मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|श्यामची आई|
रात्र सदातिसावी

श्यामची आई - रात्र सदातिसावी

’श्यामची आई’ हे पुस्तक सुंदर, सुगंधी आणि सुरसच नसून, हृदयातील सारा जिव्हाळा यात साने गुरूजींनी ओतलेला आहे.


श्यामने आरंभ केला.
शेवटी आमच्यावर मारवाड्याने फिर्याद करण्याचे ठरविले. कोर्टात फिर्याद दाखल झाली. व्याज व मुद्दल मिळून चार हजारांची त्याने फिर्याद दिली. दावा सुरु झाला. कोर्टात सावकाराचे देणे योग्य ठरले व सारी होती नव्हती ती मिळकत जप्त करुन तिचा लिलाव व्हावा, असा निकाल देण्यात आला.
त्या दिवशी गावात दवंडी पिटली जाणार होती! आईला दोन दिवस एक घासही गेला नाही. डोळ्याला डोळा लागला नाही."आई जगदंबे! शेवटी या डोळ्यांदेखत अब्रुचे धिंडवडे होणार ना? या कानांनी ती दुष्ट दवंडी ऐकावयाची! माझे प्राण ने ना ग आई! नको हा जीव! अशी ती प्रार्थना करीत होती.
पुरुषोत्तम शाळेत गेला होता. घरी आईला खूप ताप भरुन आला व ती अंथरुणावर पडली. ती तळमळत होती व रडत होती.
सकाळी नऊ वाजावची वेळ होती. महार ढोलके घेऊन गावात दवंडी देत होता. तो ठिकठिकाणी उभा राहून" आज भाऊराव यांच्या घराची दुपारी जप्ती होणार आहे, " वगैरे ओरडत सांगे व ढोलके वाजवी. दुसर्‍याच्या मानहानीत आनंद मानणारे काही जीव असतात. त्यांना आनंद होत होता. खानदारीच्या घरंदाज लोकांस वाईट वाटत होते.
महार दवंडी देत चालला होता. शाळेजवळ येऊन त्याने ढोलके वाजविले. सारी मुले ऐकू लागली. त्याने दवंडी दिली व पुढे गेला. माझ्या भावाला मुले चिडवू लागली. पोरे त्या दवंडीची नक्कल करीत व माझ्या भावाच्या पाठीस लागत.
"पुर्षाच्या घराची जप्ती होणार, ढुमढुमढुम!’ असे ती म्हणत पुरुषोत्तम रडू लागे. त्याच्या डोळ्यांतून अश्रू येऊ लागले. तो मास्तरांजवळ गेला व म्हणाला,
"मी घरी जाऊ का?"
मास्तर म्हणाले, "कोठे चाललास? बस खाली! अध्या तासाने शाळाच सुटेले." मास्तरांना त्या लहान भावाच्या ह्रदयातील कालवाकालव समज का नाही?
दहा वाजले. शाळा सुटली. लांडग्यांनी कोकराची दशा करावी तशी माझ्या भावाची इतर मुलांनी केली. मुले त्याच्या "ढुमढुमढुम" करीत पाठीस लागली. तो रडत रडत घरी आला व एकदम आईला बिलगला.
"आई! सारी मुले मला चिडवतात! का ग असे? म्हणतात,’तुझ्या घराची जप्ती होणार. शेणाचे दिवे लागणार.’ आई! सारी का ग माझ्या पाठीस लागतात? आपणांस येथून बाहेर काढणार का ग? आई! काय ग झाले? असे आईला विचारु लागला.
"बाळ! देवाजी मर्जी; मी तरी काय सांगू तुला?" असे म्हणून पडल्यापडल्याच या पोटच्या गोळ्याला पोटाशी घेऊन आई शतधारांनी त्याला स्नान घालू लागली. मायलेकरे शोकासागरात बुडून गेली होती. शेवटी आई त्याला म्हणाली, " जा बाळ; हातपाय धू; आज राधाताईकडे जेवायला जा. इंदूने तुला बोलावले आहे."
लहान भाऊ, त्याला काय समजणार? तो शेजारी जेवायला निघून गेला.
त्या दिवशी वडील जेवले नाहीत. त्यांनी स्नान केले. देवाची पूजा केली. लाज वाटत होती, तरी देवळात गेले. खाली मान घालून गेले व तसेच परत आले. ज्या गावात त्यांना सरदार म्हणत, ज्या गावात ते पंच होते, ज्या गावात त्यांना मान मिळे, त्या गावात त्या दिवशी कुत्रेही विचारीत नव्हते! ज्या गावात ते मिरवले, ज्या गावात त्यांच्या शब्दाला मान मिळे तेथेच लहान लहान पोरेही त्या दिवशी त्यांची टर उडवीत होती. जेथे फुले वेचली. तेथेच शेण वेचण्याची आईवर पाळी आली; आजपर्यंत आईने कसेबसे अबुने दिवस काढले होते; परंतु देवाला तिची कसून परिक्षा घ्यावयाची होती. मानाची शिखरे व अपमानाच्या खोल दर्‍या, आईला दोन्ही प्रकार देव दाखवू इच्छीत होता. संपूर्ण सुख व संपूर्ण दु:ख दोन्ही कळली पाहिजेत. अमावास्या व पौर्णिमा दोन्हींचे दर्शन झाले पाहिजे. या संसाराचे संपूर्ण ज्ञात ती मोठी आई माझ्या छोट्या आईला करुन देत होती.
दुपारी पोलिस, कारकून, तलाठी, सावकार, साक्षीदार आमच्या घरी आले. घरात स्वयंपाकाची चार भांडी ठेवून बाकी सारे एका खोलीत त्यांनी अडकविली. आईच्या अंगावार दागिने नव्हतेच. मणिमंगळसूत्र काय ते राहिले होते. होते नव्हते, ते त्या खोलीत टाकून त्याला सावकाराने कुलूप ठोकले. सील केले. आम्हांला राहावयाला दोन खोल्या मोठ्या कृपेने देण्यात आल्या.
ती मंडळी निघून गेली. आई इतका वेळ उभी होती. केळीप्रमाणे ती थरथर कापत होती. अंगात ताप व आत मनस्ताप! आतून बाहेरुन ती भाजून निघत होती. मंडळी निघून जाताच आई धाडकन्‍ खाली पडली. ‘आई आई! असे करीत पुरुषोत्तम रडू लागला. वडील आईजवळ गेले. तिला अंथरुणावर ठेवण्यात आले. थोड्या वेळाने आईला सुद्ध आली व म्हणाली, "ज्याला भीत होत्ये,ते शेवटी झाले! आता जगणे व मरणे सारखेच आहे!"

N/A

References : N/A
Last Updated : February 02, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP