भगवंत - नोव्हेंबर ८

महाराजांचे प्रवचन वाचले की वाटते , श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे . तारखेप्रमाणे शक्यतो प्रवचन वाचण्याचा नेम करावा , म्हणजे वर्षाला एक पारायण पूर्ण होईल .


जगामध्ये आणि जीवनामध्ये दुःख आहे यात शंका नाही. पण त्यापैकी पंचवीस टक्के दुःखच बाहेरुन येते. युद्ध, महागाई, दुष्काळ, चोर्‍यामार्‍या, दारिद्र्य इत्यादींचे दुःख बाहेरुन येते. पण पंचाहत्तर टक्के आपले दुःख आपल्यामधूनच निर्माण होत असते. आपले शरीर, मन आणि ह्रदयस्थ भगवंत मिळून आपण बनतो. भगवंत आनंदरुप असल्याने तो दुःख निर्माण करु शकणारच नाही. देहाचा स्वभाव झिजणे, क्षीण होणे, असमर्थ होत जाणे, हा असल्याने तो आपल्या मार्गाने जात असतो. तो दुःख निर्माण करु शकत नाही. जे जडच आहे ते सुखही देऊ शकत नाही आणि दुःखही निर्माण होऊच शकत नाही. ज्याचे मन देहाला चिकटते, त्याचे मन दुःख निर्माण करीत असले पाहिजे. भगवंताहून वेगळेपण आणि देहाशी एकपण, या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. देह लहान आहे, आकुंचित आहे, तात्पुरता आहे, सान्त आहे; तोच मी आहे अशा घट्ट भावनेने जिकडेतिकडे दोनपण दिसू लागते आणि त्यातून भयरुपी समंध साकार होतो आणि तो जीवाला छळतो. भगवंताच्या स्मरणात आनंदाची मस्ती भोगायला जन्मलेला माणूस, भयापोटी चिंता आणि चिंतेपायी दुःख निर्माण करतो. भगवंताने आपल्या संकल्पाने जग निर्मिले. त्यात घडणार्‍या घटनांचा आराखडा त्या संकल्पातच असतो. कालचक्र जसे फिरते तशा घटना आकार घेत जातात. त्यात भगवंताचा हात असतो. त्याचा विसर पडला की आपण गोंधळून जातो, आणि आपली कल्पना भय निर्माण करते. भगवंत मला सांभाळणारा आहे ही वस्तुस्थिती आहे, कारण भगवंताने स्वतःतूनच हे जग निर्माण केले. आपण अंतर्यामी त्याच्या नामात गुंतून राहिलो, तर त्याचे साहाय्य कसे मिळते याचा अनुभव आपोआप येईल. भगवंत नामस्वरुप आहे, म्हणून त्याच्या नामात राहाणार्‍याला देहाचे काय होईल याचे भय उरत नाही.
आपल्या प्रयत्नाने जेवढ्या गोष्टी करती येतील तेवढ्या करा. त्या होतच असतात, प्रयत्नाने फक्त आपला हात लागतो. आपल्या मनासारखेच व्हावे असे म्हणणे म्हणजे ज्या होणार्‍या गोष्टी आहेत त्या मी बदलाव्या, असे म्हणण्यासारखे आहे. त्या कधी बदलल्या जात नाहीत, आणि आपल्याला आनंद कधी मिळत नाही. म्हणून म्हणतो, रामावर निष्ठा ठेवावी. माझे कर्तव्य मी केले आहे ना? ते करीत असताना मी अनीती, अधर्माने वागलो नाही ना? आता जे व्हायचे ते होऊ दे; कुठे काळजी करा ! ही वृत्ती ठेवून जगात जो वागेल ना, तोच मनुष्य सुखी होईल.

N/A

References : N/A
Last Updated : November 01, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP