भगवंत - नोव्हेंबर २७

ब्रह्मचैतन्य महाराजांचे प्रवचन वाचले की वाटते, श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे. तारखेप्रमाणे शक्यतो प्रवचन वाचण्याचा नेम करावा, म्हणजे वर्षाला एक पारायण पूर्ण होईल.


समजा, आपल्याला एका गावाला जायचे आहे. त्या गावाला जाणारी आगगाडी धरुन आपण तिची संगती करतो. आपले गाव आले की आपण गाडी सोडतो. हे जसे खरे, त्याचप्रमाणे, निर्गुण हे आपले साध्य असले तरी आज आपल्याला सगुणच खरे मानून त्याची संगती केली पाहिजे. निर्गुणाशिवाय सगुण खरे नाही ही गोष्ट खरी; पण सगुण खरे धरुन चालल्याशिवाय निर्गुणापर्यंत पोहोचता येणार नाही हेही तितकेच खरे. सगुणोपासनेत स्वतःचा विसर पडला की, एकीकडे ‘ मी ’ नाहीसा होत आणि दुसरीकडे देव नाहीसा होतो, आणि शेवटी परमात्मा शिल्लक उरतो. म्हणूनच, आपण निर्गुणाची ओळख करुन घेऊन सगुणात राहावे. स्वतःचा विसर जर रामाच्या पूजनात पडू लागला, तर निर्गुण आणखी दुसरे कोणते राहिले? परंतु ताप आलेल्या माणसाला ज्याप्रमाणे सर्व कडूच लागते, त्याप्रमाणे आमची वृत्ती विषयाकार झालेली, तिला सगुण, निर्गुण, दोन्ही कुठे गोड लागतात? ‘ सगुणाशिवाय निर्गुण उपासना करतो ’ म्हणतो, त्याला त्याचे मर्मच नाही कळले. वस्तूतः तो सगुण उपासनाच करीत असतो, पण त्याचे त्यालाच नाही कळत. स्थलात आणि कालात जे देवाला आणतात, त्यांनी त्याला सगुणात नाही आणले या म्हणण्यात काय अर्थ आहे?
परमार्थाविषयी आपल्या काही विचित्र कल्पना असतात. अगदी अडाणीपणा पत्करला, पण हे विपरीत ज्ञान नको. सूर्य हा आपल्या आधी होता, आज आहे, आणि पुढेही राहणार आहे. तो नेहमीचाच असल्यामुळे त्याचे अस्तित्व आपल्या ध्यानात येत नाही, त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो. भगवंताच्या बाबतीत आपले तसेच घडते. एखादा नास्तिक जर म्हणाला की, ‘ देव नाहीच; तो कुठे आहे हे दाखवा, ’ तर त्याला असे उत्तर देऊन अडविता येईल की, ‘ देव कुठे नाही ते दाखवा. ’ पण हा उत्तम मार्ग नव्हे. देव नाही असे म्हणणारालासुद्धा, त्या स्वरुपाचे काहीतरी आहे ही जाणीव असतेच; फक्त तो त्याला निरनिराळी नावे देतो. निसर्ग, शक्ती, सत्ता, अशी नावे देऊन तो त्यांचे अस्तित्व मान्य करतो, पण ‘ देव ’ नाही असे तो म्हणतो. जे आहे असे त्याला वाटते तोच देव समजावा. मनुष्याला जितके ज्ञान असते तितके लिहिता येत नाही; जितके लिहिलेले असते तितके वाचणार्‍याला समजत नाही; त्याला जितके समजलेले असते तितके सांगता येत नाही; आणि ऐकणार्‍याला, तो जितके सांगतो तितके कळत नाही. म्हणून, मूळ वस्तूचे वर्णन स्वतः अनुभव घेऊनच समजावे. परमात्मा कर्ता आहे असे समजून, आपण आजचे कर्तव्य करीत राहावे.

N/A

References : N/A
Last Updated : November 07, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP