मे २५ - साधन

महाराजांचे प्रवचन वाचले की वाटते , श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे .


घरामध्ये सर्वांनी कसे हसूनखेळून मजेत असावे . आपली वृत्ती अशी असावी की , ज्याला आनंद पाहिजे असेल त्याने आपल्याकडे धाव घ्यावी . इतर संपत्ति कितीही दिली तरी पुरे पडत नाही , पण वृत्तीचा आनंद देऊन कधी संपत नाही . जीवन हे मूलत : आनंदमय आहे ; सृष्टिक्रमावर सोडले तर ते सुखी होईल . आनंद अत्यंत विशाल आहे . देहबुध्दि मेली म्हणजेच त्याची प्राप्ती होत असते . आनंद मिळविणे हे सोपे आहे ; पण हे समजून , आपण सोपे झाले पाहिजे . आपण उपाधीने जड झालो आहोत , म्हणून आपण हलके झाले पाहिजे . सर्व जगाला आनंद हवा असतो . म्हणून कोणत्याही परिस्थितीत आनंद राखावा . आनंद हा शाश्वत आहे . पण आपण विषयातच आनंद मानतो , त्यामुळे खरा शाश्वत आनंद आपल्याला मिळत नाही . फोड आला म्हणजे खाज सुटते , आणि खाजवल्यावर रक्त आले तरी एक प्रकारचा आनंद आपल्याला होत असतो ; पण म्हणून , खाजवतच राहणे योग्य होईल का ? कुत्र्याच्या तोंडात हाड असताना , स्वत :च्या तोंडातले रक्तच तो चघळत असतो . त्यातले काही रक्त जमिनीवर पडून कमीही होत असते . परंतु तो हाडूक काही सोडीत नाही . विषयाचा आनंद हा असाच असतो . कोणतीही वस्तु अस्तित्वात नसतानाही होणारा जो आनंद , ते परमात्म्याचे व्यक्त स्वरुप आहे .

वासना भगवंताकडे वळविली की मग आनंदाशिवाय दुसरा कोणता लाभ होणार ? खरोखर , वासना ही विस्तवासारखी आहे . ज्या विस्तवाने सुंदर स्वयंपाक करुन कढत आणि ताजे अन्न खायला मिळते , तोच विस्तव जर घरावर ठेवला , तर घर जाळून टाकतो . त्याचप्रमाणे , वासना भगवंताकडे वळली तर माणसाला आनंदरुप बनविते ; पण ती जर विषयाकडे वळली तर त्याला दु :खामध्ये लोटते . वासना रोज नवीन नवीन खेळ आपल्याला दाखविते ; म्हणजे , खेळ जुनेच असतात , पण आपली वासना मात्र नवी असते . वासना , म्हणजे अभिमान किंवा मीपणा , हा मनुष्याचा शत्रु असून तो त्याच्या आनंदावर विरजण घालतो . वासनेमुळे चित्ताला समाधान नाही हे कळत असूनसुध्दा , वासनेचा जोर इतका विलक्षण असतो की तो शेवटच्या श्वासापर्यंत जात नाही . ज्याने वासनेला जिंकले , त्याच्यावर भगवंताची कृपा झाली म्हणून समजावे . वासनेला जिंकायला भगवंताच्या नामात राहण्यासारखा दुसरा उपाय नाही . वासना न ठेवता कर्म करणे याचेच नाव संन्यास . जिथे वासना संपली तिथे आनंदच आहे .

N/A

References : N/A
Last Updated : May 25, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP