नामस्मरण - सप्टेंबर २८

महाराजांचे प्रवचन वाचले की वाटते , श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे . तारखेप्रमाणे शक्यतो प्रवचन वाचण्याचा नेम करावा , म्हणजे वर्षाला एक पारायण पूर्ण होईल .


अभिमान सोडून जो गृहस्थाश्रम पाळील तोच खरा परमार्थी . अभिमान सोडल्याने गृहस्थाश्रम चांगला होतो . ‘ मी म्हणेन तसे होईल , ’ असे कधीही म्हणू नये . अभिमानाच्या पायावर उभारलेली इमारत डळमळीत होणारच . अभिमान हा देहाचा आणि तत्संबंधी विषयांचा असतो . अभिमानाचे मूळच काढून टाकावे ; म्हणजे , मी देहाचा आहे म्हणतो , हेच काढून टाकावे . हा देह माझा नाही हे आपल्याला पटते , पण अखंड सहवासाने आपले त्यावर प्रेम जडते . एकदा देहावर प्रेम जडले म्हणजे मग अभिमान आला . त्याच्या पाठोपाठ लोभ , क्रोध येणारच . अभिमान म्हणजे ‘ मी कर्ता ’ ही भावना असणे . ही भावना टाकून काम केले , तर व्यवहारात कुठे नडते ? आपल्या देहाचा आणि मनाचा फार निकटचा संबंध आहे . पण देह केव्हातरी जाणार असल्याने त्याला इतके महत्त्व नाही . नुसता जाडजूड देह कामाचा नाही . आपले मन तयार झाले पाहिजे . ‘ मी भगवंताचा आहे ’ हे एकदा मनाने जाणून घेतले , म्हणजे मग अभिमानरहित होता येते . नेहमी भगवदभजनात राहण्याचा प्रयत्न करा , म्हणजे अभिमान शिवणार नाही . डोळ्यांत पाणी आणून भगवंताला आळवावे , त्याला शरण जावे ; भगवंत कृपा केल्याशिवाय राहणार नाही . आपण आपल्या मर्यादा ओळखून वागावे . अमुक एक गोष्ट अमक्या तर्‍हेने घडावी असे जोपर्यंत आपल्याला वाटते आहे , तोपर्यंत व्यवहाराच्या मार्गाने जो योग्य प्रयत्न आहे तो आपण केला पाहिजे . पण प्रयत्न केल्यावर मात्र त्याचे फळ भगवंतावर सोपवावे , आणि जे काही घडेल त्यामधे समाधान मानावे .

आपले अंतःकरण नेहमी शुद्ध ठेवावे . रात्री निजण्यासाठी अंथरुणावर पडले असताना आपले अंतरंग शोधून पाहावे की , ‘ मी कुणाचा द्वेष -मत्सर करतो का ? ’ तसे असेल , तर ते मनातून जबरीने काढून टाकावे ; ते थोडे जरी शिल्लक राहिले , तरी आपल्या परमार्थाच्या आड येणार आहे ; आपल्या मनाने आपल्याला निश्चयाने असे सांगितले पाहिजे की , ‘ मी कुणाचाही द्वेष करीत नाही . ’ आपले अंतःकरण इतके शुद्ध आणि सरळ असावे की , आपण तर कुणाचा द्वेष -मत्सर करु नयेच नये , परंतु दुसरा कुणी आपला द्वेष करीत असेल ही कल्पनासुद्धा आपल्याला येता कामा नये . ‘ मी भगवंताचा आहे , या देहाचा नाही . ’ असे अखंड अनुसंधान ठेवून , आपल्याला भगवत्स्वरुप का होता येणार नाही ? जो आतबाहेर भगवंताने भरुन राहील किंवा त्या ज्ञानाने भरुन राहील तोच खरा ज्ञानी होय . आणि जाणीव ज्याप्रमाणे देहाला व्यापून असते , त्याप्रमाणे भगवंताचे स्मरण ज्याचे मन व्यापून टाकील तोच खरा साधक , तोच खरा अनुसंधानी , आणि तोच खरा मुक्त समजावा .

N/A

References : N/A
Last Updated : October 12, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP