शिवाजी राजांचा पोवाडा - भाग ७

शिवाजी महाराजांच्या कार्याची प्रेरणा घेऊन महात्मा फुल्यांनी, त्यांचे चरित्र अशिक्षित लोकांना समजेल असे पोवाड्याच्या माध्यमातून लिहीले.


शिवाजी तों मसलत देई मित्र तान्हाजीला ।
बेत छाप्याचा सुचवीला ॥
तान्हाजींने भाऊ धाकटा सोबत घेतला ॥
मावळी हजार फौजेला ॥
सुन्या रात्रीं सिंहगड पायीं जाऊन ठेपला ।
योजिलें दोर शिडीला ॥
दोरीची शिडी बांधली शिपाई कमरेला ।
हळुच वर चडवीला ॥
थोडी चाहूल कळली सावध उदेबानाला ।
करी तयार लोकांला ॥
थोडया लोकांसवें तान्हाजी त्यांवर पडला ।
घाबरा गडकरी केला ॥
रणीं तान्हाजी पडे मावळे पळती बाजूला ।
सूर्याजी येऊन ठेपला ॥
धीर मोडक्या देई परत नेई सर्वाला ।
उगवी बंधु सूडाला ॥
उदेबान मारिला बाकिच्या रजपुताला ।
घेतलें सिंहगडाला ॥
गड हातीं लागला तान्हाजी बळी घेतला ।
झालें दु:ख शिवाजीला ॥
सिंहगडीं मुख्य केलें धाकटया सुर्याजीला ।
रुप्याचीं कडीं मावळयाला ॥
पुरंधर माहूली घेई वरकड किल्ल्याला ।
पिडा जंजिरी सिद्दयाला ॥
सुरत पुन्हां लुटी मागीं झाडी मोगलाला ।
मोगल जेरदस्त केला ॥
कैद करी शिवाजी बाकी उरल्या फौजेला ।
त्यांमधीं अनेक स्त्रीयांला
सुंदर स्त्रीया परत पाठवी नाहीं भाळला ।
लाजवी औरंगजीबाला ॥
सरनौबत वीर पाठवी खानदेशाला ।
शुरु केलें चौथाईला ॥
जलदी मोगल धाडी मोहबतखानाला ।
देई मोठया फौजेला ॥
औढापट्टा घेऊन वेढी साल्हेर किल्ल्याला ।
धिंगाणा दक्षिणेंत केला ॥
गुजर उडी घाली सामना शत्रूचा केला ।
मोरोबा पठाण पंक्तीला ॥
लढतां पळ काढी दावी भ्याला मोगलाला ।
जसा खरा मोड झाला ॥
तों मराठे पळती मोगल गर्वानें फुगला ।
आळसानें ढिला पडला ॥
गुजर संधी पाहून परत मुरडला ।
चुराडा मोगलाचा केला ॥
बेवीस उमराव पाडले रणभूमीला ।
नाहीं गणती शिपायांला ॥
लहान मोठे कैदी बाकी सर्व जखम्यांला ।
पाठवी रायगडाला ॥
मोगल वेढा झोडून मार देत खबरीला ।
गोडबोल्या गोवी ममतेला ॥
एकसारखें औषध पाणी देई सर्वांला ।
निवडलें नाहीं शत्रूला ॥
जखमा ब-या होतां खुलासा सर्वांचा केला ।
राहिले ठेवी चाकरीला ॥
शिवाजीची कीर्ति चौमुलखीं डंका वाजला ।
शिवाजी धनी आवडला ॥
मोगल यवनी शिपायी सोडी चाकरीला ।
हाजरी देती शिवाजीला ॥
पोर्चुग्यास धमकी देई मागे खंडणीला ।
बंदरी किल्ला वेढीला ॥
मधींच इंग्रज भ्याला जपे मुंबे किल्ल्याला ।
बनया धर्मा आड झाला ॥
दिल्लीस परत नेलें सुलतान माजूमाला ।
दुजें मोहबतखानाला ॥
उभयतांचा बदली खानजाहान आला ।
मुख्य दक्षणेचा केला ॥
मोगलाला धूर देऊन लुटलें मुलखाला ।
गोवळकुंडीं उगवला ॥
मोठी खंडणी घेई धाकीं धरीं निजामाला ।
सुखें मग रायगडी गेला ॥
मोगलाचे मुलखीं धाडी स्वार लुटायाला ।
लुटलें हुबळी शहराला ॥
समुद्रकांठीं गांवें लुटी घेई जाहाजांला ।
केले खुलें देसाईला ॥
परळी सातारा किल्ले घेई पांडवगडला ।
आणिक चार किल्ल्यांला ॥

॥चाल॥
हुकूम विजापुरी झाला । सोडिलें बहुत फौजेला ॥
द्यावा त्रास शिवाजीला । घ्यावें त्याचे मुलखाला ॥
शिवाजी सोडी गुजराला । कोंडी आबदुल करीमाला ॥
केला माहग दाण्याला । शत्रु अती जेर केला ॥
आर्जव करणें शिकला । भोंदिलें सेनापतीला ॥
निघून विजापुरीं गेला । क्रोध शिवाजीस आला ॥
रागाऊन लिहिलें पत्राला । निषेधी प्रतापरावाला ॥
गुजर मनांत लाजला । निघून वराडांत मेला ॥

॥चाल॥
आबदुल्यानें । बेशर्म्यानें ॥
फौज घेऊन । आला निघून ॥
राव प्रताप । झाला संताप ॥
आला घाईने । गाठी बतानें ॥
घुसे स्वताने । लढे त्वेषानें ॥
घेई घालून । गेला मरुन ॥
प्रतापराव पडतां मोड फौजेचा झाला ।
पाठलाग मराठयाचा केला ॥
तोफ गोळया पोटीं दडती भिडती पन्हाळयाला ।
गेले नाहीं शरण शत्रूला ॥
अकस्मात हंसाजी मोहिता प्रसंगीं आला ।
हल्ला शत्रूवर केला ॥
गुजर दळ मागें फिरुन मारी यवनाला ।
पळीवलें विजापुराला ॥
शिवाजीनें हंसाजीला सरनौबत केला ।
मोठा अधिकार दिला ॥
हंबिरराव पद सोडलें त्याच्या नांवाला ।
शिवाजी मनीं सुखी झाला ॥
सेनापतीचे गुण मागें नाहीं विसरला ।
पोशी सर्वं कुटुंबाला ॥
प्रतापराव-कन्या सून केली आपल्याला ।
व्याही केलें गुजराला ॥
काशीकर गंगाभट घाली डौल धर्माचा ।
केला खेळ गारुडयाचा ॥
लुटारु शिवाजी लुटला धाक गृह फौजेचा ।
खर्च नको दारुगोळीचा ॥
बहुरुपी सोंग तूलादान सोनें घेण्याचा ।
पवाडा गातो शिवाजीचा ॥
कुळवाडी-भूषण पवाडा गातो भोसल्याचा ।
छत्रपती शिवाजीचा ॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : January 18, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP