भगवंत - नोव्हेंबर १५

महाराजांचे प्रवचन वाचले की वाटते , श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे . तारखेप्रमाणे शक्यतो प्रवचन वाचण्याचा नेम करावा , म्हणजे वर्षाला एक पारायण पूर्ण होईल .


आनंद पाहायला आपल्याला दुसरे कुठे जावे लागते का? नाही. जो स्वतःच आनंदरुप आहे त्याने आपण होऊन ‘ मी दुःखी आहे ’ असे मानून घेतले आहे. एकजण आपले तोंड आरशात पाहायला गेला, पण त्याला ते दिसले नाही. त्यावर दुसरा एकजण म्हणाला, ‘ मी दाखवितो ’ असे म्हणून आरशावर मळ बसला होता तो पुसून, त्याने आत पाहायला सांगितले, तेव्हा तोंड स्वच्छ दिसले. त्याचप्रमाणे साधू लोक करीत असतात. ते आपल्याला सांगत असतात की, तूच ब्रह्मरुप आहेस; म्हणजे तू स्वतःसिद्ध आणि आनंदरुप आहेस. परंतु आपण काय करतो की हा प्रपंच माझा आहे असे समजतो, आणि त्यामुळे त्यांतले सर्व सुखदुःख आपण आपल्यावर लादून घेतो. ज्याने तो उत्पन्न केला त्याला तो रक्षण करण्याची शक्ती असते आणि तो ते आपल्या इच्छेप्रमाणे करीतही असतो; पण तिथे आपल्यावर कर्तेपणा ओढून घेऊन आपण सर्व काळजी करीत बसतो. वास्तविक आपल्या हाती काय आहे? परमात्म्याला काय करायचे ते तो करीत असतो, आपण मात्र काळजी करुन शीण करुन घेत असतो. म्हणूनच काळजी सोडून देऊन आपण भगवंताला शरण होऊन राहावे. आपण त्याचे होऊन राहिले म्हणजे आपल्याला सुखदुःख होत नाही, आणि मग आपल्याला त्या आनंदाचा लाभ मिळतो.
काळजी ही मोठी विलक्षण असते. एका माणसाला आपल्या मुलाला चांगली नोकरी लागावी याची काळजी होती. पुढे त्याच्या मनाप्रमाणे नोकरी लागल्यावर, त्या मुलाच्या लग्नाची काळजी सुरु झाली. काही दिवसांनी लग्न झाले; मग पुढे सून चांगली वागत नाही म्हणून काळजी लागली. नंतर तिला मूल होईना म्हणून काळजी लागली. काही दिवसांनी तिला मूल झाले; त्या मुलाला फिट येऊ लागली म्हणून त्याला काळजी लागली. शेवटी आणखी काही दिवसांनी मुलाची फिट बरी झाली. पण त्या म्हातार्‍यालाच फिट्स येऊ लागल्या. आणि अखेर काळजी करीत करीतच तो मरुन गेला. काळजी ही आपल्याला भगवंतापासून खरेच काळाच्या स्वाधीन करते. आपण काळाच्या स्वाधीन झालो की आपली बुद्धी भ्रष्ट होते. खरे म्हणजे काळजीचे मूळ माझेपणात आणि कर्तेपणात आहे, आणि खुद्द कर्तेपणाचे मूळ भगवंताच्या विस्मरणात आहे. व्यवहारी माणसे मोठी हुशार असतात; भगवंताला साक्षी ठेवून काळजी करतात ! हा तर त्याच्याहिपेक्षा मोठा गुन्हा आहे. ‘ काळजी लागणे स्वाभाविक आहे ’ ही कल्पनाच आधी आपण मनातून काढून टाकली पाहिजे. आपली काळजी का सुटत नाही? या प्रश्नाचे उत्तर अगदी सोपे आहे. काळजीने आपल्याला धरण्याच्या ऐवजी आपणच काळजीला घट्ट धरुन ठेवतो, मग ती सुटणार कशी? ज्याने भगवंत आपलासा करुन घेतला त्याला काळजीचे कारण उरत नाही.

N/A

References : N/A
Last Updated : November 01, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP