देवता - विठ्ठल

श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा रचून इतिहास घडविला आहे .


५१

समचरणाचा हाचि भावो । तेथें भक्तां दावावया ठावो । उभा राहावया अभिप्रावो । भक्त खांद्यावरि घ्यावे ॥१॥

विठोबा हे आमुची जननी । भीमातीरनिवासिनी । भक्त पुंडलिका लागुनि । वैकुंठींहुनि पातली ॥२॥

श्रीवत्साचिये खूण । तें भक्ताचें कृपास्थान । आजानुबाहु यालागुन । भक्तां आलिंगन द्यावया ॥३॥

शोभे सुहास्यवदन । नाभी नाभी हें वचन । पूर्ण आकर्णनयन । अवघे भक्त पहावया ॥४॥

मुगुटीं मयूरपत्रें त्रिवळी । विटे नीट असे ठाकिली । रामदासाची माउली । भक्तांलागीं उभी असे ॥५॥

५२

कांहीं बोल रे विठ्ठला । मौन वेष कां धरिला ॥१॥

काय मागतों गांठोडी । बोलसीना धरिली गुडी ॥ध्रु०॥

आशा वैभवाची नाहीं । भिऊं नको वद कांहीं ॥२॥

नलगे मज धन दारा । वेगें लोचन उघडा ॥३॥

दास म्हणे वर पाहे । कृपा करुनि भेटावें ॥४॥

५३

सोनियाचा दिवस जाला । पांडुरंग रंगीं आला ॥१॥

मना आतां सावध होईं । प्रेमरंगीं रंगुनि राहीं ॥२॥

बोल कैसा सुपरित कांहीं । अनुसंधान विठ्ठलपायीं ॥३॥

दास म्हणे हेचि युक्ती । एक देवासी चिंतिती ॥४॥

५४

न विसंबिजे । न विसंबिजे । आमुतें पाहिजे । पांडुरंगा ॥ध्रु०॥

न विसंबीत वीट । धरिली चरणांतळीं । तेंविं दासें आपुलीं । न विसंबिजे ॥१॥

न विसंबित ह्रदयीं । धरिलें श्रीवत्सासी । तेंवि निजदासांसी । न विसंबिजे ॥२॥

रामीरामदास । विनवी पढरिराया । दासा आपुलिया । न विसंबिजे ॥३॥

५५

भाग्यें पंढरी पाहिली । दृष्टी विठ्ठलीं जडली । निपटचि लांचावली । विठ्ठल जालीसे आपण ॥१॥

नवल देखावयाचा साक्षात्कार । पहांट फुटली अनिवार । कोंदाटला विठ्ठलवीर । अवनी अंबर हारपलें ॥२॥

आजि निजबोध सोनियाचा जाला । अस्त उदय अस्ता गेला । रामीरामदास विनटला । हर्षे भरला त्रैलोक्य ॥३॥

५६

देह हे पंढरी आत्मा पंढरिराव । यात्रा महोत्साव सर्वकाळ ॥१॥

आम्ही यात्रेकरु नित्य यात्रा करुं । दर्शनीं सादरु पांडुरंग ॥२॥

भक्ती हेचि वीट भाव धरुं नीट ॥ उभा जो वरिष्ठ ब्रम्हादिकां ॥३॥

वैराग्य भीवरा ज्ञान पुंडलीक । तेथोनी सन्मुख पांडुरंग ॥४॥

निज बोधें दर्शन रामदासा जालें । यात्रेचें खुंटलें अनुसंधान ॥५॥

५७

आम्हीं देखिली पंढरी । सच्चिदानंद पैलतीरीं ॥ध्रु०॥

भाव भक्ति श्रवण मनन ॥ निदिध्यास साक्षात्कारपणें ॥१॥

चिच्छक्ति धर्मनदी । तरलों ब्रम्हास्मि बुद्धि ॥२॥

तेथिंचा अहंकार तेंचि पोंवळी । त्यजोनी प्रवेशलों राउळीं ॥३॥

रामदासीं दर्शन जालें । आत्म्या विठ्ठलातें देखिलें ॥४॥

५८

पुंडलीक म्हणिजे उभा पांडुरंग । तेंचि पांडुरंग नाम जालें ॥१॥

पांडुरंग देव पांडुरंग भक्त । पांडुरंग मुक्त श्रोते वक्ते ॥२॥

अळंकारीं हिरे जडिले पांडुरंग । पडिलें पांडुरंग तेज त्यांचें ॥३॥

पांडुरंग टिळा पांडुरंग माळा । पांडुरंग कीळा मुक्ताफळीं ॥४॥

पांडुरंग शंख पांडुरंग चक्र । पांडुरंग वस्त्रयुग्म शोभे ॥५॥

पांडुरंग नगर पांडुरंग शिखर । पांडुरंग नीर भीमानदीं ॥६॥

पांडुरंग विभव पांडुरंग भाव । पांडुरंग देव रामदासीं ॥७॥

५९

विठोबा तूं आमुचें कुळदैवत । आम्ही अनन्य शरणागत । तुझे पायीं असे चित्त । जीवीं आर्त भेटीचें ॥१॥

धांवें पावें विठो माये । उडी घालीं लवलाहें । भेटावया जीव फुटों पाहे । खंती देहीं न समाये ॥२॥

येईं उभारुनी बाहे ॥ धांव धांव विठ्ठले ॥३॥

रामदास बाहे करुणावचनीं । धांवें बाह्या पसरोनी । अश्रुं दाटले लोचनीं । आलिंगनीं पातली ॥४॥

६०

सहज बरवा सहज बरवा । सहज बरवा विठोबा माझा ॥१॥

सहज सांवळा दिगंबर । सहज कटीं करु ठेऊनि उभा ॥२॥

रामीरामदास म्हणे । सहज अनुभव तोचि जाणे ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : December 22, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP