स्त्रीधन - सासुरवास

लोकगीतातील स्त्रीधन म्हणजे मराठीतील एक अमूल्य ठेवा आहे, तो आपण पुढील पिढीसाठी जतन करून ठेवला पाहिजे.

ज्या घरामध्यें नवरा बघून मुलीला द्यावयाची त्या घरामध्यें असेल त्यामध्यें सुख मानून तिनें जगलें पाहिजे, असा सक्त इषारा पूर्वी मुलीला दिला जात असे. त्यामुळें मुलगीहि त्या भावनेला चिकटून रहावयाची शिकस्त करावयाची. सुरवातीला कितीहि चांगलें स्थळ बघून दिलें तरी तेथील माणसें केव्हां बिथरतील आणि कोणता आळ केव्हां घेतील याचा नेम नसायचा ! त्यामुळेंच ही शिकवण मुलीला वडीलधारी मंडळी देत आणि मुलगीहि ती पचनीं पाडण्याचा प्रयत्‍न करीत असे !
परंतु एवढें करूनहि सासुरवास नशिबाचा टळत असेच असें नाहीं. तो हटकून पुढें यायचाच ! अर्थात् कांहीं मुलींच्या नशिबीं तो लिहिलेला नसेहि; परंतु अशीं उदाहरणें फारच थोडीं. सर्वत्र सासुरवास हा कानींकपाळीं लिहिलेलाच असे ! नाही म्हणायला त्याचें प्रमाण बरीक कमीजास्त दिसून येई इतकेंच काय तें.
एखाद्या मुलीला सासुरवास होतो आहे किंवा नाहीं हें सुरवातीला कळत नसे; आणि मुलीखेरीज अगर प्रत्यक्ष पाहिल्याखेरीज कोणाच्यातरी करवीं तो ऐकायला आला, तर त्यावर कुणी सहसा विसंबून रहात नसे. तथापि या नको असलेल्या गोष्टीचा उलगडा होई तो मात्र असा-
भाऊ भैनीच्या ग दारीं        भर उनाचा कहर
                    दोन पहाट दुपार
भाऊ भैनीच्या ग दारीं        गेला कोणा समयानं
                    गर्दी केली उनाळ्यानं
भाऊ भैनीच्या ग दारीं        उबा र्‍हाईला अंगनीं
                    न्हाई घंगाळांत पाणी
भाऊ भैनीच्या ग दारीं        सासुरवास ये कानीं
                    झालं काळजाच पाणी    
आल्या पावलीं कसता        उभा गल्लीबर राही
                    भैन आंतुनी पाही
भैनीचा ग सासुरवास        न्हाई ऐकवला कानीं
                    जीन घोड्यावरी आनी
'मरूंदे' भैन म्हनूनी            घोडा फिरविला रानीं
                    न्हाई पाहिलें परतूनी
शेवया बोटव्यांनीं            उतरंड्या आगाशीं
                    भाऊ चालला उपाशी
घरीं वासाचे तांदूळ             काय करतां असून
                    सासुरवाशी ग भैन
घराच्या वळचनींत            उभी र्‍हाईली भैन
                    म्हणे दादा जा भेटून
आंब्याच्या सावलींत            कोयाळ बोल राधा
                    उपाशी गेले दादा
ऐकणाराच्या काळजाचें पाणी करून सोडण्याची शक्ति असलेल्या या गीतांनीं सासुरवाशिणीच्या परिस्थितीचें फारच चित्तवेधक चित्रण केलेलें आहे.
उन्हाळ्याचे दिवस तेव्हां विशेष कामाधानाची निकड मागें नाहीं, म्हणून बहिणीला भेटायला आणि जमलें तर तिला आणायलाहि, बहिणीकडे गेलेल्या भावानें डोळ्यानें बघितलेली ही हकीकत आहे. ऐन उन्हामध्यें तो दुपारीं गेला असतांना धांवत येऊन बहीण त्याला घंगाळांत पाणी ओतीत नाहीं, हातपाय धू म्हणीत नाहीं, उलट तिचा सासुरवास मात्र तिच्या घरच्या हालचालीनें दिसून येतो, घरच्या माणसांच्या तोंडून वेड्यावाकड्या भाषेंत ऐकायला मिळतो, यामुळें इथें भाऊ व्याकूळ झाला आहे. त्याच्या काळजानें ठाव सोडला आहे ! त्याच्याच्यानें घरच्या माणसांची बडबड नि बहिणीचे होणारे हाल ऐकवेनात व सहन होईनात म्हणून तो रस्त्यावर जाऊन तिचें ओझरतें दर्शन घडतें का पहावें, यासाठीं लांबूनच कसता होऊन डोकावतो आहे आणि तीहि तो कुठं दिसतोय का म्हणून उतावीळ झाली आहे, अशी काळजाला जाऊन भिडणारी कथा हीं गीतें सांगत आहेत.
अशा अवस्थेंत बहिणीला नेणें योग्य न वाटल्यानें इथें भाऊ घोड्यावर बसून माघारीं देखील बघवेना एवढा तो व्याकूळ झाला आहे.
आणि तें बघून इकडे बहिणीचें ह्रदय पेटलें आहे ! घरांतील उतरंडीं शेवया बोटव्यांनी भरल्या असतांनाहि आपण भावाला जेवूं घालूं शकलों नाहीं याचें तिला अपार दुःख झालें आहे. वासाचे तांदूळ घरांत असतांनाहि भावाला तसेंच जावें लागलें, म्हणून ती घराच्या वळचणीखालीं येऊन दूरवर दिसणार्‍या भावाला डोळे भरून पहात आलेला हुंदका आवरीत आहे. दादाला भेटून तरी जा म्हणावयाचें आहे पण आवाज फुटत नाहीं ! आंब्याच्या सावलींत उभी राहून बिचारी कोकिळेसारखा साद घालते आहे कीं, माझे दादा उपाशी गेले !'
सासुरवाशिणीच्या काळजाची हालचाल दर्शविणारी हीं गीतें विशेष ह्रद्य आहेत यांत शंका नाहीं.
सासुरवाशिणीचा दुसरा एक प्रकार यापेक्षां निराळा आढळतो तो असा-
बंधुजी विचारीतो            भैना सासुरवास कसा
सावळ्या बंदुराया            बरम्या लिवून गेला तसा
बंधुजी विचारीतो            भैना सासुरवास कसा
चिताकाचा फासा            गळीं रुतला सांगूं कसा
एखादा भाऊ बहिणीला भेटूं शकला आणि त्यानें कसें काय चालिलें आहे म्हणून तिच्याजवळ विचारपूस केली, तर ती असें मोठें ह्रदयस्पर्शी उत्तर देतें आहे. ब्रह्मदेवानें कपाळावर ओढलेल्या रेघेप्रमाणें अगर विधिलिखिताप्रमाणें चाललें आहे, असें सांगणार्‍या बहिणीचें केवढें हें मोठें मन ! घरच्या सासुरवासाबद्दल अवाक्षरहि न बोलतां नशिबांत आहे तसें चाललें आहे, हें मोघम बोलून नकळत कांहीं सूचित करण्याची ही तर्‍हा विलक्षण चित्ताकर्षक तशीच कल्पना सौष्ठव दर्शविणारीहि आहे.
हौसेनें केलेला 'चिताका' सारखा सोन्याचा दागिना गळ्यांत रुतल्याकारणानें नकोसा वाटावा, तसें माझें चाललें असल्याचें एक निराळें उत्तर इथें बहिणीनें भावाला दिलेलें आहे ! या उत्तरांतहि तिची अक्कलहुषारी दिसून येत आहे.
अशा प्रश्नोत्तराचे वेळीं भाऊ मग बहिणीची समजूत घालायचा प्रयत्‍न करीत असतो, तोहि पाहण्याजोगा आहे -
बंधुजी म्हनीयीतो            भैना दिल्या ग घरीं र्‍हावं
लाडके राजूबाई            भांडं न्हवं तें बदलावं
आज सासुरवाशीन            घरीं जात्याचं झाडनं
पोटींच्या बाळकानं            पुढं फिटल पारनं
दिल्या घरीच तुला आहे त्यांत सुख मानून रहाणें भाग असल्याची गोष्ट पटवून देतांना भावानें इथें भांड्याचा दाखला घेतला आहे. एखादें भांडें बदलून घ्यावें तसा हा प्रकार नव्हें हें तो सांगतो आहे. या त्याच्या सांगण्यावरून जुन्या काळीं पुनर्विवाहाची चाल निदान प्रतिष्ठित घराण्यांत तरी नव्हती; आणि सर्व सहन करून गिळीत रहावें पण काडीमोडीची अपेक्षा करूं नये, हें मनावर कटाक्षानें बिंबविण्याचा प्रयत्‍न होत असे, हें दिसून येत आहे. या ठिकाणीं आज त्रास होत असला तरी उद्यां मुलें तुझें नशीब उघडतील, हा आशावादहि भावानें बहिणीपुढें ठेवलेला आहे.
सासर एवडा वस            नको करूंसा सासूबाई
दारींच्या चाफ्यापाई            दूर देशाची आली जाई
सासुरवाशिणीनें या गीतांत सासूशी कानगोष्ट केलेली आहे. आणि ती करीत असतांना मोठी सुंदर उपमा तिच्यापुढें तिनें ठेविली आहे. ती म्हणते आहे कीं, तुझ्या दारांत चांफा होता म्हणून त्याला बिलगण्यासाठीं जाई होऊन मी आलें आहें तेव्हां माझा अव्हेर करूं नकोस ! स्वतःला मुलाप्रमाणें सांभाळ म्हणून सासूला सून करीत असलेली ही विनंति काव्यानंदाच्या दृष्टीनें एक नमुनेदार मासला म्हणून पहाण्याजोगी आहे.
सासुरवासिनी मला            येती तुजी कींव
सासरीं गेली मैना            तिच्यापशीं माजा जीव
सासुरवासिनी                बस माज्या ओसरीला
तुज्या ग शीनची            मैना माजी सासर्‍याला
शेजारणीनें सासुरवाशिणीची घातलेली समजूत इथें रंगविलेली आहे. आपली मुलगीहि सासरीं असल्याने व ती याच मुलीच्या वयाची असल्यामुळें तिला हिच्याबद्दल वाटणारी हळहळ तिनें इथें व्यक्त केलेली आहे. जिव्हाळ्यानें होणारी कानगोष्ट या दृष्टीनें या ओव्या अभ्यासण्यासारख्या आहेत.
जातीसाठी माती            बाई खातांना लाग वाळू
पित्या माज्या दौलता        ढाण्या वागा मी तुजं बाळू
बारीक पिठायाची            बाई भाकरी चौघडी
बया माजीच्या जेवनाची        याद हुतीया घडीघडी
या गीतांनीं सासुरवाशिणीनें शेजारणिला दिलेलें बाणेदार उत्तर सांगितलें आहे. वडिलांच्या इभ्रतीसाठीं मी हें सारें सहन करीत आहें, असें सांगून ती म्हणते कीं, माती खातांन वाळूचा घास तोंडात आला तरी बिनबोभाट गिळावा लागतो आहे. याचा अर्थ असा कीं, कोंड्याचा मांडा करीत ती दिवस काढते आहे किंवा शिळेंपाकें तिच्या वांट्याला येतें आहे ! अशा वेळीं आईच्या हातच्या चार पदर सुटणार्‍या भाकरीची चव तिच्या ओठांवर घोळत असल्याचें सांगून ती मन हलकें करूं पहात आहे.
आणि एवढें होऊनहि जर ती एकांतात विचार करीत बसली, तर मग तापलेल्या तव्यांत लाह्या फुटाव्यात, तशीं शेंकडों गीतें तिच्या ओठांवर घोळूं लागतात. हुंदक्यांच्या साथीवर ती आपल्या भावगीताला वाचा फोडते -
जिवाला माज्या जड            कसं कळालं जातां जातां
माज्या त्या बयानं            तांब्या ठेवला तोंद धुतां
जिवाला माज्या जड            कसं कळालं जातां जातां
सावळ्या बंधुजीनं            सान सारीली गंध लेतां
जिवाला माज्या जड            कसं कळालं रानामंदीं
माज्या ग पिताजीला        कडूं लागलं पानामंदीं
आपणाला त्रास होतो आहे याची बातमी आईला, भावाला व वडिलांना कशी कळली याची हकीकत सासुरवाशिणीनें तोंड धुतांना तांब्या खालीं ठेवणें गंध लावतां लावतां सहाण बाजूला सारणें आणि पानामध्यें कडवटपणा येणें या क्रियांनी अनुक्रमें सांगितली आहे. अशा प्रकारची ही कल्पना करून आणि तिने असें कुणाचें तरी घडलें होतें, असें मागें केव्हांतरी ऐकल्या भरवशावर विसंबून, आपलें समाधान उभें केलें आहे.
जिवाला माज्या जड            शेजी बघती सान्यांतून
बया माज्या-मालणीच्या        गंगा लोटल्या डोळ्यांतून
जिवाला माज्या जड            मी ग उंबर्‍या दिलं उसं
माज्या ग मालणीला        न्हाई कळालं असं कसं
जिवाला माज्या जड            जावा बगूनी गेल्या शेतां
पिता माजा दवलत            आला सुक्कीर उगवतां
जिवाला माज्या जड            आयाबायांनी भरला सोप
माजी ती बयाबाई            आली वाचीन टाकी झेपा
जिवाला माज्या जड            कसं कळालं एकाएकीं
सावळा बंधुराया            हातीं धोतर धूम ठोकी
आपल्याला बरें नाहीं हें आईला कसें कळलें नाही याची रुखरुख मनाला लागली नाहीं, तोंच सगळ्यां आयाबाया जमल्या असतां वाघिणीसारखी झेपा फटींतून (सान्यांतून) डोकावून पहात आहेत, पण आईचे डोळे आसवांनीं भरून आले आहेत; जावा बघून शेताला गेल्या आहेत, पण शुक्राच्या चांदणीच्या उदयाबरोबर वडील येऊन पोंचले आहेत, असा विरोधी भावनाविष्कार इथें मोठ्या कुशलतेनें व्यक्त झालेला आहे. एकाएकीं बातमी कळल्यामुळें हातांत धोतर घेऊन भाऊ धांवत आल्याबद्दल अभिमानाचाहि उल्लेख या गीतामध्यें आलेला आहे. खेडुत मंडळी गांवीं जातांना धोतर घेऊन जातात, या चालरीतीचाहि इथें मुद्दाम उल्लेख आलेला आहे, असें यावरून दिसतें.
जिवाला माज्या जड            धरनीं लोळती माज केस
माजे तूं बयाबाई            डोकं घेऊनी मांडीं बस
जिवाला माज्या जड            कसं कळालं हरनीला
बया माज्या मालनीचा        पाय ठरना धरनीला
जिवाला माज्या जड            कोन माज्या कळकळीचं
बयाचीं माज्या बाळं            वाघ सुटल साकळींच
जिवाला माज्या जड            माजीं दुखतीं नकंबोटं
बया माजी मालन            माजी बैदीन गेली कुठं
जिवाला माज्या जड            कसं कळालं मायबापा
अंगनीं होता चांफा            कळ्या पडती झपांझपां
जिवाला माज्या जड            कसं कळालं माज्या आ
अंगनीं हूती जाई            कळ्या पडती घाई घाई
जिवाला माज्या जड            कोर्‍या कागदीं जलदीं लिवा
आत्ती माजी मावळन        दूर देशींची यील कवा
मोठे सुंदर दृष्टांत देऊन आईवडिलांना आपल्या दुखण्याची बातमी कशी कळली याची चित्तवेधक हकीकत या गीतांनीं दिलेली आहे. अंगणातील चांफ्याच्या आणि जाईच्या कळ्या भराभर पडल्यामुळें ही बातमी आईवडिलांना समजली, ही कल्पना खरोखरोच मोठ्या कवीला देखील वेड लावणारी आहे !
सासुरवाशिणीनें इथें आपल्या दुखण्याचा उल्लेख केला असून आपणाला बरें करायला साखळी सुटलेल्या वाघासारखे भाऊ धावून आल्याचें सांगून तिनें दूर गांवीं असलेल्या आतेला बोलावून घ्या म्हणून पत्र लिहायलाहि सुचविलें आहे. पूर्वीच्या काळीं लांबच्या गांवाला दुसरा मुलूख अगर देश मानीत ! इथें 'देश' हा शब्द त्याच अर्थानें आलेला आहे.
आपले केस धरणीवर लोळल्यामुळें सौभाग्याला धक्का पोंचूं नये या अपेक्षेनें सासुरवाशीण इथें आईला मांडीवर डोकें घे म्हणते आहे. जुन्या काळीं सुहासिनीबाई केस मोकळे सोडीत नसे, या समजुतीचा हा आविष्कार असावा.
जिवाला माज्या जड            माज्या जिवाच धनी कोन
सावळ्या बंधुरजा            शान्या शाईरा मनीं जान
जिवाला माझ्या जड            कसं कळालं चावडींत
हावशा माज कांत            कडूं लागलं पानांत
जिवाला माज्या जड            गरड लिंबाला घाली मिठी
हौशा ते माज कांत            इष्ट मैतर झाले कष्टी
या गीतांनीं सासुरवाशिणीच्या नवर्‍याचें चित्र रंगविलें आहे. तो आपल्या जिवाचा धनी आहे आणि चावडीवर पान खात बसला असतां त्याला ही बातमी समजली, असें सासुरवाशीण इथें बोलून दाखवीत आहे. जुन्या काळीं इतर मंडळींच्या समोर नवरा बायकोंनीं न बोलण्याची चल होती ती या उल्लेखावरून लक्षांत येते. त्याचप्रमाणें खेडुत मंडळी सतत पान खाण्यांत दंग असतात व पान इतरांना देऊं करण्यांत अभिमान बाळगतात त्याचीहि कल्पना यावरून येते. बायको आजारी झाल्याचें कळतांच नवरा गरड्या लिंबाला मिठीमारून दुःख शमवीत आहे व त्याचे मित्रमंडळ कष्टी झालें आहे, अशी माहितीहि या गीतानें सांगितली आहे !
सासू सुनाचं भांडान            ल्योक ऐकतो ग दारीं
तूं उगीच बस नारी            म्हातारीला तोंड भारी
सासू सुनचं भांडान            ल्योक कीं ग दारीं उभा
अस्तुरीला देतो मुभा        कर म्हातारीचा भुगा
सासू अत्याबाई            काम करूं करूं मेल्या
आमच्या राज्यामंदीं            गिरन्या बाई आल्या
भारताराच्या राजीं            कांचचा ग बंगला
पुतराच्या राजीं            वारा धुंधूक लागला
सासूसुनांच्या मध्यें होणारी कुरबूर आणि त्यामुळें सासू, सून व नवरा यांनी व्यक्त केलेले विचार या ओव्यांत गुंफिलेले आहेत. हा मोठा गंमतीदर भावनाविष्कार आहे यांत शंका नाहीं. एवीतेवीं म्हातारीला फार तोंड सुटलेंच आहे तेव्हां तूं ऐकलें न ऐकलें करून शांत रहा किंवा बोलून तिला हैराण कर असा इषारा इथें नवरा बायकोला देत आहे ! आणि तें ऐकून बायको सासूला सांगते आहे कीं, आमच्या राज्यांत आतां गिरण्या झाल्या आहेत, तेंव्हा उठतां बसतां तुमच्या कामाचें कौतुक नको आहे ! आणि सासू सुनेचें हें उलट बोलणें ऐकून मनांतल्या मनांत चरफडते आहे कीं, नवर्‍याच्या हयातींत मी सुरक्षित होतें, पण मुलाच्या राज्यांत माझी धडगत दिसत नाहीं  !
खेड्यामध्यें आईला 'म्हातारी' असे संबोधण्याची जी पद्धति आहे, तिचा या ठिकाणीं मुद्दाम तसाच उल्लेख आलेला दिसतो.
गुज ग बोलायला            दार माळीचं ढकलावं
माजे तूं भैनाबाई            मग हुरदं उकलावं
गुज ग बोलायाला            बाई तुळशीचं झाड
चांद माळीच्या गेला आड        मायलेकीचं गुज गोड
दिव्याला भरायानं            घाला दिव्याला जोड वाती
वडील बहिनी ग            गूज बोलूंया सार्‍या रातीं
देऊनी घेऊनी                न्हाई पुरत डोगर
वडील बहिनी ग            तुज्या बोलाचा आधार
इथें माहेरीं आलेल्या सासुरवाशिणीला आईशीं मोठ्या बहिणीशीं किती बोलावें नि किती नको असें झालें आहे  ! त्यासाठीं ती दार बंद करून माजघरांत बसावें किंवा तुळशीच्या कट्ट्यावर बसावें असें सुचवीत आहे. हेतु एवढाच कीं, इतर कोणीं तें बोलणें ऐकूं नये. हें बोलणें रात्रभर चालणार असल्यानें व त्यांतून इतर कांहीं मिळालें नाहीं, तरी विश्वासाच्या माणसाजावळ मन मोकळें करून मिळणारें समाधान हेंच जीवनाचा आधार होणार असल्याची काळजाचा ठाव घेणारी भावना इथें चित्रित झालेली आहे.

N/A

References : N/A
Last Updated : December 20, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP