TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

स्त्रीधन - उगवला नारायण

लोकगीतातील स्त्रीधन म्हणजे मराठीतील एक अमूल्य ठेवा आहे, तो आपण पुढील पिढीसाठी जतन करून ठेवला पाहिजे.

उगवला नारायण
दररोज सकाळीं उठल्याबरोबर पहिल्यांदा देवाचे नांव घ्यावें आणि नंतर त्याचें दर्शनहि घ्यावें, म्हणजे आपला दिवस चांगला जातो, अशी सर्वसामान्य मनाची एक भोळी श्रद्धा आहे. त्यामुळें इतर देवादिकांच्या जोडीलाच उगवत्या सूर्यनारायणाचीहि मनोभावें पूजा करण्यांत माणसांना आनंद वाटतो. उभ्या दुनियेला नवचैतन्य प्राप्त करून देणारा सूर्य म्हणजे एक मोठी देवता आहे. तिची पूजा ही स्वाभाविकपणेंच झाली पाहिजे, म्हणून माणसें सूर्योदय होत असतांना असतील तेथून सूर्याकडे तोंड करीत उभीं रहातात आणि हात जोडून त्यास नमस्कार करतात. अशावेळीं नदीमध्यें स्नान करीत असतांना अगर इतरत्र सोय असेल तिथें स्नान करीत असतांना, ओलेत्यानें सूर्याला नमस्कार केलेला अधिक चांगला, अशी आपली एक भाविक मनाची समजूत आहे.
सूर्याला नमस्कार करतांना बायकामंडळी म्हणत असतात कीं, 'देवा, भगवाना, चांगलं कर रऽऽऽ बाबा !'' म्हणजे सूर्याजवळ त्या हव्या असलेल्या आपल्या भलेपणाची मागणी करीत असतात.
उगवत्या नारायणा            आदीं उगव माज्या दारीं
माज्या त्या बाळासंगं        दुधा तुपाची कर न्ह्यारी
उगवत्या सूर्याला उद्देशून म्हणावयाच्या ओव्या या पद्धतीनें सुरू होतात. प्रत्यक्ष सूर्यदेवाला अगोदर आपल्या दारीं यावयाची विनंति करावयाचि व आपल्या बाळाबरोबर दुधतुपाची न्याहारी कर म्हणावयाचें म्हणजे मोठी अद्‌भुतरम्य अशी विनंति आहे ! त्याचप्रमाणें हें कल्पनासौंदर्यहि मोठें विलोभनीय आहे, यांत शंका नाहीं.
या ओवींत आलेला दुधातुपाचा उल्लेख जुन्या काळीं घरांत असलेल्या भरपूर दुभत्याची कल्पना देत आहे.
उगवला नारायण            येऊन बसलो आदमासीं
बगतो ग हाल हवा            दुनिया आवरती कशी
या गीतांत सूर्यदेव कुठें तरी एका विशिष्ट ठिकाणीं येऊन बसतो; आणि दुनियेचा प्रवास आटोक्यांत कसा येईल अगर धरणीवर सर्वत्र समाधान कसे पसरतां येईल, याचा विचार करीत असतो, अशी कल्पना आली आहे. मानवानें आपल्या संसाराचा विचार करावा त्याप्रमाणें सूर्यहि दुनियेच्या संसाराचा विचार करीत असल्याची ही अभिनव कल्पना आहे.
उगवला सूर्व्यादेव            लाल आगीचा भडका
मावळा गेला                चंद्र आईचा लाडका
या ओवीनें सूर्योदय होते वेळीं उगवतीची दिशा लालसर झाली असून आईचा लाडका चंद्र मावळायला गेल्याची माहिती सांगितली आहे. चंद्र आईचा लाडका कसा झाला याबाबत प्रसिद्ध असलेली लोककथा लक्षांत घेऊन हा उल्लेख आलेला असावा. या लोककथेमध्यें अशी हकीकत आलेली आहे कां, एक म्हातारी बाई असते. तिला चार मुलें असतात. त्यांचीं नांवें चंद्र, सूर्य, अग्नि आणि वायु. तर ह्या मुलांना एक धनिक माणूस जेवायला बोलावतो. अशा वेळीं ही म्हातारी त्यांना जेवायला जा म्हणते. पण एक अट घालते कीं, येतांना आपल्यासाठीं थोडी मिठाई आणा. पण एकट्या चंद्राखेरीज तें काम कुणीं करीत नाही. हीं नाहीं तीं कारणें इतर मुलें पुढें करीत मिठाई आणली नसल्याचें सांगतात. पण चंद्र मिठाई आणून देतो. त्यामुळें म्हातारी त्याच्यावर प्रसन्न होऊन 'दुनियाचा तूं आवडता होशील' असा मंगल आशीर्वाद देते; आणि चंद्र तेव्हांपासून सर्वांचा आवडता व आईचा लाडका होतो. अशी थोडक्यांत ही हकीकत आहे.
उगवला नारायण            लाल शेंदराच्या फोडी
लाडक्या बाळराजा            औक मागीतें वाडिदिडी
उगवला नारायण            आतां काय मागूं त्येला
सावळे भैनाबाई                औक मागीतें कुंकवाला
उगवला नारायण            धनसंपता मला थोडी
मागनं मागीतें मी            पोटीं पुत्राची ग जोडी
सूर्यदेवाजवळ केलेल्या मागणीची माहिती त्या गीतांनीं दिलेली आहे. आपल्या बाळाला व पतीला उदंड आयुष्य इथें मागितलेलें असून पोटीं पुत्रांच्या जोडीचीहि अपेक्षा केली आहे. उगवत्या दिशेची इथें लाल शेंदराच्या फोडीशी केलेली तुलना आणि घरीं धनसंपत्ति थोडीफार आहे तेव्हां तिला धनी म्हणून पुत्र मागून घ्यावयाचा, अशी इथें आलेली कल्पना सामान्य मनाच्या विशालतेची चुणूक दाखवीत आहे.
उगवला नारायण            उगवतांना संध्या करी
चौ रत्‍नांचं जानवं            पतिराजाच्या भुजवरी
उगवला नारायण            उगवतांना पाणी पडं
माज्या ग बाळीच्या            बाई गंदाला तेज चडं
उगवला नारायण                आदीं आला माज्या दारीं
धईभातची ग न्ह्यारी            मग पिरतीमी धूंडी सारी
उगवला नारायण            केळीच्या ग कोक्यांतन
धुंदीत बाळराज            बाई फिरतो मळ्यांतन
उगवला नारायण            माज्या अंगनीं प्रकाशला
हळदी कुंकवाचा            वटा शालूचा माखला
उगवला नारायण             किरनं टाकीतो झपाझपा
माजी ग बाळाबाई            सई चांदनी लोटी सोपा
सूर्योदय झाल्यानंतर होणारी हालचाल या गीतांनीं दर्शविलेली असून ती मोठी चित्ताकर्षकहि झाली आहे.
सूर्यदेव उगवला त्यावेळीं रत्‍नजडित जानवं घातलेला पतिराज संध्यापूजा करीत आहे, उगवतीकडे पाण्याचा धबधबा असल्यानें त्या पाण्याप्रमाणें मुलीच्या कुंकवाला तेज चढतें आहे, माझ्या घरीं येऊन तो दहीभाताची न्याहारी करून मग  सगळ्या दुनियेवर जात आहे, केळीच्या कोक्यांतून डोकावीत तो माझ्या बाळाला मळ्यामध्यें शोधीत आहे, हळदीकुंकवानें आपला शेला माखला असून त्याचें तेज त्याच्या प्रकाशांत चमकतें आहे, त्याच्या कोवळ्या उन्हांत मुलगी सोपा झाडून काढीत आहे, अशी विविध प्रकारची हालचाल इथें प्रकट झाली असून, ती नित्य व्यवहारांतील असल्यानें ह्रदयंगम झाली आहे. केळीच्या कोक्यांतून डोकावीत सूर्यकिरणांनी मुलाला शोधावयाचें अशी इथें आलेली कल्पना विशेष चित्ताकर्षक झालेली असून, कल्पना वैभवाचा एक नमुना या दृष्टीनें ती उल्लेखनीयहि ठरेल.
उगवला नारायण            लाल शेंदराच्या खापा
फुलें अंगणांत चांफा
उगवला नारायण            चढे झाडाझुडावरी
तेज पडे चुड्यावरी
उगवला नारायण            अगीनीचा ग पुडका
आंत मोत्यांच्या सडका
उगवला नारायण            आला पहाड फोडून
दिले सुरुंग लावून
उगवला नारायण            सारी उजळे दुनीया
किती लावाव्या समया
उगवला नारायण            पसरलं पिवळं ऊन
बाई हासलं हिरवं रान
उगवला नारायण            तिरीप पिवळी छान
हंसे मखमल रानोरान
सूर्योदयानंतर निसर्गानें दाखविलेली आपली हालचाल या गीतांनीं सांगितलेली आहे आणि ती सांगतांना प्रत्येक वेळीं एखाद्या कृतीशीं तुलना करीत नवें सौंदर्यदर्शन घडविलेलें आहे. उपमा दृष्टांतांचा सुंदर नमुना म्हणून या ओव्यांचा अभ्यास करावा, इतक्या त्या चटकदार झालेल्या आहेत.
शेंदराच्या लाल चिपेप्रमाणें दिसणारा सूर्य बघून अंगणांतील चांफा इथें फुलला आहे, झाडावरील सूर्याचें तेज हातांतील सौभाग्याच्या चुड्यावर चढलें आहे, अग्नीच्या पुड्याप्रमाणें दिसणार्‍या सूर्याच्या आंत मोत्यांच्या सडका पसरल्या आहेत (तेजस्वी किरणांचे झोत दिसत आहेत), पहाड फोडून तो वर आल्यानें सुरुंग उडावा त्याप्रमाणें सर्वत्र लाल धूळ आभाळांत उडाली आहे, त्याच्या तेजानें उजळलेली दुनिया लाखों समयांच्या प्रकाशाला लाजवीत आहे, पिवळ्या उन्हाच्या तिरपीनें रानोरानची मखमल हंसते आहे आणि हिरवें रानहि आनंदलें आहे, अशी ही विविध तर्‍हांनीं नटलेली हकीकत आहे. निसर्गवर्णनाचा एक उत्तम नमुना म्हणून या गीतांची थोरवी गातां यावी, एवढीं तीं अंतरंगानें वजनदार झालेलीं आहेत.
उगवला नारायण            केळीच्या कंबळांत
मावळाया गेला               नारळी सुंदरींत
मावळाया गेला               कोकनीचा राजा
आडवी ग आली               बहीन कंबळजा
या ओव्यांनी उगवत्या व मावळत्या सूर्याची माहिती दिली आहे. सकाळी केळीच्या बागेंतून (कमळासारख्या केळफुलांतून) सूर्यदेव वर येतो आणि सायंकाळीं नारळीच्या झावळींत मावळतो अशी ही हकीकत आहे. पश्चिमेकडे सूर्य मावळतो तेव्हां तो कोंकणांत जाऊन गुप्त होतो आणि त्याला त्याची बहीण कमळजा आडवी येते, म्हणजे मावळतांनाहि त्याच्याभोवतीं कमळासारखें तेज फांकतें असें इथें वर्णन आलेलें आहे.
अगदीं भोळ्या भाबड्या आणि सर्वसामान्य स्त्रीमनानें सूर्यदेवाचें हें केलेलें वर्णन अतिशय मनहारी आणि सुशिक्षितांच्या कल्पनेलाहि वेडें करणारें झालेलें आहे. त्यामुळें जाणत्या मनाला याविषयीं विचार करतांना प्रत्यक्ष सूर्याच्या तेजाशीं या विलोभनीय सौंदर्याची तुलना करावयाचा मोह झाला, तर खास वावगे होणार नाहीं. एवढ्या त्या ओव्या ह्रदयंगम झालेल्या आहेत.
सामान्य स्त्रीमनानें केलेलं निसर्गाचें वर्णन म्हणून या गीतांची थोरवी फार मोठी ठरेल.

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2013-12-20T05:16:22.2930000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

महानंद

  • n. मद्रदेश का एक राजा, जिसका नरिष्यन्त पुत्र दमन ने सुमना के स्वयंवर के समय वध किया था [मार्क.१३०.५२] । इसके नाम के लिए ‘महानाद’ पाठभेद भी प्राप्त है । 
RANDOM WORD

Did you know?

What is Gotra?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site