शिवाजी राजांचा पोवाडा - भाग ५

शिवाजी महाराजांच्या कार्याची प्रेरणा घेऊन महात्मा फुल्यांनी, त्यांचे चरित्र अशिक्षित लोकांना समजेल असे पोवाड्याच्या माध्यमातून लिहीले.


सावंत पत्र लिही पाठवी विजापूरास ।
मागे फौज कुमकेस ॥
बाजी घोरपडा बल्लोळखान येती साह्यास ।
शिवाजी करी तयारीस ॥
त्वरा करुन गेला छापा घाली मुधोळास ।
मारिले बाजी घोरपडयास ॥
भाऊबंद मारिले बाकी शिपाइ लोकांस ।
घेतलें बापसूडास ॥
सावंताची खोड मोडून ठेवी चाकरीस ।
धमकी देई पोर्च्युग्यास ॥
नवे किल्ले बांधी डागडुजी केली सर्वास ।
बांधिले नव्या जाहजास ॥
जळी सेनापती केले ज्यास भीती पोर्च्गुगीस ।
शोभला हुद्दा भंडा-यास ॥
विजापूरचा वजीर गुप्त लिही शिवाजीस ।
उभयतां आणलें एकीस ॥
व्यंकोजी पुत्रा घेइ शाहाजी आला भेटीस ।
शिवाजी लागे चरणास ॥
शाहाजीचे सद्‍गुण गाया नाहीं आवकास ।
थोडेसे गाऊं अखेरीस ॥
सुखसोहळे झाले उपमा लाजे मनास ।
उणें स्वर्गी सुखास ॥
अपूर्व वस्तू घेऊन जाई विजापूरास ।
भेट मग देई यवनास ॥
पराक्रमी शिवाजी पाळी पाऊण लक्षास ।
साजे यवनी स्नेहास ॥
विजापूरचा स्नेह होता लढे मोगलास ।
घेतले बहूतां किल्ल्यांस ॥
सर्व प्रांती लूट धुमाळी आणिलें जेरीस ।
घाबरें केले सर्वांस ॥
संतापानें मोंगल नेमी शाइस्तेखानास ।
जलदि केली घेई पुण्यास ॥
चाकणास जाऊन दावी भय फिरंगोजीस ।
फुकट मागे किल्ल्यास ॥
मास दोन लढला घेऊन सर्व फौजेस ।
खान खाई मनास ।
आखेर दारु घालून उडवी एका बुर्जास ।
वाट केली आंत जायास ॥
वारोंवार हल्ले गर्दी करुं पाहे प्रवेश ।
शाईस्ता पठाण पाठीस ॥
मागें पळति सर्व कोणी मानिना हुकूमास ।
भीति आंतल्या मर्दास ॥
लागोपाठ मार देत हटवि पठाणास ।
खचला खान हिंमतीस ॥
प्रात:काळी संतोषानें खालीं केलें किल्ल्यास ।
देई मुसलमानास ॥
फिरंगोजीला भेट देतां खुषी झाली यवनास ।
देऊन मान सोडी सर्वास ॥
शिवाजीची भेट घेतां सन्मान दिला त्यास ।
वाढवी मोठया पदवीस ॥
फिरंगोजीचें नांव घेतां मनी होतो उल्हास ।
पीढीजाद चाकरीस ॥
येशवंतशिंग आले घेऊन मोठया फौजेस ।
मदत शाईस्तेखानास ॥
सरनौबत भौती लुटी नगरी मुलखास ।
जाळून पाडिला ओस ॥
पाठी लागुन मोंगल मारी त्याच्या स्वारांस ।
जखमा केल्या नेताजीस ॥
राजगड सोडून राहीला सिंव्हगडास ।
पाहून मोगलसेनेस ।
जिजीबाईचे मुळचें घर होतें पुण्यास ।
खान राही तेथें वस्तीस ॥
मराठयास चौकी बंदी गांवांत शिरण्यास ।
होता भीत शिवाजीस ॥
लग्नव-हाडी घुसे केला पुण्यांत प्रवेश ।
मावळ सोबत पंचवीस ॥
माडीवर जाऊन फोडी एका खिडकीस ।
कळालें घरांत स्त्रीयांस ।
शाइस्त्यास कळतां दोर लावी कठडयास ।
लागला खालीं जायास ॥
शिवाजीनें जलदी गाठूंन वार केला त्यास ।
तोडीलें एका बोटास ॥
स्त्रियपुत्रां सोडून पळे पाठ दिली शत्रूस ।
भित्रा जपला जीवास ॥
आपल्या पाठीस देणे उणें शिपायगिरीस ।
उपमा नाहीं हिजडयास ॥
सर्व लोकांसहित मारिलें खानपुत्रास ।
परतला सिंहगडास ॥
डौलाने मोंगल भौती फिरवी तरवारीस ।
दावी भय शिवाजीस ॥
समीप येऊं दिले हुकूम सरबत्तीस ।
शत्रू पळाला भिऊन मारास ।
करनाटकी बदली धाडी शाइस्तेखानास ।
मुख्य केलें माजमास ॥
राजापुरीं जाई शिवाजी जमवी फौजेस ।
दावी भय पोर्च्युग्यास ॥
सर्व तयारी केली निघाला नाशिक तीर्थास ।
हुल कसी दिली सर्वांस ॥
मध्यरात्री घेई बरोबर थोड्या स्वारांस ।
दाखल झाला सुर्तेस ॥
यथासांग साहा दिवस लुटी शहरास ।
सुखी मग गेला गडास ॥
बेदनूराहून पत्र आलें देई वाचायास ।
आपण बसे ऐकायास ॥
शिपायाचे बच्चे शाहाजी गेले शिकारीस ।
लागले हरणापाठीस ॥
घोडया ठेंच लागे उभयतां आले जमीनीस ।
शाहाजी मुकला प्राणास ॥
पती कैलासा गेले कळालें जिजीबाईस ।
पार मग नाही दु:खास ॥
भूमी धडपडे बैसे रडून गाई गुणांस ।
घेई पुढें शिवाजीस ॥
॥चाल॥
अतीरुपवान बहु आगळा ।
जसा रेखला चित्रीं पूतळा ॥
सवतीवर लोटती बाळा ।
डाग लाविला कुणबी कुळा ॥
सवतीला कसे तरी टाळा ।
कज्जा काढला पति मोकळा ॥
ख-या केंसानें कापि का गळा ।
नादी लागला शब्द कोकिळा ॥
मूख दुर्बळ राही वेगळा ।
अती पिकला चितेचा मळा ॥
झाला शाहाजी होता सोहळा ।
मनी भूलला पाहूनी चाळा ॥
बहुचका घेती जपमळा ।
जाती देऊळा दाविती मोळा ॥
थाट चकपाक नाटकशाळा ।
होती कोगळा जशा निर्मळा ॥
ख-या डंखिणी घाली वेटोळा ।
विषचुंबनी देती गरळा ॥
झाला संसारी अती घोटाळा ।
करी कंटाळा आठी कपाळा ॥
मनी भिऊन पित्याच्या कुळा ।
पळ काढला गेले मातुळा ॥
छातीवर ठेवल्या शिळा ।
नाही रचला सवत सोहळा ॥
॥चाल॥
कमानीवर । लावले तीर ॥
नेत्रकटार । मारी कठोर ॥
सवदागर । प्रीत व्यापार ॥
लावला घोर । सांगतें सार ॥
शिपाई शूर । जुना चाकर ॥
मोडक्या धीर । राखी नगर ॥
आमदानगर । विजापूरकर ॥
मंत्रि मुरार । घेई विचार ॥
वेळनसार । देई उत्तर ॥
धूर्त चतुर । लढला फार ॥
छाती करार । करी फीतुर ॥
गुणगंभीर । लाविला नीर ॥
होता लायक । पुंडनायक ॥
स्वामीसेवक । खरा भाविक ॥
सिंहगडावर गेला बेत केला क्रियेचा ॥
बजावला धर्म पुत्राचा ॥
रायगडीं जाई राही शोक करी पित्याचा ।
शत्रु होता आळसाचा ॥
दु:खामधी सुख बंदोबस्त करी राज्याचा ।
पवाडा गातो शिवाजीचा ॥
कुळवाडी-भूषण पवाडा गातो भोसल्याचा ॥
छत्रपती शिवाजीचा ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : January 18, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP