देवता - देवी

श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा रचून इतिहास घडविला आहे .


६६

सदा आनंदभरित । रंग साहित्य संगीत ॥१॥

जगन्माता जगदीश्वरी । जगज्योति जगदोद्धारी ॥२॥

जिच्या वैभवाचे लोक । हरिहर ब्रम्हादिक ॥३॥

बहु राजे राजेश्वर । सर्व तुझेचि किंकर ॥४॥

वसे आकाशीं पाताळीं । सर्वकाळीं तिन्हीताळीं ॥५॥

सर्व देह हालविते । चालविते बोलविते ॥६॥

मूळमाया विस्तारली । सिद्धसाधकांची बोली ॥७॥

शक्ति सर्वांगें व्यापिली । शक्ति गेली काया मेली ॥८॥

होते कोठून उत्पात्ति । भगवती भगवति ॥९॥

सुख तीवांचूनि नाहीं । नलगे अनुमान कांहीं ॥१०॥

जाली माता मायराणी । भोग नाहीं तीवांचूनी ॥११॥

भूमंडळींच्या वनिता । बाळ तारुण्य समस्तां ॥१२॥

जगजीवनी मनमोहनी । जिवलगचि त्रिभुवनीं ॥१३॥

रुप एकाहुनी एक । रम्य लावण्यनाटक ॥१४॥

पहा एकचि अवयव । भुलविले सकळ जीव ॥१५॥

मन नयन चालवी । भगवती जग हालवी ॥१६॥

भोग देते भूमंडळीं । परि आपण वेगळी ॥१७॥

योगी मुनिजन ध्यानीं । सर्व लागले चिंतनीं ॥१८॥

भक्ति मुक्ति युक्ति दाती । आदिशक्ति सहज स्थिति ॥१९॥

सतरावी जीवनकळा । सर्व जीवांचा जिव्हाळा ॥२०॥

मुळीं रामवरदायिनी । रामदास ध्यातो मनीं ॥२१॥

६७

अनंत युगाची जननी । तुळजा रामवरदायिनी । तिचें स्वरुप उमजोनी । समजोनि राहे तो ज्ञाता ॥ध्रु०॥

शक्तिविणें कोण आहे । हें तों विचारुनि पाहे । शक्तिविरहित न राहे । यशकीर्ति प्रताप ॥१॥

शिवशक्तीचा विचार । अर्धनारी नटेश्वर । दास म्हणे हा विस्तार । तत्त्वज्ञानी जाणती ॥२॥

६८

जगदंबा जगदेश्वरी । श्रीराम अयोध्याविहारी । भक्तजनांसी उद्धरी । पार करी भवासी ॥१॥

शिवशक्तीचा विचार । साधु जाणती सारासार । अंतरीं स्मरावा रघुवीर । एका भावें करुनी ॥२॥

देव देवी अवघा एक । याचा करावा विवेक । नदी नद्या पुण्यदायक । सागरीं उदक एकचि ॥३॥

दास म्हणे सत्य वचन । एकचि देवी रघुनंदन । अवघा व्यापक आपण । साधुसंत जाणती ॥४॥

६९

तुकाई यमाई नमूं चडाबाई । जाखाई जोखाई सटवाई ते ॥१॥

सटवाई जगदंबा आदिशक्ति अंबा । तुम्हीं त्या स्वयंभा दाखवावें ॥२॥

दाखवावें तुम्हीं सर्वां पैलीकडे । देखतांचि घडे मोक्षपद ॥३॥

मोक्षपद घडे मोक्षासी पहातां । तद्रूपचि होतां दास म्हणे ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : December 22, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP