नामस्मरण - सप्टेंबर ११

महाराजांचे प्रवचन वाचले की वाटते , श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे . तारखेप्रमाणे शक्यतो प्रवचन वाचण्याचा नेम करावा , म्हणजे वर्षाला एक पारायण पूर्ण होईल .


भगवंत आपलासा करुन घेण्याचा प्रयत्न करावा . अभिमान सोडून जर असा प्रयत्न चालू ठेवला तर सदगुरुकृपा झाल्याशिवाय राहात नाही . अमुक एक साधन करीत जा म्हणून सदगुरुने सांगितले , आपण ते अट्टाहासाने करु लागलो , पण आपले विचार जर आहेत तसेच राहिले , तर भगवंताचे प्रेम येणार कसे ? चारपाच वर्षे खूप कष्ट केले , विषय बाजूला ठेवले , पण अजून कसा अनुभव येत नाही असे म्हणू लागलो , तर साधनाचा जोर कमी होतो आणि निष्ठा घसरायला लागते . जे काही होणार ते सदगुरुच्याच इच्छेने , त्याच्याच प्रेरेणेन होते , अशी आपली ठाम श्रद्धा पाहिजे . साधनाचे प्रेम तो भगवंतच देतो , हे आपण विसरुन जातो . आपण पूर्वी काही साधन करीत नव्हतो , ते आता करु लागलो , असा साधनाबद्दलचा अभिमान बाळगू लागलो तर काय उपयोग ? सदगुरुच्या पायावर एकदा डोके ठेवले की काहींचे काम होते , यात सदगुरु पक्षपात करतात असे कसे म्हणता येईल ? आपलेच कुठेतरी चुकत असले पाहिजे याचा विचार करावा . आजवर देवाचे नाव घेणे बरे असे वाटत होते , परंतु घ्यायचे काही जमले नाही ; ते आता घेऊ लागलो हे त्याच्या कृपेने घेऊ लागलो हे नाही का समजू ?

प्रपंचात मनुष्याला धीर हवा . आपण भगवंताच्या स्मरणात निर्धास्तपणे असावे . फार चिकित्सा करण्याने नुकसान होते . विद्येचे फळ काय , तर आपल्या मनाला जे बरे वाटेल त्याची चिकित्सा न करता ते करायचे , आणि आपल्याला जे नाही त्याची चिकित्सा करीत बसायचे ! चिकित्सा मर्यादेपर्यंतच असावी . ती मर्यादेबाहेर गेली की आपण काय बोलतो हे आपले आपल्यालाच कळत नाही .

एक मुलगा रोज तालमीत जातो आणि चांगले दूध , तूप खातो ; पण तो जर दिवसेंदिवस वाळू लागला आणि हडकुळा दिसू लागला तर त्याला काही तरी रोग आहे असे नक्की समजावे . त्याचप्रमाणे , सध्याच्या सुधारणेने माणूस पाण्यावर , हवेत , जिकडे तिकडे वेगाने जाऊ लागला आहे खरा , पण तो दिवसेंदिवस जास्त असमाधानी बनत चालला आहे ; हे काही खर्‍या सुधारणेचे लक्षण नाही . परिस्थिती वाईट आली म्हणून रडू नका , कारण ती बाधतच नसते . कोणत्याही काळात , कशाही परिस्थितीत , आपल्याला आनंदरुप बनता येईल . आजपर्यंतचा आपला अनुभव पाहिला तर ‘ आपण केले ’ असे थोडेच असते ; म्हणून परिस्थितीबद्दल फारशी काळजी न करता आपण आपले कर्तव्य तेवढे करावे , आपल्या वृत्तीवर परिणाम होऊ देऊ नये . अभ्यास केला तर थोड्या दिवसांत हे साधेल .

N/A

References : N/A
Last Updated : September 29, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP