मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|श्यामची आई|
रात्र एकेचाळिसावी

श्यामची आई - रात्र एकेचाळिसावी

’श्यामची आई’ हे पुस्तक सुंदर, सुगंधी आणि सुरसच नसून, हृदयातील सारा जिव्हाळा यात साने गुरूजींनी ओतलेला आहे.


आईजवळ मी नव्हतो. मी दूर शिकत होतो. आईची सेवा न करता मी शिकत होतो. परंतु आईची सेवा करता यावी म्हणून शिकत होतो. त्या दिवशी  रात्री माझ्या स्वप्नात आई आली व मला म्हणाली, "का, रे, नाही भेटायला आलास? तुला त्यांनी कळविले नाही का? त्या दिवशी रागावून गेलास. अजून नाही का राग गेला? लहान मुलांचा राग लौकर जातो; मग तुझा रे कसा नाही जात? ये, मला भेट." सकाळी उठल्यावर ते स्वप्न आठवून मला कसेसेच होई. आज आई फार आजारी नसेल ना, असे मनात येई. पंख असते तर आईजवळ उडून गेलो असतो, असे वाटे. परंतु किती दूर जावयाचे! दोन दिवस जावयाला लागले असते. आगगाडी, आगबोट, बैलगाड्या, किती दूरचा प्रवास!
मला वाईट वाटत होते. जिवाला चैन पडेना. घरी जाऊन आईला भेटून यावे, असे वाटे. परंतु पैसे?
मला एक नवीन मित्र मिळाला होता. त्याचे नाव नामदेवच होते. भक्त नामदेवाचे पंढरपूरच्या पांडुरंगावर जितके प्रेम व जितकी भक्ती होती. तितकेच प्रेम व भक्ती त्या नामदेवाची या श्यामवर होती. जणू तो माझाच झाला होता व मी त्याचा. "यूयं वयं वयं यूयं" असे आम्ही कितीदा म्हणावयाचे! माझ्या ह्रदयातील सारे न बोलताही त्याला कळत  असे. त्या नानकाच्या पदात आहे ना "अन बोलत मेरी बिरथा जानी, अपना नाम जपाया" देवाचे नाव घेतले की पुरे. त्याला आपले दु:ख न बोलताही समजते. नामदेवाला माझे सुखदु:ख समजे. माझा जीवनग्रंथ, ह्रदयग्रंथ त्याला वाचता येत असे माझे डोळे, माझी चर्या तो बरोबर वाचीत असे. जणू आम्ही एकमेकांची रुपे होतो. जणू दोन कुडींत एक मन होते, एक ह्रदय होते. जणू मनाने व ह्रदयाने आम्ही जुळे होतो.
"नामदेव! मला घरी जावेस वाटत आहे. आई फार आजारी आहे, असे वाटते. सारखी हुरहुर लागली आहे." मी म्हटले.
"मग जा, भेटून ये. " तो म्हणाला.
"आईला डोळे भरुन पाहून येईल! पण पैसे?" मी म्हटले.
"काल नाही का माझी मनीऑर्डर आली? जणू ती तुझ्यासाठीच आली आहे. दहा रुपये आहेत. तुला पुरतील? आईला भेटून ये, माझा नमस्कार सांग. जा."नामदेव म्हणाला.
थोडेसे सामान घेऊन मी निघालो. स्टेशनवर नामदेव पोचवावयास आला होता. मी गाडीत बसलो. दोघांचे डोळे भरुन आले होते.
"पत्र लगेच पाठव बरे, श्याम." नामदेव म्हणाला.
"होय." मी म्हटले.
"तुझ्याबरोबर मी आलो असतो. पण पैसे नाहीत. " तो म्हणाला.
"तू माझ्याबरोबर आहेसच." मी म्हटले.
गाडी सुटली. प्रेमळ नामदेव डोळ्यांआड झाला. गाडी सुटली व डोळ्यांतून पाझर सुटले---शतपाझर सुटले. राहून राहून ह्रदय उचंबळून येत होते. गाडीच्या खिडकीच्या बाहेर माझे तोंड होते.अश्रुसिंचन करीत मी जात होतो.
बोरीबंदरवर उतरुन तसाच परभा मी बोटीवर गेलो. कारण गिरगावात भावाला भेटायला गेलो असतो, तर आगबोट चुकली असती. मी आगबोटीत बसलो. लाटांवर बोट नाचत होती. माझे ह्रदयही शतभावनांनी नाचत होते. रवीन्द्रनाथांची गीतांजली माझ्या हातांत होती.
"आई! माझ्या अश्रूंचा हार तुझ्या वक्षस्थळावर रुळेल." हे मी वाचीत होतो. खरेच माझ्या गरीब आईला मी दुसरे काय देणार? माझ्याजवळही अश्रूंशिवाय द्यावयास दुसरे काही नव्हते. मध्येच मी गीतांजली मिटीत असे व समोरच्या उचंबळणार्‍या सागराकडे बघे. या सागरावर शततरंग उसळत होते. एक लाट दुसर्‍या लाटेला जन्म देत होती. माझ्या ह्रदयसागरावर शतस्मृती उसळत होत्या. एक स्मृती दुसर्‍या स्मृतीस जन्म देई. आईच्या शेकडो आठवणी, शेकडो भावनामय प्रसंग---दृष्टीसमोर सारे येत होते. स्वप्नसृष्टीत, स्मृतिसृष्टीत मी ध्यानमग्न ऋषीप्रमाणे रमून गेलो. रंगून गेलो. आईच्या स्मृतिसागरात हा श्याममत्स्य डुंबत होता पोहत होता, नाचत होता.
हर्णै बंदरावर दीपस्तंभ दिसू लागला. हर्णै हर्णै खलाशी  ओरडू लागले. उतरणारे उतारु वळकट्या बांधू लागले. मी आपले लहानसे गाठोडे बांधले. आणखी सातआठ तासांनी आईचे पाय पाहीन, प्रेमाने भरलेले डोहच असे तिचे डोळे पाहीन, असे मनात मी म्हणत होतो.
हर्णै बंदर आले. पडाव बोटीजवळ आले. त्यांत माणसे उतरली.
मीही पडावात उतरलो. बंदरावरुन कोणी तरी माझ्याकडे पाहात होते. माझे तिकडे लक्ष नव्हते. त्या व्यक्तीचे माझ्याकडे लक्ष होते. मला पाहून बंदरावर कोणाचे तरी डोळे भरुन येत होते. कोणाची ती मूर्ती होती?
पडाव उभा राहिला. मी पटकन उतरलो. पाण्यातून बंदरावर आलो. झपझप पावले टाकीत होतो. इतक्यात माझ्या कोण दृष्टीस पडले? मावशी! माझ्या दृष्टीस माझी मावशी पडली. "
"मावशी! तू इकडे कोठे? परत जातेस होय  पुण्याला? आईचे बरे आहे वाटते?" असे मी विचारले. मावशीच्या गंगा-यमुनांनी उत्तर दिले.
"मावशी! बोलत का नाहीस?"मी काकुळतीने विचारले.
"श्याम! तुझी आई, माझी अक्का, देवाजवळ गेली!" ती म्हणाली.
माझा शोकसागर मला आवरेना. आम्ही धर्मशाळेत गेलो. कोणालाही बोलवत नव्हते.
"मला बोलावलेत ग का नाही? मला स्वप्न पडले, म्हणून मी निघालो. स्वप्नात आई मला हाक मारी. परंतु आता कोठची आई? कायमची अंतरली आई!" असे म्हणून मी रडू लागलो.
"श्याम! त्या दिवशी तुझीच सारखी आठवण ती काढीत होती. तूच तिला सारखा दिसत होतास. म्हणे, अजून हट्टीच आहे. श्याम!  दोन दिवसांत अक्का जाईल, असे वाटले नव्हते. मी तुला बोलवावयाचे ठरविले; परंतु त्याच दिवशी अक्का गेली! सारे प्रयत्न केले. तिचे हाल होऊ दिले नाहीत. मी आहे हो तुम्हांला. अक्काने तुम्हांला माझ्या पदरात घातले आहे. मी तुम्हांला आईची आठवण होऊ देणार नाही. उगी, किती रडशील!" मावशी मला समजावीत होती.
"मावशी! माझे केवढाले मनोरथ! माझ्या आईला सुख देईन. तिला फुलासारखी ठेवीन, असे मी मनात म्हणे. परंतु आता कशाला शिकू? शिकून आईची सेवा जर करता येत नसेल, आईच्या उपयोगी पडता येत नसेल, तर कशाला शिकू? " मी म्हणालो.
"तुझ्या भावांसाठी, वडिलांसाठी शीक; आमच्यासाठी शीक, जगासाठी शीक, आईला प्रेम देणार होतास, ते जगाला दे. जगातील दु:खी मातांना दे" मावशी नवीन दृष्टी देत म्हणाली.
"मावशी! तू परत निघालीस?" मी विचारले.
"होय. तेथे माझ्याने राहवेना. तू घरी जा. उद्या तिसरा  दिवस. अस्थिसिंचन उद्या आहे. तू तिचा लाडका: म्हणून उत्तरक्रियेला आलास. येताना अस्थी घेऊन ये. गंगेत नेऊन टाकू." मावशी म्हणाली.
"मावशी! मी घरात कसा जाऊ? अंधारानं भरलेल्या घरात कसा जाऊ" मी म्हटले.
"त्या अंधारात आईचा मुखचंद्र नसला, तरी वडिलांचा तारा आहे. तुझ्या भावाचा तारा आहे. तेथे सारा अंधार नाही. तेथे प्रेम आहे. जा घरी, त्यांना धीर दे. तू शहाणा, विचार करणार, गीतांजली, गीता वाचणारा," मावशी म्हणाली.
"श्याम! आलास का, थांब, हो, देवाला गूळ ठेवते, असे आता मावशी कोण म्हणेल?" मी म्हणालो.
"श्याम! या प्रेमाच्या आठवणी तुझ्याजवळ आहेत. आई गेली, तरी प्रेमरुप आई --- स्मृतिरुप आई ---- तुझ्याजवळ आहे. जेथे जाशील, तेथे आहे. चल, तुझ्यासाठी गाडी ठरवू." असे म्हणून तिने माझ्यासाठी बैलगाडी ठरविली. मावशीचा बोट दूर दिसू लागली.. पडाव सुटायला झाले होते. मावशी निघून गेली. आईची जागा घेणारी मावशी पडावात बसायला निघून गेली.
मी बैलगाडीत बसलो. आईच्या आठवणी येत होत्या. माझ्या जीवनसमुद्रात पुन्हा पुन्हा आईची दिव्य मूर्ती शेकडो लाटांतू वय येत आहे, असे मला दिसे. आईचे कष्ट व हाल मला दिसू लागले. कारुण्यमूर्ती माता! तिचे प्रेम, तिची सेवा पर्वताप्रेमाणे दिसू लागली.
शेवटी मी एकदाचा घरी आलो. मागे एकदा पहाटे असाच आलो होतो. त्या वेळेस ताक करताना आई कृष्णाची मंजूळ गाणी म्हणत होती. आज घरात गाणे कोठले? तेथे हाय हाय होती! घरात एक मिणमिण दिवा जळत होता. भेसूर शांतता होती. मी दार लोटले. दाराला आतून कडी नव्हती. दार उघडले. वडील एका तरटावर बसलेले होते.
"श्याम! दोन दिवस उशीर झाला तुला. गेली हो सोडून, बाळ!" ते म्हणाले.
पुरुषोत्तम जागा झाला. "अण्णा, अण्णा," असे म्हणून तो रडू लागला. मला त्याने मिठी मारली. आम्हांला कोणासही बोलवत नव्हते.
दूर्वांची आजी म्हणाली, " तुझीच आठवण काढीत होती हो श्याम! तिचा लाडका तू. शेवटी तिच्या उत्तरक्रियेला तरी आलास. रडू नको. आता उपाय का आहे? तुम्ही मोठे होईतो हवी होती हे जगायला. परंतु नाही त्याची इच्छा. " मी ऐकत होतो.
अस्थिसंचयनासाठी मी नदीवर गेलो. भटजी बरोबर होते. नदीकाठी जेथे आईचा पुण्यदेह अग्निसात्‍ करण्यात आला होता, तेथे गेलो. आईची भस्ममय मूर्ती तेथे निजलेली होती. जसाच्या तसा भस्ममय देह होता. वार्‍याने इवली देखेल मूर्ती भंगली नव्हती. त्या भस्ममय मूर्तीला मी वंदन केले. सर्व पार्थिवता लोपून पवित्र भस्ममय असा देह  तेथे होता. अत्यंत शुध्द असा भस्ममय आकार तेथे होता. जीवनातील तपश्चर्येने आधीच देह भस्मीभूत झाला होता. आतून जळून गेला होता. शंकराच्या अंगावरील भस्माइतकाच पवित्र झाला होता. मनाने तर ती पवित्र होतीच होती.
लावला, मी हात लावला. भस्ममय मूर्ती भंगली. माझ्या ह्रदयात अभंग मूर्ती निर्माण करुन ती भस्ममय मूर्ती मी मोडली. या नश्वर मूर्तीने कोणाच्या ह्रदयात जर आपणास अनश्वर निर्माण करता आली तर केवढे भाग्य? मी आईच्या अस्थी गोळा केल्या. मंगळसूत्रातील मणी सापडले, ते सौभाग्यदायक म्हणून चुलत्यांनी नेले, स्वत:च्या पत्नीच्या गळ्यात घालण्यासाठी नेले.
सर्व विधी करुन आम्ही घरी गेलो. एकेक दिवस जात होता. पुरुषोत्तमाच्या तोंडून एकेक कहाणी ऐकत दिवस जात होता. आईच्या आठवणीचे पवित्र गुरुपुराण पुरुषोत्तम मजजवळ वाचीत असे व मी ऐकत असे. शेजारच्या इंदू, राधाताई यांनीसुध्दा आठवणी सांगितल्या. आईचे कष्ट ऐकता ऐकता मला हुंदके येत.
आईच्या पिंडदानाचा दिवस आला. आईच्या पिंडांना कावळा पटकन शिवेल की नाही, तिची काही इच्छा राहिली असेल का, असे विचार माझ्या मनात येत होते. पिंडाला कावळा शिवला नाही तर मृतात्म्याला शांती नाही असे म्हणतात. आम्ही नदीवर गेलो. पिंड तयार केले. सर्व विधी झाले. ते पिंड दर्भावर ठेवले. नदीवर कावळा दिसेना. भटजींनी काव काव करुन कावळ्यांना आमंत्रण दिले. "आला, एक कावळा आला, तो दुसराही आला, " चुलते म्हणाले. आम्हांला बरे वाटले. पिंड ठेवून आम्ही बाजूला झालो. कावळे पिंडाजवळ बसत, शिवत ना. काय करावे? पिंडाभोवती घिरट्या घालीन; परंतु स्पर्श करीत ना. मला वाईट वाटू लागले, मी म्हटले, "आई! तुझी इच्छा असेल तर मी लग्न करीन. मी बैरागी होणार नाही. " तरी कावळा शिवेना. चुलते म्हणाले," आम्ही भाऊंना अंतर देणार नाही. त्यांच्यावर, वयनी, प्रेम करु." तरी कावळा शिवेना. पिंड घेऊन ठिकठिकाणी मी नाचलो. माझा जीव रडकुंडीस आला. कावळा जर शिवला नाही तर दर्भाचा कावळा करुन शिववितात; परंतु या गावात या गोष्टीची चर्चा होते. मला वाईट वाटले. मी म्हणालो, " पिंड घेऊन घरी जाऊ. तेथे कदाचित शिवेल. एवढ्यात दर्भाचा नका करु."
नदीवरुन जड अंत:करणाने पिंड घेऊन आम्ही घरी आलो. अंगणाच्या कडेला केळीशेजारी पिंड ठेविले. भोवती कावळे जमले; परंतु एकही शिवेना!
शेवटी माझी दूर्वांची आजी घरातून बाहेर आली. ती म्हणाली, "यशोदे, काही काळजी नको करु. पुरुषोत्तमला मी आहे. त्याचे सारे मी करीन." काय चमत्कार! आजीचे ते आश्वासनपर शब्द ऐकताच झटकन कावळा शिवला.
माझ्या डोळ्यांत पाणी आले. मावशी पुढे एकटी निघून गेली होती. लहान  पुरुषोत्तम घरी आजीजवळ आता राहणार. तो जरा खोड्याळ होता. त्याची आबाळ होईल, त्याला मारतील, रागावतील, हीच आईला काळजी होती. आईला हीच एक चिंता होती. आई! केवढे तुझे प्रेम! तुझ्या प्रेमाला मोजमाप नाही. ते आकाशाहून मोठे व समुद्राहून खोल आहे. ईश्वर किती प्रेममय असेल ह्याची कल्पना ह्या संसारातील आईवरुन येईल. स्वत:च्या प्रेमाची जगाला कल्पना देण्यासाठीच ह्या छोट्या आईला ती जगन्माऊली पाठवीत असते.
गड्यांनो! माझी आई मेली. तिचे जीवन सरले तरी तिची चिंता सरली नव्हती. आईची सारी बाळे जोपर्यंत सुखी नाहीत तोपर्यंत आईला सुख नाही. आईच्या एकाही लेकराच्या लोचनातून जोपर्यंत अश्रू गळत आहेत, त्याच्या तोंडातून हाय हाय उठत आहे, जोपर्यंत त्याला वस्त्र नाही, अन्न नाही, ज्ञान नाही, तोपर्यंत आईची चिंता सरणार नाही. भाऊभाऊ सारे प्रेमाने परस्परांस मदत करतील, श्रेष्ठकनिष्ठ मानणार नाहीत, एकमेकांस वाढवतील, पाळतील, पोसतील, हसवतील, ही जोपर्यंत आईला खात्री नाही तोपर्यंत तिला सुख नाही, शांती नाही, मोक्ष नाही. तोपर्यंत ती रडतच राहणार! तोपर्यंत तिच्या चिंतेची चिता धडधड पेटतच राहणार!"

N/A

References : N/A
Last Updated : February 02, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP