बापाच्यापुढं गोणीतल्या मोहरा ओतल्या. झाली गोष्ट तिनं बापाला घडली तशी सांगितली. बापान सर्वांना घरांत घेतलं. आनंदी आनंद झाला. सातवी मुलगी नशीबवान ठरली. तिचं कौतुक सर्वांनी केलं. ज्याच्या त्याच्या तोंडीं आपलं तिचंच नांव झालं. ती भाग्यवान ठरली. तिचं सुख तें तुमचं आमचंहि होवो.

या कथेमध्यें अद्‌भुत चमत्कार घडून एखाद्याचें नशीब कसें उजाडतें, याची चित्ताकर्षक माहिती आली आहे. त्याचप्रमाणें चिकाटीनें वागल्यास चांगले दिवस कसे येतात याचीहि माहिती आली आहे. बापानें मुलें टाकलीं आणि गरिबीचा अव्हेर करायचा प्रयत्न केला, तरी मुलें चांगले दिवस कसा आणूं शकतात, हेंहि इथें दाखविलेले आहे. स्वतःच्या पुरणपोळीच्या स्वार्थी आवडीखातर बापानें एवढा त्याग केला, तरी मुली त्याच्यावर उलटलेल्या नाहींत, हें दाखवितांना इथें वडील माणसांच्याबद्दल आवश्यक असलेला आदर सूचित केलेला आहे.
देव प्रसन्न व्हावयाचा आणि मुंगीनें राजवाड्याची वाट दाखवून भले दिवस यायला मदत करावयाची, हा अदभुतरम्य कथा भाग इथें मोठ्या आकर्षक पद्धतीनें सांगितलेला आहे. 'आटपाट नगर होतं-' अशी ही कथेची झालेली सुरवातहि स्थळकाळातीत घडलेल्या या गोष्टीच्या जुनेपणाची साक्ष देणारी आहे. त्याचप्रमाणें शेवटीं गोष्टींतील सुख आपल्याहि वाट्यांला येवो, अशी व्यक्त केलेली आशा देखील मोठी चित्ताकर्षक आहे.
पालखी
संत म्हनती संताला तुमच्या गांवचं नांव काय ? आमच्या गांवचं नांव अळंकापुरी. पालखी महाद्वारीं. सोन्याचा पिंपळ देवाच्या दारीं. पंधरा वर्साची समांध घेतली नंदीखालीं द्यानुबांनीं. आळंदीच लोक जमून पालखी आनली चिखली मुशीवरी. पुन्याचं ख्याडपाड आडव गेल गांवकरी. पालख्या भवानी पेठवरी. संताला मेजवानी गूळपोळी, शिरापुरी. तोंदी लावाय शाक तरकारी. गनेश टेबल शिपायांची गर्दी भारी. जरीचं निशान भाडभाड करी. चांदी सोन्याचा साज नेवरती महाराजांच्या घोड्यावरी. पताका चालल्यात हारोहारीं टाळ मृदुंगाची महिमा भारी. अबीर बुक्क्याची गर्दी मनहारी. नगारनौबत गाड्यावरी. ऐका ऐका शिंगाची ललकारी. दोन पालख्यांचा संगम झाला छत्रीवरी. मंमदवाडीवरी आरती करी. फराळ कराय गेल उरळीवरी. घाट येंगून गेल करवरी. पाऊस पड झिरमिरी. आखाडीचा महिमा भारी. खांद्याव पताका भिजल्यात वारकरी. राहुट्या दिल्या माळावरी. पैली आंगूळ भागीरथीवरी. संताला मेजवानी गूळपोळी. शिरापुरी. तोंडी लावाय शाक तरकारी. तिनी पालख्यांचा संगम झाला नीरा नदीवरी. नीरा नदीचं तेज भारी. साडेतीनशें जमून पालख्या नेल्या वाखरीवरी. वाखरीचं रंगान भारी. निवरती महाराजांचा घोडा नाचतो नानापरि. सर्वी यात्रा गेली पुलावरी.
संत म्हणती संताला तुमच्या गावचं नांव कय ? आमच्या गांवचं नांव पंढरपूर लोटालोटी. तुळशीबनांत झाली यात्रेला दाटी. देवा आदीं कुंडलीकाच्या घेऊं भेटी. गोपाळपुरीं गोपाळकाला. देव कैकांच्या भेटीला गेला. असं पंढरी तिरीथ भारी. गोरा कुंभार, नरहरी सोनार, सावतामाळी. नामदेव हारी. उधरून गेले महाद्वारीं. काय यात्रा भरली घनदाट. महाद्वाराला जाती वाट. काय यात्रा भरली भारी. चोखूबा देवद्वारीं. नामदेव बसल्यात पायरीवरी. कापूर जळतूया हारोहारीं. यात्रेनं भरल्या नावा. करा विठ्ठल-रुक्मिनीचा धांवा.
संत म्हनतो संताला, असं आपून तिरीथ करूं वारंवार. देवासंगं जेवतो चोख्या महार. सावता माळी घाली फुलांचा हार.
देवाच्या आळंदीहून निघालेली पालखी पंढरपूरला पोचेपर्यंत काय काय घडलें आणि पंढरपूरीं काय पाहिलें, याची साईनसंगीत हकीकत देणारी ही लोककथा मोठी सुंदर आहे. मला हीकथा पुणें जिल्ह्यांत मिळाली. या कथेच्या भाषेवर पुणें जिल्ह्यातील बोली मराठीची बरीच छाप पडलेली आहे.
वारकरी सांप्रदायातील स्त्रियांनीं 'पालखी' चें केलेलें हें मराठमोळा वर्णन चटकदार आहे ! देवाबद्दलचे सारे भाव या छोट्या कथेमध्यें व्यक्त झालेले असून भक्तांचे वर्णनहि योग्यप्रकारें झालेलें आहे.
यात्रेच्या वर्णनाची ही पद्धति उल्लेखनीय असून आकर्षकहि आहे.

N/A

References : N/A
Last Updated : December 25, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP