नामस्मरण - सप्टेंबर २०

महाराजांचे प्रवचन वाचले की वाटते , श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे . तारखेप्रमाणे शक्यतो प्रवचन वाचण्याचा नेम करावा , म्हणजे वर्षाला एक पारायण पूर्ण होईल .


आपण रामापाशीं मागावें एक । ‘ तुझे इच्छेनें सर्व जगत चालतें देख । त्यांतील मी एक पामर । रामा , तुला कसा झालों जड ? ॥ रामा , अन्यायाच्या कोटी । तूंच माय घालीं पोटीं ॥ मातेलागीं आलें शरण । त्याला नाही दिलें मरण । ऐसें ऐकिलें आजवर । कृपा करीं तूं रघुवीर ॥ दाता राम हें जाणून चित्तीं । म्हणून आलों दाराप्रति ॥ आता रामा नको पाहूं अंत । तुजवीण शून्य वाटे जगत ॥ ज्याचा ज्याचा मी केला स्वार्थ । तें तें झालें दुःखाला कारण ॥ आतां असो नसो भाव । मी रामा ! तुझा झालों देख ॥ आतां कसें तरी करीं । मी पडलों तुझ्या दारीं ॥ आता लौकिकाची चाड । नाहीं मला त्याची आवड । हें ठसावे चित्ती । कृपा करीं रघुपति ॥ आता मनास येई तसें करीं । माझें मीपण हिरोनि जाई ॥ ’

जोंवर देहाची संगति । तोंवर मी -माझें ही वृत्ति । राहील अभिमानाला धरुन । तेथे न राहे कधीं अनुसंधान ॥ काळोख अत्यंत मातला । घालवायला उपाय न दुजा सुचला ॥ होता सूर्याचें आगमन । काळोख जाईल स्वतः आपण ॥ प्रपंचांतील संकटें अनिवार । माझ्या बोलण्याचा करावा विचार । आतां कष्टी न व्हावें फार ॥ प्रपंचाची आठवण । हेंच दुःखाचें मूळ कारण ॥ तेंच घोकीत बसल्यानें । न होई आनंदरुप स्मरण ॥ सुखदुःखाची उत्पत्ति । आपलेपणांत आहे निश्चित ॥ स्वार्थ म्हणजेच आपलेपण । म्हणून माझे मीच दुःखाला कारण ॥ आपण आपलेपणानें वागत गेलें । सुखदुःख चिंता शोक यांचे मालक व्हावे लागलें ॥ अमुक व्हावें , अमुक होऊं नयें , । याचें कसे होईल , त्याचें कसे होईल , । ही चित्ताची अस्वस्थता । याचें नांव चिंता ॥ सुखदुःखें चित्ताची न राहे स्थिरता । तीच त्याची खरी अवस्था ॥ सुखदुःख परिस्थितीवर नसतें । आपल्या जाणीवेवर अवलंबून राहतें ॥ ज्यांत एकाला सुख वाटते । तेच दुसर्‍याला दुःखाला कारण होतें ॥ दुःखाचें मूळ कारण । जगत सत्य मानलें आपण ॥ देहानें कष्ट केले फार । त्यांतील फळाचा घेऊन आधार ॥ फळ नाहीं हातीं आलें । दुःखाला कारण तें झालें ॥ आपले चित्त झालें विषयाधीन । नाहीं दुःखास दुसरें कारण ॥ मागील गोष्टींची आठवण । पुढील गोष्टींचें चिंतन । हेंच दुःखाला खरें कारण ॥ याला एकच उपाय जाण । अखंड असावें अनुसंधान ॥ प्रपंच न मानावा सुखाचा । तो असावा कर्तव्याचा ॥ वृत्ति होऊ द्यावी स्थिर । चित्तीं भजावा रघुवीर ॥

N/A

References : N/A
Last Updated : October 12, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP