मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|कथाकल्पतरू|स्तबक ८|
स्तबक ८ - अध्याय २४

कथाकल्पतरू - स्तबक ८ - अध्याय २४

'कथा कल्पतरू' या ग्रंथात चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे, तसेच रामायण, महाभारत व श्रीमद्‍भागवत हे हिंदू धर्मिय वाङमय ओवीरूपाने वर्णिलेले आहे.


श्रीगणेशाय नमः

मुनीसि ह्नणे जन्मेजयो ॥ वैशंपायना तूं मतीचा डोहो ॥ अपूर्व कथिला कथान्वयो ॥ पुराणांतरींचा ॥१॥

तरी पुढील कथामृत ॥ सेवितां असें मी अतृप्त ॥ ह्नणोनि सांगावें प्रस्तुत ॥ कृपा करोनी ॥२॥

मग ह्नणे मुनीश्वरु ॥ ऐकें अग्रकल्पतरु ॥ यथामती कथाचारु ॥ ग्रंथांतरींचा ॥३॥

भीम जात असे तरत ॥ जैसा वाहावला पर्वत ॥ तो देखोनि पद्मावती ह्नणत ॥ सखियांप्रती ॥४॥

कीं मज अंबेनें दीधला वर ॥ पैल तोचि येतसे भ्रतार ॥ जरी असेल दैव थोर ॥ तरीच आरुता येईल ॥५॥

ऐसें ह्नणे तंव पवनगतीं ॥ मोहरोनि लागला थडियेप्रती ॥ थोर संतोषें पद्मावती ॥ काढीतसे बाहेरी ॥६॥

हरुषोनि सखियांसि ह्नणे ॥ पहा वो सर्वागीं राजलक्षणें ॥ कवणें गुणें वस्त्रें भूषणें ॥ काढिलीं नाहीं अंगींचीं ॥७॥

मग श्रृंगारोनि उपचारीं ॥ तया जवळी ठेविल्या नारी ॥ स्वयें जावोनि सविस्तरीं ॥ पितयालागीं श्रुत केलें ॥८॥

येरु ऐकतां आला तीरीं ॥ लग्न निर्धारिलें द्विजवरीं ॥ विवाह केला मंगलतुरीं ॥ महोत्साहें ॥९॥

वोंवाळिती नागकुमरी ॥ अमृत आणविलें झडकरी ॥ तेणें कर चोपडोनि सुंदरी ॥ घाली मुखीं तयाचे ॥१०॥

तंव सजीव जाहला तत्क्षणीं ॥ समारंभ देखे विस्मित मनीं ॥ ह्नणे मी काय देखें स्वप्नीं ॥ पुनरपी नेत्र झांकिले ॥११॥

वासुकी ह्नणे तयाप्रती ॥ सुभगा तुज तोषली पार्वती ॥ स्वप्न नव्हे हे सांडी भ्रांती ॥ सुखें भोगीं दिव्य भोग ॥१२॥

येरें मागुती नेत्र उघडिले ॥ मग वासुकीनें सर्व कथिलें ॥ पार्वतीनें वरदान दीधलें ॥ तेथोनि विवाहपरियंत ॥१३॥

भीम ऐकतां पाटीं बैसला ॥ जयजयकारें गर्जिन्नला ॥ मग कुळाचार पुसिला ॥ वासुकीरायें ॥१४॥

भीमें सोमवंशींची कथा ॥ पंडुपावेतों कथिली व्यवस्था ॥ बंधु धर्मार्जुन कुंति माता ॥ भीम नाम ह्नणे मातें ॥१५॥

मग दुर्योधनें लाडु घातले ॥ तेथपरियंत सांगीतलें ॥ यावरी ह्नणे काय वर्तलें ॥ तें नकळें मज ॥१६॥

वासुकी ज्ञानीं पाहोनि ह्नणे ॥ लाडुमिषें घातलें विष तेणें ॥ आणि जळीं वाहविलें तुजकारणें ॥ विदुरादिकीं ॥१७॥

असो पार्वतीचे वरदानें ॥ संयोग घडला तुजकारणें ॥ तो पद्मावतीनें पति पावणें ॥ प्रेतरुपी ॥१८॥

अमृत कर मुखीं घातला ॥ तेणें तुमचा प्राण आला ॥ ऐसा वृत्तांत सांगीतला ॥ परस्परांहीं ॥१९॥

मग चालिले पाताळविवरीं ॥ उत्साहें पद्मावतीमंदिरीं ॥ संभ्रमें क्रमिली ते रात्री ॥ समस्तीं देखा ॥२०॥

येरा दिवशीं ते विखार ॥ गेले स्वमंदिरीं समग्र ॥ भीम पद्मावती निरंतर ॥ भोगिती सुख आनंदें ॥२१॥

असो मग कितीएकां दिवशीं ॥ गर्भ संभवला पद्मावतीसी ॥ तंव भीम परमप्रीतीसीं ॥ पुसता जाहला ॥२२॥

ह्नणे अमृतकर मुखीं घातला ॥ तेणें तुझा प्राण आला ॥ ऐसें वासुकी बोलिला ॥ मजलागोनी ॥२३॥

तरी अमृत कैसें तवकरीं ॥ विश्वास न ये मज अंतरीं ॥ आतां असे जें कुंडाभीतरीं ॥ तें दाखवीं मजला ॥२४॥

तंव बोलिली पद्मावती ॥ मरणभयें मज कोणी न वरिती ॥ ह्नणोनि प्रसन्न केली पार्वती ॥ तियें अमृत दीधलें ॥२५॥

भीम ह्नणे हो कांते ॥ कां पां चाळविशी मातें ॥ तुवां दाखवावीं त्वरितें ॥ अमृतकुंडें ॥२६॥

अमृतकुंडें असती पाताळीं ॥ हें बहुतीं कथिलें पूर्वकाळीं ॥ आतां भेट तुजसी जाहली ॥ तरी सत्वर दाखवीं ॥२७॥

येरी ह्नणे हो प्राणपती ॥ त्यांसी विखार रक्षिती ॥ आणि तीं अमरगिरीपर्वतीं ॥ असती नवकुंडें ॥२८॥

येरु उगा राहिला ऐकोन ॥ ह्नणे आजिचा दवडूं दिन ॥ उदयीक अमृत भक्षून ॥ करुं क्षुधानिवृत्ती ॥२९॥

तंव तोचि दिवशीं सायान्हीं ॥ शेषें भोजन दिलें सर्पालागुनी ॥ तेथें भीम नेला सन्मानोनी ॥ जामातपणें ॥३०॥

सर्प टवाळी करिती भीमासी ॥ की फडें नाहींत जांवाइयासी ॥ विषफडेंविण पुरुषासी ॥ व्यर्थ सन्मान ॥३१॥

भीम ह्नणे फडें नाहीं आह्मां ॥ परि कान कोठें असती तुह्मां ॥ मुंडे हो बोलतां कां विभ्रमा ॥ आपुल्याठायीं ॥३२॥

फडें आणि काळकूटविषा ॥ आमुच्या उदरीं असे देखा ॥ उदयीक तुह्मां सकळिकां ॥ दिसेल सत्य ॥३३॥

ऐकोनि सर्प हासिन्नले ॥ तंव ते वासुकीयें वारिले ॥ येरु उगलेचि राहिले ॥ मग जाहली आरोगणा ॥३४॥

भीमें उदयीक प्रातःकाळीं ॥ पद्मावतीसि संबोखिली ॥ कीं मी पाहिन नेत्रकमळीं ॥ अमरशैल ॥३५॥

पद्मावती भीमासि ह्नणे ॥ स्वामी आपण नच जाणें ॥ येखादें अनुचित तत्क्षणें ॥ होईल प्राप्त ॥३६॥

येरु ह्नणे न करीं चिंता ॥ मी पाहूनि येईन निरुता ॥ मग गेला तो शीघ्रता ॥ अमरगिरीसी ॥३७॥

तेथें कुंडांभोवतें फणिवर ॥ रक्षक देखिले अपार ॥ ह्नणे यांचा करोनि संहार ॥ करुं अमृतप्राशन ॥३८॥

ह्नणोनि सर्पालागी पुसत ॥ कीं येखादा नेईल अमृत ॥ तरी काय कराल रे येथ ॥ प्रयत्न तुह्मी ॥३९॥

उरग ह्नणती सर गा परता ॥ पाहों पां कैसा येसी आरुता ॥ तूं रायाचा जामात एकुलता ॥ नातरी मारितों क्षणार्धे ॥४०॥

तंव भीम ह्नणे तयांसी ॥ व्यर्थ रे भेडसावितां मजसी ॥ तरी आतां धरोनि पुच्छीं ॥ तुह्मां आकाशीं उडवितों ॥४१॥

ते कोपोनि ह्नणती भीमसेना ॥ तूं उगाचि जाई स्वस्थाना ॥ कां गा इच्छितोसि मरणा ॥ प्राणा कंटाळलासि कीं ॥४२॥

तूं रायाचा जामात ॥ ह्नणोनि राखिला जिवंत ॥ तंव येरु होवोनि कोपाक्रांत ॥ करी घात सर्पीचा ॥४३॥

येका रगडी भूमीसी ॥ येका गोफणी आकाशीं ॥ येका धरोनियां पुच्छीं ॥ उडविलें देखा ॥४४॥

येकीं वासुकीसि जाणविलें ॥ तेथ शेषतक्षकादि मीनले ॥ वासुकी ह्नणे कां चिडविलें ॥ काल तयासी ॥४५॥

सर्प ह्नणती राखिला राया ॥ तुमचा जांवाई ह्नणोनियां ॥ नातरी विषज्वाळीं तया ॥ भस्म करितों ॥४६॥

वासुकी ह्नणे सर्पाची ॥ तेणें अनर्थ केला तुह्मासी ॥ तरी चालेल तैसें भीमासी ॥ करा तुह्मी ॥४७॥

तंव कोणी येक सर्प ह्नणती ॥ अहो तयाची अद्भुत शक्ती ॥ कोटिसर्पाची केली शांती ॥ क्षणार्धे तेणें ॥४८॥

मग शेषतक्षकादि मुख्य करोनी ॥ गेले भीमावरी धांवोनी ॥ ते झुंजिन्नले वमोनी ॥ विषज्वाळा ॥४९॥

येरें अमृत होतें भक्षिलें ॥ ह्नणोनि विषाग्नीचें काहीं न चाले ॥ येका वृक्षासि उपडिलें ॥ सर्प झोडिले धांवोनी ॥५०॥

तेथ संग्राम थोर जाहला ॥ ह्नणोनि वासुकी कैलासीं गेला ॥ वृत्तांत अवघा श्रुत केला ॥ गौरीहरासी ॥५१॥

ऐकतां चालिला पिनाकपाणी ॥ तंव बोलिली भवानी ॥ ह्नणे तो असे माझा वरदानी ॥ पती पद्मावतीचा ॥५२॥

आतां मज धेनूचा वेष धरणें ॥ तुह्मी पंचानन होणें ॥ सिंहनाद करोनि फाडणें ॥ उदर तयाचें ॥५३॥

मग दोघीं वेष धरिला ॥ व्याघ्र गाईपाठीं लागला ॥ धेनु रिगाली तये वेळां ॥ भीमाआड ॥५४॥

भीमें पंचानन हाकिला ॥ येरु अठ्ठाहासें गर्जिन्नला ॥ तेणें भयें मूर्छित पडिला ॥ भीमसेन ॥ ॥५५॥

उदर चिरोनि काढिलें अमृत ॥ मग परतला उमाकांत ॥ तंव भीम होवोनि सावचित्त ॥ व्याघ्र पाथीं धरियेला ॥५६॥

तय अंतरिक्षीं फिरवुनी ॥ जंव त्राहांटावा मेदिनीं ॥ तंव प्रत्यक्षरुपें भवानी ॥ भीमाप्रती बोलिली ॥ ॥५७॥

अरे वत्सा पाहें वरी ॥ येरु पाहे तंव त्रिपुरारी ॥ मग वोजें उतरोनि चरण धरीं ॥ भीमसेन ॥५८॥

कर जोडोनि करी स्तुती ॥ जयजयाजी उमापती ॥ मज भेटलेति आकांतीं ॥ तरी प्रसन्न होइजे ॥५९॥

देवा तुमचे चपेटघातीं ॥ माझीं निघालीं उदरआंतीं ॥ ऐसें ऐकतां पशुपती ॥ लावी विभूती त्या ठायां ॥६०॥

तंव तो धावो पातपला ॥ रुद्र ह्नणे गा माग वाहिला ॥ भीम ह्नणे देई आपुला ॥ कृपाळा सिंहनाद ॥६१॥

मग सिंहनाद देवोनि शंकर ॥ ह्नणे तुझें नाम वृकोदर ॥ तंव पद्मावती करी नमस्कार ॥ शिवशक्तीसी ॥६२॥

विनवोनि ह्नणे शिवातें ॥ हा वर दीधला उमेनें मातें ॥ परी ऐसें वर्तलिया येथें ॥ हा जाईल स्वदेशा ॥६३॥

मी येकली करूं काय ॥ तंव ह्नणती कैलासराय ॥ हा चिंतिसी तिये क्षणीं ॥ प्राप्त होयीं सत्वर ॥६५॥

आणिक तूं गा परिकर ॥ जैं हा स्मरसी वायुमंत्र ॥ तैं मनइच्छा तृप्त सत्वर ॥ होईल तुझी ॥६६॥

भीम ह्नणे जाणें स्वामिया ॥ माताबंधूंसि भेटावया ॥ मग आज्ञा देवोनि तया ॥ शिवगौरी गेलीं कैलासीं ॥६७॥

अमृत ठेविलें जेथिचें तेथें ॥ तंव पद्मावती ह्नणे भीमातें ॥ आजी गृहीं राहोनि प्रभातें ॥ करा गमन ॥६८॥

मग मंदिरासि जावोनि ॥ संभोगीं क्रमिली ते रजनी ॥ तंव विनविती जाहली कामिनी । भीमाप्रती ॥६९॥

जीजी गर्भ असे उदरांत ॥ तंव भीम तियेसि ह्नणत ॥ कीं नांव ठेवीं जालिया सुत ॥ बभ्रु ऐसें ॥७०॥

मग भीम निघाला तत्क्षणीं ॥ येरी अवस्थाभूत पंचबाणीं ॥ शेषवासुकींची आज्ञा घेउनी ॥ आला भागीरथीये ॥७१॥

जंव तीर्थासि जाती ऋषी ॥ तंव तो भेटला तयांसी ॥ ह्नणे सवें न्यावें मजसी ॥ कृपाळवणें ॥७२॥

ऋषि ह्नणती वृकोदरासी ॥ तुझें प्रयोजन नाहीं आह्मासी ॥ येरु ऐका ह्नणे तयांसी ॥ विनंती माझी ॥७३॥

जो भागेल शिणेल तुह्मांत ॥ तयासि सांभाळीन मी सत्य ॥ येरु ह्नणती तरी निभ्रांत ॥ देऊं ग्रास येकरोटी ॥७४॥

तें मानोनि भीमसेन ॥ प्रचंड ताल उन्मळोन ॥ तयाची काठी करोन ॥ चालिला पंथीं ॥७५॥

ते खांदीं घालोनि काठी ॥ भागलीं बैसची दों काठीं ॥ वस्त्रे लेवोनि फाटीं तुटी ॥ जाला कापडी भीमसेन ॥७६॥

ऋषींच्या कंठीं रुद्राक्षमाळा ॥ भीमें देखोनि तये वेळां ॥ आपण पाथर घेत वाटोळा ॥ मध्यें हाणी टोमणिया ॥७७॥

यापरि छिद्रें पाडोनी ॥ माजी वेळुवा ओंवोनी ॥ ते अश्ममाळा करोनी ॥ घालीं कठीं ॥७८॥

मार्गी पोवा उतरे येथें ॥ भीम काष्ठें पुरवी तेथें ॥ ऋषी रंधनें करोनि त्यातें ॥ देती येक येक रोटी ॥७९॥

तंव भीम तयांसि ह्नणे ॥ अवघियें मज एकैक देणें ॥ ते नेदिती या कारणें ॥ इंद्रप्रस्थाई ॥ कैक ॥८०॥

ह्नणे एकैकें देऊ केली ॥ आणि आतां हुबळी घातली॥ ऋषी होवोनि आकुळी ॥ सकळ देती एकैक ॥८१॥

असो भोजनांतीं निद्रा केली ॥ तंव प्रभातवेळा जाहलीं ॥ पोंवा चालिला तये वेळीं ॥ इंद्रपस्थासी ॥ ॥८२॥

इकडे वर्ष भरलें तियेचि दिवशीं ॥ भीमाचें सांवत्सरिक परियेसीं ॥ मग देखोनि ऋषीश्वरांसी ॥ धर्म गेला सामोरा ॥८३॥

तयां षोडशोपचारीं पूजिलें ॥ श्राद्धीं परिकुसरीं जेवविले ॥ कर्पूरविडे दीधले ॥ तंव बोलिले ऋषीश्वर ॥८४॥

कीं बिर्‍हाडीं असे येक ऋषी ॥ काहीं ग्रास द्यावा तयासी ॥ धर्मे पाठवोनि अर्जुनासी ॥ त्यासी आणिलें बोलाउनी ॥८५॥

अर्जुन ह्नणे ऋषीश्वरा ॥ वेगें पत्रावळी सिद्ध करा ॥ येरें वटपत्रांचा भारा ॥ आणिला तत्क्षणीं ॥ ॥८६॥

त्यांची पत्रावळी येकचि केली ॥ कोंपरें खणोनि खांच पाडिली ॥ तेथें ते पत्रावळी मांडिली ॥ वाढिती नकुळार्जुन सहदेव ॥८७॥

दडवादडीं तिघे आणिती ॥ अन्नें शाकादि रिचवती ॥ परि भक्षितां नव्हेचि तृप्ती ॥ येरु आणितां भागले ॥८८॥

अन्न अवघेंही सरलें ॥ तें धर्मकुंतियें देखिलें ॥ आश्वर्ये अनुमानूं लागले ॥ कीं भीमासम क्षुधा याची ॥८९॥

निश्वयें हा भीमचि होय ॥ समान दिसती अवयव ॥ परि दिसे उदरी घावो ॥ ह्नणोनि निश्वय नबैसे ॥९०॥

भ्रांतपणें बोलिली कुंती ॥ कीं पांच लाडूवीं भीमासि तृप्ती ॥ तरी याची पाहों प्रचीती ॥ ह्नणोनि वाढिले तियें ॥९१॥

तंव भीमें ढेंकर दीधला ॥ ह्नणती हा भीम निश्वयें गमला ॥ कुंतियेसी पान्हा आला ॥ ह्नणोनि भेटली धांवोनी ॥९२॥

येरें आनंदें समस्तां ॥ क्षेम दीधलें सस्नेहता ॥ तंव उदरघायाची व्यवस्था ॥ पुसिली त्यासी ॥९३॥

येरें अमरगिरीची व्यवस्था ॥ अमृतापासोनि समस्ता ॥ प्रसन्न केलें पार्वतीनाथा ॥ तेथपरियंत सांगीतली ॥९४॥

शिवें व्याघरुपें नख घातले ॥ ह्नणोनि उदरीं चिन्ह राहिलें ॥ मग प्रत्यक्षरुपें मज दीधलें ॥ सिंहनादासी ॥९५॥

ऐसी ऐकोनियां व्यवस्था ॥ आनंद जाहला समस्तां ॥ धर्म होय दानें देता ॥ श्रृंगारिलें इंद्रप्रस्थ ॥९६॥

नगरनारी अतिप्रतीं ॥ रत्नीं आरत्या ओंवाळिती ॥ तें दुर्योधनाचिये दूतीं ॥ देखिलें सर्व ॥९७॥

त्याहीं श्रुत केली दुर्योधना ॥ अवघी आद्यंत विवंचना ॥ विस्मय पावला कौरवराणा ॥ भीष्मादिक समस्तही ॥९८॥

गांधारी ह्नणे विदुरासी ॥ कीं भीम मारील दुर्योधनासी ॥ तरी रक्षावें समस्तांसी ॥ विचारोनि उपावो ॥९९॥

मागां तुह्मीचि रक्षिलें ॥ आतां तैसेंचि विचारा वहिलें ॥ तंव तियेसि विदुर बोले ॥ करा जिंताणें भीमाचें ॥१००॥

दानें करोनि अपारें ॥ तुह्मीं आणिक गांधारें ॥ भेटों जाइजे वस्त्रालंकारें ॥ वडिलांसहित ॥१॥

मग विदुरोक्त सर्व करोनी ॥ भीष्मादिक सर्व घेवोनी ॥ महोत्साहें तत्क्षणीं ॥ गेलीं इंद्रप्रस्थासी ॥२॥

नगराबाहेर राखोनि सर्वासी ॥ विदुर गेला पांडवांपाशीं ॥ भेटोनि धर्म कुंतीसी ॥ बोलिला वचन ॥३॥

कीं धृतराष्ट्र गांधारी दुर्योधन ॥ आलीं तुमच्या भेटीलागुन ॥ भीम वांचला ह्नणवोन ॥ महोत्साहें ॥४॥

तरी शत्रुमित्रउदासिया ॥ जो येतसे भेटावया ॥ धर्मा मान द्यावा तया ॥ मनीचें मनीं राखोनी ॥५॥

ऐकोनि भीमार्जुन ह्नणती ॥ आतां पुरे तयांची प्रीती ॥ आह्मां रक्षिता श्रीपती ॥ बहुतांपरी ॥६॥

विदुर ह्नणे रक्षितां अनंत ॥ तेथें काय करील कृतांत ॥ परि भेटी घ्यावी निभ्रांत ॥ लौकिकासाठी ॥७॥

तंव कुंती विदुरासि ह्नणे ॥ आह्मां तुमची आज्ञा मानणें ॥ मग भीमार्जुनासि ह्नणे ॥ ऐका विदुरोक्त ॥८॥

हा मातृशब्द ऐकोनी ॥ धर्म सामोरा गेला तत्क्षणीं ॥ स्वमंदिरा आला घेवोनी ॥ सकळिकांसी ॥९॥

अवघे भीमासि भेटले ॥ वस्त्रालंकार समर्पिले ॥ कुंतीप्रमुख पूजियेलें ॥ धर्मादिकांसी ॥११०॥

दुर्योधन गहिंवरला ॥ भीमाच्या चरणीं लागला ॥ मग भीष्मादिकां बोलिला ॥ कीं मी थोर अपराधी ॥११॥

मग परस्परीं पूजिलें ॥ उभयां जयजयकार वर्तले ॥ गांधार ह्नणे आह्मीं दीधलें ॥ वारुणावत भीमासी ॥१२॥

ऐसे पांडव बुझाविले ॥ तंव भीमकुंतीयें बोलिलें ॥ कीं होणार तें होवोनि गेलें ॥ परि कौरव भले गा ॥१३॥

गांधारी ह्नणे तयांसी ॥ आह्मीं नष्टत्वें दुखविलें तुह्मासी ॥ आतां कृपा करोनि मजसी ॥ क्षमा कीजे ॥१४॥

ऐसा दुर्योधनाचा भावो ॥ देखोनि तोषला धर्मरावो ॥ विसरला पूर्वील वैरभावो ॥ केला उत्साहो समस्तां ॥१५॥

असो कौरव गेले हस्तनापुरीं ॥ भीष्म धृतराष्ट्रादि गांधारी ॥ पुढें दुर्योधन कपट करी ॥ तें सांगेल कविमधुर ॥१६॥

इति श्रीकथाकल्पतरु ॥ अष्टमस्तबक मनोहरु ॥ भीमपद्मावतीप्रकारु ॥ चतुविशोऽध्यायीं कथियेला ॥११७॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ श्रीमज्जगदीश्वरार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP