देवता - श्रीकृष्ण

श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा रचून इतिहास घडविला आहे .


३७

नमस्कार माझा विघ्नविनाशना । शारदा आननामाजीं राहो ॥१॥

राहो सर्वकाळ गोविंदाचें नाम । कीर्तन उत्तम यादवांचें ॥२॥

यादवांचे कुळीं गोकुळीं गोविंद । आनंदाचा कंद अवतरला ॥३॥

अवतरला पूर्ण अच्युत अनंत । आयुधें मंडीत चतुर्भूज ॥४॥

चतुर्भुज हरी डोळस सांवळा । वैजयंती माळा पितांबर ॥५॥

पीतांबरधारी प्रगटे मुरारी । मथुरेमाझारीं कारागृहीं ॥६॥

कारागृहीं माता पिता वसुदेव । तेथें आले देव सोडवणें ॥७॥

सोडवणें आला वैकुंठीचा राव । येतांचि लाघव थोर केलें ॥८॥

थोर वर्म केलें सर्वां भुलवीलें । स्वयें आच्छादिलें निजरुप ॥९॥

निजरुप देवें साडूनी कौतुक । जाहाला बाळक नंदजीचें ॥१०॥

नंदजीचें बाळ करीं पंथ मोकळा । जावया गोकुळा विश्रांतीये ॥११॥

विश्रांतीसी आले स्थळ पालटिलें । तंव जाणवलें कंसराया ॥१२॥

कंसराव जाये मारुं आपटूनी । मणगट मोडुनी उसळली ॥१३॥

उसळली म्हणे कंसा तूझा वैरी । गोकुळामाझारीं वाढतसे ॥१४॥

वाढतसे वैरी नंदाचिये घरीं । बोलोनी अंबरीं गुप्त जाली ॥१५॥

जाली तळमळ ऐकोनी कंसासी । लागली मानसीं थोर चिंता ॥१६॥

थोर चिंता करी म्हणे माझा वैरी । वाढतसे मारी कोण आतां ॥१७॥

कोण आतां तरी करावा उपाव । वैरिया अपाव होय जेणें ॥१८॥

होय जेणें मृत्यु तया बाळकासी । तंव आले जोशी माभळभट ॥१९॥

माभळभट आले रायें सन्मानीले । तयाप्रती बोले कांहि येक ॥२०॥

कांहिंयेक भटो मांडलें संकट । तंव येरें पट उकलीला ॥२१॥

उकलीला पट पाहिला मुहूर्त । म्हणे चिंता वेर्थ कां करितां ॥२२॥

कां करितां चिंता तया बाळकाची । वधूनी शीघ्रची येतों आतां ॥२३॥

येतों आतां ऐसें बोलोनी वचन । सीघ्रचि गमन आरंभीलें ॥२४॥

आरंभीलें तेणें ब्राम्हणें गमन । पावला भुवन नंदजीचें ॥२५॥

नंदजीचें बाळ आलें मुळावरी । बैसवूनी नारी सांगतसे ॥२६॥

सांगतसे म्हणे हें तुम्हां वाईट । कुळाचा शेवट करुं आलें ॥२७॥

करुं आलें घात सर्वांचें अनहीत । वोखटें बहुत दिसतसें ॥२८॥

दिसतसें दुष्ट सांगतों मी स्पष्ट । बुद्धीनें वरिष्ठ आहां तुम्हीं ॥२९॥

आहां तुम्हीं माझीं सखीं यजमानें । म्हणोनि सांगणें लागे तुम्हां ॥३०॥

लागे तुह्मां शब्द ऐसें न करावें । सत्वर वधावें लेंकुरासी ॥३१॥

लेंकुरासी क्रोध ऐकोनि वचन । मग पिढेदान आंरभीलें ॥३२॥

आरंभीलें थोर कठीण द्विजासी । उठोनि त्वरेसी पळतसे ॥३३॥

पळतसे पुढें मागें पीढेदान । पृष्ठीचें कंदन होत असे ॥३४॥

होतसे ताडण काष्ठें चहुंकुण । कष्टला ब्राह्मण पळतसे ॥३५॥

पळतसे भय भरलें अंतरीं । म्हणे हरी हरी नारायणा ॥३६॥

नारायणा मज रक्षीलें जीवेंसीं । दावी रायापासी पृष्टीभाग ॥३७॥

पृष्ठीभागीं थोर जाहालें ताडण । भटो बहु सीण पावलेती ॥३८॥

पावली पूतना म्हणे काय जालें । बाळकें मारिलें ब्राह्मणासी ॥३९॥

ब्राह्मणासी जेणें दिलें पीढेदान । तयासी मारीन सीघ्र काळें ॥४०॥

सीघ्रकाळें वीषें भरिले पयोधर । पावली मंदीर पूतना ते ॥४१॥

पूतना मावशी होये गोविंदासी । म्हणोनि वेगेसी पाहूं आली ॥४२॥

पाहूं आली परी कपट अंतरीं । भाव वरिवरी दावितसे ॥४३॥

दावीतसे भाव शब्दाचें लाघव । जाणितली माव बाळकानें ॥४४॥

बाळकासी पुढें घेऊनि चुंबन । देते स्तनपान आदरेसी ॥४५॥

आदरेंसी हरी स्तनपान करी । पूतना अंतरीं जाजावली ॥४६॥

जाजावली म्हणे पुरे बापा आतां । जाऊं दे अनंता सोडीं वेगीं ॥४७॥

सोडीं वेगीं आतां लोटिलें श्रीमूख । निघेना बाळक सोखीतसे ॥४८॥

सोखिली पूतना आक्रंदे मानसीं । मुकली प्राणासी कृष्णमुखें ॥४९॥

कृष्णमुखें रीठासुर रगडीला । लाता विघडीला शकटासूर ॥५०॥

शकटासुरा लाता हाणे बाळपणीं । वृक्ष उन्मळूनि रांगतसे ॥५१॥

रांगतां रांगतां देव गिळीयेला । उदरीं दाविला विश्वलोकू ॥५२॥

विश्वलोक नांदे जयाचे उदरीं । गाई राखे हरी गौळियांच्या ॥५३॥

गौळियांच्या गाई राखतां पाबळीं । खेळे चेंडूफळी गोपाळांसी ॥५४॥

गोपाळांसी चेंडू खेळतां उडाला । जाउनि बुडाला डोहामध्यें ॥५५॥

डोहामध्यें कृष्णें टाकियेली उडी । पाहताती थडीं सवंगडे ॥५६॥

सवंगडे गेले सांगों नंदापासीं । यशोदा मातेसी सांगताती ॥५७॥

सांगताती कृष्ण बुडाला तुमचा । जेथें काळ्याचा डोह आहे ॥५८॥

डोहो आहे तेथें दाविती गोपाळ । मिळाले सकळ विश्वजन ॥५९॥

विश्वजन सवें पाहाती गोविंदा । आक्रंदें यशोदा दीनरुप ॥६०॥

दीनरुप माता करिते रुदन । संमोखिती जन यशोदेसी ॥६१॥

यशोदेसी ठाव दाविला गोपाळीं । मोडली डाहाळी कळंबाची ॥६२॥

कळंबाची छाया दिसे जळावरी । बुडाला श्रीहरी तये ठाईं ॥६३॥

तये ठाईं माता घालूं पाहे उडी । धरिली देवढी नगर लोकीं ॥६४॥

नगर लोक सर्व गोपाळ रुदती । गाई हुबंरती कृष्णालागीं ॥६५॥

कृष्णालागीं जन सर्व आक्रंदले । मग संमोखिले येरयेरां ॥६६॥

येरयेरां संमोखुनीया निघाले । कृष्णें काय केले डोहामाजीं ॥६७॥

डोहामाजीं क्रूर काळ्या विखार । परस्परें थोर युद्ध जालें ॥६८॥

युद्ध जालें थोर काळया नाथीला । गोकुळासी आला कृष्णनाथ ॥६९॥

कृष्णनाथें कागा बगा विदारीलें । धेनुका मारिलें आपटोनी ॥७०॥

आपटुनी मांडी खेळती गोपाळ । घुमरी कल्लोळ पावयांचे ॥७१॥

पावयांचे नाद वाजती मोहरी । तेणें नर नारी लुब्ध होती ॥७२॥

लुब्ध होती नर पक्षी तृणचर । यमुनेचें तीर तुंबळलें ॥७३॥

तुंबळ गोपाळ लागला वणवा । गिळुनियां अश्वा वधीयेलें ॥७४॥

वधीयलें कृष्णें पन्नगा आवर्ता । दुष्ट तृणावर्ता मारीयेलें ॥७५॥

मारियेला थोर गर्व ब्रह्मयाचा । जाहाला सर्वांचा समुदाव ॥७६॥

समुदाव सर्व गोपाळ स्वजन । बळें गोवर्धन उचलीला ॥७७॥

उचलीला तळीं राखिलें गोकूळ । इंद्राचा सर्व गर्व नेला ॥७८॥

नेलें मथुरेसी आक्रूरें कृष्णासी । मल्ल चाणुरासी वधीयेलें ॥७९॥

वधियेला कंस घातलें आसन । तेथें उग्रसेन बैसवीला ॥८०॥

बैसवीला उग्रसेन नृपासनीं । चैद्यादि त्रासूनी मारीयेले ॥८१॥

मारिला शिशुपाळ आणि भस्मासूर । मारिला असुर जरासंध ॥८२॥

जरासंध काळयवन हा क्रूर । मारिले असुर थोर थोर ॥८३॥

थोर ख्याती केली अर्जुना रक्षीलें । सर्व साह्य केलें पांडवांचें ॥८४॥

पांडवांचा सखा सर्व साहाकारी । संकटीं कैवारी द्रौपदीचा ॥८५॥

द्रौपदीचा सखा द्वारकेभीतरी । सोळा सहस्त्र नारी गोपांगना ॥८६॥

गोपांगना राधा रुक्मिणी सुंदरी । सुखें राज्यकरी यादवेंसी ॥८७॥

यादवांसी श्राप दिला ऋषेश्वरीं । मांडली बोहरी तेणें मीसें ॥८८॥

तेणें मीसें सर्व आटले यादव । ते काळीं उद्धव उपदेसीला ॥८९॥

उपदेसीला दास श्रीकृष्णें आपुला । अवतार जाला पूर्ण आतां ॥९०॥

३८

श्रावण वद्य अष्टमीसी । अर्धरात्रीचे समयीं । कृष्ण जन्मला गौळियागृहीं । लीळाविग्रही बाळकु ॥१॥

रिटासुर शकटासूर । विमळार्जुन तरुवर । कागासुर बगासुर । तृणवत्सें गोपिका ॥२॥

केलें पूतनाशोषण । माबळभट्टा पिढेदान । पुढें मांडिलें विंदाण । बाळपणीं गोकुळीं ॥३॥

दहीं दूध लोणी चोरी । साय तुप गुळ चोरी । आटाटी घरोघरीं । परोपरी होतसे ॥४॥

बाळा तारुण्य सुंदरी । व्रजांगना बहु नारी । हरी त्यासी रळी करी । वाटे तिटे येकांतीं ॥५॥

लहान होतो मोठा होतो । नाना वेष पालटितो । बहु कैवाड करितो । ब्रह्मादिकां कळेना ॥६॥

गाई गोपाळ वासुरें । नेलीं विरंचीं तस्करें । विश्वरुप जाला पुरें । घरोघरीं पुरवला ॥७॥

इंद्र कोपला अंतरीं । मेघ पाडिला शिळाधारीं । कृष्णें धरिला बोटावरीं । गोवर्धन पर्वतु ॥८॥

कृष्णें काळिया नाथिला । कंसासुर संहारिला । भार पृथ्वीचा फेडिला । नाना दैत्य मारोनि ॥९॥

पांडवांचा साहाकारी । अर्जुनाचीं घोडीं धरी । द्रौपदीस तो कैवारी । भक्तांसाठीं कष्टला ॥१०॥

सोळा सहस्त्र गोपिका । छपन्न कोटी यादव देखा । नाहीं वैभवाचा लेखा । दासासी सखा तो एक ॥११॥

N/A

References : N/A
Last Updated : December 22, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP