मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|धर्मसिंधु|तृतीयपरिच्छेद : पूर्वार्ध १|
गर्भाधानहोम

धर्मसिंधु - गर्भाधानहोम

हिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे.
This 'Dharmasindhu' grantha was written by Pt. Kashinathashastree Upadhyay, in the year 1790-91.


पहिल्या ऋतूच्या शांत्यर्थ जें स्त्रीगमन करणें तें गर्भाधानासंबंधाचा होम केल्यावर करावें. दुसर्‍या खेपेपासून पुढें केव्हांहि होमाची जरुरी नाहीं. ज्यांच्या सूत्रांत होम सांगितलेला नाहीं, अशांनीं होम न करितां मंत्रपाठादि रुपानेंच पहिला गर्भाधानसंस्कार करावा. अग्निहोत्री, अर्धाधानी (गृहाग्नि ठेवणारा अग्निहोत्री) आणि अनाहिताग्नि (फक्त स्मार्ताग्नि ठेवणारा) यांचा अग्नि जर सिद्ध असेल, तर त्यावरच होम करावा. अग्नि नाश होऊन बाराहून जर कमी दिवस झाले असतील, तर ’अयाश्चा’ या मंत्रानें तुपाच्या आहुतीनें होम करावा आणि बारापेक्षां जर अधिक दिवस झाले असतील, तर प्रायश्चितपूर्वक पुन्हां सन्धानविधीनें अग्नि उत्पन्न करुन, त्यावर होम करावा. दर वर्षास प्राजापत्याचे जें कृच्छ्रप्रायश्चित करावें, त्याचा संकल्प असा :-

’ममगृह्याग्निविच्छेददिना दारभ्यैतावन्त कालं गृह्याग्निविच्छेदजनितदोषपरिहारद्वाराश्रीपरमेश्वरप्रीत्यर्थं

गृह्याग्नि विच्छेददिनादाभ्यैतावदब्दापर्यन्तं प्रत्यब्दं एकैककृच्छ्रान्यथाशक्तितत्प्रत्यान्मायगोनिष्क्रयीभूतरजतनिष्कार्धनिष्कपादनिष्कपादार्धान्यतमद्रव्यदानेन

अहं आचरिष्ये तथा एतावद्दिनेषु गृह्याग्निविच्छेदेन लुप्तसायंप्रातरौपासन होमद्रव्यं लुप्तदर्शपौर्णमासस्थालीपाकादिकर्मपर्याप्तव्रीह्याद्याज्य्द्रव्यंच तन्निष्क्रयं वा दातुमहमुत्सृजे’ ।

कृच्छ्राच्या ऐवजीं जर दुसरा प्रत्यान्माय करणें असेल, तर तसा उच्चार करावा. ऐशीं गुंजा म्हणजे जो एका निष्काचा चतुर्थांश होतो, त्याची चौपट (तीन तोळे व चार मासे) केली म्हणजे एक निष्क असा संकल्प करुन, ’विच्छिन्नस्य गृह्याग्ने: पुनः सन्धानं करिष्ये’ या संकल्पानें आपापल्या सूत्राप्रमाणें गृह्याग्नि तयार करावा. सर्वाधानी (गृह्याग्नि न ठेवणारा अग्निहोत्री) जो असेल त्यानेंही अशाच तर्‍हेनें पुन्हां सन्धानानें गृह्याग्नि उत्पन्न करुन, त्यावर-गर्भाधान, पुंसवन इत्यादिकांचा होम करावा. त्याबाबतींत कृच्छ्राचा किंवा होमादि द्रव्यदानाचा संकल्प करुं नये. फक्‍त ’गर्भाधानहोमकर्तुं गृह्यपुनःसन्धानंअ करिष्ये’ इतकाच संकल्प करावा. गर्भाधान झाल्यानंतर अग्नीचा त्याग करावा. जे अर्धाधानी असतात. त्यांच्या बाबतींतही दोन पक्ष आहेत. १) गृह्याग्नीवर संध्याकाळीं व सकाळीं होम आणि स्थालीपाक करावेत हा पहिला पक्ष व २) गृहाग्नि फक्त रक्षण करुन, त्यावर होम वगैरे कांहीं करायाचें नाहीं हा दुसरा पक्ष. पहिल्या पक्षाच्या बाबतींत मागें सांगितल्याप्रमाणें होमादिद्रव्यदान करावें आणि दुसर्‍या म्हणजे होमादि न करण्याच्या पक्षीं फक्त प्रायश्चित करावें, द्रव्यदान करुं नये. दोन अग्नींना संसर्ग होण्याच्या आधीं जर दोन्ही अग्नि नष्ट होतील, तर दोन्ही अग्नींचा विच्छेद झाल्या दिवसापासून वर्षें मोजून त्याप्रमाणें दोन बायका असलेल्या नवर्‍यानें--निरनिरालीं कृच्छ्र प्रायश्चितें, निराळें होमद्रव्यदान आणि स्थालीपाकाच्या द्रव्याचें दान-हीं करुन, पुन्हां सन्धानपूर्वक दोन अग्नि उत्पन्न करावे. व त्यांचा संसर्ग करुन त्यावर गर्भाधानाचा होम करावा. दोन अग्नींचा संसर्ग होण्यापूर्वीं जर एक अग्नि नष्ट झाला, तर त्यापुरतें प्रायश्चित्त करुन, त्याच्या होमद्रव्याचें दान मात्र करावें, स्थालीपाकद्रव्याचें दान करुं नये. दुसरी बायको जर जवळ नसेल तर ज्या भार्येचें गर्भाधान करावयाचें असेल, तिच्या अग्नीच्या विच्छेदाचें प्रायश्चित्त वगैरे करुन, गृह्याग्नि उत्पन्न करावा. आणि त्यावर होम करावा. स्थालीपाकाला जर सर्वत्र आरंभ झाला नसेल, तर पुनः- सन्धानाच्यावेळीं स्थालीपाकद्रव्याचें दान करावें अथवा करुंहि नये. याप्रमाणें यथायोग्य असा गृह्याग्नि तयार करुन,

’मम अस्यां भार्यायां संस्कारातिशयद्वाराऽस्यां जनयिष्यमाण

सर्वगर्भाणां बीजगर्भसमुद्भवैनोनिबर्हणद्वारा श्रीपरमेश्वरप्रीत्यर्थं

गर्भाधानाख्यं कर्म करिष्ये तदङ्‌गत्वेन स्वस्तिवाचनम्’

असा संकल्प केल्यावर पुण्याहवाचन, मातृकापूजन, नान्दीश्राद्ध वगैरे करावींत व आपल्या गृह्यसूत्राप्रमाणें गर्भाधानसंस्कार करावा. या ठिकाणीं गर्भाधानकर्माची देवता ब्रह्मा असल्यानें पुण्याहवाचनांत ’कर्माङ्‌गदेवता ब्रह्माप्रीयताम्’

आणि स्थालीपाकाच्या आरंभीं ’अग्निः प्रीयताम्’ असें उच्चार करावेत. बाकीच्या कर्मासंबंधानें इतर ग्रंथांत माहिती पाहावी.

N/A

References : N/A
Last Updated : May 09, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP