मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|श्यामची आई|
रात्र बाविसावी

श्यामची आई - रात्र बाविसावी

’श्यामची आई’ हे पुस्तक सुंदर, सुगंधी आणि सुरसच नसून, हृदयातील सारा जिव्हाळा यात साने गुरूजींनी ओतलेला आहे.


"दिवाळीचे दिवस जवळ जवळ येत होते. शाळांना सुट्टी झाली होती. मी दापोलीस जवळच शिकत होतो. त्यामुळे सुट्टी होताच घरी गेलो. मला व माझ्या धाकट्या भावांना एकेक नवीन सदरा वडिलांनी केला. परंतु त्यांच्या नेसूची धोतरे मात्र फार फाटली होती. आईने ती सतरांदा शिवली होती. सतरा ठिकाणी शिवली होती. ती आता इतकी विरलीहोती, की शिवणे कठीण झाले होते. आम्हां मुलांना त्यांनी नवीन कपडे केले; परंतु स्वत:ला नवीन धोतरे घेतली नाहीत.
आईला वाईट वाटत होते. परंतु ती काय करणार? तिच्याजवळ थोडेच पैसे होते? किती तरी दिवसांत तिला सुध्दा नवीन लुगडे मिळाले नव्हते. परंतु तिला स्वत:चे इतके वाईट वाटत नसे. परंतु वडिलांचे दैन्य पाहून तिचा जीव करपे. रोज फाटका भाग निर्‍यांमध्ये लपवून वडील वेळ मारुन नेत असत.
मुंबई पुण्याकडचे लोक दिवाळीत घरी येतात. दिवाळीच्या सुमारास बोटी सुरू होतात. समुद्र शांत असतो. मुंबईहून घरी येणारे लोक येताना फटाके, खेळणी वगैरे दिवाळीसाठी मुलांना घेऊन येतात. माझा मोठा भाऊ पुण्यास मामांकडे शिकत होता. तो काही येणार नव्हता. परंतु पुण्याहून कोणसे आमच्या गावी आले होते. त्यांच्या बरोबर पुण्याच्या मामांनी आईला भाऊबीजेचे तीन रुपये पाठविले होते. आमच्यासाठीही खाऊ पाठविला होता.
ते तीन रुपये पाहून आईला आनंद झाला. तिने सर्वांची खुशाली विचारली. रुपये देऊन तो गृहस्थ निघून गेला. आम्ही आईच्या भोवती जमा झालो. ‘मामाने खाऊ पाठविला. आम्हांला दे.’ आम्ही तिच्या पाठीस लागलो. जरदाळू व पेपरमिंटच्या वड्या होत्या. आईने एकेक जरदाळू व दोन दोन वड्या दिल्या. माझा धाकटा भाऊ ‘दोन जरदाळू पाहिजेत’ म्हणून हट्ट धरुन बसला. आई म्हणाली, "अरे, तो तुमच्यासाठीच आहे. आज का एकदम संपवावयाचा आहे? पुरवून खाल्लात, तर तुम्हांलाच बरेच दिवस पुरेल." तो म्हणाला, "तर मग आणखी एक वडी दे आणि ही बदलून दे. मला गुलाबी रंगाची दे."आईने त्याला वडी बदलून दिली व शिवाय आणखी एक दिली. आम्ही अंगणात खेळू लागलो. चिंध्यांचा देशी चेंडू केला होता व धबाधबी आम्ही खेळत होतो.
आईने खाऊ फडताळात, मुंग्या न येतील, अशा व्यवस्थेने ठेवून दिला. थोड्या वेळाने तिने मला हाक मारली. मी घरात गेलो. आई म्हणाली. "श्याम, अमृतशेटजींकडे जाऊन नवीन धोतरजोड्यास काय पडते विचारुन ये. त्यांच्यासाठी हवा आहे, म्हणून सांग. घरात आहेत का, म्हणून त्याने विचारले, तर गावाला गेले आहेत, उद्या येतील, असे सांग. चौकशी करुन येण्याला मला सांगितले, म्हणून आलो, असे सांग. जा."
मी अमृतशेटजींच्या दुकानात गेलो. मोहन्या व बद्री त्यांचे मुलगे तेथे होते. मोहन्या मला म्हणाला, "काय, रे, श्याम, काय पाहिजे? चित्रे पाहिजे असतील, म्हणूस आलास होय ना?"
मी त्याला म्हटले, " चित्रे देत नाहीस, मग कशाला मागू? मी तुझ्याजवळ कधी मागणार नाही. परंतु धोतराचा भाव विचारावयास मी आलो आहे."
"कोणाला धोतरजोडी? तुला?"त्याने विचारले.
"नाही, भाऊंसाठी. चांगला लांब-रुंद हवा पोत चांगले हवे. किंमत काय, ते विचारावयास मी आलो आहे. दोन-तीन नमुने दे. ते मी घरी दाखवून आणतो." असे मी सांगितले. मोहन्या मारावाड्याने दोन-तीन प्रकारचे धोतरजोडे दिले. अमृतशेट म्हणाले, "दाखवून लौकर आण हो, श्याम."
"आम्ही काही घरी ठेवणार नाही व ठेवले, तर पैसे देऊ." असे मी अभिमानाने म्हटले.
"तुझ्याजवळ भारी झालेत वाटते पैसे? बापाजवळ तर फद्या नाही!" अमृतशेट म्हणाले.
मला ते शब्द ऐकून वाईट वाटले. अमृतशेटांचे आम्हांला कर्ज होते, म्हणून ते तसे बोलले. स्वाभिमानाने जगू म्हणाणार्‍याने मरावे; परंतु कर्ज कधी काढू नये.
मी ते नमुने घेऊन घरी आलो व आईला दाखविले, त्यांतील एक आईने पसंत केला. किंमत बेताचीच होती. तीन, साडेतीन रुपये काही तरी होती. आईने मजजवळ पैसे दिले व म्हणाली, "हा घेऊन ये. बाकीचे परत कर. "मी धोतरजोडे परत केले व एक विकत घेऊन आलो. आईने त्याची दोन पाने निरनिराळी फाडली व त्या प्रत्येकाला कुंकवाचे बोट लावून ठेवले.
वडील गावाहून परत आले, तरी त्यांना ही गोष्ट कळली नव्हती. दिवाळीच्या दिवशी पहाटे मंगल स्नाने झाल्यावर आई वडिलांना नवीन धोतर नेसावयास देणार होती. आम्ही मुले होतो, तरी ती गोष्ट आम्ही फोडली नाही. आईच्या कटात आम्ही तिची मुले सामील झालो होतो.
उद्याची दिवाळी. आम्ही टाकळ्याच्या शेंगा आणून त्यांतले इंद्रजव काढिले; ते वाटून आईने अंगाला लावण्यासाठी तयार करुन ठेवले. पायाखाली नरकासुर म्हणून चिरडण्यासाठी कारिंटे आम्ही गोळा करुन ठेवली. अंगण झाडून स्वच्छ केले. घाण दूर करणे म्हणजेच खरोखर नरकासुर मारणे. नरक हाच असुर आहे. नरक म्हणजे घाण. ह्या घाणीसारखा दुष्ट राक्षस कोण आहे? राक्षस शंभर माणसे खाईल; परंतु घाणीतून उत्पन्न होणारा रोगरुपी राक्षस हजारो लोकांना खातो, तरी तृप्त होत नाही.घाणीसारखा शत्रू नाही. पावसाळ्यात सर्वत्र घाण होते. विष्ठा, शेण सारे आजूबाजूला पडलेले असते. ही घाण दूर करावयाची, म्हणजे नरकासुराला मारणे होय आणि मोठी गंमत आहे. सत्यभामेने नरकासुराला मारले. ती कृष्णाला म्हणाली,"तुमच्याने हा मरणार नाही, याला शेवटी मीच मारीन." घाण दूर क्ररुन स्वच्छता निर्माण करणे यात स्त्रियांचा हातखंडा आहे. पुरुष घरात घाण करतात; परंतु बायका स्वच्छता ठेवतात.  बायकांच्या बाहेरपणात पुरुषांच्या हातांत घर असते. ते धड केर काढणार नाहीत, चूल सारवणार नाहीत, शेण नीट लावणारे नाहीत, भांडी घासणार नाहीत, दिवे पुसणार नाहीत! चार दिवसांत घर म्हणजे उकिरडा अशी स्थिती करुन टाकतात. परंतु स्त्रिया अंग धुताच पुन्हा सारे आरशासारखे स्वच्छ करतात. नरकानुसार सत्यभामाच मारील. घाण स्त्रियाच दूर करतील. परंतु अलिकडच्या स्त्रिया घरातील घाण रस्त्यात फेकतात! राक्षस रस्त्यात ठेवला, तरी तो वाईटच. घाण रस्त्यात फेकू नये. म्युनिसिपालिटीच्या पेट्या असतील, त्यांत जवळ जाऊन घाण टाकावी.
आम्ही सारे स्वच्छ करीत होतो. तुळशीचे वृंदावन आईने नवीन घातले. आईने पणत्या पुसून तयार केल्या. वाती तयार केल्या. सायंकाळी त्या ठिकठिकाणी आम्ही लावल्या. पहाटे लवकरच उठावयाचे, म्हणून आम्ही मुले लौकर झोपलो. आई मात्र बराच वेळ काम करीत होती. उटणी वगैरे तयार करीत होती.
मोठ्या पहाटे उठून आईने बाहेरच्या चुल्यात विस्तव घातला. तिने स्वत: आपले न्हाणे आटोपले व मग आम्हां एकेकाला ती उठ्वू लागली. अंगाला उटणे, तेल चोळू लागली. आधी तेलाचे पाच ठिपके जमिनीवर काढून मग ती आमच्या अंगाला लावी. खूप पाणी आंघोळीला ती देत होती. वडीलही केव्हाच उठले होते. त्यांनी देवाच्या पूजेसाठी फ़ुले आणून ठेवली. आमची स्नाने झाल्यावर ते आंघोळीस गेले.
आम्ही घरच्या देवाला नमस्कार केले व देवळातून सुध्दा जाऊन आलो. आईने वडिलांना आंघोळीस पाणी दिले. त्यांची आंघोळ झाली. जुना कद नेसून त्यांनी देवाची पूजा केली. देवांना थोडे वासाचे तेल त्यांनी लावले. आज देवांनासुध्दा कढत पाण्याची आंघोळ. रोज बिचारे थंड पाण्याच्या अभिषेकात कुडकुडायचे! परंतु आज त्यांना गरम पाणी. वडिलांनी देवांची पूजा केली.करंजी-अनारशांचा नैवेद्य होता. पहाट झाल्यापासून भुत्ये भिक्षेसाठी येत होते. अंबाबाईची गाणी म्हणत होते, पै-पैसा, पोहे, करंजी मागत होते व आम्ही त्यांना घालीत होतो. वडिलांनी आम्हांला हाक मारली व देवांचा नैवेद्य त्यांनी आम्हांला दिला. रोजचे सूर्याचे नमस्कार घालून ते देवळात गेले. देवळातून थोड्या वेळाने ते परत आले.
"माझे धोतर, ग, कुठे आहे आज? दिसत नाही ते." त्यांनी आईला विचारले.
"त्याची दोन अंगपुसणी केली. किती फाटले होते ते?" आई म्हणाली.
"अग, मग नेसू काय आज? आणखी महिनाभर ते गेले असते." ते म्हणाले.
"त्याचा अंत तरी किती पाहावयाचा? ते धोतर धुताना मला रोज लाज वाटत होती व वाईट वाटत होते."आई म्हणाली.
"अग, मला नेसायला सुध्दा वाटत होती. परंतु करायचे काय? लाज वाटली, म्हणून वरुन काही पैसे पडत नाहीत."ते म्हणाले.
"हे धोतर नेसा आज. "आईने धोतर पुढे केले.
"हे कोठले? कोणी आणले?" त्यांनी विचारले.
"अमृतशेठकडून मी आणविले." आई म्हणाली.
"अग, तो मला उधार देत नव्हता. मी त्याच्याजवळ मागितले का नाही? परंतु तोउधार देईना. ‘माझी पूर्वीची बाकीचे कशी वसूल होईल. हीच मला काळाजी आहे. तुम्हांला उधार देऊन फसलो,’ असे तो म्हणाला. तू घेऊन आलीस वाटते? का मोहन्याला बोलावून त्याला गळ घातलीस?" वडील चौकशी करु लागले.
"मी ते विकत आणले आहे. श्यामने जाऊन आणले." आई म्हणाली.
"श्यामजवळ कोठले पैसे?" त्यांनी विचारले.
"मी दिले. " आई म्हणाली.
"तुझ्याजवळ कोठले?" त्यांनी विचारले.
"पुण्याहून आप्पाने भाऊबीजेचे म्हणून त्या काळ्या कृष्णाबरोबर पाठविले." आईने सांगितले.
"केव्हा आला काळा कृष्णा?" त्यांनी विचारले.
"झाले दोन दिवस." आई म्हणाली.
"तुझे लुगडे फाटले आहे, त्याला ते झाले असते. तुझ्या भावाने पाठविलेली ओवाळणी-तुझा त्यावर हक्क. ते आम्हांला घ्यावयाचा हक्क नाही." भाऊ म्हणाले.
"तुम्ही व मी निराळी का आहोत? इतकी वर्षे एके ठिकाणी संसार केला; सुखदु:खे पाहिली; नाना बरेवाईट अनुभव घेतले; अजून का आपण निराळी आहोत? माझे सारे तुमचेच आहे व तुमचे ते माझेच आहे. आहे तरी काय आपणांजवळ? तुम्ही नवीन धोतर नेसलात म्हणजे मीच नवीन लुगडे नेसल्यासारखे आहे. त्यातच माझा आनंद आहे. नेसा, मी कुंकवाचे बोट लावले आहे."आई म्हणाली.
"मी नवीन धोतर नेसावे व तुला नवीन लुगडे नसावे, याचे मला नाही का वाईट वाटणार? तुला आनंद होत आहे; परंतु मला दु:ख होत आहे! तू आपल्याला आनंद मिळविलास आणि मला?" त्यांच्याने बोलवेना.
"माझा आनंद तो तुमचाच आहे. तुम्हांला बाहेर चारचौघांत जावयाचे असते, गंगूआप्पंकडे आज सोंगट्या खेळायला बोलावतील, गेले पाहिजे. मला आज कोठे जायचे आहे बाहेर? पुढे सवड झाली, की आधी मला लुगडे घ्यावे. असे उगीच मनाला लावून घेऊन नये. आज दिवाळी; आज सार्‍यांनी हसायचे, आनंदात राहायचे आम्हांला आनंद देण्यासाठी तरी आनंदी व्हा." आई म्हणाली.
"तुझ्यासारखी जन्माची सोबतीण व अशी गोड व गुणी मुले असल्यावर मी का आनंदी होणार नाही? मी दरिद्री नसून श्रीमंतांहून श्रीमंत आहे. मग मी का हसणार नाही, का सुखी होणार नाही? आण ते धोतर." असे म्हणून आईच्या हातातून ते धोतर त्यांनी घेतले. ते ते नेसले व देवांना त्यांनी नमस्कार केला.
वडिलांचे नेसूचे धोतर पाहून आम्हांलाही आनंद झाला; परंतु खरा आनंद जर कोणाला झाला असेल, तर तो माझ्या आईला. तो अनुभव स्वत:च अनुभवून पाहावा लागतो. प्रेमपूर्वक त्यागातील आनंद त्याची चव तसे करीत गेल्यानेच समजू लागते. एकदा चटक मात्र लागली पाहिजे.

N/A

References : N/A
Last Updated : February 02, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP