मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|श्यामची आई|
रात्र तिसावी

श्यामची आई - रात्र तिसावी

’श्यामची आई’ हे पुस्तक सुंदर, सुगंधी आणि सुरसच नसून, हृदयातील सारा जिव्हाळा यात साने गुरूजींनी ओतलेला आहे.


मे महिन्याची सुट्टी संपून मी परत दापोलीस शिकावयास गेलो. शाळा सुरु झाली. पावसाळाहे सुरु झाला. तप्त जमिनीला मेघ शांतवू लागले. तापलेल्या जमिनीवर पाणी पडे व कसा सुंदर वास सुटे! नवीनच पाऊस जेव्हा सुरु होतो, तेव्हा मातीचा एक रम्य सुंदर वास सुटत असतो. "गंधवती पृथ्वी" या वाचनाची त्या वेळेस आठवण येते. फुलाफळात जो रस व जो गंध असतो, एक प्रकारचा स्वाद असतो तो पृथ्वीच्याच पोटातला.
घरुन दापोलीस येताना या वेळेस. मी एक निश्चय करुन आलो होतो. सुट्टीत घरी असताना एके दिवशी लहान भाऊ नवीन सदर्‍यासाठी हट्ट बसला होता. त्या वेळेस त्याची समजूत घालताना आई म्हणाली, "तुझे अण्णा-दादा मोठे होतील, रोजगारी होतील, मग तुला सहा महिन्यांनी नवीन सदरा शिवतील. आता नको हट्ट धरु. " मित्रांनो! माझ्या लहानपणी कपड्यांचे बंड फार माजले नव्हते. आम्हांला कोट माहीतच नव्हता. कित्येक दिवस सदराही वर्षा दोन वर्षांनी नवीन मिळावयाचा. थंडीच्या दिवसांत धोतर चौघडी करुन गळ्याशी बांधून शाळेत जावयाचे. मफलर नव्हते. जाकिटे नव्हती, गरम कोट नव्हते. आता शहरांत तर विचारुन नका. परंतु खेड्यांतूनही कितीतरी कपडे लागतात. वारा, प्रकाश यांचा अंगाला जितका स्पर्श होईल, तितका चांगला. वारा व प्रकाश यांच्या रुपाने प्रत्यक्ष परमेश्वरच आपली अंगे स्वच्छ करावयास जणू येत असतो! परंतु त्या सृष्टिमाऊलीला आपण अंगास हात लावू देत नाही व नाना रोग शेवटी आपणांस जडतात. एक रशियन डॉक्टर म्हणतो, "जगातील पुष्कळसे रोग फाजील कपड्यांमुळे होतात." रशियातील मुले फार थंडी नसली. म्हणजे फक्त लंगोट लावूनच शाळेत जातात. कपडा कमी वापरण्याची वृत्ती नवीन रशिया निर्माण करीत आहे. विचाराच्या डोळ्यांनी रशिया पाहण्याचा यत्न करीत आहे व तसे चालण्याचेही ठरवीत आहे.
माझ्या धाकट्या भावाचा सदरा फाटला होता. आईने त्याला दोनतीन गाबड्या होत्या. आपल्या भावास नवीन कपडा शिवून न्यावयाचा, असे मी ठरवून आलो होतो; परंतु पैसे कोठून आणावयाचे?
माझे वडील कोर्ट-कचेरीच्या कामास वरचेवर दापोलीस येत. दारिघ्र येत होते, तरी कज्जेदलाली सुटली नव्हती. व्यसनच असते तेही. काही लोकांना कोर्ट-कचेर्‍यांशिवाय चैनच पडत नाही. स्वत:चे संपले तर दुसर्‍याचे खटले चालवावयास ते घेतात. "तुझा खटला मी जिंकून दिला, तर मला इतके पैसे खटला फसला, तर झालेला खर्च सारा माझा."असे सांगून खटला चालविण्याची कंत्रोटे घेणारे लोक मी पाहिले आहेत.
वडील दापोलीस आले, म्हणजे आणा दोन आणे मला खाऊला म्हणून देऊन जावयाचे. खाऊच्या पैशातील एक पैही खाऊमध्ये न खर्चण्याचे मी ठरविले. ज्येष्ठात आमची शाळा सुरु झाली. गणेशचतुर्थीला तीन महिने होते. तेवढ्या महिन्यांत या खाऊच्या पैशांचा रुपयाभर जमला असता, गणेशचतुर्थीस धाकट्या भावास कोट किंवा सदरा शिवून न्यावयाचा, असे मी मनात निश्चित केले.
ध्येयावर डोळे होते. रोज पैसे मोजत होतो. गणेसचतुर्थी जवळ येत चालली. मजजवळ एक रुपया दोन आणि जमले होते. गौरी गणपतीला नवीन कपडे करतात. आपल्या गावातील मुलांना त्यांचे आईबाप नवीन कपडे शिवतील; परंतु माझ्या भावास कोण शिवील? माझ्या भावाला मी शिवून नेईन.
मी शिंप्याकडे गेलो. माझ्या भावाच्या वयाचा एक मुलगा मी बरोबर घेऊन गेलो. त्याच्या अंगाचा कोट शिवावयास मी सांगितले. दोन वार कापड घेतले. अर्धा वार अस्तर घेतले. कोट तयार झाला. जवळच्या पैशात सारा खर्च भागला.
तो कोट हातात घेतला, तेव्हा माझे डोळे अश्रूंनी न्हाले होते. नवीन कपड्याला मंगलसूचक कुंकू लावतात; परंतु प्रेमसूचक अश्रूच मी त्या कोटावर शिंपडले.
मी घरी जाण्यास निघालो. पाऊस मी म्हणत होता. मी ज्यांच्याकडे राहिलो होतो, ते म्हणाले, "पावसापाण्याचा जाऊ नकोस. नदीनाल्यांना पूर आले असतील. पिसईचा पर्‍ह्या, सोंडेघरचा पर्‍ह्या यांना उतार नसेल; आमचे ऐक." मी कोणाचे ऐकले नाही. ह्रदयात प्रेमपूर आला होता, तो नदीनाल्यास थोडीस भीक घालणार!
नवीन कोट बांधून घेऊन मी निघालो. पंख असते, तर एकदम उडून गेलो असतो. चालण्याचे श्रमच वाटत नव्हते. सुखस्वन्पात दंग होतो. आईला किती आनंद होईल, या कल्पनेत मे होतो. एक नानेटी माझ्या पायाजवळून उडी मारुन गेली. नानेटी म्हणून एक सापाचा प्रकार आहे. तिचा हिरवा रंग असतो. नानेटी उड्या मारीत जाते. मला जरा भीती वाटली. जपून चालू लागलो. पिसईचा पर्‍ह्या दुथडी भरुन वाहत होता. त्याच्या पाण्याला ओढ फार. काय करायचे? आईचे नाव घेतले व शिरलो पाण्यात. हातात काठी होती. पुढे काठी टाकावयाची व मग पाऊल टाकावयाचे. मी वाहून जाण्याच्या बेतात होतो. परंतु कसा बाहेर आलो. देवाला माहीत! माझे प्रेम मला तारीत होते. इतर नदीनाल्यांना प्रेमाने भेटावयास जाणारा तो नाला! तो मला कसा बुडवील? मी माझ्या भावास भेटावयास जात होतो. त्या नाल्याइतकाच उत्सुक होतो, धावपळ करीत होतो. त्या नाल्याप्रमाणेच मीही ह्रदय भरुन येऊन जात होतो.
रस्त्यातील खडी वर आली होती. सुयांसारखे दगड पायांना खुपत होते. परंतु माझे तिकडे लक्ष नव्हते. अंधार होण्यापूर्वीच घरी जाण्याची धडपड चालली होती. परंतु वाटेतच अंधार पडला. कडाडू कडाडू आकाश गरजत होते. विजा चमचम करीत होत्या. खळखळ पाणी वाहत होते. त्या पंचमहाभूतांच्या  नाचातून मी चाललो होतो.
शेवटी एकदाचा मी घरी आलो. ओलचिंब होऊन गेलो होतो.‘आई! मी बाहेरुन हाक मारली. हवेत फार गारठा आलेला होता. वडील संध्या करीत होते व आईने शेगडीत निखारे शेकण्यासाठी दिले होते.
"अण्णा आला, आई, आण्णा!" धाकट्या भावाने दार उघडले. दोघे लहान भाऊ भेटले.
"इतक्या पावसातून श्याम कशाला आलास? सारा भिजलास ना?" आई विचारु लागली.
"सोंडेघरच्या ण्राह्याला पाणी नव्हते का रे?" वडिलांनी विचारले.
"हो! परंतु मी आलो कसातरी!" मी म्हटले.
"त्या दिवशी एक बाई वाहून गेली हो त्यातून!" वडील म्हणाले.
"गणपतीची कृपा. बरे, ते कपडे काढ. कढत पाण्याने आंघोळ कर. "आई म्हणाली.
मी आंघोळीस गेलो. धाकट्यात भावाने माझे लहानसे गाठोडे सोडले. लहान मुलांना सवयच असते. त्यांना वाटत असते, त्यांना वाटत असते, की काही तरी आपल्यासाठी आणलेले असेल. परंतु मी माझ्या भावंडास काय आणणार? कोणता खाऊ आणणार? कोणते खेळणे आणणार? कोणते रंगीत चित्रांचे पुस्तक देणार? मी गरीब होतो.
परंतु माझ्या भावास त्या गाठोड्यात काहीतरी सापडले. त्यात कोट सापडला. नवीन कोट! तो कोट नव्हतो, ते ह्रदय होते, ते प्रेम होते! ती आईची फलद्रूप झालेली शिकवण होती.
"अण्णा हा लहानसा कोणाचा कोट? हा नवीन कोट कोणाला रे?" धाकटा भाऊ कोट घेऊन मजजवळ येऊन विचारु लागला.
"मग सांगेन. घरात जा घेऊन. "मी म्हटले.
"आई! हा बघ कोट. हा काही अण्णाच्या अंगाचा नाही. हा मला आणलान. होय, आई?" धाकटा भाऊ आईला विचारु लागला.
आईने कोरडे धोतर दिले. मी चुलीजवळ शेकत बसलो. आई म्हणाली, "श्याम! हा कोणाचा कोट?"
"मोरु जोशांकडे का रे द्यावयाचा आहे? कापातल्या मुक्याने पाठविला असेल!" वडील म्हणाले.
"नाही. हा मी  पुरुषोत्तमसाठी शिवून आणला आहे. "मी म्हटले.
"पैसे रे, कोठले? कोणाचे कर्ज काढलेस? का फीचे दवडलेस?" वडिलांनी विचारले.
"कोणाच्या पैशांना हात तर नाही ना लावलास?" आईने कातर स्वरात विचारले.
"आई! त्या दिवशी तू सांगितले होतेस ‘हा पहिला व शेवटचा हात लावलेला.’ ते मी विसरेन का? मी कर्ज काढले नाही, चोरलेही नाहीत फीजेही खर्चिले नाहीत." मी म्हटले.
"मग उधार का शिवून आणलास, श्याम?" वडिलांनी विचारले.
"भाऊ, तुम्ही मला खाऊला आणा, दोन आणे देत असा; ते मी जमविले. गेल्या दोन-तीन महिन्यांचे सारे जमविले. त्यांतून हा कोट शिवून आणला. आई म्हणत असे, ‘तुझे अण्णा, दादा मोठे होतील, मग तुला नवीन शिवतील कोट.’ मी मनात ठरविले होते, की गणपतीला नवीन कोट आणावयाचा पुरुषोत्तम, बघ तुला होतो का?" मी म्हटले.
"अण्णा! हा बघ छान होतो आणि आतलाही खिसा! आता माझी पेन्सिल हरवणार नाही, आई, बघ!" पुरुषोत्तम आईला दाखवू लागला.
मी सांगितलेली हकीकत ऐकून आईला गहिवर आला व ती म्हणाली," श्याम! तू वयाने मोठा नाहीस, पैशाने मोठा नाहीस, शिकून मोठा नाहीस; परंतु मनाने मोठा आजच झालास, हो. हेच प्रेम, बाळांनो, पुढेही ठेवा. या प्रेमावर,देवा, दृष्ट नको कुणाची पाडू!"
वडिलांनीही माझ्या पाठीवरुन प्रेमाने हात फिरवली. ते बोलले नाहीत. त्या हात फिरविण्यात सारे बोलणे होते, सार्‍या स्मृती होत्या.
"आई, याला कुंकू लावू?" पुरुषोत्तमाने विचारले.
"बाळ, आता घडी करुन ठेव. उद्या कुंकू लावून, देवांना नमस्कार करुन अंगात घाल. नवीन कोट घालून गणपती आणायला जा, हो."आई म्हणाली.

N/A

References : N/A
Last Updated : February 02, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP