मे २३ - साधन

महाराजांचे प्रवचन वाचले की वाटते , श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे .


तुम्ही स्वत :ला दिवसातून एकदा तरी विसरता की नाही ? हल्ली आपण आपल्याला विसरतो , पण ते विषयाकरिता विसरतो . स्वत :ला विसरावे , पण ते विषयाकरिता विसरु नये . एखादे वेळेस असे होते की , एखादी आनंदाची बातमी समजली म्हणजे आपण काय करतो हे आपले आपल्यालाच समजत नाही . अशा वेळी देह भानावर नसतो हेच खरे . त्याचप्रमाणे दु :खाची बातमी कळली म्हणजे होते . थोडक्यात म्हणजे , आपण जेव्हा विषयाच्या अधीन होतो , तेव्हा आपण देहाला विसरुन विषय भोगतो . त्याचप्रमाणे क्रोधाचे होते . विषयासाठी देहभान विसरणे हे केव्हाही वाईटच ; परंतु देवाकरिता जर आपण आपल्याला विसरलो , तर ते फारच उत्तम . भजन करीत असताना देहभाव विसरुन भजन करावे . आपण आता तसे करतो का ? भजन म्हणत असताना कोणी ताल चुकला की लगेच आपण रागावतो ; ते खरे भजन होत नाही . म्हणून भजन करताना , मी देवापुढे आहे , आणि तो आणि मी याच्याशिवाय दुसरे कोणी नाही , असे मानूनच भजन करावे आणि तशी सवय ठेवावी , म्हणजे देहभाव विसरता येईल . संसारात आपण कोण हे न विसरता संसार करावा ; म्हणजेच , विषयाच्या अधीन केव्हाही न होता संसार करावा . स्वत :ची आठवण ठेवून प्रपंच केला तर तो आपल्याला बाधक व्हायचा नाही .

व्यवहारात काम , क्रोध , लोभ , वगैरे सर्व काही असावे , पण आपण त्यांच्या स्वाधीन न होता , त्यांना आपल्या ताब्यात ठेवून वागावे ; म्हणजे देहभाव आपोआप नष्ट होऊन जाईल . हे सर्व साधायला , परमेश्वराला शरण जाणे हा एकच सोपा मार्ग आहे ; आणि त्याकरिता नामस्मरणात राहणे हेच साधन आहे . कोणी बारा अन बारा चोवीस वर्षे साधनात राहूनही काही काम झाले नाही असे म्हणतात , आणि यात काही अर्थ नाही म्हणून सोडूनही देतात ; तेव्हा अशा लोकांतच अर्थ नसतो , की गुरुत काही नसते ? तर आपले आपणच याला कारणीभूत असतो हे पक्के समजावे . संन्यास घ्यायचा असेल तर बायकोला बरोबर घेऊन संन्यास घेता येईल का ? त्याप्रमाणे , विषय बरोबर घेऊन गुरुकडे गेलो , तर गुरुची खरी भेट होईल का ? ती शक्य नाही . याकरिता , ते सांगतील ते साधन आधी करावे म्हणजे चित्त शुध्द होते , आणि ते झाल्यावर त्यांची खरी भेट होते . म्हणून आपण त्यांच्याजवळ खरे समाधान मागावे . आणि ते मिळाल्यावर आणखी काय मिळवायचे राहते ? मग तो ज्या स्थितीत ठेवील त्यातच समाधान होते . देहभोगाची अशा वेळी काहीच किंमत राहात नाही , आणि मग त्याला कंटाळण्याचेही कारण उरत नाही .

N/A

References : N/A
Last Updated : May 25, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP