नामस्मरण - सप्टेंबर १

महाराजांचे प्रवचन वाचले की वाटते , श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे . तारखेप्रमाणे शक्यतो प्रवचन वाचण्याचा नेम करावा , म्हणजे वर्षाला एक पारायण पूर्ण होईल .


प्रापंचिक लोक म्हणतात की , विषयाचा अनुभव तात्काळ येतो , पण भगवंताचा अनुभव हा अनुमानाचा आणि श्रद्धेचा आहे . हे त्यांचे म्हणणे मला पटते . प्रापंचिक लोक प्रपंच सोडीत नाहीत याचे मला नवल वाटत नाही , पण ते सुख चिरकाल टिकणारे आहे ही समजूत करुन घेऊन त्यामध्ये रमतात , याचे मला वाईट वाटते . मी असे म्हणतो की , तुमच्या अनुभवाप्रमाणे जे खरे आहे तेवढेच खरे माना , पण ते तुम्ही करीत नाही . भगवंताचा आनंद मिळाला नाही तरी हरकत नाही , पण कायम टिकणारे सुख विषयामध्ये नाही एवढी जरी खात्री झाली तरी पुष्कळ काम होईल . त्यामधूनच भगवंताचा आनंद उत्पन्न होईल . भगवंताचा आनंद बाहेरुन कुठून आणायचा नसून तो आपल्यामध्येच उत्पन्न होणारा आहे .

सध्याच्या सुधारणेने देहाचे सुख पुष्कळ वाढविण्याचा प्रयत्न केला , पण ते शेवटी दुःखालाच कारण झाले . समजा , देहाचे पुष्कळ सुख समोर आहे , पण ते भोगण्याची जर आपल्याला शारीरिक शक्ती अथवा सांपत्तिक सुबत्ता नसेल तर त्याच्या प्राप्तीमुळेसुद्धा दुःखच पदरात पडेल . सगळ्यांना सगळे सुख मिळणे केव्हाच शक्य नसल्यामुळे प्रत्येकजण धडपड करुन शेवटी दुःखीच राहतो . सुख आणि दुःख ही दोन्ही वस्तुतः उत्पन्न झालीच नाहीत . ती आपण आपल्या भ्रमाने उत्पन्न केली आहेत . मनाच्या सुलट झाले की सुख होते , आणि मनाच्या उलट झाले की दुःख होते . मुळात सुखही नाही आणि दुःखही नाही . ‘ मी देही ’ ही भावना जोपर्यंत आहे , तोपर्यंत अनुभवाच्या बरोबर भ्रम हा असायचाच . सृष्टी ही आनंदमय असूनही तशी ती आपल्याला दिसत नाही , हा आपला भ्रम आहे ; त्या भ्रमाचे मूळ आपल्या आतमध्ये आहे . भगवंत तिथे माया , काया तिथे छाया , हे जसे खरे , त्याप्रमाणे अनुभव तिथे भ्रम असायचाच हा नियम आहे . पाचजण मिळून प्रपंच बनतो . त्यामध्ये प्रत्येकजण स्वार्थी असतो ; मग सर्व सुख एकट्यालाच मिळणे कसे शक्य आहे ?

एका गावाहून दुसर्‍या गावी बदली झालेला मनुष्य आता दोनतीन वर्षे तरी निदान आपल्या बदली होत नाही म्हणून निश्चिंत असतो . या प्रपंचामध्ये आपली आयुष्याची तितकीसुद्धा निश्चिंती नाही . याकरिता , आपण आयुष्याचा एक क्षणसुद्धा फुकत न घालविता सत्कर्मांत , म्हणजेच भगवंताच्या अनुसंधानात व्यतीत करावा . आपला शत्रू भेटून त्याच्याशी भांडण झाल्यामुळे गाडी चुकली काय , किंवा कोणी मित्र भेटून त्याच्याशी प्रेमाने बोलण्यात गाडी चुकली काय , दोन्ही सारखेच . त्याप्रमाणे प्रपंचामध्ये आघात झाल्यामुळे भगवंताला विसरले काय , आणि प्रपंच अत्यंत अनुकूल असून त्यामध्ये गुंतून राहिल्यामुळे भगवंताला विसरले काय , दोन्ही सारखेच ; नुकसान एकच .

N/A

References : N/A
Last Updated : September 29, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP