मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|श्यामची आई|
रात्र चौतिसावी

श्यामची आई - रात्र चौतिसावी

’श्यामची आई’ हे पुस्तक सुंदर, सुगंधी आणि सुरसच नसून, हृदयातील सारा जिव्हाळा यात साने गुरूजींनी ओतलेला आहे.


श्यामने सुरुवात केली:
"आमचे कर्ज दिवसिंदिवस वाढतच होते. कारण वेळच्या वेळी व्याजही देता येत नसे. आमची काही शेते होती. वडिलांनी पहिल्यानेच यांतील एकदोन मोठी शेते विकली असती, तर बहुतेक सारे कर्ज वारता आले असते; आणि शिवायपोटापुरते शेतभात राहिले असते; परंतु वडिलांच्या मनाला ते प्रशस्त वाटत नव्हते. जमीन विकणे म्हणजे त्यांना पाप वाटे, अपमान वाटे.
त्या रात्री आईचे वडील-आमचे आजोबा-आमच्या घरी आले होते. त्यांना आम्ही नाना म्हणत असू माझ्या वडिलांना चार गोष्टी सांगण्यासाठी ते आले होते; वडिलांची समजूत घालता आली तर पाहावी या विचाराने ते आले होते. आजोबा मोठे हुशार, साक्षेपी गृहस्थ होते. व्यवहारचतुर, हिशेबी व धोरणी ते होते; परंतु त्यांना स्वत:च्या बुध्दीचा मोठा अहंकार होता. त्यांच्या म्हणण्याविरुध्द कोणी बोलले, तर त्यांना ते खपत नसे. स्वभावही थोडा रागीत होता. ज्याला कुशाग्र बुध्दी असते, त्याला वाटत असते की इतरांना अक्कल नाही; सारी अक्कल आपणच जणू घेऊन आलेले, असे तो मानतो. नानांचा स्वभाव थोडा असाच होता.
माझे वडील ओसरीवर पोते टाकून त्यावर बसले होते. जेवणे झाली होती. आइ घरात जेवत होती. बाहेर आजोबा आले व वडिलांजवळ बोलू लागले.
नानांनी सुरुवात केली व म्हणाले, " हे पाहा भाऊ, आज तुम्हांला शेवटचे सांगावयाला आलो आहे. मी तुम्हांला यापूर्वी पुष्कळदा सुचविले होते; परंतु तुम्ही ते मनावर घेतले नाही. परंतु आता गळ्याशी आले, आता सावध झाले पाहिजे. तुम्ही आपली शेतजमीन विकून टाका. निदान प्रथम त्या मारवाड्याचे कर्ज देऊन टाका. दुसरे सावकार मागून पाहू. ते जरा दमाने घेतील व व्याजाचा दरही त्यांचा फार नाही. कापातल्या मारवाड्याचे देणे हेच मुख्य आहे. दिवसेंदिवस कर्ज तुंबत चालले आहे, देणे वाढत चालले आहे. याने सर्व नाश होईल. माझे मत ऐका."
"परंतु माझी एवढी काळजी तुम्हांला कशाला? दरिद्य्री पुरुषाला सारेच सल्ला देण्यासाठी येत असतात दरिद्र्यी माणसाला काहीच समजत नाही का? नाना! माझ्या कर्जाची चिंता मला आहे. तुम्हांला पाझर फुटायला नकोत!" वडील औपरोधिक बोलत होते.
"भाऊ! माझ्याने राहवले नाही, म्हणून मी आलो. पोटतिडीक आहे म्हणून मी आलो. माझे आतडे येथे अडकलेले आहे, म्हणून आलो. माझी पोटची पोर तुम्हांला दिलेली आहे, म्हणून या एवढ्या रात्री चिखलातून आलो. माझे सोन्यासारखे नातू, त्यांना थोडे शेतभात, घरदार या गावात राहावे, या पूर्वजांच्या गावातून ते परागंदा होऊ नयेत, देशोधडीस लागू नयेत, म्हणून मी आलो. लौकरच जप्ती येईल. लिलावात पै किमतीने माल जातो. ते तुमचे पायरे शेत पंधराशे रुपयांस तो विसापूरवाला घेत आहे, देऊन टाका. उद्या दर येणार नाही. मारवाडी वारता येईल." नानांनी ह्रदय ओतून सांगितले.
"नाना! पायरे शेत कसे विकावयाचे? या पायरे शेतात आम्ही लहानाचे मोठे झालो. ते शेत आम्ही वाढविले, मोठे केले. मोठमोठ्या धोंडी उरस्फोड करुन फोडल्या. कातळास सुरुंग लावले व भातजमीन तयार केली. दहा मणांचे शेत तीन खंडींचे केले. तेथे विहिर खणली. पायरे म्हणे विका. पायरे शेतावर पोरांचा किती लोभ! मुले शनिवारी-रविवारी लहानपणी शेतावरच राहावयाची. तेथेच वांग्याचे भरीत व भात दूर्वांच्या आजीबरोबर खावयाची. तेथे किती आंबे लावले, फुलझाडे लावली. किती त्या शेताशी जिव्हाळ्याचा संबंध! जमीन सुध्दा कशी आहे! सोने पिकेल तेथे, अशी आहे जमीन. दिवसेंदिवस जमीन डोळ्यांना दिसेनाशी होत चालली आहे. वाडवडिलांच्या शेतीभातीत भर घालिता येत नाही, तर निदान आहे ती तरी नको का सांभाळायला? जमिनीचा एक तुकडाही माझ्याने विकवणार नाही. काळजाचा तुकडा का कोठे कापता येतो? आपलीच जमीन आपल्याच हातांनी विकायची? आपली आई ज्याप्रमाणे विकणे पाप, आपली गोठ्यातली गाय विकणे ज्याप्रमाणे पाप, तसेच जमीन विकणेही पाप! जमीन म्हणजे आईच आहे. तिच्या धान्यावर आम्ही पोसलेलो!" वडील बोलले.
"भाऊ! मोठाल्या गप्पा मारुन जगात भागत नसते. बोलाचीच कढी, बोलाचाच भात खाऊन अंगावर मांस चढत नसते. जमीन म्हणे आई, कशी विकावयाची? दुसर्‍याची विकत घेता येते का? लुबाडता येते का? त्या वेळेस नाही वाटत जमीन म्हणजे दुसर्‍याची आई! मला नका नीती सांगण्याचा आव आणू. एके वेळी तुम्ही दुसर्‍यांच्या शेतावर जप्ती नेत असा, लिलावे करीत असा, या आया हिरावून आणीत असा. जमीन विकतात. विकत घेतात. व्यवहार पाहिला पाहिजे. पुढे देवाच्या कृपेने मुले मोठी झाली. रोजगारधंदा नीट लागला, तर पुन्हा घेतील जमीन विकत. ही जमीन नाही, तर दुसरी. परंतु कर्ज डोक्यावर ठेवून जमिनी सांभाळणारा कशा, राखणार कशा? जप्तीची दवंडी पिटतील, पोलिस येतील, लिलाव होतील, घराला कुलपे ठोकतील, सारी शोभा होईल! म्हणजे मग बरे, की आपण होऊनच तसा प्रसंग येऊ न देणे, अब्रु सांभाळणे, झाकली मूठ ठेवणे, हे बरे?" नानांनी विचारले.
"माझ्या अब्रुचे मी पाहून घेईल. माझी अब्रु म्हणजे तुमची नाही ना?"
भाऊ म्हणाले, "माझीही आहे, म्हणून तर आलो. तुम्ही माझे जावई आहात, हे विसरलात वाटते? ‘लोक म्हणतील, अमक्याच्या जावयाच्या घराची जप्ती झाली. तुमच्या अब्रुत माझीही अब्रु आहे. माझ्या मुलीची अब्रु ती माझीच. जरा विचार करा. आपलाच हेका मूर्खासारखा धरणे चांगले नाही!" नाना म्हणाले.
"मूर्ख म्हणा, काही म्हणा. तुम्हांला व जगाला आज वाटेल ते बोलून घेण्यास संधी आहे व अधिकार आहे. मूर्ख म्हणा, अडाणी म्हणा!" भाऊ म्हणाले,
"म्हणेनच. म्हटल्याशिवाय राहीन की काय? मोठे सरदार घराण्यातले! आम्ही म्हणे सरदार! सरदार घराण्यातले, म्हणून मुलगी दिली! हुंडा दिला! मुलीचा संसार व्हावा म्हणून दिली! तिच्या अब्रुचे धिंडवडे व्हावे म्हणून नाही मुलगी दिली मी! तुम्ही सरदार ना, हेच का सरदार? ना बायकोच्या अंगावर फुटका मणी, ना धड ल्यालला, ना खायला! हेच का सरदार? दारात सावकाराचे धरणेकरी आहेत, बायकोला वाटेल ते बोलत आहे, हेच का सरदार? नाही नीट घरदार! दारात सावकाराचे धरणेकरी  आहेत, बायकोला वाटेल ते बोलत आहे, हेच का सरदार? नाही नीट घरदार! नाही काही! हीच का सरदार? आम्ही म्हणे सरदार! केवढी ऐट होती! तीस वर्षए संसार केलात, का धन लावलीत? पैची अक्कल नाही मिळवलीत! सार्‍यांनी तुम्हांला फसविले व हाकलून दिले. डोळे उघडा थोडे, सरदार! भिकार्‍याची लक्षणे आणि म्हणे सरदार! बरे, बोवा, स्वत:ला अक्कल नाही, तर दुसरा सांगतो ते तरी ऐकले. तेही नाही. हा काय चावटपणा चालविला आहे? या गाढवपणाला काय म्हणावे? भाऊ! हा गाढवपणा आता पुरे. मी सांगतो, तसे करा! " असे नाना बोलत आहेत तो घरातून आई तेथे आली.
ती बोलणी घरात आईला ऐकवत ना; तरी मोठ्या कष्टाने ऐकत होती. परंतु आता तिची शांती भंगली. ती बाहेर येऊन नानांना म्हणाली, " नाना! माझ्या घरात तुम्ही बसलेले आहात; तुम्ही आपली मुलगी एकदा दुसर्‍याला दिलीत, आता वाटेल तसे बोलू नका! सारे जण खडे मारतात, म्हणून तुम्ही मारु नयेत. नाना! तुमच्या मुलीचीच पुण्याई कमी, म्हणून या भरल्या घराला अवकळा आली. वाईट दिवस आले. तुमची मुलगी यांच्या  घरात येण्या पूर्वी यांचे सोन्यासारखे चालले होते. त्यांची सरदारकी कशाला काढतो? स्वत:च्या मुलीचे नशीब वाईत, असे म्हणा. आजपर्यंत मी सुखाने घास खाल्ला, अब्रुने दिवस काढले. ते त्याच्या पुण्याईने. मी अभागी आहे, तुमची मुलगी अभागी आहे. त्यांच्याने जमीन विकवत नाही, तर नाही व्हायचे ते होईल. परंतु मन दुखवू नका. होणारे होऊन जाते; परंतु मने मात्र दुखावलेली राहतात नाना! फुटलेले मोती सांधता येत नाही. मने वाईट झाली की जोडता येत नाहीत. त्यांचे मन, दुखवू नका. माझ्या देखत वेडेवाकडे काही बोलू नका. स्वत:च्या मुलीच्या समक्ष तिच्या पतीची हेटाळणी कषी करता तुम्ही? कसेही असले तरी ते माझे पती आहेत; आमचे काय व्हायचे असेल काही ते होवो, ते तरी बर्‍यासाठीस करतात ना सारे? मुलाबाळांचे पुढे वाईट व्हावे, असे का त्यांना वाट्ते? देवाला सारे कळत आहे. बुध्दी देणारा तोच आहे. नाना, उगाच शिव्या द्यायला पुन्हा या झोपडीत येऊ नका. मुलीला व तिच्या पतीला सदिच्छेचा आशीर्वाद देण्यास या. दोन गोड शब्द बोलावयास या. तुमचा आशीर्वाद व प्रेम द्या, बाकी काही नको. उपदेश नको, शिव्या नको. नाना! बोलते याची क्षमा करा! सरदार घराणे नाना! नव्हते का सरदार घराणे! सारा गाव मान देत होता. तुम्हीच नव्हते का पाहिले? सारे दिवस सारखे नसतात. या वर्षी सारे आंबे गळून गेले तरी पुढच्या वर्षी पुन्हा मोहोर येईल; झाड वाळून गेले, तर पुन्हा पालवी फुटेल. नाना! रागवू नका. मी तुमच्या पाया पडते. आमचे व्हावचे असेल तसे होवो. परंतु यापुढे तुम्ही कधी त्यांना टोचून नका बोलू. माझे एवढेच मागणे आहे."असे म्हणून आई खरोखरच नानांचे पाय धरावयास गेली.
"बरो! ऊठ. तुझी इच्छा आहे, तर हा पाहा मी जातो. आजपासून पुन्हा तुमच्या कवाडीत पाय टाकणार नाही. समजलीस! माझे म्हातार्‍याचे काय अडले आहे!"
"नाना! असा अर्थाचा अनर्थ करु नका; त्रागा करु नका . तुम्ही येत जा. मी जशी तुमची मुलगी, तशीच त्यांची पत्नी. मला सार्‍यांकडे पाहिले. मला तुम्हीही हवेत व हेही हवेत. नाना! आम्हांला भाग्य सोडून गेले: भाऊबंद सोडून गेले; तुम्हीही सोडून जाणार का? नाना! तुम्ही येत जा, प्रेमाने आम्हांला भेटावयास येत जा. बयोकडे येत जा तुमच्या. याल ना?"आईचा गळा दाटून आला.
"नाही, मी आता येणार नाही, जेथे आपल्या शब्दाला मान नाही, तेथे कशाला जा?" असे म्हणत नाना निघून गेले.
"नाना! तुमच्या पोटच्या मुलीपेक्षा ओठचा शब्दच तुम्हाला प्रिय ना? गेले. काय करायचे? जाऊ दे. तुम्ही आता पडा. कपाळाला तेल चोळू का? म्हणजे शांत वाटेल." आई वडिलांना म्हणाली.
"या कपाळकरंट्याच्या कपाळाला तेल कशाला? तू तिकडे आत जा. मला एकटाच पडू दे." वडील त्राग्याने म्हणाले.
गरीब बिचारी आई! ती उठून गेली. धाकटा पुरुषोत्तम निजला होता. त्याच्या अंगावरचे पांघरुण सरसावून ती गेली. कोठे गेली? कोठे म्हणजे? तुळशीच्या अंगणात जाऊन तुळसादेवीजवळ अश्रू ढाळीत बसली. आजूबाजूचे प्रचंड आम्रवृक्ष गंभीरपणे उभे होते. वारा स्तब्ध होता. आकाश स्तब्ध होते. माझी आई रडत बसली होती. ते ऋण तिला रडवीत होते. माझ्या आईला रात्रंदिवस ऋण रडवीत होते!

N/A

References : N/A
Last Updated : February 02, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP