मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|धर्मसिंधु|तृतीयपरिच्छेद : पूर्वार्ध १|
नागबलि

धर्मसिंधु - नागबलि

हिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे.
This 'Dharmasindhu' grantha was written by Pt. Kashinathashastree Upadhyay, in the year 1790-91.


अमावास्या, पौर्णिमा, पंचमी अथवा आश्लेषासह नवमी यांपैकीं कोणत्याही दिवशीं नागबलि करावा. ब्राह्मणमंडळाला प्रदक्षिणा करुन नमस्कार करावा. त्यांच्यापुढें एक गाय व बैल यांची किंमत ठेवून ---’भार्येसह माझ्या हातून या जन्मीं अथवा मागच्या जन्मीं घडलेल्या सर्पवधाच्या पातकाच्या निरसनासाठीं मला तुम्हीं प्रायश्चित्त सांगावें. आपण सर्व धर्माचा विचार करणारे आहां--’ अशी त्यांची प्रार्थना करावी. त्यानंतर ब्राह्मणांनीं ’पूर्वांग आणि उत्तरांग यांनीं युक्‍त व अमुक प्रत्यान्मायाच्या द्वारें चौदा कृच्छ्रांचें प्रायश्चित्त केल्यानें तुझी शुद्धि होईल’----असें सांगावें. ब्राह्मणांनीं असें सांगितल्यावर--देश, काल, वगैरेंचा उच्चार करुन, ’पर्षदुपदिष्टं चतुर्दशकृच्छ्रप्रायश्चित्तं (अमुक) प्रत्याम्नायेन अहं आचरिष्ये’ असा संकल्प करावा. आणि क्षौरादि विधि केल्यावर तें प्रायश्चित्त करावें. क्षौर न केल्यास दुप्पट कृच्छ्रप्रायश्चित्तांचा प्रत्याम्नाय सांगितला आहे. ’सर्पवधदोषपरिहारार्थं इमं लोहद्ण्डं सदक्षिणं तुभ्यमहं संप्रददे’ असें म्हणून लोहदण्डाचें दान करावें. नंतर गुरुची आज्ञा घेऊन---गहूं, तांदूळ अथवा तीळ--यापैकीं कोणच्या तरी पिठाचा साप बनवून सुपांत ठेवावा आणि

’एहि पूर्वमृतः सर्प अस्मिन्पिष्टे समाविश ।

संस्कारार्थमहं भक्‍त्या प्रार्थयामि समाहितः ॥’

अशी प्रार्थना करावी, आणि नंतर आवाहनादि केल्यावर षोडशोपचारें त्याची पूजा करुन त्याला नमस्कार करावा. ’भो सर्प इमं बलिं गृहाण मम अभ्युदयं कुरु’ असें म्हणून त्याला बलि द्यावा आणि पाय धुऊन आचमन करावें. त्यानंतर देशकालादिकांचा उच्चार करुन ’सभार्यस्य मम इहजन्मनि जन्मातरे वा ज्ञानादज्ञानाद्वा जातसर्पवधोत्थदोषपरिहारार्थं सर्पसंस्कारकर्मं करिष्ये’ असा संकल्प करावा. स्थंडिलावर अग्नीची स्थापना करुन ध्यान करावें. अस्मिन्सर्पसंस्कारहोमकर्मणि देवतापरिग्रहार्थं अन्वाधानं करिष्ये । चक्षुषी आज्येन इत्यन्ते अग्नौ अग्निं वायुं सूर्यं आज्येन सर्पमुखे प्रजापतिं आज्येन आज्यशेषेण सर्पं सद्यो यक्षे’ असा संकल्प केल्यावर अग्नीला दोन समिधा द्याव्या. अग्नीच्या अग्नेयीला प्रोक्षण करुन (पाणी शिंपडून) त्यावर चिता करावी. अग्नीला व चितेला परिसमूहन (रचना) करुन अग्नेयीकडे टोकें केलेल्या दर्भांचीं परिस्तरणें (सभोंवार पसरणें) घालावींत. नंतर (त्यांवर) पर्युक्षण (पाणी शिंपडणें) करुन सहा पात्रें मांडावींत व चक्षुषी होमापर्यंत कर्म केल्यावर सर्पाला चितेवर ठेवावा. पाणी व कान यांना स्पर्श करुन, ’भूः स्वाहा अग्नये इदंनमम’ इत्यादि तीन व्याहृतिमंत्रांनीं तुपाच्या आहुतींचें अग्नींत हवन करावें. समस्त व्याहृतिमंत्रांनीं चौथी आहुति सापाच्या तोंडांत द्यावी. शिल्ल्क राहिलेलें तूप स्त्रुवापात्रांत (लांकडी पळींत) घेऊन सर्पावर ओतावें. येथें स्विष्टकृतादि होमशेष नाहीं. चमस (चमचा) पात्रांत पाणी घेऊन, तें हातानें समस्त व्याहृतिमंत्रांनीं सर्पावर (प्रोक्षण) शिंपडावें. नंतर

’अग्ने रक्षाणो वसिष्ठोग्निर्गायत्री ।

सर्पायाग्निदाने विनियोगः’।

असा मंत्र म्हणावा आणि

’नमो अस्तु सर्पेभ्यो ये केच पृथिवी मनु ।

ये अन्तरिक्षे ये दिवि तेभ्यः सर्पेभ्यो नमः ॥

ये दोरोचने दिवो ये वा सूर्यस्य रश्र्मिभिः येषामप्सु सदस्कृतं तेभ्यः०॥

या इषवो यातुधानानां ये वा वनस्पती रनु ।

ये वा वटेषु शेरते तेभ्यः ०॥

त्राहि त्राहि महाभोगिन् सर्पोपद्रवदुःखतः ।

संततिंदेहिमेपुण्यांनिर्दुष्टां दीर्घजीविनीम् ॥

प्रपन्नं पाहि मां भक्‍त्या कृपालो दीनवत्सल ।

ज्ञानतोऽज्ञानतो वापि कृतःसर्पवधोमया ॥

जन्मान्तरे तथैतस्मिन्मत्पूर्वैरथवा विभो ।

तत्पापं नाशयक्षिप्रमपराधं क्षमस्व मे’ ॥

याप्रमाणें उपस्थानपूर्वक नागेन्द्राची प्रार्थना करुन स्नान करावें व नंतर दूध व तूप यांनीं अग्नीचें प्रोक्षण करावें. साप जळून मेल्यानंतर पाण्यानें अग्नि विझवावा. सापाचें सारें संस्कारकर्म सव्यानेंच करावें. अस्थि गोळा करण्याचें कारण नाहीं. स्नान व आचमन केल्यावर घरीं जावें. कर्त्यांनें आपल्या बायकोसह तीन रात्रीं सुतक व ब्रह्मचर्य हीं पाळावींत. चौथ्या दिवशीं सचैल स्नान करुन --तूप, खीर व इतर पदार्थ यांचें आठ ब्राह्मणांना जें जेवण घालावें तें असें :-

’सर्पस्वरुपिणे ब्राह्मणाय इदंते पाद्यम् ।

अनन्तस्वरुपिणे० । शेषस्वरुपिणे० । कपिलस्वरुपिणे० ।

नागस्व० । कालिकस्व० । शंखपालस्व० । भूधरस्व० ।’

आठ ब्राह्मणांना याप्रमाणें पाद्य दिल्यावर स्वतःचे पाय धुऊन आचमन करावें. त्यानंतर

’सर्पस्वरुपिणे ब्राह्मणाय इदं आसनं आस्यताम् ।’

असें म्हणून, पहिल्या ब्राह्मणाला आसन द्यावें. तद्वतच अनन्तादिकांच्या नांवांनीं इतर सातांना आसनें देऊन, क्षण द्यावेत, ते पुढीलप्रमाणें:---

सर्पस्थाने क्षणः क्रीयताम् इत्यादि

ॐ तथा प्राप्नोतु भवान् प्राप्नवामि’

त्यानंतर ’भोसर्परुप इदंते गन्धं’ असें म्हणून गन्ध द्यावें. याप्रमाणेंच अनन्तादिकांच्या नांवांनीं क्षण व गन्ध द्यावींत. त्यानंतर पुष्प, धूप, दीप, वस्त्र वगैरे देऊन पानें मांडावींत आणि त्यांवर सर्व पदार्थ वाढल्यावर प्रोक्षण करुन

’सर्पाय इदं अन्नं परिविष्टं परिवेक्ष्यमाणंच दत्तं दास्यमानंच आतृप्तेः

अमृतरुपेण स्वाहा सम्पद्यन्तां न मम’

असें म्हणावें व अन्न अर्पण करावें. अनन्तादिकांबद्दलही असेंच करावें. ब्राह्मणभोजनानंतर ’भो सर्प अयं ते बलिः’ वगैरे नाममंत्रांनीं बलिदान करावें व पिण्डांची वस्त्रादिकांनीं पूजा करावी. हें सारें सव्यानेंच करावें. तांदूळ, दक्षिणा वगैरे ब्राह्मणांना देऊन आचार्याची पूजा करावी आणि कलशांत सोन्याच्या नागाची आवाहनादिक षोडशोपचारें पूजा केल्यावर---

’ब्रह्मलोकेच ये सर्पाः शेषनागपुरोगमाः ।

नमोस्तु तेभ्यः सुप्रीताः प्रसन्नाः सन्तु ते सदा ॥

विष्णुलोकेच ये सर्पा वासुकिप्रमुखाश्चये । नमोस्तु०॥

रुद्रलोकेच ये सर्पास्तक्षकप्रमुखास्तथा । नमोस्तु०॥

खाण्डवस्य तथा दाहे स्वर्गं येच समाश्रिताः ॥नमोस्तुते० ॥

सर्पसत्रेच ये सर्पा अस्तिकेन च रक्षिताः ।नमोस्तु० ॥

मलये चैव ये सर्पाः कर्कोटप्रमुखाश्चये । नमोस्तु० ॥

धर्मलोके च ये सर्पा वैतरण्यां समाश्रिताः ।नमोस्तु०॥

ये सर्पाः पार्वती येषु दरीसन्धिषुं संस्थिताः । नमोस्तु० ॥

ग्रामेवायदिवारण्ये ये सर्पाः प्रचरन्ति हि । नमोस्तु० ॥

पृथिव्यां चैव ये सर्पा ये सर्पा बिलसंस्थिताः ।नमोस्तु० ॥

रसातलेच ये सर्पा अनन्ताद्यामहाबलः । नमोस्तु० ॥’

अशी प्रार्थना करावी व देशकालादिकांचा नंतर उच्चार करुन---

’कृतसर्पसंस्कारकर्मणः सांगतार्थं इमं हैमं नागं सकलशं

स्वस्त्रं सदक्षिणं तुभ्यं अहं संप्रददे नमम

अनेन स्वर्णनागदानेन अनन्तादयो नागदेवताः प्रीयन्ताम् ॥’

असा संकल्प सोडावा आणि कलशांत स्थापन केलेला नाग दान करावा, आचार्याला गोदान द्यावें व ---

’यस्य स्मृत्याच० मयाकृतं सर्पसंस्काराख्यं कर्मदद्भवतां

विप्राणां वचनात्परमेश्वरप्रसादात्सर्वं परिपूर्णमस्तु ।’

असें म्हणून कर्माची समाप्ति करावी. ब्राह्मणांनीं ’तथास्तु’ असें म्हणावें. ब्राह्मणांचा सन्तोष करावा. कर्माची सांगता होण्यासाठीं ब्राह्मणांना भोजन द्यावें. या विधीनें जर सर्पसंस्कार केला, तर मनुष्य त्वरित निरोगी होऊन, त्याला चांगली संतति प्राप्त होते.

N/A

References : N/A
Last Updated : May 09, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP