TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

स्त्रीधन - कुलदैवत

लोकगीतातील स्त्रीधन म्हणजे मराठीतील एक अमूल्य ठेवा आहे, तो आपण पुढील पिढीसाठी जतन करून ठेवला पाहिजे.

कुलदैवत
कांही घराण्यांमध्यें कुलदैवत म्हणून एक वेगळाच देव मानण्यांत येतो आणि जत्रेच्या निमित्तानें त्याची खास पूजाहि करण्यांत येते. अशा देवाला बायका नवसहि करीत असतात व तो फेडण्यासाठी प्राण पणाला लावून त्यांची धडपड चाललेली असते. त्यामागचा हेतु एवढाच कीं, ही कुलदेवता आपल्या घराण्यावर कायमची प्रसन्न व्हावी व आपलें भलें व्हावें.
चैताच्या म्हईन्यांत                फुलल्या चारी वाटा
जोतिबा माजा देव                रत्‍नागिरीचा राजा मोठा
जोतिबाची वाट                चढतां दिसं वन
जोतिबा माज्या देवा                कंदीं देशील दरशन
जिवाला माज्या जड                मला कशाला वैदवानी
देवा माज्या जोतीबाच्या            त्येच्या न्हानीचं पाजा पानी
जिवाला माज्या जड                मला कशाला म्हालदोरी
नाईकबा माजा देव                सादु वैद माज्या घरीं
दिवस उगवला                दिवसापशीं माजं काई
जोतिबा माजा देव                येन्याची ग वाट हाई
कोल्हापूरपासून बारा मैलांवर असलेल्या रत्‍नागिरी डोंगरावरील 'ज्योतिबा' नांवाच्या कुलदेवतेसंबंधींच्या या ओव्या आहेत. महाराष्ट्रांतील पुष्कळ घराण्यांची 'ज्योतिबा' ही एक कुलदेवता आहे. या देवतेवर या भक्त मंडळींची विलक्षण श्रद्धा आहे. केलेला नवस फेडला नाहीं, तर ही देवता किती कोपते याची कल्पना य सामान्य मंडळींनीं 'सोन्याच जानवं' या नांवाच्या एका लोककथेंत दिलेली आहे. एक बाई दळणकांडण करीत असते. त्यावरच आपलें रोजचें जीवन भागवतें. पण घरीं मूलबाळ नसल्यानें ती ज्योतिबाला सोन्याचं जानवं घालीन असा नवस करते. पण तिला दिवस गेल्यावर ती देवाला विसरते. त्याचा परिणाम फार वाईट होतो. तिला मूल होतें तें डुकराच्या पिलासारखें ! पुढें ही डुकरासारखी दिसणारी मुलगी राजाची सून होते. मग राजा हा नवस फेडतो व त्या मुलीचें सुंदर राजकन्येंत रूपांतर होतें. अशी ही कथ अगदीं थोडक्यांत म्हणून सांगतां येईल.
या ओव्यांनीं ज्योतिबाचा महिमा गाइलेला आहे. चैत्र महिन्यांत या डोंगराच्या चारी वाटा फुलून जातात, ही कल्पना इथें देऊन यात्रा यावेळीं फार मोठी भरते, असें सामान्य स्त्रियांनीं मोठ्या खुबीनें सूचित केलें आहे. त्याचप्रमाणें हा ज्योतिबाचा डोंगर एवढा ऊंच आहे कीं. चढण संपत नाहीं व भोंवतालीं वनांची गर्दी दिसते व त्यामुळें देवाचें दर्शन कधीं होणार म्हणून भक्त मंडळींना चिंता पडते, अशी इथें सांगितलेली कल्पनाहि निसर्ग वर्णनाचा एक नमुमा म्हणून पहाण्याजोगी आहे.
उगवत्या नारायणाला नमस्कार न करतां ज्योतिबा घरीं येईल म्हणून वाट पहावयाची आणि औषधापेक्षांहि त्याच्या दर्शनानेंच अधिक गुण यावयाचा, अशी इथें प्रकट झालेली दृढ श्रद्धा भाविक मनाची निदर्शक म्हणून अभ्यासण्यासारखी आहे असें दिसून येईल. ज्याला इंग्रजीमध्यें 'वुईल पॉवर' म्हणतात व 'विश्वास असेल तर यश मिळूं शकेल' अशी एक मराठींत सामान्य झालेली दृढ कल्पना आहे, तिचा इथें सुरेख वापर झालेला आहे. उत्तर सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यांतील 'नाईकबा' ह्या कुलदेवतेचाहि उल्लेख इथें असाच आलेला आहे.
शिराळ गांवामंदीं                गल्ल्या हाईत्या दाटणीच्या
देवा माज्या नाथाजीला            दिंड्या येत्यात्या पैठणीच्या
आठां दिसांच्या ऐतवारीं            नाथ म्हाराज घोड्यावरी
हातीं दात लेखयीनी                लिवी चिंचच्या झाडावरी
शिराळ एवढं गाव                गांव म्हमई बरोबरो
देवा माज्य नाथाजीचं            भगवं निशान चिंचवरी
माज्या ग अंगनांत                बच्च्या नागाची लोळयीनी
नाथ देव महाराज                गेला गारुडी खेळुयीनी
चला ग सया पाहूं                नाथ बाबाची एवढी हवा
टाकी नदार खेड्यावरी            तिथं पाण्याचा जळ दिवा
चला ग सया पाहूं                नाथ बाबाची बागशाई
चिंचच्या झाडावरी                सैन निगाली काशीबाई
पाटानं जातं पाणी                वर अबीराची शाई
देवा माज्या नाथाजीला            कानफाट्याला रानी न्हाई
कापूर वड्यायाचं                पाणी दिसतं ताकावानी
देवा गोरखनाथायांनी                जटा धुतील्या गोसाव्यांनीं
दक्षिण सातारा जिल्ह्यामधील शिराळा महालांतील शिराळा गांवच्या सीमेवर असलेल्या गोरखनाथाची ही हकीकत आहे.
वास्तविक शिराळा गांव हे फार मोठें नाहीं. परंतु इथें मुंबईच्या बरोबरीला त्यास बसविलें आहे ! आपल्या गांवच्या अभिमानाची द्योतक म्हणून सामान्य मनाला वाटणारी ही बरोबरी लक्षांत ठेवण्यासारखी आहे. नाथाच्या यात्रेसाठीं या गांवीं पैठणसारख्या दूरच्या गांवाहून दिंड्या येत असतात हें सांगतांना नाथाची थोरवी किती आहे, हें दाखविण्याचा प्रयत्‍न केला आहे. नाथाच्या दारांत इथें फारच मोठीं-शेकडों वर्षांची जुनी-अशीं चिंचेचीं झाडें आहेत. या झाडांच्या फळाचा आकारहि झाडाला शोभेल असाच मोठा आहे ! त्या चिंचेवर (फळावर) काशीचें चित्र उमटल्याची अद्‌भुतरम्य हकीकत इथें आली आहे ! शिराळ्यास नागपंचमीचा उत्सव मोठा असतो. त्यामुळे नाथालाहि इथें गारुडी करून टाकलें आहे ! नाथाच्या जटा धुण्यामुळें मोरणा नदीच्या पाण्याचा रंग बदलला आणि अबीराच्या शाईनें नाथानें लेखनं केलें, असा चमत्कारहि इथें मोठ्या अभिमानानें सांगितलेला आहे. कानफाट्या नाथाचें भगवें निशाणहि या ठिकाणीं सांगितलें असून तिथें सतत जळणार्‍या पाण्याच्या दिव्याचा विलोभनीय अद्‌भुत चमत्कारहि आवर्जून वर्णिलेला आहे !
चैताच्या म्हईन्यांत                हवा पेटच्या कावडीची
गिरजा एवडी नार                संबू देवाच्या आवडीची
तेल्या भुत्याची कावड            मुंगी घाटाला थटली
संबू देवाची गिरजाबाई            कुंकूं लेतांना उटली
पाटानं जातं पानी                शिंगणापुरीच्या मळ्याला
चैताच्या महिन्यांत                दौना आलाय भराला
देघाचा भाऊपना                संबू देवानं चालवीला
सांडनीवरी स्वार                दौना रातींत पाठवीला
वरी संबूंचं शिकायार                खालीं बळीचं देवाळ
सईला किती सांगूं                गिरजा म्हायार जवळ
शिंगणापूरच्या शंभू महादेवासंबंधींच्या या ओव्या आहेत. शिंगणापूरच्या यात्रेच्या वेळची हकीकत इथें आली आहे. गिरजाबाई देवाकडे येणारी तेल्याभुत्याची   ( एका भक्ताची ) कावड डोंगरालगतच्या मुंगीं घाटाजवळ अडकलेली पहातांच, भक्तांच्या मार्गात आलेला अडथळा नाहींसा करण्यासाठी कुंकूं लावतांना देखील उठते, अशी या गीतानें दिलेली माहिती देव आणि भक्त यांच्या मधील निष्काम प्रेमाची निदर्शक आहे. उंटावरून पाठविलेल्या दवण्याची, एका गांवच्या देवाकडून दुसर्‍या गांवच्या देवाला भेट म्हणून पाठविलेल्या दवण्याची (सुवासिक वनस्पति) इथें सांगितलेली माहिती चित्ताकर्षक आहे. सांगावा येतांक्षणींच रातोरात पोंचत्या केलेल्या दवण्याची ही माहिती जुन्या काळच्या वहानांची व दळणवळणाच्या साधनांचीहि निदर्शक ठरते.
शंभूच्या देवळाच्या शिखराजवळच गिरजाचें माहेर आहे, असें या गीतनें सांगतांना मुलीबाळी नजरेखालच्या टप्प्यांत देण्याची जुनी चालहि ओळखीची करून दिली आहे !
सकाळीं उठूनी                घराबाहेर माझं जाणं
                        प्रभुदर्शन मला घेणं
बस्तीच्या दरबारांत                उभी राहिली एका कोनीं
                        देवा उघड नेत्रं दोनी
सकाळीं उठूनी                देवा अरहंत माझ्या मुखीं
                        राख माझं सर्व सुखी
दक्षिण सातार्‍याकडील जैन मंडळींच्या मुखीं असलेल्या या ओव्या आहेत जैनांच्या मध्यें बस्तीला (देवळामध्यें) रोज सकाळीं नियमानें व स्नान करून सोवळ्यानें जाण्याची पद्धत आहे, त्याची हकीकत इथें सुरवातीलाच आली आहे. बस्तीला जाऊन एका कोपर्‍यांत उभें रहावयाचें आणि पूज्यदेवतेला (अर्ह्रत्) नेत्र उघडून आशीर्वाद मागावयाचा अशी जी चाल आहे, तीहि इथें सांगण्यांत आली आहे. त्याचप्रमाणें उठल्याबरोबर दररोज देवाचें नांव प्रथम घ्यावयाचें म्हणजे मनाची शांति होते अशी जी समजूत आहे, तिचाहि इथें उल्लेख आलेला आहे. अतिशय भाविक मनानें व दृढ श्रद्धेनें देवाचा विचार करणार्‍या सामान्य मनाचें हें दिग्दर्शन आहे.
समाजामध्यें सार्वमान्य झालेल्या इतर प्रमुख देवतांचीं गाणीं यापुढें स्वतंत्रपणें व विस्तारानें दिलेली आहेत. इथें आलेली हीं या प्रकारचीं गाणीं मात्र अतिशय मर्यादित क्षेत्रांतील ठरतील.
या प्रकरणाचे सुरवातीस दिलेल्या सर्व देवांच्यावरील एकत्र झालेल्या ओव्या हिंदु समाजामध्यें बहुतेक सर्वांच्याच मुखीं असलेल्या आढळतात. एकंदरीनें देवाबद्दलची श्रद्धा व भावना सर्व समाजामध्यें थोड्याबहुत फरकानें सारखीच वावरत असलेली यावरून आढळून येते. परंतु फरक दिसतो तो आराध्य देवतेमध्यें आणि तिच्या निमित्तानें निर्माण झालेल्या संस्कृतीच्या संवर्धनामध्यें, इतकेंच काय तें !

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2013-12-20T05:09:26.6330000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

air drying

  • न. वातशुष्कन 
RANDOM WORD

Did you know?

लग्न ठरवितांना पत्रिका पाहणे किती योग्य आहे? पत्रिका पाहूनही कांही विवाह अयशस्वी कां होतात
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site