मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|कथाकल्पतरू|स्तबक ८|
स्तबक ८ - अध्याय २०

कथाकल्पतरू - स्तबक ८ - अध्याय २०

'कथा कल्पतरू' या ग्रंथात चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे, तसेच रामायण, महाभारत व श्रीमद्‍भागवत हे हिंदू धर्मिय वाङमय ओवीरूपाने वर्णिलेले आहे.


श्रीगणेशाय नमः

द्रोण ह्नणे गा दुर्योधना ॥ आतां द्यावी गुरुदक्षिणा ॥ येरु ह्नणे असेल वासना ॥ ते मागावी सेवकासी ॥१॥

देश भांडारें वस्त्रालंकार ॥ पाहिजे तें देईन अपार ॥ यावरी गुरु बोले उत्तर ॥ याची आह्मां चाड नाहीं ॥२॥

हेचि मज पाहिजे गुरुदक्षिणा ॥ कीं द्रुपदरायासि बांधोनि आणा ॥ येरीं ऐशा ऐकोनि वचना घातल्या माना खालतीं ॥३॥

द्रोण ह्नणे दुर्योधनासी ॥ कां गा उगाची राहिलासी ॥ कर्ण असतां तुजपासीं ॥ दुर्घट कांरे वाटतें ॥४॥

याउपरी ह्नणे कर्ण ॥ कवण द्रुपदासि आणील बांधोन ॥ तो महावीर दारुण ॥ नागवसेचि त्रैलोक्या ॥५॥

तरी तुह्मी भलतेंचि बोलतां ॥ जेवीं संदीपनें मागितलें सुतां ॥ तेथें श्रीकृष्णाची समर्थता ॥ ह्नणोनि आलीं बाळकें ॥६॥

तो साक्षात परमेश्वर ॥ तैसा त्रिभुवनीं नाहीं वीर ॥ तरी हा दुर्घट विचार ॥ तुह्मीं सांड मनींचा ॥७॥

ऐसें ऐकतां कोपला गुरु ॥ ह्नणे हा मूर्ख गांधारु ॥ तेणें तुझा मानोनि आधारु ॥ अंगदेश दीधला ॥ ॥८॥

आह्मी इतुका श्रम केला ॥ तरी तो सर्व वृथा गेला ॥ आतां मनोरथ राहिला ॥ जीवींचा जीवीं ॥९॥

परि हें ऐकोनियां पार्थे ॥ स्वयें विनविलें सद्रुरुतें ॥ स्वामी आज्ञा द्याजी मातें ॥ बांधोनि द्रुपदा आणीन ॥१०॥

मी येकलाचि जावोनी ॥ जरी तया नाणीन बांधोनी ॥ तरी लाजविली कुंती जननी ॥ आणि स्वर्गी पंडुपिता ॥११॥

ऐकोनि गुरु संतोषला ॥ मस्तकीं अभयकर ठेविला ॥ ह्नणे द्रुपदा आणीं वहिला ॥ बांधोनियां ध्वजासी ॥१२॥

मग विद्या दीधली मोहिनी ॥ शस्त्रास्त्रें उपदेशी विदानी ॥ तंव धर्म ह्नणे पार्थालागुनी ॥ नेई भीमा सांगातें ॥१३॥

ऐकोनि पार्थ धर्मासि ह्नणे ॥ केविं त्यावरी भीमा नेणें ॥ एकल्यानेंचि आणोनि देणें ॥ दक्षिणा गुरुसी ॥१४॥

ऐसें बोलानियां उठिला ॥ आज्ञा भीष्माची घेता जाहला ॥ येरें आशिर्वाद दीधला ॥ मग नमिलें मातेसी ॥१५॥

तंव बोलिला विदुरु ॥ कैसें पाठवितां लेंकरुं ॥ असतां एतुला दळभारु ॥ वडीलपणा बोल लागे ॥१६॥

भीष्म ह्नणे वत्सा अर्जुना ॥ समागमें नेई सेना ॥ येरु ह्नणे वृथा प्रतिज्ञा ॥ होईल ताता ॥१७॥

होणार न टळे सर्वथा ॥ परि भाष रक्षावी जाणतां ॥ उद्धरावें मातापिता ॥ सत्व राखोनि आपुलें ॥१८॥

दुर्योधनादि वीर भ्याले ॥ ह्नणोनि म्यां गुरुसि विनविलें ॥ तरी प्रतीज्ञावाक्य आपुलें ॥ नेईन सिद्धीसी ॥१९॥

ह्नणोनि रथीं आरुढला ॥ तंव अपूर्व शकुन जाहला ॥ जळपूर्व कुंभ भेटला ॥ आणि सवत्स धेनुका ॥२०॥

असो पार्थे वेगवत्तर ॥ अटोपिलें पांचाळनगर ॥ शृंगारवनीं जाहला स्थिर ॥ लक्षोनि शत्रू ॥२१॥

तेथ रायाचे सेवक होते ॥ पार्थे ह्नणितलें तयांतें ॥ तुह्मी सांगारे रायाते ॥ जाई अस्तनापुरासी ॥२२॥

तेथें द्रोणगुरुसि भेटोनी ॥ यावें आपुलें राजधानी ॥ न जासील तरी बांधोनी ॥ नेईन मी द्रोणशिष्य ॥२३॥

सोमवंशीं पंडुवीरु ॥ तयाचा मी पार्थ कुमरु ॥ द्रोणाचार्य माझे गुरु ॥ आलों न्यावया द्रुपदासी ॥२४॥

मग ते सेवक बोलिले ॥ अगा हें राजया नाहीं कळलें ॥ तंवचि तुवां जावें उगलें ॥ आलिया ठायां ॥२५॥

तो पुष्पदंताचा कुमर ॥ ऐसा त्रिभुवनीं नाहीं झुंजार ॥ हिरोनि घेईल रहंवर ॥ तेव्हां अपकार पावसी ॥२६॥

येरु ह्नणे राजसेवकां ॥ तुह्मी रायासि सांगाना कां ॥ प्रसंगीं देखाल क्षणा येका ॥ कर्तृत्व माझें ॥२७॥

मग ते गेले वेगवत्तर ॥ रायासि कळविला समाचार ॥ कीं येके रर्थेसिं वडिवार ॥ बोलतो ऐसा ॥ ॥२८॥

राव ऐकोनि हासिन्नला ॥ मग दळवैय्या पाचारिला ॥ अरे द्रोण ह्नणिजे केतुला ॥ धरोनि आणीं तच्छिष्या ॥ ॥२९॥

दळवैय्या रायासि ह्नणे ॥ एकल्यावरी म्यां केविं जाणें ॥ तराळसेवक पाठविणें ॥ तया आणणें धरोनी ॥ ॥३०॥

मग तराळसेवक चारीशतें ॥ पाठविले पांचाळनाथें ॥ ह्नणे धरोनि आणारे तयातें ॥ रथासहित ॥३१॥

तराळसेवक चालिले ॥ लोक पहावया धाविन्नले ॥ शस्त्रास्त्रें पर्जित पातले । श्रृंगारवनीं ॥३२॥

यापरि अनर्थ देखोन ॥ पार्थे प्रेरिला क्षुरबाण ॥ तो येतां रुणझुणोन ॥ नाकें छेदिली सटसटां ॥३३॥

अर्जुन ह्नणे तयांसी ॥ जावोनि सांगारे द्रुपदापाशीं ॥ हीं बापुडीं कां विटंबविशीं ॥ येई युद्धासि निर्लज्या ॥३४॥

येरें निघालीं पळतपळतें ॥ नाकींच्या पुशिती रुधिरातें ॥ येक करिती शंखध्वनीतें ॥ रायापुढती ॥३५॥

दांडियापासोनि दोनी ओंठ ॥ तोडोनि टाकिले सरसपाट ॥ दांत दिसती भडभडाट ॥ रक्तें माखले सकळही ॥३६॥

वेगां येवोनि आघवीं ॥ ह्नणती गा दळवैय्या गोसावी ॥ तुवां बुद्धि केली बरवी ॥ जे पाठविलें आमुतें ॥३७॥

आतां त्वां तेथें न जावें ॥ आणिकासीच पाठवावें ॥ रायासही जावों नेदावें ॥ तो नासिकें छेदितो ॥३८॥

तेथें जो जाईल युद्धासी ॥ तेणें रक्षावें नासिकासी ॥ भय नाहीं गा जीवासी ॥ नाकें छेदितें पिशाच ॥३९॥

रुणझुणोनि बाण येती ॥ चराचरीं नाकें कापिती ॥ आमुची ऐकावी विनंती ॥ झणी भूपती पाठवा ॥४०॥

ऐसें दळवैय्यासी ह्नणितलें ॥ येकीं रायासि सांगीतलें ॥ तये वेळीं राव बोले ॥ दळवैय्यासी ॥४१॥

अगा तुवां जो हळुवट केला ॥ तो एकलाचि असे आला ॥ तरी वीरचि गमे भला ॥ ह्नणोनि जावें सकळही ॥४२॥

मग घावो देवोनि निशाणीं ॥ राव चालिला चातुरंगसैन्यीं ॥ तंव दळवैय्या करी विनवणी ॥ तुह्मी नृपमणी राहिजे ॥४३॥

मी येकलाचि जावोनी ॥ तयासि आणीन बांधोनी ॥ तुह्मी पहावा निजनयनीं ॥ पुरुषार्थ माझा ॥४४॥

राव ह्नणे तरी दळवैय्या ॥ जायीं सैन्य घेवोनियां ॥ आणीं तयास धरोनियां ॥ मग येरु चालिला ॥४५॥

ऐशीसहस्त्र रहंवर ॥ साठीसहस्त्र असिवार ॥ दहासहस्त्र कुंजर ॥ पायभार तीनक्षोणी ॥४६॥

चालिला निशाणांच्या गजरीं ॥ दळवैय्याची आयणी थोरी ॥ परि भयचकित ह्नणे अंतरीं ॥ झणी करील नासिकछेद ॥४७॥

असो येवोनि दळभार ॥ वेढिला पार्थाचा रहंवर ॥ हांवे शस्त्रास्त्रांचा पुर ॥ वीर वर्षती ॥४८॥

ये येकलेनि पार्थे साहिले ॥ बाण असंख्यात प्रेरिले ॥ द्रुपदाचें दळ भंगिलें ॥ छेदोनि शस्त्रें ॥४९॥

भारता तो विस्तार सांगतां ॥ येथेंचि विस्तार होईल ग्रंथा ॥ भय वर्तलें सुरनाथा ॥ तये वेळीं ॥५०॥

तंव दळवैय्या ह्नणे उत्तरीं ॥ अरे मी वीर गजकेसरी ॥ तूं मुरडें अद्यापि तरी ॥ नातरी जीवें जाशील ॥५१॥

येरु ह्नणे तूं गजकेसरी ॥ मी शार्दूळ बैसेन मानेवरी ॥ कैसा वांचविशी समरीं ॥ आपणेया ॥५२॥

मग दळवैय्यें तत्क्षणीं ॥ पार्थ विंधिला पांचबाणीं ॥ येरें पाडिले तोडोनी ॥ वरिच्यावरी ॥५३॥

सवेंचि पार्थे सोडिले शर ॥ सैन्य संहारिलें अपार ॥ एक पळती चौफेर ॥ दाहीदिशां ॥५४॥

तो भद्रसेन दळाधिपती ॥ मूर्छागत पडिला क्षितीं ॥ मग अर्जुनें शीघ्रगती ॥ धरिला धांवोनी ॥५५॥

शिरीं पांच पाट काढिले ॥ डावें नासापुट चिरिलें ॥ दोनी कर्ण छेदिले ॥ भादरिले मिशीखांड ॥५६॥

विटंबोनि सोडिलें त्यासी ॥ ह्नणे जाई दाखवीं द्रुपदासी ॥ हा श्रृंगारु दीधला तुजसी ॥ भद्रसेना ॥५७॥

येरु जिव्हारीं खोंचला ॥ जाऊनि रायासि भेटला ॥ वृत्तांत अवघा सांगीतला ॥ अर्जुनाचा ॥५८॥

जी तो चाळवयसा लहान ॥ परि युद्धकर्मीं असे निपुण ॥ तुह्मी तयासि भेटा जाउन ॥ नातरी अपकीर्ती पावाल ॥५९॥

हें ऐकोनि कोपला रावो ॥ निशाणासी देवोनि घावो ॥ रथीं आरुढला महाबाहो ॥ वेष्टिला सैन्यें ॥६०॥

सातअर्बुदें रहंवर ॥ आठअर्बुदें असिवार ॥ नवकोटी मत्त कुंजर ॥ पायभार तीनी पद्में ॥६१॥

द्रुपदें इतुकेनि सैन्येंसी ॥ वढिलें पार्थवीरासी ॥ परि तो नक्षत्रांमाजी शशी ॥ तेवें दिसे प्रकाशित ॥६२॥

वीर वर्षती शरधारीं ॥ जैसे मेघ पर्वतावरी ॥ शस्त्रें न मावती अंबरीं ॥ नाइकिजे वाद्यगरें ॥६३॥

तो संग्राम जाहला ऐसा ॥ झांकोळल्या दाही दिशा ॥ विस्तार करितां सागरा ऐसा ॥ वाढेल ग्रंथ ॥६४॥

अर्जुनें येक बाण प्रेरिला ॥ तो कोटिगुणें विस्तारला ॥ शरजाळें निवारिता जाहला ॥ परवीरांचीं ॥६५॥

भंगविली सकळ सेना ॥ तेव्हां द्रुपद पाचारी अर्जुना ॥ आतां तूं रक्षीरें आपणा ॥ ह्नणोनि बाणीं विंधित ॥६६॥

अवघें ब्रह्मांड भरिलें शरीं ॥ सूर्य न दिसे अंबरीं ॥ रावो ह्नणे वृथा थोरी ॥ भिक्षुशिष्याची ॥६७॥

ब्राह्मणाची प्रौढी मोठी ॥ तरी कण मागावे मुष्टिमुष्टी ॥ तेणें राज्य मागण्यासाठीं ॥ पाठविलें बालक ॥६८॥

ऐसें गर्वे राव बोले ॥ तंव पार्थानें संधान केलें ॥ अग्निबाण कडाडिले ॥ शर जाळिले द्रुपदाचे ॥६९॥

अग्निठिणग्या पडती इंगळ ॥ तेणें सैन्य पळालें सकळ ॥ मागुती पार्थासी तुंबळ ॥ मांडिलें द्रुपदें ॥ ॥७०॥

वरुणास्त्र बाण प्रेरिला ॥ तेणें अग्नी विझोनि गेला ॥ पार्थे मारुत शर सोडिला ॥ निवारिला वर्षाव ॥७१॥

द्रुपदें पर्वत आड घातले ॥ येरें वज्रास्त्रें फोडिले ॥ ऐसें निर्वाण युद्ध जाहलें ॥ दोघांवीरां ॥७२॥

मग पार्थ ह्नणे द्रुपदासी ॥ आतां वांचवीं आपणासी ॥ ह्नणोनि पांच बाण आवेशीं ॥ मोकलियेले ॥७३॥

चारी चोंवारुवां लागले ॥ येकें सारथ्या पाडिलें ॥ द्रुपदासी विरथ केलें ॥ येरु चढला दुजे रथीं ॥७४॥

तंव गर्जोनि बोले पार्थ ॥ कीं कळला तुझारे पुरुषार्थ ॥ आतां न करितां तुझा घात ॥ साधीन कार्य आपुलें ॥७५॥

ह्नणोनि घातली मोहनी ॥ सैन्य निद्रिस्थ जाहलें रणीं ॥ द्रुपद ध्वजस्तंभीं टेकोनी ॥ सुषुप्तीतें पावला ॥७६॥

धनुष्य पडतां गळोनी ॥ पार्थ धांवला तत्क्षणीं ॥ द्रुपद आणिला उचलोनी ॥ आपुलीये रथावरी ॥७७॥

ध्वजस्तंभाजी बांधिला ॥ मग मोहनीबाण काढिला ॥ इकडे परिवार जागृत जाहला ॥ परि न देखते राजया ॥७८॥

अर्जुन ह्नणे समस्तांसी ॥ भिवूं नकारे मानसीं ॥ जीवें राखिलें तुह्मासी ॥ न मारीं रायासी निर्धारें ॥७९॥

आतां हस्तनापुरीं नेवोंनी ॥ गुरुद्रोणासी भेटवोनी ॥ सवेंचि देईन सोडोनी ॥ हें वाक्य सत्य माझें ॥८०॥

यावरी द्रुपद ह्नणे पार्था ॥ तूंचि माझा प्राणदाता ॥ हस्तनापुरीं नेणें वृथा ॥ करीं सर्वथा शिरच्छेद ॥८१॥

वाचा वेंचली आमुची ॥ कैसी भेटी घेवों द्रोणाची ॥ लाज जाहली समस्तांची ॥ मरण भलें येथोनियां ॥८२॥

तरी शिरश्छेद करोनि माझा ॥ होई पांचाळदेशींचा राजा ॥ अथवा बैसवीं गुरु तुझा ॥ मारीं मारीं स्वामिया ॥८३॥

पार्थ ह्नणे ऐकें राया ॥ रणीं हारी ये क्षत्रिया ॥ तरी प्रसंगानुरुप प्राणिया ॥ राहणें भाग ॥८४॥

विष्णुसारिखी देवता ॥ प्रसंगीं जाहली विरोचनकांता ॥ रावणें हरुनि नेली सीता ॥ तैं बांधिले सुरवर ॥८५॥

राया तूं आपुलें उणें ॥ भलत्यापरी काढणें ॥ परि सहसा प्राण न देणें ॥ वृथा मरणें अपकीर्ती ॥८६॥

ऐसी शिकवोनि उपपत्ती ॥ घेवोनि चालिला हस्तनावती ॥ येतां नगरबाह्यप्रांती ॥ नागरिकीं देखिला ॥८७॥

त्यांहीं जाणविलें भीष्मादिकांसी ॥ कीं पार्थे आणिलें द्रुपदासी ॥ मग संबोखोनि समस्तांसी ॥ द्रोणें केली संसद ॥८८॥

सकळ जन साउमे गेले ॥ निशाणीं अंबर गर्जिन्नले ॥ द्रोणें उत्साहें आलिंगिलें ॥ अर्जुनासी ॥८९॥

मग द्रोणाचे मंदिरीं ॥ समस्त आले वाद्यगजरीं ॥ वोंवाळिती नगरनारी ॥ थोर संभ्रमें अर्जुना ॥९०॥

द्रुपद ध्वजस्तंभीं बांधिला ॥ देखोनि हास्यरस वर्तला ॥ ह्नणती बरवा बांधोनि आणिला ॥ मिथ्यावादी पांचाळ ॥९१॥

तें आइकोनि द्रुपदासी ॥ अत्यंत खेद होय मानसीं ॥ असो मग पावले मंदिरासी ॥ द्रोणाचिये समस्त ॥९२॥

कृपी कनकाचे परियेळी ॥ अर्जुना पंचारती ओंवळी ॥ विजयी हो बा सर्वकाळीं ॥ सिद्धी नेला अभिमान ॥९३॥

येरु उतरोनि रथाखाली ॥ गुरुपत्नी नमस्कारिली ॥ येरी आशिर्वादें बोलिली ॥ विजयी होई सर्वदा ॥९४॥

मग सकळ सभे बैसले ॥ तेथें भीष्मदेवें बोलिलें ॥ कीं द्रुपदासि पार्थे जिंकिलें ॥ थोर केलें आश्वर्य ॥९५॥

उपरी भीष्म ह्नणे द्रोणा ॥ आतां द्रुपदा कीजे सोडवणा ॥ येरें पाठवोनि भीमसेना ॥ आणविला सभेसी ॥९६॥

उत्तमासनीं बैसविला ॥ येरु अधोवदनें राहिला ॥ मग भीष्में आलिंगिला ॥ उठवोनि प्रीतिभावें ॥९७॥

समस्त कौरवां भेटला ॥ पांडवीं प्रीतीं आलिंगिला ॥ आदरमानें बैसविला ॥ थोर केला उत्साहो ॥९८॥

भीष्म ह्नणे द्रुपदासी ॥ खेद न करीं गा मानसीं ॥ यश अपयश वीरासी ॥ होतां नाहीं नवलावो ॥९९॥

तंव अर्जुनाचा पुरुषार्थ ॥ द्रुपद नानापरी सांगत ॥ ह्नणे ऐसा वीर समर्थ ॥ नाहींनाहीं त्रिभुवनीं ॥१००॥

हा जिंकील त्रिभुवना ॥ येथें अन्यथा नाहीं भावना ॥ हें ऐकोनि खेद जाला दुर्योधना ॥ उठोनि गेला स्वगृहीं ॥१॥

असो मग तये अवसरीं ॥ पार्थ गुरुसी विनंती करी ॥ कीं तुमचेनि प्रसादें वैखरी ॥ सत्य जाहली दयाळा ॥२॥

आतां गुरो ही दक्षिणा घ्यावी ॥ परि येक विनंती ऐकावी ॥ मजलागीं आज्ञा द्यावी ॥ नेईन द्रुपदा स्वगृहीं ॥३॥

द्रोण ह्नणे बा अर्जुना ॥ त्वां पूर्ण केली मनकामन ॥ आतां येईल तुझे मना ॥ तें करीं ययाचें ॥४॥

मी दुर्बळ द्विज अशक्त ॥ तुज काय देऊं भातुकपदार्थ ॥ ह्नणोनि दीधला हाचि उचित ॥ तरी जाणसीं तें करावें ॥५॥

मग पार्थ विनवी धर्मासी ॥ आतां यासी नेवों मंदिरासी ॥ गुरुआज्ञेनें मग द्रुपदासी ॥ नेलें स्वगृहीं ॥६॥

कुंती पार्थासि ओंवाळी ॥ द्रुपद लागला चरणकमळीं ॥ येरीनें सन्मानिला तियेवेळीं ॥ बंधुभावें ॥७॥

कुंती ह्नणे बा धनंजया ॥ मागुता नेई द्रुपदराया ॥ थोरासि उपकार केलिया ॥ कीर्ति होय त्रिलोकीं ॥८॥

ऐसा ऐकोनि मातृशब्द ॥ रथी बैसविला नृप द्रुपद ॥ घेवोनि गेला गुरुप्रमोद ॥ पांचाळनगरीं ॥९॥

तें ऐकोनि समस्त जनीं ॥ नगरीं केलीं वाधावणीं ॥ रावो स्थापिला सिंहासनीं ॥ कुंतिकुमरें ॥११०॥

थोर जाहला महोत्साहे ॥ पार्था वानी दुपदरावो ॥ प्राणदाता हा धनंजयो ॥ याचें नव्हें मी उत्तीर्ण ॥११॥

असो राज्यीं स्थापोनी द्रुपदासी ॥ पार्थ आला हस्तनापुरासी ॥ आनंद जाहला समस्तांसी ॥ सोमवंशीं धन्य पार्थ ॥१२॥

परि अभिमानी पडला गांधार ॥ तो काय करील प्रतिकार ॥ पुढें ऐकावा तोकथाप्रकार ॥ ह्नणे मधुकरकवी ॥१३॥

इति श्रीकथाकल्पतरु ॥ अष्टमस्तबक मनोहरु ॥ द्रुपदबंधमोक्षप्रकारु ॥ विंशोऽध्यायीं कथियेला ॥११४॥ ॥ श्रीमज्जगदीश्वरार्पणमस्तु ॥ ॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ श्रीरस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP