नामस्मरण - सप्टेंबर २९

महाराजांचे प्रवचन वाचले की वाटते , श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे . तारखेप्रमाणे शक्यतो प्रवचन वाचण्याचा नेम करावा , म्हणजे वर्षाला एक पारायण पूर्ण होईल .


मी प्रपंचासाठी नसून रामाकरता आहे , ही दृढ भावना ठेवावी . ‘ मी माझ्याकरता जगतो ’ असे न म्हणता ‘ रामाकरता जगतो ’ असे म्हणू या , मग रामाचेच गुण अंगी येतील . आपण प्रपंचाकरता जगतो , म्हणून प्रपंचाचे गुण अंगी येतात . म्हणून भगवंताकरता जगावे . प्रपंच हे साधन आहे , परमार्थ हे साध्य आहे . प्रपंच कुणाला सुटला आहे ? पण साधू त्याचा सदुपयोग करतात ; आम्ही तसा करीत नाही , म्हणून परमार्थ साधत नाही . जगात तीन गोष्टी दुर्मिळ आहेत ; मनुष्यजन्म , संतसमागम , आणि मुमुक्षुत्व . मनुष्यजन्म हा परमार्थाकरताच आहे , विषयभोगासाठी नव्हे . परमार्थाची तळमळ लागली पाहिजे . तळमळ उत्पन्न झाल्यावर , मन शुद्ध झाल्यावर , राम भेटेलच . समई लावली पण तेल वरचेवर न घातले तर ती विझेल . स्मरणरुपी तेल वारंवार घालावे , मग परमार्थ -दिवा कायम राहील . परमार्थ हा मुख्यतः अनुभवाचा आहे . पंढरपूरला जायचे असेल तर वाट चालू लागले पाहिजे . मग वाटेत कुणीतरी वाट दाखवणारा भेटतोच ; निदान पाट्या तरी आढळतात . आम्ही परमार्थमार्गावर प्रत्यक्ष चालूच लागत नाही , मग वाटाड्या कसा भेटणार ? परमार्थमार्गावर गुरु खास भेटेलच . म्हणून रामाचे अखंड स्मरण ठेवून परमार्थाला लागू या .

आचार आणि विचार यांची सांगड असावी . पोथीत जे ऐकतो ते थोडेतरी कृतीत येणे जरुर आहे . पोथी वाचल्यानंतर , जेवढे कळले तेवढे तरी आचरणात आणायला काय हरकत आहे ? जे कळणार नाही तेही पुढे हळूहळू कळेल . घरातून बाहेर पडल्यावर एकदम मुक्कामाचे ठिकाण दिसत नाही . प्रथम एक रस्ता , मग दुसरा , मग तिसरा , असे करता करता आपण मुक्कामाला पोहोचतो . त्याप्रमाणे , पोथीतले सगळे कळले नाही , तरी जे कळले तेवढे तरी कृतीत आणू या . दृढ निश्चयाने एकएक मार्ग आक्रमीत गेलो तर मुक्कामाला खास पोहोचू . म्हणून भगवतस्मरणाला जपले पाहिजे . त्याला प्राणापेक्षाही जास्त समजून सांभाळावे . संत , सदगुरु आणि शास्त्र यांच्या वचनावर दृढ विश्वास ठेवावा . तेथे बुद्धिभेद होऊ देऊ नये . याप्रमाणे वागले तर प्रपंच परमार्थरुपच होईल . मी रामाचा म्हणणे हाच परमार्थ , अहंबुद्धी ठेवणे हा प्रपंच . परमार्थात अहंकार मिसळला की तो प्रपंचच झाला ; उलट , प्रपंचातला अहंकार दूर झाला की तो परमार्थच . संसाररुपी वृक्षाला अभिमानाचे पाणी आम्ही वारंवार घालतो म्हणून तो इतका फोफोवला . हा मूळ अभिमानच नष्ट केला पाहिजे . खरा कर्ता ईश्वर असताना , जीव विनाकारणच ‘ मी कर्ता ’ असे मानतो . झाडाचे पान रामावाचून हलत नाही . देहाचा योगक्षेम तोच चालवितो . मी कर्ता नसून राम कर्ता ही भावना वाढविणे हीच खरी उपासना .

N/A

References : N/A
Last Updated : October 12, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP