TransLiteral Foundation
मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|कथाकल्पतरू|स्तबक ८|
स्तबक ८ - अध्याय २८

कथाकल्पतरू - स्तबक ८ - अध्याय २८

'कथा कल्पतरू' या ग्रंथात चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे, तसेच रामायण, महाभारत व श्रीमद्‍भागवत हे हिंदू धर्मिय वाङमय ओवीरूपाने वर्णिलेले आहे.


अध्याय २८

श्रीगणेशाय नमः

धर्मासि नाम जयंत ॥ भीमा नाम बळिवंत ॥ अर्जुनासी विजयवंत ॥ साह्यवंत सहदेवो ॥१॥

आणि नकुळ जयसुत ॥ ऐसा नामांचा संकेत ॥ धर्म ठेवी तंव अनंत ॥ तेथें पातला ॥२॥

वृद्धब्राह्मणाचेनि रुपे ॥ थरथरां अंग त्वचा कांपे ॥ पांडव घालिती अमूपें ॥ दंडवतें पैं ॥३॥

ब्राह्मण ह्नणे पांडवांसी ॥ चला मजसवें सैंवरासी ॥ काहीं दक्षिणा तुह्मांसी ॥ मिळेल तेथें ॥४॥

मग त्यासवें पांचही जण ॥ चालिले कुंतिये पुसोन ॥ काहीसें होतां मार्गक्रमण ॥ देव प्रकट जाहला ॥५॥

पांडव चरणी लागले ॥ मग मुरडोनि शाळेसि आले ॥ कृष्णकुंती सर्व भेटले ॥ जाहली पूजा ॥६॥

नवरत्नांची मुद्रिका ॥ करीं होती यदुनायका ॥ ते धर्मासि दीधली देखा ॥ प्रेमादरें ॥७॥

मग आज्ञा घेवोनि मुरारी ॥ गेले आपुले मेळिकारीं ॥ इकडे भीम धर्मा विनंती करी ॥ भूक थोरी लागली ॥८॥

तेणें मुद्रिका देवोनि भीमासि ॥ ह्नणे जो पूर्ण आहार देईल तुजसी ॥ हे मुद्रिका द्यावी तयासी ॥ नातरी घेवोनि येइंजे ॥९॥

येरु घेवोनि चालिला झडकरी ॥ नगरीं दाखवी घरोघरीं ॥ ह्नणे जेऊं घालील पोटभरी ॥ त्यासि हे देईन ॥१०॥

परि ते भीमा देखोनि ह्नणती ॥ याची मुद्रिका नलागे हातीं ॥ हा झगटोनि भोजनांती ॥ जाईल घेवोनी ॥११॥

ह्नणोनि द्रुपदाचें मंदिर ॥ तया दाविती समग्र ॥ येरु जावोनियां शीघ्र ॥ भेटला त्याचे प्रधाना ॥१२॥

ह्नणे हे मुद्रिका देतों तुज ॥ परि पूर्ण आहार द्यावा मज ॥ भोजनासाठीं तेजःपुंज ॥ देतसें रत्न ॥ ॥१३॥

मुद्रिका प्रधान जंव पाहे ॥ ह्नणे हे पृथ्वीचें मोल लाहे ॥ भोजनासाठीं येत आहे ॥ तरी न घ्यावी कां ॥१४॥

मुद्रिका वानिती समस्त ॥ परि भय वाटे मनांत ॥ झणी हा मावरुपें अतीत ॥ असेल राक्षस ॥१५॥

प्रधान ह्नणे राक्षस असेल ॥ तरी अन्नहानीच होईल ॥ एकन्नभोजनचि जाईल ॥ तें पुण्य मानूं ॥१६॥

असो मुद्रिका अंगुळीं घालुनी ॥ ह्नणे चालें भोजनालागुनी ॥ भीम ह्नणे ऐका वचनीं ॥ प्रमाणोत्तर ॥१७॥

जरी पूर्णआहार द्याल मातें ॥ तरीच मुद्रिका भोगेल तुह्मातें ॥ आणि न द्याल तरी मागुतें ॥ घेईन मुद्रिकेसी ॥१८॥

प्रधान ह्नणे गोष्टी कायसी ॥ चालरे ऊठ किती खासी ॥ भीम ह्नणे समृद्धी तुह्मासी ॥ परि बोल भला ॥१९॥

प्रधान ह्नणे आहार न देववे ॥ तरी त्वां मुद्रिकेसि न्यावें ॥ पोट भरलिया उगलेंचि जावें ॥ तनखा नाहीं मुद्रिकेसी ॥२०॥

ऐसें दोघांचें मन मानलें ॥ भाषाबोल उभयां जाहले ॥ जनलोक साक्षी ठेविले ॥ प्रमाणासी ॥२१॥

यापरि अपूर्व रत्न देखोनी ॥ प्रधान भ्रमला निजमनीं ॥ मग आरोणास्थानीं ॥ नेला वृकोदर ॥२२॥

रांधवणीयांसि ह्नणे ॥ यया पूर्णभोजन घालणें ॥ मग गमन केलें प्रधानें ॥ राजभद्रीं ॥२३॥

तेथें आला शिखंडिया ॥ तेणें ते मुद्रिका देखोनियां ॥ आपुल्या हातीं घालोनियां ॥ गेला मंदिरांत ॥२४॥

येरीकडे भीम बैसला ॥ ह्नणे पृथ्वीपात्रीं अन्न घाला ॥ रांधवणी सहस्त्र सोळा ॥ वाढिती अन्नें ॥२५॥

पृथ्वीचिये भूपाळांसी ॥ निपजविल्या होत्या अन्नराशी ॥ तीं सर्व वाढिलीं तयासी ॥ नानाविध पक्कान्नें ॥२६॥

तैलें तुपें पत्रशाखा ॥ सकळ पदार्थ लवणशाखा ॥ भक्षितां वायूचिया लेंका ॥ क्षण न लागे ॥२७॥

जंव वाढावया आणों जाती ॥ तंव वाढिल्याची करी शांती । वाढितां सकळ भागलीं तीं ॥ परि न तृप्ती वृकोदरा ॥२८॥

मग रांधवणी भिऊनि तया ॥ भीतरींचि राहिलिया ॥ येरु हाका मारी वहिलिया ॥ आणाआणा पदार्थ ॥२९॥

मग कोपें सडकरोनी ॥ धापा हाणिती ब्राह्मणी ॥ तो गवगवा आइकोनी ॥ तेथें आला प्रधान ॥३०॥

पाहे शेष तंव अन्न नाहीं ॥ भिक्षा लाविली रायासि पाहीं ॥ आतां वाढावें तें काई ॥ पडिला चिंते ॥३१॥

अन्न भक्षिलें शतखंडिया ॥ भय उपजलें प्रधाना तया ॥ मग चरणीं लागोनियां ॥ बुजावीत वृकोदरा ॥३२॥

स्वामी आतां कृपा कीजे ॥ येरु ह्नणे मुद्रिका दीजे ॥ कृतनिश्वयो आठविजे ॥ जो बोलिलासि मागां ॥ ॥३३॥

प्रधान ह्नणे कीं ते मुदी ॥ सर्वथा मी तुज नेदीं ॥ येरु होवोनि महाक्रोधी ॥ हाणी चडकणा ॥३४॥

प्रधान मूर्छागत पडिला ॥ सेवकांसी पळ सूटला ॥ भीम मारा प्रवर्तला ॥ आपटी कवळोनी ॥३५॥

दाहीदिशांतें गोफणी ॥ तंव पायीं लागती ब्राह्मणी ॥ आह्मी तुझिया दासी होउनी ॥ प्राणें राखीं मायबापा ॥३६॥

येरु न सांभाळीचि क्रोधें ॥ ब्राह्मणी आपटिल्या वसुधे ॥ रुदन करिती महाशब्दें ॥ कोल्हाळ थोर ॥३७॥

येकी ह्नणती अहो माये ॥ इतुकें केलें द्रुपदरायें ॥ आतां करावें तें काये ॥ जावें कोणे ठायी ।३८॥

ते हांकबोंब आयकिली ॥ द्रौपदी पहावया आली ॥ ब्राह्मणीलागीं बोलिली ॥ काय जालें सांगा पां ॥३९॥

ब्राह्मणी ह्नणती तियेतें ॥ तुझें वर्‍हाड आह्मां भोंवतें ॥ आतां भविन्नलें तें तूतें ॥ काय सांगों ॥४०॥

द्रौपदी देखोनि भीमासी ॥ ह्नणे हा महावीर तापसी ॥ उचलोनि नेईल जरी आह्मांसी ॥ तरी कवण निवारील ॥४१॥

ह्नणोनि द्रौपदी पळाली ॥ गृहीं लपोनि राहिली ॥ रायें येवोनि तये वेळीं ॥ मनीं आणिला वृत्तांत ॥४२॥

सकळही ऐकोनि स्थिती ॥ मिळाले पृथ्वीचे भूपती ॥ आणि येवोनि श्रीपती ॥ पुसे तयांसी ॥४३॥

मग तो अवघा प्रकार ॥ श्रुत करीतसे वृकोदर ॥ तंव पुसे शारंगधर ॥ प्रधानासी ॥४४॥

या उपरी अवघी व्यवस्था ॥ प्रधान सांगे गोपिनाथा ॥ देवो ह्नणतसे समस्तां ॥ द्यारे याची मुद्रिका ॥४५॥

प्रधान ह्नणे तये वेळीं ॥ ते तरी राजपुत्रें नेली ॥ मग देवें आणविली ॥ पाठवोनि द्रुपदा ॥ ॥४६॥

प्रधाना ह्नणितलें देवरायें ॥ कीं अतीताची वस्तु राखों नये ॥ यासी जेवविलें पाहें ॥ तें घडलें पुण्य ॥४७॥

मग ते मुद्रिका अवधारा ॥ देवोनि वायूचिया कुमरा ॥ समजाविलें त्या अवसरा ॥ पायीं अवघे पाडिले ॥४८॥

तो मुद्रिका घेवोनि जात ॥ परि हे पूर्वील ऐकोनि मात ॥ करावया तयाचा साह्यार्थ ॥ येत होते पांडव ॥४९॥

तयांसि भीम भेटला ॥ अवघा वृत्तांत सांगीतला ॥ मग सर्व प्रवेशले शाळा ॥ कुलालाची ॥५०॥

ऐसी मुद्रिकेची ख्याती ॥ करविता जाहला श्रीपती ॥ हें ऐकता सकळ नासती ॥ ब्रह्महत्या ॥५१॥

ऐसी क्रमिली ते निशी ॥ तंव काय वर्तलें येरा दिवशी ॥ ते अपूर्वता परियेसीं ॥ भारता गा ॥५२॥

पांडव ह्नणती मातेसी ॥ आह्मी जातों सैंवरासी ॥ कांहीं भिक्षा मिळेल आह्मासी ॥ तये ठायीं ॥५३॥

तैं बोलिली कुंतमादेवी ॥ जे मिळेल ते वांटोनि घ्यावी ॥ पार्थे बांधिली पालवीं ॥ शकुनगांठी ॥५४॥

चौघेबंधु विचारिती ॥ कीं दांडिये बैसोनि सभेप्रती ॥ जाती समस्त भूपती ॥ आणि अस्मद्वैरी दुर्योधन ॥५५॥

मग धोत्रासि देवोनि गांठीं ॥ मध्यें भीमाची घातली काठी ॥ धर्मा बैसवोनि किरीटी ॥ वृकोदर उचलिती ॥५६॥

नगर पाहत चालिले ॥ मंडपद्वारीं पातले ॥ तंव त्रैलोक्य असे दाटलें ॥ भूपाळेंसी ॥५७॥

गादिया मुंडे सिंहासनें ॥ बैसले असती राय राणे ॥ डोळी देखोनि सकळ जनें ॥ हास्यवदनें केली पैं ॥५८॥

येक ह्नणती केवढी प्रौढी ॥ डोळिये बैसविला कापडी ॥ येक कौतुकें बोलती फुडीं ॥ नाही असेल पांगुळा ॥५९॥

तेथें यक्षकिन्नर देव ॥ पन्नग असुर मानव ॥ मुनीश्वर सनकादि सर्व ॥ बैसले होते सैवरीं ॥ ॥६०॥

वायव्यकोणीं मुनीश्वर ॥ बैसले होते अपार ॥ तेथ झोळी उतरोनि युधिष्ठिर ॥ बैसविला बंधुवर्गी ॥ ॥६१॥

तंव श्रीकृष्णें काय केलें ॥ सकळ राजे न्याहाळिले ॥ मुनीश्वरांत पांडव देखिले ॥ कापडीरुपें ॥६२॥

कोठोनि येणें जाहलें यांसी ॥ चला जावोनि पुसों त्यांसी ॥ कीं भेटलिया अतीतासी ॥ होय धर्मलाभ ॥६३॥

जाइजे महानुभावदर्शना ॥ तरी गृहींचि लाहिजे पुण्य़ा ॥ ऐसें सांगोनि सभाजना ॥ उठिला श्रीकृष्ण ॥६४॥

नमन करितां कापडियां ॥ येरु उठत होते भेटावया ॥ तंव नेत्रें खुणावोनि तयां ॥ वारिलें गोविदें ॥६५॥

मागुती मुरडोनि आले ॥ अवघे स्वस्थांनी बैसले ॥ ययाउपरी काय केलें ॥ यादवनाथें ॥६६॥

बोलावोनि द्रुपदरायासी ॥ ह्नणता जाहला हषीकेशी ॥ वेगीं आणिजे द्रौपदीसी ॥ श्रृंगारोनी ॥६७॥

जंव पांडव आले नव्हते ॥ तंव तैसीचि वोडव होती तेथें ॥ परि तिये दिवशीं द्रौपदीतें ॥ आणिलें सभेसी ॥६८॥

करीं घेवोनि पद्ममाळा ॥ हस्तिणीवरी बैसली बाळा ॥ पाहतां मोहन पडलें भूपाळां ॥ नवर्णवे शेषादिकां ॥६९॥

ते तरी साक्षांत भवानी ॥ अवतरली द्रुपदयज्ञीं ॥ तंव जन्मेजयो ह्नणे हो मुनी ॥ सांगा कथानक ॥७०॥

वैशंपायन ह्नणती भारता ॥ हे पूर्वील दक्षदुहिता ॥ दक्षें निंदिलें भूतनाथा ॥ ह्नणोनि घातलें अग्निकुंडीं ॥७१॥

ते दक्षाची समूळ कथा ॥ तृतीयस्तबकीं असे भारता ॥ असो अग्निमाजी होतें तत्वतां ॥ तेजभवानीचें ॥७२॥

आणि भीष्में अव्हेरिली सुंदरी ॥ अंबा काशीश्वराची कुमरी ॥ तियें घातलें अग्निमाझारी ॥ अहंताप धरोनियां ॥७३॥

तेंही तेज अग्नींत होतें ॥ आणि वीरभद्रें जाळिलें दक्षशिरातें ॥ तेंही तेज होतें निरुतें ॥ वन्हिउदरीं ॥७४॥

ऐसी तिन्ही तेजें अग्निआंत ॥ तंव पार्थे बांधिला पांचाळनांथ ॥ मग तेणें प्रसन्न उमाकांत ॥ केला तपसाधनें ॥७५॥

प्रसन्न ह्नणोनि बोले हर ॥ येरु मागता जाहला वर ॥ जेणें जामात जोडे धनुर्धर ॥ ऐसी कन्या द्यावी पैं ॥७६॥

तंव ह्नणितलें त्रिनयनें ॥ तुवां यज्ञ अपूर्व करणें ॥ तेथें जन्मती तिघें जणें ॥ येकी कन्या दोन पुत्र ॥७७॥

उपरी द्रुपदें यज्ञ केलां ॥ तेथें धृष्टद्युम्न जन्मला ॥ राया तोचि जाणिजे वहिला ॥ दक्षतेजात्मक ॥७८॥

दुसरा अंबेचा अवतार ॥ तो शिखंडिया क्लीबाकार ॥ द्रौपदी तरी निर्धार ॥ दाक्षायणी ॥७९॥

परि पुराणांतरी अन्य मत ॥ द्रौपदी हे कृत्या सत्य ॥ तंव राव ह्नणे वृत्तांत ॥ सांगा कैसा ॥८०॥

मुनि ह्नणे येके अवसरीं ॥ धाता वेदपठण करी ॥ तंव निघालें क्षणांतरीं ॥ मुख रासभाचें ॥८१॥

तें शिवें देखिलें पांचवें शिर ॥ ह्नणोनि त्रिशूळें तोडिलें शीघ्र ॥ तें उडोनि बैसलें वेगवत्तर ॥ ग्रीवे शंभूचिये ॥८२॥

तें न सोडी नानाकष्टीं ॥ येरु पळतां जाहला हिपुटी ॥ ह्नणोनि गेला उठाउठी ॥ काशियेसी ॥८३॥

शिव प्रवेशतां पंचक्रोशीं ॥ शिरें सोडिलें शिवासी ॥ कन्या होवोनि परियेसीं ॥ असे बाहेर ॥८४॥

बाहेर येईल त्रिपुरारी ॥ तेव्हां बैसेन ग्रीवेवरी ॥ ऐसें राखत निरंतरीं ॥ राहिलें कन्यारुपें ॥८५॥

शंभु भयभीत अंतरीं ॥ न निघे काशिये बाहेरी ॥ इकडे कैलासीं चिंतावली गौरी ॥ शिववियोगें ॥८६॥

मग जावोनियां अनंता ॥ गौरीनें कथिली सर्व व्यवस्था ॥ येरें विचारितां अंतरर्गता ॥ भासलें सकळ ॥८७॥

समागमें घेवोनि पार्वतीये ॥ दोघें आलीं काशिये ॥ बाहेर पार्वती आपण राहे ॥ येरु जात शिवापाशीं ॥८८॥

तयासि ह्नणे श्रीपती ॥ बाहेर उभी असे पार्वती ॥ तरी ते कन्या द्यावी पशुपती ॥ मजकारणें ॥८९॥

येरें समर्पिली विष्णूसी ॥ मग तो गेला तियेपाशीं ॥ तंव ह्नणे ग्रासीन तुजसी ॥ आतांचि जाण ॥९०॥

विष्णु भ्याला अंतःकरणीं ॥ ह्नणोनि बोलिली भवानी ॥ अहो ब्रह्मकपाळनंदिनी ॥ पुसतें येक ॥९१॥

तुवां कां त्रासिला शूळपाणी ॥ तंव ते बोलिली वचनीं ॥ कीं अशुद्ध मिळावें भोजनीं ॥ ह्नणोनि रुद्र त्रासिला ॥९२॥

ऐकोनि पुसे श्रीपती ॥ रक्तपान पाहिजे किती ॥ येरी ह्नणे होईल तृप्ती ॥ औटघटांहीं ॥९३॥

अशुद्धें बुडे उष्ट्रकर्ण ॥ तोचि होय घट संपूर्ण ॥ आणि अर्धघटाचें परिमाण ॥ नाभिपरियंत ॥९४॥

मग ह्नणे शारंगधरु ॥ हें चहूंयुगीं पूर्ण करुं ॥ तुवां धरावा कृत्यकारु ॥ अवतरोनी ॥९५॥

परशुराम राम कृष्ण ॥ चौथा कलंकी अवतार जाण ॥ चहूंयुगीं अवतार घेणें ॥ मजलागोनी ॥९६॥

तुझीच इच्छा पूर्ण कराया ॥ मग तें वाक्य मानिलें तियां ॥ भाष घेवोनि वैकुंठराया ॥ सोडिलें देखा ॥९७॥

यासी साक्ष असे गौरी ॥ मग ते अदृश्य जाहली कुमरी ॥ वैकुंठी गेला श्रीहरी ॥ शिवगौरी कैलासीं ॥९८॥

भारता ते युगयुगाप्रती ॥ अवतार धरी कृत्या सती ॥ ते कवण कैसी स्मृतिमती ॥ ऐकें श्लोक ॥९९॥

श्लोक ॥ कृते च रेणुका कृत्या त्रेतायां जानकी सती ॥ द्वापरे द्रौपदी कृत्या कृत्या म्लेच्छगृहे कलौ ॥१॥

रेणुका कृत्या जाहली कृतीं ॥ त्रेतायुगीं सीतासती ॥ तेचि द्वापारीं कृत्या निरुती ॥ द्रौपदीरुपे ॥१००॥

आतां कलियुगीं घरोघरीं ॥ कृत्या होतील नानापरी ॥ परि म्लेच्छरायाचे मंदिरी ॥ मुख्य कृत्या ॥१॥

कृतीं त्रेतीं द्वापारीं जाणीं ॥ अशुद्धघट भरती तीनी ॥ आणि कलयुगीं म्लेच्छहननीं ॥ अर्धघट प्रमाण ॥२॥

देवदैत्य हे उभयतां ॥ सापत्नबंधु तत्वतां ॥ अदिती दिती त्यांचिया माता ॥ आणि पिता कश्यप ॥३॥

त्या उभयताम देवदैत्यां ॥ कुटुबकलह होय सर्वथा ॥ तैं अशुद्धघट देखोनि कृत्या ॥ होईल तृप्त ॥४॥

ऐसें कपालकांतेप्रती ॥ स्वयें बोलिला श्रीपती ॥ ऐकोनि ह्नणे ते युवती ॥ कवणे स्थानीं देशील ॥५॥

कृतीं महिकावती नगरीं ॥ त्रेतीं त्रिकुट लंकापुरीं ॥ द्वापारी जाण कुरुक्षेत्रीं ॥ कलयुगीं महाराष्ट्र ॥६॥

येथें श्रोते आक्षेपिती ॥ कीं परशुराम जाहला त्रेतीं ॥ तरी उत्तर ऐकावें युक्तीं ॥ मतानुसार ॥ ॥७॥

त्या कृतयुगाचे अंतीं ॥ होईल रेणुके उत्पत्ती ॥ ते जमदग्नीची युवती ॥ होईल कालांतरें ॥८॥

मग सहस्त्रार्जुनाचे हस्तें ॥ त्रेतीं छळ होईल रेणुकेतें ॥ तैं अविनाश पुत्र दैत्यांतें ॥ वधील तदाज्ञें ॥९॥

एकवीस घाय होतील शरीरीं ॥ ह्नणोनि येकवीस वेळां निक्षेत्री ॥ परशुराम करील धरित्री ॥ तें रक्त देखेल रेणुका ॥११०॥

तेणेंचि तये तृप्ती होइल ॥ एकवीरा नाव पावेल ॥ ऐसा कथासंबंध पूर्वील ॥ ह्नणोनि कृतीं रेणुका कृत्या ॥११॥

आतां असो हे कथायुक्ती ॥ तेचि द्रौपदी जन्मली निगुती ॥ तियेनिमित्तचि भांडती ॥ कौरवपांडव ॥१२॥

अठराक्षोणींचा होईल संहार ॥ ऐसा पूर्वील कथाचार ॥ बोलिलासे पराशरकुमर ॥ ग्रंथांतरीं ॥१३॥

तरी जे ब्रह्मकपालयुवती ॥ तेचि द्रौपदी कृत्या सती ॥ औटघटांचा तये श्रीपतीं ॥ दीधला वर ॥१४॥

मग शांती धरोनि मनीं ॥ तियें बोलाविला शूळपाणी ॥ समक्ष विष्णु आणि भवानी ॥ विनविला हरु तियेनें ॥१५॥

पांचवेळां मागीतलें ॥ पति दे पति दे ह्नणितलें ॥ तंव महेशें बोलिलें ॥ होईल द्वापारीं पूर्णकाम ॥१६॥

मग ते अदृश्य जाहली युवती ॥ स्वस्थानीं गेले शिवश्रीपती ॥ ते सत्य करावया भारती ॥ रुद्र अवतरला पांडववेषें ॥१७॥

पांचवेळ मागीतला भ्रतार ॥ ह्नणोनि पांडववेषें हर ॥ अवतरला हा संबंध समग्र ॥ केला सत्य ॥१८॥

कामधेनु अष्टवसूंनी वेढिली ॥ तैं पार्वती हासिन्नली ॥ ह्नणोनि तियें शापिली ॥ कीं पावसी पंचभ्रतार ॥१९॥

तो शाप कराया साचार ॥ पांडवरुपें अवतरला हर ॥ आणि द्रौपदी ते निर्धार ॥ पार्वती जाणा ॥१२०॥

कवणीयेके गायीसांगातें ॥ पांच बैल लागले होते ॥ तैं पार्वती हांसिली तीतें ॥ ह्नणोनि शापिली तयेनें ॥२१॥

हें एक पुराणांतर मत ॥ आणि कामधेनु हें भारतोक्त ॥ दुसरी येक अपूर्व मात ॥ ऐकें जन्मेजया ॥२२॥

गायीचेनि वेषें धरणी ॥ गेली होती शिवभुवनी ॥ ओळंगाया शूळपाणी ॥ तंव भवानी बोलिली ॥२३॥

धिक तवसंसार वो क्षिती ॥ तुज भोगिती सर्व नृपती ॥ तंव कोपें शापिली पार्वती ॥ धरत्रीयें ॥२४॥

तुजही असोत पांच पती ॥ मग ते सत्य कराया भारती ॥ शिव अवतरला पांडवरीतीं ॥ द्रौपदी ते पार्वती ॥२५॥

आणि आदिपर्वी भारतोक्त ॥ द्रौपदी स्वर्गलक्ष्मी सत्य ॥ पांडव तेचि निभ्रांत ॥ पांच इंद्र ॥२६॥

तें पंचइंद्रोपाख्यान ॥ केलें पंचमस्तबकीं कथन ॥ ह्नणोनि पुररुक्ती संकलोन ॥ कथिली असे ॥२७॥

ऐसें नानापुराणप्रणित ॥ कथिलें असे प्राकृत ॥ असो पांडव ईश्वरावतार सत्य ॥ पार्वती ते द्रौपदी ॥२८॥

हें द्रौपदीचें आदिअवसान ॥ ऐकतां होय पापक्षालन ॥ पुढें ऐका सैंवरकथन ॥ ह्नणे मधुकरकवी ॥२९॥

इति श्रीकथाकल्पतरु ॥ अष्टमस्तबक मनोहर ॥ भीममुद्रिकादिप्रकारु ॥ अष्टाविंशाध्यायीं कथियेला ॥१३०॥ ॥ शुभंभवतु ॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2010-03-03T21:11:58.1200000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

collective saving/wealth

 • सामूहिक बचत राशियांसंपत्ति 
RANDOM WORD

Did you know?

नमस्कार कोणी कोणास कसा करावा ?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Status

 • Meanings in Dictionary: 717,490
 • Total Pages: 47,439
 • Dictionaries: 46
 • Hindi Pages: 4,555
 • Words in Dictionary: 325,863
 • Marathi Pages: 28,417
 • Tags: 2,707
 • English Pages: 234
 • Sanskrit Pages: 14,232
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.